आत्या
“नाना चौक, ग्रँड रोड, मुंबई. ”येथील ईश्वरदास मॅन्शन या सुखवस्तू लोकांच्या इमारतीत माझे आजोबा (आईचे वडील) राहत. मम्मी (आजी) संध्या, (मावस बहीण) आणि भाईंची बहीण असे चौघेजण त्या इमारतीतल्या ब्लॉक मध्ये पहिल्या मजल्यावर राहत. अतिशय शिस्तबद्ध, नीटनेटकं, आखीव चौकटीतलं त्यांचं आयुष्य होतं. या चौघांपैकी भाईंची बहीण म्हणजे आईची आत्या आणि सवयीने आम्ही सगळेच तिला आत्या म्हणत असू.. तिचं एक वेगळं व्यक्तिमत्व लहानपणापासून नकळत माझ्या मनावर ठसलेलं आहे. वास्तविक तिच्या आयुष्याचा पूर्वेतिहास मी कधी जाणून घेतलेला नाही. माझ्यापुरतं आणि खरं म्हणजे आम्हा सर्वच कुटुंबीयांपुरतं आत्याबद्दल जे माहीत होतं ते हेच की तिच्या पतीचे निधन झाल्यानंतर भाईंनी तिचा भावाच्या मायेने आणि कर्तव्य बुद्धीने सांभाळ केला. तिला ते त्यांच्या घरी घेऊन आले. तेव्हापासून ती भाईंबरोबरच राहत होती.
आत्याला “वसंतप्रभा” नावाची एकुलती एक मुलगी होती. ती मात्र भाईंच्या घरी आत्याबरोबर कधी राहत असल्याचं स्मरत नाही शिवाय जेव्हापासून आत्याबद्दल माझ्या आठवणी आहेत त्यावेळी वसंतप्रभाचे लग्न झालेले होते आणि ती तिच्या पतीबरोबर सुखाने डोंबिवलीत संसार करत होती. मधून मधून ती तिच्या कमलिनी नावाच्या मुली बरोबर आत्याला भेटायला भाईंकडे येत असे. त्यावेळी आत्याच्या चेहऱ्यावरचा ओसंडून जाणारा आनंद मात्र मला आठवतो. नात आणि मुलगी भेटल्याचे समाधान तिच्या चर्येवर दिसायचं शिवाय माझी आई, मावशी आणि वसंतप्रभा यांच्यातलं बहिणी बहिणींचं नातंही तसं उल्लेखनीय होतं.
मी सात-आठ वर्षाची असताना मम्मी गेली. आजोबांचं आणि आजीचं विलक्षण प्रेमाचं नातं होतं. आजी गेल्यानंतर आजोबा खूपच एकाकी झाले. प्रचंड मानसिक पोकळीत ते जगत होते त्या वयात मला एवढी जाण नव्हती पण मम्मीचं आणि आत्याचं जे नणंद भावजयीचं नातं होतं ते काहीसं घर्षणयुक्तच होतं. आत्या असहाय्य, निराधार म्हणूनच भाईंनी तिच्या बाबतीतलं भावाचं नैतिक कर्तव्य सांभाळलं होतं आणि मम्मीनेही त्यांच्या या भावनेला दुःख पोहोचेल असं वर्तन कधीही केलं नाही पण कुठेतरी अंतस्थ तिची घुसमट होत असावी. त्याचा परिणाम तिच्या प्रकृतीवर व्हायचा. खरं म्हणजे या मानसिक कोंडीचा ताप माझे आजोबाही सोसत असावेत पण भेगाळलेलं नातं कधी तुटलं नाही हे महत्त्वाचं. शिवाय चार भिंतींच्या पलीकडे हे पडसाद कधी गेले नाहीत. आजी-आजोबांचे घट्ट प्रेमळ नातं आणि भावाच्या संसारातलं आत्याचं समंजस! गृहीत धरलेल्या नात्याचं अस्तित्व याला मात्र कधी तडा गेला नाही. आजी असतानाही आणि ती गेल्यानंतरही.
आजी गेल्यानंतरची आत्या मला अधिक आठवते. एकट्या पडलेल्या भावाचा आधार म्हणून बहिणीच्या मायेने आजोबांची मनापासून काळजी घेणारी आत्या माझ्या मनात राहिलेली आहे. माझ्या मनातली आत्या वृद्धत्वाकडे झुकणारी होती. तिची राहणी अतिशय टापटीपीची होती. ती नेहमीच पांढरी फुलाफुलांचे प्रिंट असलेली, स्वच्छ नऊवारी लुगडी नेसायची. तिने तिच्या लुगड्यांना कधी इस्त्री केलेली मी पाहिली नाही तरीपण तिच्या साड्या अगदी व्यवस्थित घडी असलेल्या इस्त्री केल्यासारख्याच वाटायच्या. तिचा रंग गोरा, चमकदार होता. डोक्यावरचे केसही ती आवरून सावरून त्याचा घट्ट बुचडा बांधायची. मध्यम बांध्याची आणि मध्यम उंचीची आत्या दिवसभर घरातली काम करूनही मला कधी विस्कटलेली, थकलेली वाटलीच नाही. जसे माझे आजोबा शिस्तीचे आणि स्वच्छतेचे भोक्ते होते तशीच आत्याही होती. ओंगळपणा, रेंगाळणं, कसंतरी उरकणं हे तिच्या स्वभावातच नव्हतं.
आजोबा, संध्या आणि नंतरच्या काळात आणखी एका सदस्याची वाढ झाली होती आणि ती म्हणजे माझी मोठी बहीण ताई हिची. दर मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही आणि मावशीचा परिवार भाईंकडे राहायला जायचो. स्वयंपाकाचा सर्व भार आत्याच पेलायची. आम्ही मुलं मात्र खेळातच रमलेले असायचे. आई, मावशी तिच्या कामात हातभार लावायच्या पण मुख्य सूत्रधार आत्याच. विलक्षण चव होती तिच्या हाताला! तिच्या हातच्या एकेका पदार्थाची चव जिभेवर आजही रेंगाळते. इतकंच नव्हे तर, ”आजची तुझी शेंगांची आमटी अगदी आत्यासारखीच जमलीय” असं कोणी म्हटलं की १०० पैकी १०० मार्क मिळवल्याचा आनंद होतो. पदार्थ नुसता चविष्टच नाही तर त्याचे रंग, रूप, नेटकेपणा, आकर्षक मांडणी याबाबतीत आत्याचा हात कोणीच धरू शकणार नाही. इतके सारे पदार्थ ती एकाच वेळी बनवायची पण कधीही ओट्यावर पसारा नाही, वेडावाकडा भाज्या कापल्यानंतरचा कचरा नाही. मसाल्याच्या डब्यातले पदार्थही कधी एकमेकात मिसळले नाहीत. ज्यात शिजवले जायचं ते भांडंही कधी लडबडलेलं नसायचं. सगळं अगदी नीटनेटकं, स्वच्छ, चकचकीत. त्यावेळी आत्याच्या या सवयीचा धाकच वाटायचा. तिला मदत करावी की न करावी असाच प्रश्न पडायचा मला. कारण “राम ! राम ! राम! काय बाजार मांडून ठेवला आहे.” असं म्हणून ती उगीच फटकारेल याचंच भय वाटायचं.
मे महिन्याच्या सुट्टीतला पापड लाटण्याचा एक मोठा कार्यक्रम आत्याबरोबरचा असायचा. आदल्या दिवशीच आत्या वर्षभर कपाटात सांभाळून ठेवलेली पोळपाट- लाटणी धुवून पुसून ठेवायची. आजोबांच्या घरातल्या, दिवाणखान्याला लागून असलेल्या ऐसपैस गॅलरीत जुन्या स्वच्छ साड्या अंथरायच्या,, चारी टोकांवर वजनं ठेवून द्यायची, पापडाचे पीठ बांधून कुटणं ओढणं आणि लाट्यांना तेलात घोळवून ठेवणं ही सगळी कामं आत्याच्या देखरेखी खालीच व्हायची. जराही इकडचे तिकडे झालेलं मला आठवतच नाही. लाटलेले पापड एखादी रांगोळी काढावी तशी ती एकसारखी रांगेत वाळत घालायची. हा पापडांचा कार्यक्रम तसा दोन-तीन दिवस चालायचा. रात्रीच्या जेवणात खिचडी बरोबर तो ताजा ओलसर तळलेला बुडबुडे आलेला कुरकुरीत पापड खायला काय मजा यायची! एकदा का उंच पत्र्याच्या कोठीत हे वाळलेले पापड व्यवस्थित भरले गेले की पापड मिशन संपायचं.
आज सगळं आठवून लिहितानाही मला खूप काही हरवून गेल्याची भावना सतावते. लहानपणी या घरातल्याच उपक्रमांनी आम्हाला खूप शिकवलं. एकत्र सामुदायिकपणे काम करण्याचा आनंद, मेहनत, चिकाटी आणि एक प्रकारचे स्वनिर्मितीचे समाधान काय असते हे अनुभवायला मिळाले. त्याचे महत्त्व त्यावेळी नसेल जाणवलं पण आज बाजारातून सारं काही रेडिमेड आणून रेखीव वेष्टनातून सोडवून, दिसण्यास आकर्षक असणाऱ्या पदार्थांना स्वाहा करताना त्यात हरवलेलं, कधीही न सापडणारं, ज्याला नावही देता येणार नाही असे काहीतरी मी शोधत राहते. त्यावेळी घरोघरी अशा रांधणाऱ्या, राबणाऱ्या गृहिणींमधली स्त्री आणि माझ्यात वास करणारी आजच्या आणि उद्याच्या मधली स्त्री यांना तुलनात्मक रीतीने जेव्हा मी पाहते ना तेव्हा आत्याचं कुठल्याही कामात मनापासून झोकून देणारं, शिस्तप्रिय आणि हसतमुख व्यक्तिमत्व मी विसरू शकत नाही. शिवाय याही पार्श्वभूमीवर आत्याचं एक वेगळं अस्तित्व होतं. भावाच्या संसारात राहूनही तिनं तिचं एक विश्व निर्माण केलं होतं. ती रसिक होती कलाकार होती. झाडं, पाना -फुलांची तिला मनस्वी आवड होती.
गच्चीच्या एका कोपऱ्यात कुंड्यांमधून तिने अनेक झाडं लावली होती. जास्वंदी, गुलाब, मोगरा, तुळस झिपरी टेबल पामसारखी बरीच झाडं तिने लावली होती आणि त्या झाडांची निगा ती स्वतः राखत असे. त्यांना पाणी घालणं, माती कोरणं, आकार देणं सारं काही इतकं कलात्मकतेने ती करायची ! कुठेही पाण्याचे, मातीचे वेडेवाकडे सांडलेले ओघळही दिसायचे नाहीत. रोज सकाळी अगदी अलगद गुलबक्षी, सदाफुली, तगरीची फुले तोडून देव्हार्यात पूजेसाठी ठेवायची. पूजा बहुतेक आजोबाच करायचे. कधी कधीच आत्या करायची. देवांना धुवून पुसून चंदन, गंध फुलं वाहून, उदबत्तीच्या वासात निरांजनाच्या मंद प्रकाशात देव्हारा कसा छान उजळायचा ! आत्याची पूजाही कशी देखणी असायची, सुंदर असायची. सजलेल्या त्या देवांकडे पहातच रहावसं वाटायचं. कदाचित त्यावेळी पूजाअर्चा म्हणजे रिकामे उद्योग, एक काम असंच वाटायचं का? आज मात्र याही रिकाम्या उद्योगाचे अर्थ निराळे जाणवतात. चित्त एकाग्र करण्याचा तोच एक संस्कार नव्हता का? आणि कुठल्याही कामात सौंदर्याची जपणूक कशी करायची आणि का करायची याचाही एक वस्तूपाठ मनावर नकळतपणे बिंबवला गेला होता.
आमच्याशिवाय आत्याने स्वतःचा असा परिवार जमवला होता. खरं म्हणजे ईश्वरदास मॅन्शन मध्ये राहणारी सगळीच कुटुंबं आर्थिकदृष्ट्या भक्कम होती. अनेकजण उद्योग, व्यवसाय, सरकारी कामकाजात उच्च हुद्द्यावर होते. सर्वांचीच राहणी, उच्च, उंच आणि वेगळ्या दर्जाची होती पण अशाही माणसांच्या समूहात आत्याला रमाबेन, शहाबेन, लाठीबेनसारख्या जिवलग मैत्रिणी लाभल्या होत्या.त्या आत्याच्या चाहत्या आणि प्रशंसक होत्या. त्या अगदी प्रेमाने, आपुलकीने आत्याला भेटायला येत, गप्पा मारत. आत्या म्हणजे “विमलबाई पंढरीनाथ दिघे” अस्सल मराठी पण या गुजराती बायकांशी तिचे चांगलेच जमायचे. आत्या त्यांच्याशी फक्कड गुजराती भाषेत बोलायची तेव्हा खूपच मजा वाटायची. आत्याचे बेसन लाडू आणि रमाबेनचे ढोकळे एकमेकांच्या घरात आवडीने खाल्ले जायचे. शिवाय या मैत्रीतला एक महत्त्वाचा धागा म्हणजे आत्याची कलाकारी. आत्या अतिशय सुरेख बारीक धाग्यांचे, मणी लावलेले क्रोशाकाम केलेले बटवे सफाईदारपणे विणायची. आत्याचे बटवे साऱ्या बिल्डिंगमध्ये प्रसिद्ध होते. आत्याच्या या बटव्यांना मोठमोठी गिऱ्हाईकं रमाबेन, लाठीबेन आणून द्यायच्या. बटवे विकून आलेल्या पैशात ती तिचे वैयक्तिक खर्चही भागवू शकायची. त्याच पैशातून ती तिच्या मुलीसाठी नातीसाठी भेटी आणायची.
दुपारी आवर सावर झाली की ती मधल्या खोलीतल्या मोठ्या खिडकीजवळ कॉटवर बसून तिचं विणकाम उघडायची. मग्न होऊन एकचिताने विणकाम करणारी आत्या आजही माझ्या नजरेसमोर आहे. ती क्रोशाची सुई, त्यावर घातलेले टाके आणि त्यातून धाग्यांची वीण उलगडवत जाणारी तिची गोरीपान काहीशी वक्र झालेली बोटं मला आजही दिसतात. विणकाम संपलं की ती स्वतःच्याच हाताने तिची मनगटं दाबायची. त्यावेळी नकळतपणे मी एका सक्षम, स्वावलंबी, सहनशील स्त्रीच्याच रूपात तिला पहायचे.
पाणी आणि प्रतिबिंब ही दोन्हीही नजरेला त्यांच्या अस्तित्वाप्रमाणे वेगवेगळी दिसतातच. भावाच्या आधाराने जीवनाचा डोंगर चढणाऱ्या आत्यालाही तिचं अस्तित्व होतं. स्वावलंबनाची सक्षम धार तिथे होती. आत्या निराधार असेल कदाचित पण ती लाचार कधीच नव्हती. तिच्या अंगच्या गुणांना तिने कधी पेटीत बंद करून ठेवले नाही. तिच्या कलाकारीला तिने छंद आणि व्यवसायाचे रूप दिले. तिने धाग्यांच्या, शिंपल्यांच्या, कवड्यांच्या अनेक बाहुल्या बनवल्या, कपडे शिवून कापूस भरून पक्षी, प्राणी, जलचर बनवले, झबली, स्वेटर, टोपरी, मोजे विणले, साड्यांना लावण्यासाठी सुंदर किनारी, सुती फुलं केली, नाना प्रकारची तोरणे ही बनवली. फॅशन शोसाठी उपयोगी पडणारी वस्त्रे तिने कुणाकुणासाठी शिवली या साऱ्यांची गणतीच नाही.
आमच्या ज्ञाती वर्धापन दिनानिमित्त भरणाऱ्या कला प्रदर्शनात आत्याने अनेक बक्षीसंही मिळवली. व्यक्ती स्वातंत्र्य जपणार्या त्याकाळच्या स्त्रियांमध्ये मी आत्याला प्रातिनिधिक स्वरूपात पाहते. आज वाटतं आत्या नावाचा एक मूर्तीमंत कुटीरोद्योगच आमच्या आयुष्यात होता. खूप शिकलं, खूप पदव्या घेतल्या, खूप कीर्ती मिळवली, खूप माया जमवली, वर्तमानपत्रातून, स्क्रीनवर चमकलात म्हणजेच तुम्ही तारे झालात का? पण आमच्या आत्या सारखे फारसे न चमकलेले तारे कधी कधी आपल्या घरातच असतात. त्यासाठी वैज्ञानिक दुर्बिणीची गरज नसते. असे तारे पाहण्यासाठी मनाचीच दुर्बीण करावी लागते….
क्रमश:

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800