Wednesday, April 23, 2025
Homeलेखमाझी जडणघडण : ४४

माझी जडणघडण : ४४

आई”

मला आईची महानता तेव्हाच खऱ्या अर्थाने जाणवली जेव्हा मी स्वतः आई झाले. मातृत्व या शब्दाची, या व्याख्येची, भावनेची खरी व्याप्ती आणि जाणीव तेव्हाच झाली जेव्हा मी स्वतः आई झाले. तेव्हा कळलं “माता अनंताची” म्हणजे नक्की काय ? मुलांना जन्म दिला की आई ही पदवी जरूर मिळते पण आईपण म्हणजे केवळ मुलाला जन्म देण्यापुरतंच नसून ते त्याच्या शारीरिक आणि मानसिक संगोपनात, जडणघडणीत, त्यास सुविचारी, संस्कारी करण्यात सामावलेलं असतं आणि ही आयुष्यभराची अखंड विस्तृत प्रणाली आहे. असं आईपण निभावताना जेव्हा जेव्हा माझी दमछाक झाली तेव्हा तेव्हा माझ्या मनाच्या गाभाऱ्यात हेच उद्गार घुमले, ”आई ! तू कसं केलंस गं ? मला तर दोनच मुली आहेत. तू आम्हा पाचही बहिणींचं काटेकोरपणे संगोपन कसं केलस ? आमची आजारपणं, रात्रीची जागरणं, आमच्या आवडीनिवडी, खाणंपिणं, वेण्याफण्या सतत आमच्यासाठी.. अगदी अंतर्वस्त्रांपासून ते सुंदर डिझायनर्स पोशाख शिवणे प्राथमिक वर्गातला अभ्यास घेणे, शाळेत जाताना आमचं दप्तर भरणं, मधल्या सुट्टीतला डबा देणं, त्यानंतरही आमच्या उमलत्या वयातले मूडस, शैक्षणिक टप्पे, प्रेमप्रकरणं, लग्नं, बाळंतपणं एक ना अनेक. तुझ्या या अफाट कार्याची यादी सुद्धा करणे मला जमणार नाही. प्रत्येक वयाचे टप्पे ओलांडताना तू आमच्याबरोबर खंबीरपणे असायचीस, डोळसपणे, जाणीवपूर्वक असायचीस म्हणूनच आमच्या जीवनातील अनेक वेगवेगळी वळणं आम्ही सहजपणे पार करू शकलो. तेव्हा मी तुला केवळ गृहीत धरले. आईपणा व्यतिरिक्त तुझ्यात असलेलं एक निराळं व्यक्तिमत्व आम्हाला तेव्हा ना कळलं ना कळून घेण्याची आम्हाला गरज वाटली. एक व्यक्ती म्हणून आयुष्याबद्दल तुझी काही निराळी कल्पना, विचार होते का हा कधी विचारही आम्ही केला नाही.”
आता उपकृत भावनेने जेव्हा मी आईचा विचार करते तेव्हा ती वेगवेगळ्या अनेक रूपात उलगडत जाते.

खरं म्हणजे विसाव्या शतकातला पूर्वार्ध म्हणजे १९२०/२१ चा काळ एकंदरच खूप वेगळा होता. विशेषतः स्त्रियांसाठी. त्या काळात आई ग्रँटरोडच्या “सेंट कोलंबस” या कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थिनी होती. तिला मराठी सोबत इंग्रजीचेही उत्तम ज्ञान होते. शिवाय मुंबईसारख्या मोठ्या आणि महत्त्वपूर्ण नगरीत तिचे बालपण गेले. आजोबांची शिस्त, टापटीप आणि काहीसं पाश्चात्त्य पद्धतीचं वळण तिच्या नसानसात भिनलेलं होतं त्या तुलनेत, आईचं पप्पांशी लग्न झाल्यानंतरचं वातावरण खूप वेगळं होतं. ठाण्याच्या धोबी गल्लीतल्या, फारशा सुविधा नसलेल्या एकमजली घरात आणि ज्या घरात माझ्या आजीचा प्रभाव होता तिथे तिने स्वतःला कसे सामावून घेतले असेल ? सुरुवातीला तर त्या घरात इलेक्ट्रिसिटी नव्हती, स्वयंपाकासाठी चूल होती, शेगडी होती. माझ्या आठवणीत चुलीवर गरमागरम भाकऱ्या करणारी आई अजूनही आहे. ज्या बोटांनी आईने अनेक सुंदर पेंटिंग्स केली होती, कित्येक विणकामं, भरतकामं केली होती त्याच हाताने चुलीतली लाकडं पेटवून अथवा सांजवेळी रात्र होण्याच्या आत कंदीलाच्या काचा पुसून घासलेट भरून वाती पेटवताना तिला कधी वैषम्य वाटले असेल का ? की, त्यावेळी आजूबाजूच्या बहुतांश स्त्रियांचे आयुष्य असेच होते… ? “रांधा वाढा उष्टी काढा” याच समूहातले मग आपल्या आईने वेगळा सूर का लावला नाही हा विचार बालपणीतरी आमच्या मनात येण्याचा संभवच नव्हता आणि तिने जर वेगळा सूर लावला असता तर आमच्या आयुष्याचं काय झालं असतं या विचाराने आता माझ्या अंगावर काटा सरसरतो तेव्हा मातृत्वाची खरी व्याख्याही कळते.

वास्तविक त्या काळातही ती रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरी करत होती. जात्याच ती खूप हुशार आणि मेहनती होतीच. मनात आणलं असतं तर तिने तिथे विशेष कामगिरी करून उच्चपदी पोहोचून स्वतःचं आर्थिक स्वातंत्र्य, ओळख आणि अस्तित्व मिळवलं असतं पण आमच्या जडणघडणीचं एक महत्त्वाचं “जूं” जणू तिच्या मानेवर तिनं पेललं आणि या सर्व स्वकेंद्रित जाणिवांतून ती सहजपणे बाहेर पडली.
“आई ! खूप वेळा आणि या क्षणी मला एक अपराधी भावना स्पर्शून जाते. आमच्या संपूर्ण जडणघडणीवर पप्पांच्या विद्वत्तेचा, शिकवणीचा, त्यांच्या नाना प्रकारच्या आवडी आणि रसिकतेचा पगडा निश्चितच आहे. तसेच जिजी म्हणजे आमची आजी .. जिच्या मायेच्या अखंड प्रवाहाची शीतलता आम्ही आयुष्यभर अनुभवली आणि नकळत का होईना आमच्या मनी सतत जिजी आणि पप्पांच्याच आठवणी सहजपणे येत असतात पण खरं म्हणजे जिजी आणि पप्पा आमच्यासाठी संरक्षक भिंती होत्या, तर तू आमचं छत होतीस.”

आईला जेव्हा मी निराळेपणाने पाहते तेव्हा जाणवते ती आईची मुळातली सौंदर्यदृष्टी. जिजी आणि पप्पांच्या मधली आई एक व्यक्ती म्हणून फार वेगळी होती. त्याचं कारण तिच्या जडणघडणीची पार्श्वभूमीच निराळी होती. तरीही तिने कधीही कसलाही अहंकार बाळगला नाही. सासू म्हणून तिने जिजीला आणि पती म्हणून पप्पांचा तिने सतत मान राखला आणि समांतरपणे तिने तिची शिस्त, टापटीप, स्वच्छता, घर अडचणीचं असलं तरी कसं सुंदर राखावं याचे धडे नकळत आम्हाला गिरवायला लावले.

“आई रागवेल, आई ओरडेल आईला हे आवडणार नाही” हे भय आम्हाला अनेकदा जिजीच्या कुशीत शिरायला लावायचं पण आईच्या धाकदपटशाने आमच्या आत, कुठेतरी सैरावैरा मोकाट वाढलेलं गवत माळ्याने कात्रून छान आकार द्यावा तसा आकार आम्हाला नक्कीच मिळवून दिला. आईच्या प्रेमाची आणि जिजीच्या मायेची जातच वेगळी होती आणि आज मी या दोघांचं महत्त्व जाणते कारण मी एक आई आणि एक आजी याचा भिन्नपणे या दोन्ही भूमिका जगताना विचार करू शकते. आई आईच असते आणि आजी आजीच असते. दोघीही फक्त प्रेमच करतात पण दोघींच्या प्रेमाचे रंग वेगळे असतात.

सुट्टीच्या दिवसात आई आम्हाला विणकाम, भरतकाम, पेंटिंग्स करायला शिकवायची. एकदा मी विणलेली एक कलाकृती पाहून ती मला म्हणाली, ”हे काय असं विणून ठेवलेस ? किती सैल आहे ते ? सुईवरचे टाके घट्ट टाकले की वीणही घट्ट होते. मग टाके असे सुटत नाहीत. सारं उसवून पुन्हा विणायला घे. ”आईचं हे सहजपणे उच्चारलेलं वाक्य माझ्यासाठी कायम ब्रह्मवाक्य ठरलं. आयुष्यातली अनेक नाती जपताना माझी जेव्हा जेव्हा होरपळ झाली तेव्हा आईचे हे शब्द नेहमीच कानी राहिले. नात्यांची वीण कशी घट्ट ठेवावी याची महान शिकवण आईने आम्हाला वेळोवेळी दिली ती तिच्या वागण्यातूनही. तिने सासरची माहेरची सगळी नाती प्रेमपूर्वक आणि कर्तव्य बुद्धीने सुद्धा जपली.

आईच्या आणि जिजीच्या नात्यातला घट्टपणा आणि ठिसूळपणा दोन्हीही गंमतीदार होता. जिजीने आईवर आणि आईने जिजीवर मनापासून प्रेमच केलं. दोघींच्यात मतभेद होत, खटके उडत पण आईला कधी कुठून घरी परतायला उशीर झाला तर जिजी लगेच देव पाण्यात ठेवायची. ”का गं ? मालू रस्ता तर चुकली नसेल ना ?” असं सतत आम्हाला विचारत राहायची. आईच्या बाबतीत ते खरंही होतं. आईला कधी कधी पटकन रस्ते समजायचे नाहीत. एकदा तर ती “ढग्यांचं घर कुठे आहे ?”… तेव्हा आम्ही नुकतेच नवीन घरात राहायला गेलो होतो.. असं विचारत घरी पोहचली होती. हा विनोदाचा भाग वगळला तरी जिजीला आई विषयी वाटणारी काळजी विलक्षण होती. आईला ही जिजीचं कितीही पटलं नाही तरी तिने जिजीच्या मनाविरुद्ध किंवा तिला विचारल्याशिवाय कधीही काहीही केले नाही. या पाठीमागे आईच्या मनात जिजीविषयी एक कृतज्ञतेचा भाव नक्कीच होता. वयाच्या सोळाव्या वर्षी वैधव्य आलेल्या या स्त्रीने एक तपस्विनीची भूमिका अंगीकारून चार महिन्याच्या तिच्या मुलाला एक परिपूर्ण जीवन बहाल केले होते आणि आज जे काही आम्ही सारे आहोत ते केवळ तिच्यामुळेच ही भावना आईच्या मनातून कधीही पुसली गेली नाही. नकळत आईने एक प्रकारचा सगळ्यांना जोडून राहण्याचा, समजून घेण्याचा संस्कार आम्हाला दिला. पप्पांची सगळी जीवाभावाची नाती तिने त्याच आंतरिक भावनेने जपली. आई जेव्हा गेली तेव्हा पप्पांचा धाकटा मावस भाऊ ज्याला आम्ही “पपी” म्हणायचो तो डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाला, “आज आम्ही खरे पोरके झालो ! आई जाण्याचं दुःख काय असतं हे आज कळतंय.”

आई जितकी कडक आणि कठोर शिस्तीची होती तितकीच गंमतीदारही होती. तिला नाटक, सिनेमा, क्रिकेटची मॅच बघायला मनापासून आवडायचे. त्यात ती इतकी रमायची, इतकी गुंतायची की पडद्यावर जे काय घडत आहे ते काल्पनिक आहे, अभिनय आहे हेही ती विसरून जायची.

माझी आई

एकदा आम्ही सारे मणीरत्नम् चा एक चित्रपट पाहायला गेलो होतो. बहुतेक “बॉम्बे” हाच असावा. त्यात एक मुसळधार पावसाचा सीन होता. तो कोसळणारा पाऊस पाहून आई चटकन उठली आणि आई म्हणाली “अगंबाई गच्चीत वाल वाळत घातलेत की.. ”तेव्हा माझी धाकटी बहीण आईला हसत म्हणाली, “अगं आई हा चित्रपटातला पाऊस आहे. खरा नव्हे. तुझे वाल नाही भिजणार या पावसाने.”
खेळात तिला नेहमी जिंकायलाच हवं असायचं. हरलेलं तिला चालायचंच नाही. क्रिकेटची मॅच बघताना सुद्धा कोणाचं शतक हुकलं, कोण शून्यावर आऊट झाला, तिच्यामते कोणी धाव घेऊ शकत होता आणि तरीही त्याने ती घेतली नाही तर तिची हळहळ प्रचंड असायची. तिच्या शेजारी बसून मॅच बघताना आम्हाला खूपच गंमत यायची. तिच्या कमेंट्स ऐकायला मजा वाटायची. टेलिव्हिजन तर खूप नंतर आला पण रेडिओवर पण ती त्याच आत्मियतेने क्रिकेटचं धावतं वर्णन ऐकत बसायची आणि भारताची हार होत आहे असं वाटलं की रेडिओ धाडकन बंद करायची.

तिला स्वतःलाही खेळायला खूप आवडायचं. एकदा माथेरानला सहलीला गेलो असताना तिने तिथल्या कॅरम स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. स्त्री पुरुष संयुक्तपणे आणि एकेरी खेळत होते. त्यात आईने दोन्ही विभागात विजेतेपद पटकावलं होतं. तेव्हा तिला झालेला आनंद माझ्या आजही लक्षात आहे. एक लहान मुल तिच्यात कुठेतरी दडलेलं असावं.
आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोबांकडे जायचो तेव्हा सगळे मिळून आम्ही पत्त्यातला “झब्बू” हा खेळ आवडीने खेळायचो. एका डावात आईला सतत “झब्बू” मिळत होता आणि तिच्या हातातली पानं वाढत होती. ती हरणार हे निश्चित होतं. त्यावेळी तिने चिडून हातातले पत्ते टाकून दिले आणि रागात म्हणाली, ”तुम्ही खेळा. मला नाही खेळायचं.”
त्या दिवशी मात्र आईने खेळात फार रडी खाल्ली होती पण आयुष्याच्या खऱ्या खेळात मात्र तिने कधीच रडी खाल्ली नाही. ती नेटाने लढत राहिली. जिंकेपर्यंत हरत राहिली पण तिने तिचा आत्मविश्वास कधीही ढळू दिला नाही. आमच्या घराच्या मागच्या जागेत एका नवीन वास्तूचे बांधकाम चालू होते. ज्याच्या भरवशावर पप्पा ते बांधकाम करत होते त्यानेच पप्पांना फसवले. घुसखोरी करून त्याने त्या वस्तूत मालकी हक्क गाजवायला सुरुवात केली. अनेक वर्ष कोर्टात केस चालली. तारखांवर तारखा पडत होत्या पण विजयाची माळ काही गळ्यात पडत नव्हती. त्याच दरम्यान पप्पांचं निधन झालं आणि ध्यानीमनी नसताना आईवर फार मोठी जबाबदारी पडली पण आम्हा सर्वांच्या लक्षात राहील इतका कणखरपणा आणि खंबीरपणा आईने त्यावेळी दाखवला. तोपर्यंत तिचेही वय झाले होते आणि सतत जिजी आणि पप्पांच्या अदृश्य संरक्षक कवचातच ती राहिली होती पण यावेळेस ती आत्मविश्वासाने बाहेर पडली. कोर्टाची एक एक पायरी नेटाने चढत राहिली. त्यानंतरही कितीतरी वर्ष ही केस चालली पण अखेर ती जिंकली. त्या दिवशीचा तिचा आनंद अवर्णनीय होता. तिने हात उंचावून तो व्यक्तही केला. जणू काय तिने विश्व करंडकच जिंकला होता.

जिजी गेल्यानंतर आधारवृक्ष कोसळलेल्या वेलीसारखीच तिची अवस्था झाली असावी. शेवटच्या श्वासापर्यंत जिजीचा जीव आईच्यातच गुंतलेला होता. शेवटच्या क्षणी जिजी जे म्हणाली ते मात्र काहीसं गूढ होतं पण आईच्या डोक्यावर हात ठेवून ती म्हणाली होती, ”मालू सांभाळून, जपून राहा, माझ्यामागे तुला अकरा वर्ष जगायचं आहे.”
ती अकरा वर्षं आईच्या आयुष्यातली खूप महत्त्वपूर्ण होती. त्याकाळात ती महिला मंडळात जात असे. तिथे होणाऱ्या कार्यक्रमात, स्पर्धांमध्ये, सोहळ्यांमध्ये मनापासून भाग घेत असे. अनेक बक्षीसंही तिने मिळवली. तिच्या या गुणांचे दर्शन तसं आम्हाला खूप उशिरा घडलं कारण आम्ही नेहमी पप्पांच्याच कर्तुत्ववानतेला सलाम केला. मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही म्हणतात तसंच काहीसं आईच्या बाबतीत झालं असेल.

याठिकाणी मला आईची एक आठवण सांगावीशी वाटते. पपांकडे झोटींग नावाचा एक विद्यार्थी गणित शिकायला यायचा. हा झोटींग अतिशय “ढ” होता. त्याला साध्या बेरजा वजाबाक्या जमत नसत. पपा एक दिवस त्याला चिडून म्हणाले, ”अरे बाबा ! तुला टांगासुद्धा हाकलता येणार नाही.” आईला पपांचं हे बोलणं बिलकुल आवडलं नाही. झोटींग गेल्यावर आई पपांना ठामपणे म्हणाली, “अहो सगळीच मुलं हुशार नसतात. हुशार मुलांना कुणीही शिकवेल पण झोटींगसारख्या मुलाला आत्मविश्वास मिळवून देणं ही तुमचीही कसोटी होती. त्यात तुम्ही सपशेल नापास !” पपा पूर्णपणे निरुत्तर होते.

नंतरच्या काळात मी एक दिवस आईला सहज विचारलं, ”आई तू हे सगळं सुरुवातीपासून का नाही केलंस ? आमच्यासाठी तू फक्त खमंग कुरकुरीत चकल्या करणारी, चवदार भाजणीची ढीगभर थालीपीठं थापणारी, तेलावरच्या पातळ, मुऊसूत पुरणपोळ्या आणि तत्सम बरंच काही करणारीच का राहिलीस ? आयुष्याच्या उत्तरार्धात तू तुझ्याठायी असलेल्या गुणांचं, छंदांचं जतन करतेस हेच आधी केलं असतंस तर ?”
तेव्हा आई चटकन म्हणाली, “बाळांनो ! तेव्हा माझ्या जबाबदाऱ्या वेगळ्या होत्या, मला तुम्हाला घडवायचं होतं. तुमची जडणघडण तुमची भविष्य ही महत्त्वाची नव्हती का ते ? माझ्यासाठी तेच महत्त्वाचं होतं आणि बाकी सारं दुय्यम होतं.”
आज जेव्हा मी आजच्या काळातल्या स्त्रीचा आणि त्या काळातल्या स्त्रीचा विचार करते तेव्हा कुणाचं पारडं जड, कुणाचं हलकं याचं मोजमाप करता येत नाही पण आई म्हणजे नक्की काय, याचं आकलन मात्र कुठलेही अवजड, अलंकारिक, नित्य नियमाचे, घासलेले शब्द न वापरताही मला होते.
जे तेव्हा कळलं नाही ते आता कळतं. ”हा रंग गडद आहे. हा नाही शोभणार तुला. हे फिक्या रंगाचंच कापड घे.” तयार होऊन बाहेर पडताना ती हमखास मला हटकायची. ”हे काय केस नाही नीट विंचरलेस ? नुसती झिपरट दिसतेस. जा कंगवा घेऊन ये.” तेव्हा आईचा मला प्रचंड राग यायचा. पण आता त्यापाठीमागची आईची मायेची भावना जाणवते. आपलं हे सावळं, सौंदर्यात काहीसं डावच असलेलं लेकरुही चारचौघात सुंदर दिसावं एव्हढाच तिचा भोळा भाव होता. कारण “ती आई होती म्हणोनि..”

अखेरच्या काळात कुठलाही गीताभ्यास न केलेली माझी आई संपूर्ण विरक्त, तटस्थ झालेली होती. ज्या वास्तूत ती राहत होती ती तिच्या वडिलांनी तिला दिलेली अनमोल भेट होती पण तोही पसारा पेलवण्याची शक्ती न उरल्यामुळे आणि आपल्याच मुलींच्या भविष्याचा विचार करून आणि आपल्या मागे कुठल्याही प्रकारचे कलह होऊ नयेत या भावनेने आम्हा लेकी-जावयांवर विश्वास ठेवून तिने तिची अनमोल वास्तू विकण्याचाही निर्णय घेतला आणि बजावलाही. तेव्हा म्हणाली मात्र, ”आता मला घर नाही.” थोडी गहिवरली. पण आम्ही तिला लगेच म्हणालो, ”आता तुला पाच हक्काची घरं आहेत.”

जेव्हा ती गेली तेव्हा तिने आम्हा पाचीजणींना जवळ घेतले. आमचे मुके घेतले. म्हणाली, ”मी भाग्यवान आहे. मी तृप्त आहे. माझ्या परिपूर्ण आणि सुखी जीवनासाठी मी ईश्वराची आभारी आहे. आता तुमचा निरोप घेते. सुखी रहा. एकमेकींवरची माया कायम ठेवा. आनंदाने जगा.”
त्रिभुवनातली सारी संपत्ती जरी एकत्र केली तरी त्याची किंमत तिच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या त्या दोन थेंबांच्या किंमतीपेक्षा कमीच राहील. कारण ते एका मातेचे, आशीर्वाद देणारे अनमोल अश्रू होते. त्यात संस्कारांची अजोड ठेव होती. ती गेली पण आमच्या अंगणात आनंदी जीवनाचं झाड लावून गेली.
एक गूढ मागे राहिलं. ३१ डिसेंबर २००५ साली तिचं निधन झालं. जिजीच्यानंतर बरोबर अकरा वर्षांनी.

पपा गेले, जिजी गेली, आई गेली आणि आमचं बालपण काळाच्या ओघात वाहून गेलं.
क्रमशः

राधिका भांडारकर

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. .
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी on चला, कास पठार पाहू या !
शितल अहेर on काही अ ल क
शितल अहेर on काही कविता