संध्याकाळी माझी एक मैत्रीण ईव्हींनिग वॉक घेत होती, मी सहजच म्हटलं वॉक ला आली आहेस का…?
अगं हो, डाॅक्टरनी सकाळ संध्याकाळ ‘टू टाईम’ माॅर्निग वाॅक करायला सांगितले आहे.
मला उगीच हसायला आले. सकाळी माॅर्निंग वाॅक बरोबर पण संध्याकाळी चालायला बाहेर पडतो तेव्हा आपण किती सहज माॅर्निंग वाॅक म्हणतो ना ? तिलाही हसू आले.
काही इंग्रजी शब्द इतके अंगवळणी पडले आहेत ना ! कळत नकळत आपली विचारसरणी चालतच नाही.
आपली मातृभाषा, बोलीभाषा मराठी सुंदर, श्रीमंत, वैभवी आहे. इंग्रजांना आपण ‘चले जाव’ म्हटलं, पण इंग्रजी भाषा आपल्या मानगुटीवर एव्हढी घट्ट बसली आहे की, ती जायचं म्हटलं तरी जात नाही.
मी आपल्या मराठी भाषेचा विचार करू लागली. इंग्रजी अक्षरं फक्त 26. त्याला ना काना, ना मात्रा, ना उकार, ना वेलांटी, पण जागतिक स्तरावर त्याला किती मान्यता.
आपली मराठी भाषा बरोबर दुप्पट म्हणजे 52 अक्षरांनी श्रीमंत त्यात त्या मराठीला काना, मात्रा, अनुस्वार, वेलांटी, र्हस्व, दिर्घ, आकार, उकार अशी वैभवानी नटलेली.
कानाला गोड, बोलायला छान, वाटणारी आपली मराठी भाषा. आपली भाषा जागतिक स्तरावर का नाही मिळवत मान्यता ? त्याला अनेक कारणं आहेत पण आपली मराठी ही ज्ञान भाषा झाली पाहिजे असे खूप वाटते. जगातील सर्व विषयांचे ज्ञानभांडार ज्या भाषेत उपलब्ध असते ती ज्ञान भाषा होते. जसे की इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, जपानी या भाषा ज्ञानभाषा आहेत.
भाषेचे मुख्य अंग म्हणजे त्याचे उच्चार व बोलणे. मग भाषा लिखित स्वरूपात येते ते भाषेचे दुय्यम अंग ठरते.
आपली मराठी भाषेची निर्मिती हा अभ्यासाचा विषय आहे. श्रवणबेळगोळ येथील शिलालेख ज्यावर ‘श्री चामुण्डराये करवियले, गंगाजे सुत्ताले कळविले’ हे शब्द कोरलेला शिलालेख, हा प्रथम शिलालेख म्हणून मानला जातो, तर दिवेआगर येथील ताम्रपट हा मराठीतील पहिला कोरीव लेख ठरला आहे.
कालिकदृष्टया भाषेचा विचार करताना सर्वसामान्यपणे प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन अशा संज्ञा वापरल्या जातात. ऐतिहासिक दृष्टिकोनातून विचार केला तर यादवकाल इ.स.1200 ते इ.स.1350; बहामनीकाल इ.स.1350 ते इ.स.1600; शिवकाल इ.स.1600 ते इ.स.1700; पेशवेकाल इ.स.1700 ते इ.स.1818; इंग्रजी काल 1818 ते 1874 आणि त्या नंतर अर्वाचीन काल अशी कालीक विभागणी करण्यात आलेली आहे.
भाषा ही चौकट बंद नसून प्रवाही असते. ध्वनीपरिवर्तने, तसेच अर्थपरिवर्तने भाषेत नित्य घडत असतात. भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक स्थित्यंतरे तसेच धार्मिक, आध्यात्मिक प्रभावही भाषेत बदल करतात.
आपल्या मराठी भाषेचा उगम संस्कृत भाषेतून झाला. संत वाङ्मयाचा शेकडो वर्षाचा समृद्ध वारसा मराठीला लाभला आहे. आज मराठी भाषिकांची संख्या १५ कोटी पेक्षा जास्त आहे. जागतिक क्रमवारीत मराठी दहावी तर भारतीय क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्र शासनाने मराठीला राजभाषा म्हणून मान्यता दिली. शासनाने सर्व व्यवहार मराठीतूनच व्हावे अशी सक्ती करावी. समाज काळाबरोबर बदलत असतो. भाषाही समाजाबरोबर चालत असते. भाषेचे स्वरूप मान्य करून तिच्या मूळ स्वरूपाशी तिचे नाते तुटू न देणे ही भाषिक प्रतिष्ठितांची, विद्वानांची आणि साहित्यिकांची जबाबदारी आहे.
भारत हा बहुभाषिक देश आहे. केंद्र शासनाच्या खात्यांमधील इतर भाषिक अधिकारी व सेवक यांची बदली महाराष्ट्रात किवा इतर राज्यात होते, तेव्हा मराठी भाषेचे किंवा त्या त्या राज्यातील भाषेचे प्रशिक्षण देऊन त्यांना कामावर घ्यावे. त्यामुळे शब्दाचे आदान प्रदान होत भारतातील भाषा अधिक संपन्न होतील. परंपरा आणि परिवर्तन यांचा मेळ बरोबर घातला तर मराठी भाषेचा प्रवाह अखंड चालत राहिल.
सर्व विषयांच्या अध्यापकांना, संशोधकांना, तज्ज्ञांना आपापल्या विषयांत मराठी भाषेमध्ये लिहिण्यास प्रोत्साहन करण्यात यावे. प्रत्येक विषयांतील पारिभाषिक कोश असावा.
त्यासाठी खास समित्या स्थापन करून योजनाबद्ध कार्यक्रम आयोजित करून, सुविधा निर्माण कराव्या. काही इंग्रजी शब्द, मराठी पारिभाषिक शब्द तयार करताना, साधे सुटसुटीत, पण अर्थवाही होतील याची दक्षता घेण्यात घ्यावी. असे झाल्यास आपली मराठी भाषा संपन्न होण्यास व जागतिक पातळीवर उच्च स्तरावर उंचावेल.
मराठी भाषा ही आपल्या महाराष्ट्रातील मातृभाषा आहे. शिक्षण हे मातृभाषेतच हवे. त्यामुळे बौद्धिक क्षमता, आकलनशक्ती, सृजनशीलता वाढीस लागते.ज्ञानाचा प्रवाह व शब्द संचय वाढू लागतो.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बालकांपासून आजोबांपर्यंत सगळेच जण दूरदर्शन, मोबाईल भोवती केंद्रित झालेली दिसतात. पण ज्यांना वाचनाची आवड लहानपणापासूनच आहे ती लोकं रोज कमीतकमी पुस्तकांची चार पानं तरी वाचल्या शिवाय राहणार नाही.
“ग्रंथ आमचे साथी, ग्रंथ आमच्या हाती,
ग्रंथ उजळतात अज्ञानाच्या … अंधाराच्या राती.”
परदेशात खुप ठिकाणी आपली मराठी भाषिक लोकं, आपली मराठी भाषा, मराठी शब्द अगदी विचारपूर्वक बोलण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
आपली गोड मराठी भाषा परदेशात कानावर पडली तर आपले कान टवकारून, प्रयत्न पूर्वक त्या व्यक्तीला दाद दिल्याशिवाय राहत नाही.
आपल्या देशात, महाराष्ट्रात कधी कधी उगीच इंग्रजी शब्दाची पेरणी घालून मराठी बोलताना दिसतात. फक्त नाम, सर्व नाम आणि क्रियापद फक्त मराठीत बोलतात तेव्हा आपल्या सम्रृध्द मराठी भाषेबद्दल कीव येते व वाईट वाटते.जसे की, “आज मेगाब्लॉक असेल, प्लॅटफॉर्म नंबर टू ची ट्रेन स्लो असणार, टिकीट विंडोला लाईन असणार, तिकिटाचा प्रोब्लेम होणार आपण ट्रेन कॅन्सल करू या. आणि शेअर ऑटो नी डायरेक्ट जाऊ या. मेन म्हणजे टाईम वाचेल.”
अरे..अरे…अरे..ही भाषा कुठली ?
मराठीत इंग्रजी का इंग्रजीत मराठी कळेनासे होते.
तरी आपण निर्धार करूया शुध्द मराठी बोलण्याचा, मराठी जपण्याचा.
— लेखन : सौ पौर्णिमा शेंडे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
मराठी भाषे विषयी सखोल लेखन
मराठी वाचवा मराठी शिकवा
धन्यवाद
गोविंद पाटील जळगाव जिल्हा.