Saturday, July 20, 2024
Homeलेखमाझे कृतार्थ जीवन - विजय पांढरीपांडे

माझे कृतार्थ जीवन – विजय पांढरीपांडे

बहुतेक व्यक्ती जीवनाविषयी सतत काही ना काही तक्रारी करीत जगत राहतात. मात्र माजी कुलगुरू, प्रा डॉ
विजय पांढरीपांडे सर याला अपवाद आहे. वाचू या त्यांचे कृतार्थ जीवन त्यांच्याच शब्दात. सरांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
– संपादक

आज आयुष्याच्या ७५ व्या वर्षी मागे वळून बघताना, आयुष्याची कॅसेट रिवाइंड करून ऐकताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे. प्रचंड समाधान, आनंदाचा भाव आहे. मला माझ्या आयुष्याने, अवती भवती च्या समाजाने सारे काही भरभरुन दिले.
अपेक्षेपेक्षा जास्त, क्वचित योग्यतेपेक्षा जास्त दिले ! त्यामुळे आज कुणाकडे कसलीही तक्रार नाही. काहीतरी राहून गेल्याची रुखरुख नाही. कुणावर राग नाही. आहे फक्त कृतज्ञ भाव..

सर्वात आधी मला माझ्या जन्म दात्या आई वडिलांचे आभार मानले पाहिजेत. मी दीड वर्षाचा असताना त्यांनी मला माझ्या आजीच्या (वडिलांची आई) झोळीत टाकले. तेव्हापासून माझे संगोपन, शिक्षण, पालन पोषण सारे या आजीने अन् दोन काकांनी केले. आज मी जो काही आहे त्याचे बरेचसे श्रेय या आजी काकांना जाते. तसेच मला त्यांच्याकडे पाठविणाऱ्या आई वडिलांकडे देखील जाते. एरवी इतर भावाबहिणीं सारखे खेड्या पाड्यात माझ्या शिक्षणाचे हाल झाले असते.

आजी हीच खऱ्या अर्थाने माझी आई झाली. त्याकाळी शिक्षण आजच्या सारखे महागडे नसले तरी नगरपालिकेच्या शाळेत मास्तर असणाऱ्या काकांसाठी महिन्याच्या खर्चाची जुळणी करणे तितके सोपे नव्हते. पण सारे निभावले. कुणी कुठून मदतीला पुढे आले, वेळ निभावून गेले देव जाणे..या सर्वांचा मी ऋणी आहे. हे कर्ज फिटणारे नाही. हे ओझे वाहण्यातच गम्मत आहे.

माझे मित्र, माझे शाळा कॉलेजातले शिक्षक, आय आय टी चे प्राध्यापक, मार्गदर्शक, पुढे उस्मानिया विद्यापीठातील सहकारी प्राध्यापक, यांच्याकडून खूप काही शिकता आले. आयुष्याची जडण घडण, संस्कार म्हणतात ती सारी यांचीच देणगी.

माझा शिक्षकी पेशा खऱ्या अर्थाने ७४ साली सुरू झाला असला तरी माझे शिकवणे मी प्रायमरी, मिडल स्कूल मध्ये असतानाच सुरू झाले. कारण मीच मला शिकवीत असे ! तीच माझी अभ्यास करण्याची पद्धत होती. काका शिक्षक असल्याने घरी खडू डस्टर असायचेच. दारे खिडक्या याचा फळा म्हणून उपयोग व्हायचा. काकाच्या शाळेतले घरी आणलेले त्याच्या विद्यार्थ्याचे पेपर देखील मीच तपासत असे ! मास्तरकी अशी लहानपणा पासून रक्तात भिनली. ती अजूनही टिकून आहे. शेवटच्या श्वासापर्यंत टिकून राहणार आहे !

उंच सखल वाटा, खाच खळगे हे प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतात. मीही अपयश, न केलेल्या चुकाचे दुष्परिणाम, आकस्मिक संकटे हे सारे भोगले आहे. स्वतः लेखक असूनही अवतीभवतीची, अगदी जवळची माणसे मला नीट ओळखता आली नाहीत. माझे अंदाज चुकले. माणसाची पारख चुकली. त्याचे बरे वाईट परिणाम देखील भोगावे लागले. पण त्याबद्दल मुळीच तक्रार नाही. काळाबरोबर खूप काही बदल घडताहेत. नात्याचे अर्थ बदलताहेत. पूर्वीचा ओलावा, जिव्हाळा राहिला नाही नात्यात. व्यावहारिक कोरडेपणा उरलाय फक्त. माणसाच्या भावभावनाची त्रिज्या संकुचित झाली आहे. मी, माझे, असे लहानसे वर्तुळ प्रत्येकाचे..त्यात इतरांना सहजासहजी प्रवेश नाही. स्पर्शात ओल नाही. बोलण्यात गोडवा उरला नाही. निराशेने ग्रस्त मनाचा आक्रस्ताळेपणा तेव्हढा वाढला आहे. तुमची किंमत तुम्ही काय देता, तुमचा फायदा काय, यावरच अवलंबून राहणार..

कुटुंबातले तणाव अपेक्षेपोटी वाढताहेत. कुठे कोण कधी तुमच्या वागण्या बोलण्याने नाराज होईल सांगता येत नाही. सावधगिरी किती बाळगायची ? त्याचेच दडपण आहे.
ही कुणा एकट्याची नव्हे, सर्व व्यापी समस्या आहे. आपल्याला याच रिंगणात फिरायचे आहे. कुणाचीच सुटका नाही.

तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या समवेत

मी हे सारे स्वीकारत वाटचाल केली. करतो आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो. माझ्या कुटुंबाने मला भरभरुन साथ दिली. माझ्यासाठी प्रसंगी त्याग केला. मला समजून घेतले. कुटुंबानेच नव्हे तर माझे मित्र, स्नेही, ज्येष्ठ कनिष्ठ सहकारी साऱ्यानी माझ्या वाटचालीत मदत केली. प्रोत्साहन दिले. भरभरुन आशीर्वाद दिलेत. त्या बळा वर मी एका पाठोपाठ एक शिखर काबीज करीत गेलो. माझ्या शिक्षकाकडूनच नव्हे तर विद्यार्थ्यांकडून देखील मी बरेच काही शिकलो. अजूनही शिकतोच आहे. किंबुहुना आज जे शिकतो, शिकलो ते आधीच शिकलो असतो तर माझे शिकवणे अधिक प्रगल्भ झाले असते असे आता वाटते !

पीएचडी च्या विद्यार्थ्यांसोबत

ज्या संस्थेत मी पदवी घेतली त्याच संस्थेचा प्रमुख होण्याचे भाग्य मला लाभले. निवृत्तीनंतर महाराष्ट्रात काहीतरी योगदान देण्याची राहून गेलेली इच्छा कुलगुरू झाल्याने पूर्ण झाली. हे अनुभव काही कडू काही गोड असे असले तरी, एकंदरीत समृद्ध करणारे, लक्षात राहणारे, योगदान दिल्याचे समाधान प्रदान करणारे होते. एका वेगळ्या जगाची ओळख करून देणारे होते. कडू गोड असे म्हंटले तरी कडू कमी अन् गोडच जास्त होते. माझ्या साठीच नव्हे तर पूर्ण कुटुंबासाठी..

आता आयुष्याच्या शेवटी राहून गेले, असे काहीही नाही. कसलीही इच्छा उरली नाही. एक लेखक या नात्याने स्वतःचा असा एक निवडक वाचक वर्ग निर्माण करता आला. माझ्या लेखनावर प्रेम करणारे कोण कोण, कुठे कुठे, किती किती आहेत हे पत्राने, फोन ने कळते तेव्हा लेखनाचे सार्थक झाल्याचे प्रचंड समाधान लाभते. एकीकडे इंजिनियरिंग चे अध्ययन, अध्यापन, संशोधन, अन् दुसरीकडे मराठी साहित्यातली मुशाफिरी हे सगळे माझ्या हातून कसे घडले याचे मलाच आश्चर्य वाटते ! कडक शिस्तीचा असूनही एकीकडे विद्यार्थ्याचे प्रेम अन् प्रचंड आदर मला मिळाला. तसेच मोजकेच साहित्य लिहूनही वाचकाचा अपार लोभ देखील.

तसेच संपूर्ण हस्तलिखित हाती नसून सुध्दा क्रमशः दोन वर्षे महा कादंबरी प्रकाशित करणारे विश्वासू प्रकाशक देखील मला लाभले. आकाशवाणी साठी माझ्या भाव गीतांना चाली देणारे, गाणारे तेलुगू संगीतकार देखील मला लाभले. आणखीन काय हवे ?
केवळ आपल्याला आनंद देते ते खरे यश नव्हे उलट ज्या यशाने केवळ तुम्हालाच नव्हे तर इतरांना तुमच्या पेक्षा जास्त आनंद होतो ते खरे अस्सल यश म्हणता येईल. माझ्या यशाने दुसऱ्यांनाही आनंद देण्यात मला थोडेफार यश मिळाले हे माझे भाग्य.

हा सिलसिला शेवटच्या श्वासापर्यंत अन् त्यानंतरही चालू रहावा म्हणून मी देहदान, अवयव दान करण्याचे ठरविले आहे. आपल्या देहाचा, अवयवाचा गरजूंना उपयोग व्हावा, मेडिकलच्या विद्यार्थ्याना शिक्षणासाठी उपयोग व्हावा अशी माझी इच्छा (will) आहे. गेल्यानंतर कसलेही संस्कार, विधी नको आहेत.

ज्यांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केले, माझ्या चुका मोठ्या मनाने पदरात घातल्या त्या सर्व आप्तेष्टांचा, मित्रांचा, सहकाऱ्यांचा, कुटुंबीयांचा मी ऋणी आहे. कृतज्ञ आहे. यापुढेही हा स्नेह, प्रेम, जिव्हाळा असाच कायम रहावा अशी ईश्वर चरणी प्रार्थना.

— लेखन : विजय पांढरीपांडे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments