Wednesday, September 11, 2024
Homeलेखमाझ्या आठवणीतील सुरेश भट

माझ्या आठवणीतील सुरेश भट

15 एप्रिल हा सुरेश भटांचा जन्मदिवस. या निमित्ताने माझा जो काही सुरेश भटांशी गझलांच्या संदर्भात तसेच, एक व्यक्ती म्हणून जो संबंध आला, त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा लेखन प्रपंच.

परभणी येथे पहिले त्रैभाषिक कवी संमेलन तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अंदाजे 82-83 साली सुरू झाले असावे. त्यावेळी मला मराठी कवी संमेलनाच्या संयोजन समितीमध्ये सहभागी करून घेतले गेले.या कवी संमेलनात, आदरणीय गझल सम्राट सुरेश भटांना पाचारण करण्यात आले होते. त्यांचे सोबत मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर हे कवी निमंत्रितांमध्ये होते.

या कवी संमेलनामध्ये, सुरेश भटांच्या व्यवस्थेसाठी, समितीतर्फे माझी नेमणूक करण्यात आली होती. यावेळी सुरेश भटांच्या सहवासात चार -पाच दिवस कसे गेले ते कळले नाही. मध्येच त्यांना हृदयाचा त्रास होऊ लागला म्हणून, डॉक्टर संतुक देशमुख यांचेकडे मी त्यांना घेऊन गेलो. डॉक्टरानी ईसीजी काढला आणि मला सांगितले की, हा माणूस मेडिकल सायन्स च्या दृष्टीने कधीच स्वर्गवासी व्हायला पाहिजे होता, परंतू केवळ त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर ते आज धडधाकट दिसत आहेत. त्यावेळी त्यांना खूप मोठा सिव्हियर हार्ट अटॅक आला होता आणि म्हणून संयोजन समितीने मला काम दिले की, तुम्ही सुरेश भटांना त्यांच्या नागपूरच्या घरी सुखरूप नेऊन पोहोचते करावे. शिवाय या हार्टअटॅक बद्दल कुठलीही वाच्यता त्यांच्याजवळ करू नये, अशा सूचना होत्या. त्यानुसार मी त्यांना परभणीहून नागपूरला बसने सोबत घेऊन गेलो. नागपूरला त्यांच्या घरी सुखरूप पोहोचते केले आणि स्वयंपाक घरात जाऊन, त्यांच्या मिसेसला त्यांच्या हृदयविकाराच्या झटक्यासंबंधी माहिती सांगून, ही बाब त्यांना कळू देऊ नका व त्यांची सर्वतोपरी काळजी घ्या, असे सांगितले. त्यावेळी त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी आलेले मी पाहिले. त्यानंतर सुरेश भट अनेक वेळा परभणीला आले आणि त्यांचे माझे एवढे घनिष्ठ संबंध आले की, ते मैत्रीच्या एवढे घट्ट नाते निर्माण करणारे ठरले.

एक घरगुती प्रसंग सांगतो. माझी पाच नंबरची सर्वात धाकटी बहीण विद्या हिच्या साखरपुड्या चा कार्यक्रम ज्या दिवशी परभणीत होता, त्याच दिवशी योगायोगाने भट साहेब परभणीत होते. मी का आलो नाही त्यांना भेटायला म्हणून त्यांनी चौकशी केली. तर त्यांना कळाले की, माझ्या बहिणीचा साखरपुड्याचा कार्यक्रम चालू आहे. सुरेश भटांनी लगेच परभणीच्या बाजारात जाऊन, माझ्या बहिणीसाठी साडी आणि होणाऱ्या जावयासाठी म्हणजे दिलीप सोनवळकर यांच्यासाठी पॅन्ट, बुशशर्ट चे कपडे आणि पेढ्याचा बॉक्स घेऊन अचानकपणे ते आमच्या घरी साखरपुड्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले. एवढा मोठा गझलकार माणूस आपणहून कार्यक्रमात सहभागी होतो हे पाहून उपस्थित सर्व मंडळी आवाक होवून अगदी भारावून गेली .सुरेश भटांनी माझ्या बहिणीला आणि होणाऱ्या मेहुण्यांना आहेर करून, पेढा भरवून आम्हा सर्वांना रजा मागितली . खूप आग्रह केला की जेवून जा, पण त्यांनी माझा एक कार्यक्रम आहे त्यामुळे निघावे लागते, शिवाय तुमच्या विवाहास मी येऊ शकणार नाही म्हणून, आजच आहेर केला, असे सांगून निरोप घेतला .हा प्रसंग माझ्या व माझ्या बहिणीच्या वैयक्तिक जीवनामध्ये घर करून बसला. हा प्रसंग, गझलसम्राट सुरेश भट, एक व्यक्ती म्हणून किती मोठे व महान होते हे या वरून दिसून येते.

माझ्या (प्रा.डाॅ.रे.भ.भारस्वाडकर)बहिणीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात, सुरेश भटांची उपस्थिती

भट साहेबांची माणसे जोडण्याची विलक्षण हातोटी होती. पहिल्यांदा ते माझ्या घरी आले, त्या वेळी त्यांनी माझ्या आईला, ‘तुमचे माहेर कुठले ?’ असा प्रश्न केला. त्यावर आमच्या आईने, गंगाखेड तालुक्यातील ‘नरवाडी’ चा उल्लेख करून भरभरून बोलली व नंतर तिने ‘अगदी भला माणूस हो’ असे मत व्यक्त केले. सुरेश भटांबरोबर मी बाहेर आल्यानंतर, अतिशय मिस्किलपणे त्यांनी मला सांगितले की, “त्याचे’ असं ‘ आहे रेणुकादास की, कोणत्याही स्त्रीला, तुमचे माहेर कुठले आहे असे विचारावे, तू सुद्धा ही ट्रिक वापरून पहा’. सुरेश भटांच्या बोलण्यात, नेहमी येणारा खास वैदर्भी शब्द ‘असं,’ ही त्यांची मिस्किलपणे बोलण्याची खास शैली होती.

त्यानंतर दुसरा प्रसंग असा की, सुरेश भटांनी ते परभणीला आले होते त्या वेळी, मला सांगितले की, आज संध्याकाळी तुझ्या घरी मी गझला सादर करणार आहे आणि गझलेवर बोलणार आहे. मला ते खूप अप्रूप वाटले आणि माझ्या जवळच्या दहा- पंधरा कवी मित्रांना, प्राध्यापकांना संध्याकाळी सुरेश भटांना ऐकण्यासाठी पाचारण केले. सुरेश भटांनी एकापेक्षा एक अनेक सुरेख गझला म्हणून दाखवल्या. प्रत्येक गझलेवर त्याचा अर्थ खुलवून सांगितला. हे सगळे माझ्याकडे कॅसेटमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग केलेले आहे. खूप दुर्मिळ असा तीन तास चाललेला हा कार्यक्रम कायम स्मरणात राहील असा झाला. कार्यक्रमानंतर पुरणपोळ्यांचे जेवण झाले. माझी बायको सौ.अश्विनीला ते ‘सुनबाई’ म्हणायचे.

सुरेश भट यांचे सोबत मी (प्रा.डाॅ.रे.भ.भारस्वाडकर)-1982

यानंतरचा पुढचा एक प्रसंग असा आहे की, परभणीचे रसिक- राज ॲडव्होकेट वसंतराव भिकाजीपंत पाटील यांच्या घरी, रात्री सुरेश भटांची गझल गायनाची मैफिल ठरली होती. त्यावेळी त्यांचे सोबत, आर्णीचे सुधाकर कदम हे तरूण गायक जे, सुरेश भटांच्या गजला गायचे, त्यांना पाचरण केलेले होते. मला आठवते की, या कार्यक्रमात माझे जिवलग मित्र प्रा. हनुमान दास वर्मा, प्रा. शेख शफी आणि इतर परभणीतील गझल – रसिक उपस्थित होते. त्यावेळी माझ्याकडे नॅशनल कंपनीचा जपानचा डबल कॅसेटचा डेक होता आणि सुरेश भटांच्या परवानगीने मी तो सर्व कार्यक्रम ऑडिओ रेकॉर्ड केला. सुरेश भटांच्या गझलांना प्रचंड दाद देणारा निवडक खास रसिक वर्ग आणि स्वतः वसंतराव पाटील यांनी प्रचंड दाद देऊन हा कार्यक्रम आयुष्यभर स्मरणात राहील असा दणदणीत झाला.या कार्यक्रमात सुरेश भटांनी, “खरकटे वेचावया ते उडाले कावळे ; अन् रणी झुंजावया राहिले ते मावळे” ही गझल आणि त्या वेळचे मुख्यमंत्री बॅ.अंतुले लंडनला जाऊन भवानी तलवार आणणार या वर व्यंगात्मक गझल, ‘भवानी’ आजही स्मरणात आहे

एक प्रसंग असा आठवतो की, परभणी स्टेडियमच्या ग्राउंडवर मराठी कवी संमेलन संपल्यानंतर, सुरेश भट व्यासपिठावर पुढे येऊन बसले व त्यांनी श्रोत्यांना सांगितले की, ज्यांना घरी जायचे असेल त्यांनी आता जावे, कवी संमेलन संपले आहे. आता मी माझ्या गझला ज्यांना ऐकायच्या आहेत त्यांच्यासाठी सादर करतो आहे. हजारो लोकांनी गच्च भरलेल्या स्टेडियम ग्राऊंड मधून एकही श्रोता जागचा हलला नाही. सुरेश भटांच्या गझला ऐकण्याची सुवर्णसंधी कोण सोडतो ? आणि मग पुढे अडीच तीन तास सुरेश भट आपल्या गझला सादर करत होते. मी श्रोत्यांमधे पहिल्या रांगेत बसलो होतो आणि अधून मधून सुरेश भट सांगायचे, हा शेर रेणुकादास खास तुझ्यासाठी .”खास तुझ्यासाठी” हे ऐकून, मला खूप भारी वाटायचं की, एकगझल- रसिक म्हणून व्यासपीठावरून ते आपली दखल घेत आहेत.

त्यानंतर परभणीहून त्यांना नांदेडला गझल कार्यक्रमासाठी जायचे होते. ते मला म्हणाले की, रेणुकादास तू माझ्याबरोबर चल नांदेडला. मी त्यांना सांगितले की, मला ॲग्रीकल्चर कॉलेजमध्ये लेक्चर आहे ,रजा घ्यावी लागेल .तर त्यांनी मला आग्रह केला की तू आलेच पाहिजेस आणि मी तात्काळ तयार झालो. त्यांच्यासोबत नांदेड ला गेलो आणि त्या तीन-चार दिवसांमध्ये गझलेच्या विश्वात सुरेश भटांच्या सोबत मी हरवून गेलो . नेहमी करता लक्षात राहील असा तो नांदेडचा तीन चार दिवसांचा दौरा कायम आठवणीत राहील. मला आठवतं की, त्यावेळी नांदेडच्या गुरुद्वाराला दर्शनासाठी भेट दिल्यानंतर सुरेश भटांनी बाहेरच्या दुकानातून अनेक शस्त्रे खरेदी केली होती. मला त्यांच्या या वृत्तीचे वेगळेपण जाणवलं की एक कवी ह्रदयाचा माणूस, ही शस्त्रे घरामध्ये शोपीस म्हणून लावणार आहे, छान वाटलं.

यानंतर मी औरंगाबादला वाल्मी या संस्थेत म्हणजे ,जल व भूमि व्यवस्थापन संस्था ,जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन ,या ठिकाणी , सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना नागपूर येथे अनेक वेळा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी म्हणजे जलसंपदा विभागातील अभियंत्यांचे प्रशिक्षण तसेच लाभधारक कास्तकारांचे प्रशिक्षण -वर्ग या निमित्ताने नागपूरला माझे सतत जाणे-येणे व्हायचे . कर्तव्याचा तो एक भाग होता. आम्ही नागपूर येथे जपानी गार्डनच्या समोर असलेल्या ,इरिगेशन डिपार्टमेंटच्या रेस्ट हाऊस मध्ये थांबायचो . रात्रीच्या वेळी ,मी सुरेश भटांना भेटण्यासाठी अनेकदा त्यांच्या घरी जात असे. एकदा प्रसंग असा घडला की, नागपूरच्या इरिगेशन डिपार्टमेंट मधील एक ज्युनिअर इंजिनियर, आता मला त्यांचे पूर्ण नाव आठवत नाही पण त्यांच्या आडनावात’ कर ‘ असे शेवटी होते , त्यांच्या मोटरसायकलवर मी ,सुरेश भटांच्या घरी गेलो .त्या इंजिनियर मित्राला मी असे सांगितले की, हे ‘दादा’ (सुरेश भटांना , ‘दादा’ हे नाव परभणीच्या शिवाजी काॅलेज मधील माझे मित्र प्रा.शेख शफी’ यांनी बहाल केले .ते भटांना खूप आवडले.काही भागात त्यांना ‘अण्णा’ असे म्हणत असत!) काही मला लवकर सोडणार नाहीत. उद्या सकाळी साडेनऊ वाजता माझे लेक्चर आहे , तेव्हा तुम्ही असे करा की ,आमचे बोलणे सुरू झाल्यानंतर ,अर्ध्या पाऊण तासानंतर या आणि मला ,’चला उशीर होतोय ‘,असे सांगायचे व मी पण ‘आता निघतो’ असे भटांना सांगायचे , असे ठरवले होते. त्यानुसार आमच्या गझलेवर गप्पा सुरू झाल्यानंतर ,अर्ध्या पाऊण तासाने ते अभियंते आले व मला, ‘ चला निघायचे आहे’ म्हणून सांगायला लागले. तर सुरेश भट त्या गृहस्थावर एवढे संतापले की ,त्यांनी त्याला दम दिला की ,’बघ माझ्याकडे बंदूक आहे , तू आता गुपचूप निघून जा . यांना रेस्ट हाऊस वर पोहोचविण्याची व्यवस्था मी करेल’ . शेवटी मी ही त्या अभियंत्यांना सांगितले की, सुरेशदादा आता काही ऐकणार नाहीत, मस्त गझलेच्या मूड मधे आहेत तेव्हा आता तुम्ही जा.त्यावर ते सदगृहस्थ निघून गेले आणि मग सुरेश भट आणि मी आम्ही दोघे सकाळी साडेपाच वाजेपर्यंत गझलेवर बोलत होतो . म्हणजे, ते बोलत होते आणि माझ्यावर गजलेचे संस्कार करत होते . सकाळी साडेपाचला त्यांनी आपल्या मुलाला उठवले आणि त्याने मला त्याच्या मोपेड वर पहाटे सहा वाजता रेस्ट हाऊसवर आणून सोडले .

सुरेश भटांनी रात्रभर जे गझल संबंधी ऐकवले त्यामध्ये ,त्यांची आवडती गझल -गायिका उर्दूची ‘अबिदा परवीन’ यांच्या ,निवडक गजलांची एक कॅसेट भरून मला त्या सप्रेम भेट दिली .त्यावेळी मी पाहिले की ,एक सहा फुटी उंचीची गोदरेज ची अलमारी ,केवळ गजलांच्या कॅसेट्स ने गच्च भरलेली होती आणि अबिदा परवीन च्या पंधरा-वीस निवडक कॅसेट्स मधून त्यांच्या आवडिच्या पंधरा एक गझला स्वतः मला रेकॉर्ड करून दिल्या .त्या गझलांच्या धुंद वातावरणात मी कित्येक महिने पुढचे गझलेच्या नशेत होतो .विशेष म्हणजे रेस्ट हाऊसला सकाळी सहाला पोहोचल्यानंतर मी स्नान करून डायरेक्ट माझे दिड तासांचे लेक्चर घेतले .पण कुठेही मला थकवा जाणवला नाही . यावरून आपल्याला आवडीचे काम करत असताना कधीही थकवा ,कंटाळा जाणवत नाही ही बाब माझ्या लक्षात आली .

पुढे जेव्हा मी सिद्ध समाधी योगाचा (एस.एस.वाय) शिक्षक म्हणून कार्य करत असताना ,माझे आध्यात्मिक गुरु, बेंगलोरचे ऋषी प्रभाकर गुरुजी ,यांनी जो ,आद्य शंकराचार्यांचा ‘अकर्मेव मोक्ष ‘ हा सिद्धांत शिकवला ,त्याची प्रचिती मला त्या रात्री मिळाली. एफर्टलेस जॉब म्हणजे , कष्टविहीन कार्य . याचा अर्थ काम तर करत आहे पण त्या कामाचे कष्ट जाणवत नाहीत , या , ‘अकर्मेव मोक्ष’ या स्थितीचा अनुभव ,मी सुरेश भटांच्या सोबत घेतला, हे मी माझे खरोखर भाग्य समजतो आणि त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो.

प्रा डॉ रे भ भारस्वाडकर

— लेखन : प्रा डॉ रे भ भारस्वाडकर. छ. संभाजीनगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. गझल शब्द प्रभू सुरेश भटांन विषयी माहिती व अनुभव छान विशद केले आहेत सर

    गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments