मी संयुक्त कुटुंबात वाढलेली. आई, बाबा, काका, काकू, दोन मोठे चुलत भाऊ, मी आणि दोन लहान सख्खे भाऊ असं आमचं एकूण नऊ जणांचं सुखी कुटुंब. लहानपणी जर मला कोणी विचारलं, “तुला किती भाऊ आहेत ?” तर माझं उत्तर असायचं “चार” !! कारण तेव्हा सख्खी, चुलत नाती माहितच नव्हती. लहानपणी आम्ही पाचजण कुठलाही “खाऊ” वाटून खायचो. मग ते शाळेत मिळालेलं चॉकलेट असो की घरी आलेल्या पाहुण्यांकडून मिळालेला खाऊ. त्याचे पाच भाग व्हायचे वा सोबत खायचो. हवं तर याला संयुक्त कुटुंबाचा फायदाच म्हणा. आम्हांला “शेअरिंग इज केरिंग” शिकवाव लागलं नाही. आमच्या दिवसाची सुरुवातच एकमेकांच्या खोड्या करणे, मस्करी करणे, गमतीजमती करणे यापासून होत असे. जेवढी मी भावांची लाडकीबहीण (तेव्हा कुठलीही योजना नव्हती) होती तेवढीच खोडी काढण्यासाठी मुख्य केंद्रबिंदू सुद्धा मीच होती.
नागपूरकर म्हणून आमचं संत्र्याशी घट्ट नातं आहे. पण एक बाल आठवण हे नातं अजून घट्ट करतं.
असंच एक दिवस आम्ही पाच भावंड संत्र्यावर ताव मारत होतो आणि चुकून मी संत्र्याच्या “बिया” खाल्ल्या. मग काय, माझे भाऊ माझी खोडी काढायची इतकी सुवर्णसंधी थोडीच सोडतील ! लगेच माझ्या मोठ्या भावाने “अरे, बापरे, तू बिया खाल्ल्या आता तुझ्या पोटातून संत्र्याच झाड उगवणार !” असे म्हणत मला चिडवण्यास सुरुवात केली आणि लहान भाऊ त्याला कोरस देत होते. माझा पाठाचा भाऊ लगेच म्हणाला, एकदा ताईने माती खाली होती (माती म्हणजे खरोखरची माती.. बरं का ☺️) आणि रोज ताई पाणी पिते, सूर्य प्रकाशात पण जाते, एकंदरीत काय झाड लागण्यासाठीच्या सर्व गोष्टी ताई करते….म्हणजे नक्की ताईच्या पोटातून झाड उगवणार.
हे सगळं ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि आता पोटातून झाड येणार, या कल्पनेने माझ्या पोटात गोळाच आला. माझ्या भावांनी तर “मी झाड झाल्यास” काय होईल, याचा पाढाचं वाचायला सुरवात केली . जसं की, तुला घराबाहेरच राहावं लागेल, बोलता येणार नाही, गाडीवर फिरायला जाता येणार नाही, आईजवळ झोपता येणार नाही, काकूकडे हट्ट करता येणार नाही, शाळेत जाता येणार नाही, तुझ्या अंगावर पक्षी बसतील, माकड खेळतील, ना चॉकलेट, ना आइस्क्रीम, ना केक… फक्त सूर्य प्रकाशच खावा लागणार. हे सगळ ऐकून पावसाचा फटका, थंडीचा मारा आणि उन्हाचा चटका असे तिन्ही ऋतू मला एकदम जाणवू लागले. आता माझं कसं होणार ? या विचाराने रात्रभर झोप लागली नाही. मी सकाळी उठून पहिले आरसा पाहिला. अजून तरी मला एकही पान किंवा मुळं आली नाही, हे पाहून जरा हायसं वाटलं.
याच विचारांच “मूळ” घेवून मी शाळेत गेली. माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणीने (कदाचित आमची पाळेमुळे एक असल्याने) लगेच “काय झालं ?” असं विचारले जमिनीला पाण्याचे झरे फुटावे तसे माझ्या डोळ्यांना फुटले. आणि मी तिला सर्व हकीकत सांगितली. थोड्या काळजीच्या स्वरात आपली बालबुद्धी कयास लावून ती मला धीर देत म्हणाली, “तू काळजी नको करू, तू झाड झाल्यावर मी तुला भेटायला येत जाईल. “तिचं हे बोलणं ऐकून तिच्याविषयीचं प्रेम आणि माझ्याविषयीची चिंता एकदमच दाटून आली..
हा सगळा मारा काय कमी होता की काय, म्हणून विज्ञानाच्या तासाला बाईंनी नेमका “बियांचे रूपांतर रोपात आणि रोपाचे झाडात कसे होते” हाच धडा शिकवित माझ्या भीतीला “खतपाणी” घातलं. मग काय “आता मी झाड होणार” यावर जणू शिक्कामोर्तबच झाला.
हळूहळू ही बातमी वाऱ्यासोबत “बियाणे पसरावे” तशी वर्गात पसरली. झालं, बालसल्ल्याचा ओघ सुरु झाला. कोणी म्हणत “पाणी पिऊ नको” तर कोणी म्हणत “बाहेर खेळू नको”. त्यांच्या सल्ल्याला मान देत मी त्या दिवशी डबा, पाणी वर्ज्य केले. मधल्या सुट्टीतील खेळासही “खो” दिला. शाळा सुटेस्तोवर वर्गात माझाच विषय होता. माझ्या मैत्रिणींनी जड अंतकरणाने मला बाय बाय केलं, जसं काही उद्याच माझं झाड होणार होतं.
घरी येताच आई व काकूला पाहून मला खूप गलबलून आलं. मला राहवेचना, म्हणून मी त्यांना बिलगुन माझ्या मनातली संपूर्ण घालमेल सांगत पुन्हा एकदा अश्रूंची वाट मोकळी केली. माझं पूर्ण बोलणं शांतपणे ऐकून घेत दोघींनी मला मायेने जवळ घेतलं आणि असं कधीच होत नाही हे मला पटवून दिलं. बिया खाल्ल्याने पोटातून झाड येत नाही, हे त्यांचे वाक्य ऐकून मी आनंदाने उड्या मारू लागली. आणि दारात उभी राहून चॉकलेट खात खात माझ्या मोठ्या भावांना पडणाऱ्या ओरड्याचा आस्वाद घेत राहिली.
आता कधी ही बातमी वर्ग मित्र मैत्रिणींना सांगते, असे मला झाले होते. याच विचाराने मी आईला घट्ट मिठी मारून निवांत झोपली..
— लेखन : सौ. आश्लेषा गान. सातारा
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
संपूर्ण बालपणीची निरागसता, थोडीशी भीती, बालिशपणा आठवला.
पोटात झाड उगवणार आता कसं होणार..? खुपच छान लिहिलय
खूप छान आणि गमतीशीर अनुभव. झाड पोटात नाही डोक्यात उगवलं आणि तेही ज्ञानाचं.
फारच सुंदर वर्णन केले आहे.. मला सुध्दा लहान असताना हा प्रश्न पडायचा पण कालांतराने वयानुसार जशी समज आली. तसे यावर मला लहान कोवळ्या मनाचे प्रश्नाचे उत्तर मिळायचे..
अरे वाह.. हा पोटातून झाड येण्याचा अनुभव बहुधा सगळ्यानाच आला असेल..मलाही आला होता.. आणि ते तू छान शब्दबद्ध केलेस.. पुन्हा ती बालपणीची धम्माल डोळ्यासमोर आली..खूप मस्त आश्लेषा..खूप खूप शुभेच्छा 💐💐