सहामाही परीक्षा संपली की आम्हाला दिवाळीचे वेध लागायचे. घराची रंगरंगोटी, साफसफाई, दिवाळीचा फराळ, नवीन कपडे सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व भावंडांतून वाटून आलेले फटाके. भावंडांपासून वाटणीचे फटाके लपवून ठेवायचे. दिवाळीचे चार दिवस ते पुरवून फोडायचे. खूप महागडे नसले तरी बऱ्यापैकी वाटणारे कपडे. तेही शिंप्याकडे शिवायला दिलेले असायचे. त्यामुळे कपडे शिवलेत का बघायला शिंप्याकडे रोज एक तरी चक्कर व्हायचीच आणि ते घालून मिरवताना होणारा आनंद आज हजारो रुपयांच्या कपड्यात दिसणार नाही.
पहाटे खूप लवकर उठून आईकडून चंदन,उटणे लावून मोती साबण चोळून लावून कढत पाण्याने अभ्यंगस्नान व्हायचे. स्नानानंतर नवीन कपडे घालून फटाके घेऊन बाहेर पळायचो. मी सर्व भावंडातील सर्वात मोठी. त्यामुळे फटाके फोडताना सर्वांची काळजी घ्यायची जबाबदारी माझी असायची. आन्हिक उरकून एकेक भावंड अंगणात यायचे. दरवाज्यात तुळशी वृंदावनाजवळ काढलेली सुबक रांगोळी खूप छान वाटायची. शेणाने सारविलेल्या अंगणातील ती विविध रंग भरून काढलेली रांगोळी नि त्यावर सुवर्ण किंवा चांदीचा वर्ख टाकून चमकायला लावायचो. तुळशीवृंदावनावर मंद प्रकाश देणाऱ्या पणत्या तेवत असायच्या. त्या मंद प्रकाशात सर्वांच्या चेहऱ्यावरचे तेज उजळलेले दिसायचे. हातात अगरबत्ती घेऊन आम्ही सर्वजण फटाके उडवायचो. त्यातही किती थ्रील वाटायचे. आतासारखे फटाक्यांचे नाना प्रकार नसले तरीही थोड्याफार मिळणाऱ्या फटाक्यांनीही ते उडवताना कोण आनंद व्हायचा !
फटाके उडवून झाल्यावर मस्त फराळ करायचा. पहाटे लवकर उठल्याने आणि गोड, तिखट, तेलकट, चमचमीत नाना चवीचा आणि प्रकारचा फराळ पोटात गेल्याने झोप यायची. मग निवांत झोप काढायचो. झोप काढून उठल्यानंतर नवीन ड्रेस घालून मैत्रिणी आणि शेजारी यांच्याकडे शुभेच्छा तसेच तबकातून फराळाचे द्यायला जायचो. किती प्रेम नि मायेचा ओलावा होता त्यात !
जावे वाटते आजही
मला माहेरच्या गावा
जिथे आईच्या कुशीत
मिळे जीवीचा विसावा
दुपारच्या वेळी दिवाळीच्या गृहपाठाची वही पुर्ण करायची आणि आईला थोडी कामात मदत. माझे वडील शाळेत असल्याने सर्व दिवाळी अंक घरी येत. सुट्टीत ते सर्व वाचून काढले जायचे त्यामुळे वाचण्याचा छंद जडला होता. त्यातूनच पुढे वाचन, लिखाण वाढत गेले. तसेच शाळेच्या ग्रंथालयातील सर्व पुस्तके वाचून काढायचो. अभ्यास नि शाळा नसल्याने दिवसभर कुठेही मुक्तसंचार. कुठेही जा, किती खेळा. कोणाचे बंधन नसायचे. दिवाळीत थंडीला नुकतीच सुरूवात झाल्याने हवामान प्रसन्न आणि आल्हाददायक असते. त्यामुळे नवीन काहीतरी करण्याचा जोश आणि उल्लास असतो. त्यामूळे कोणी सायकल तर कोणी स्कुटी चालवायला शिकायचे. काही जण पोहायला शिकत. करावी तेवढी गंमत कमीच. हूंदडायचो तरी इतके की पूर्ण गाव म्हणजे आमचे खेळाचे मैदानच.
संध्याकाळीही थोडे फटाके उडवले की दारात रांगोळी काढण्याची चुरस लागे. सर्वाहूनी निराळी रांगोळी कशी काढता येईल असे शिकत सुंदर रांगोळी काढू लागलो. तसे फावल्या वेळेत चित्रकला काढत बसायचो. कागदी कंदील बनवणे, तसेच मातीच्या पणत्या बनवणे यामुळे स्वावलंबनाची सवय लागली. पुढे शाळेत क्राफ्ट आणि कलाविषयात भाव खाऊन गेलो.
माझ्या गावाला वाहतो
थंडगार असा रानवारा
दिनरातीच्या कष्टाचा
उतरतोच शीण सारा
दिवाळीच्या सुट्टीत भुईमुगाच्या, तुरीच्या, चवळी हरभऱ्याच्या ओल्या शेंगांची तरी मेजवानीच! हूरडा, मक्याची कणसे भाजून खायचे, अशा या रानमेव्याची मुबलकता. त्यामुळे त्या रानातील रूचकर पदार्थांची चव आजही जीभेवर रेंगाळल्याप्रमाणे वाटते. आमचे बालपण निमशहरी वातावरणात गेल्याने गावाकडच्या शेतातील रानमेवा ही खाण्यास मिळे आणि शैक्षणिक सोयीसुविधा ही उपलब्ध असत. त्यामुळे शेतातील ज्ञानासोबत शैक्षणिक प्रगती उत्तम होती. घरात कामवाल्या बाई किंवा मशीन नसल्याने अंगाला सर्व काम करायची सवय लागली. त्यामुळे व्यायामासाठी वेगळा वेळ देण्याची गरज नसे. घरगुती कामातून सर्व प्रकारचा व्यायाम होत असे. अंगणात लगोरी, आट्यापाट्या, लंगडी आणि हॉकी असे खेळ खेळत असू. त्यामुळे आरोग्याचे छान संतुलन जमले.
गावाकडचे थंड वारे
आजही वाटतेय हवे
मुक्त रानात हूंदडणे
जगणे हे रोजच नवे
गावाकडच्या मोकळ्या हवेत दररोजची भाजी-भाकरी ही शहरातील पिझ्झा-बर्गरहून चवदार लागते. आणि ती खातानाही कोण जास्त खातेय यावर स्पर्धा लागायची. पोट भरून जेवण अन् नैसर्गिक खतावर वाढवलेल्या फळे, भाज्या घरच्याच परसाय पिकत असल्याने पौष्टिक नि सकस आहार मिळत असे. साखर कारखाना जवळ असल्याने रात्रीच्या भोजनानंतर ऊस खाण्याचा मोठा कार्यक्रम असायचा. त्यामुळे शरीरातील सर्व कमतरता भरून निघायची आणि दात हिरड्याही घट्ट झाले.
माय अडाणी निरक्षर
पण लावी प्रेमाने लळा
तिच्या कुशीत लवंडता
फुलतो ममतेचा मळा
आमच्या बालपणी भले दुरदर्शन, लॅपटॉप आणि मोबाईलसारखी आधुनिक तंत्रज्ञान असणारी साधने नव्हती.परंतु गावभर हूंदडत भटकण्याची मजा काही औरच होती. कितीही आणि काहीही खाल्ले तरी पचवण्याची ताकद होती. आजार आमच्या वाट्याला फिरकतही नसे. आजच्या पिढीतील सुखासिन जीवनाची व्याख्या म्हणजे पिकनिक, हॉटेल, शॉपिंग आणि मॉल्स हे आहे. आमच्या बालपणी असे काहीही नव्हते. परंतु निखळ आनंद आणि उत्साह आमच्या जीवनात भरभरून होता. त्या आनंदाची आज कशाशीही तुलना होऊ शकत नाही. लाकडाची एक फळी देखील क्रिकेटची बॅट म्हणून आणि कपड्याचा चेंडू ही बॉल म्हणून मोकळ्या मैदानावर क्रिकेट सुंदररित्या खेळले जाई. ना कुणाच्या घरात बॉल जाई ना कुणाच्या खिडकीची काच तुटायची भीती. ना मुलांना लागण्या, पडण्याची काळजी नाही अपहरण होण्याची चिंता. सगळ्या गावातील लोकांचे लहान मुलांच्यावर लक्ष असायचे.
आमच्या बालपणीचा हा सुखाचा सुवर्णकाळ पुढच्या पिढीला मिळावा.जीवनातील जे हरवत चाललेले सुख आहे ते त्यांच्या पदरी पडावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
— लेखन : सौ.भारती सावंत. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूपच छान