Saturday, April 13, 2024
Homeलेखमाझ्या शाळा !

माझ्या शाळा !

आयुष्याच्या पाठशाळेत दैव सतत धडे देतच असते. ते ऐच्छिक कधीच नसते आणि काळ वेळाचे गणित ही त्याला लागू नसते. सुदैवाने मानवनिर्मित शैक्षणिक संस्था मात्र याला अपवाद आहे. ऋषिकाळांपासून चालत आलेल्या गुरुकुल पद्धतीच्या शाळांमध्ये बदल घडून सुद्धा आजही प्राथमिक शिक्षण देण्यात सुकाणूची कामगिरी अशा संस्थाच बजावीत आहेत.

रूढार्थाने माझी पहिली शाळा ही उपनगरातील नावाजलेली संस्था. जातिवंत मराठमोळे नाव ल्यालेली शाळा मराठी भाषिक नसेल तरच नवल ! शिकवणे हा पेशा नसून धर्म असावा अश्या पोटतिडीकेने मुलांना शिकवणारे शिक्षक लाभले मला. सर्वतोपरी शाळेच्या शिक्षणाचा दर्जा उच्च ठेवण्याचे लक्ष्य, यामुळे शिक्षणाचे माध्यम मराठी आहे हा न्यूनगंड आमच्यात कधीच आला नाही. एक मात्र नक्की कि मराठी मूल्ये आणि संस्कारांची शिकवण नकळत विद्यार्थ्यांत शाळेने पेरली. मराठी संस्कृतीविषयीच्या अभिमानाने आमच्यात कायमचा शिरकाव केला होता. तीच भावना शिरपेचात खोचून शिक्षकांनी आमच्यासारखे अधमुऱ्या वयाचे विद्यार्थी बाहेरच्या जगातील आव्हाने पेलावयास तयार केली.

सध्या व्यक्तिमत्व विकास, सॉफ्ट स्किल्स वगैरे गुण, मुलांमध्ये विकसित होण्यासाठी पालक प्रोफेशनल संस्थांच्या मदतीने धडपड करीत असतात. माझ्या पिढी बाबतीत हे सर्व अनाकलनीयच होते. कळत नकळत संपूर्ण समाजानेच जणू ती धुरा सांभाळली होती. म्हणूनच मी जेव्हा रुईया कॉलेज चे प्रिन्सिपल डॉकटर साने यांच्याकडे पीएच डी ला प्रवेश घेतला तेव्हा माझे आयुष्य आमूलाग्र बदलून जाणार आहे ह्याची मला अजिबात कल्पना नव्हती. वरील सर्व गुण विकसित करण्यासाठी माझ्या दुसऱ्या शाळेचा कष्टप्रद कार्यकाल सुरु झाला होता.

सर संस्थेला पीएचडी ट्रैनिंग स्कूल म्हणायचे. त्यांचे डॉक्टरेट झालेले शंभरावर विद्यार्थी हें फार्मास्युटिकल इंडस्ट्री मध्ये मोठया पदांवर कार्यरत. सरांच्याच शब्दात त्यांची शाळा अशा इंडस्ट्री ला लागणारी ‘ रेडी टू युझ ‘ विद्यार्थी तयार करण्याची प्रक्रिया होती. त्यातून विद्यार्थ्याला मिळणारी पदवी हा फक्त बोनस होता. ते प्राथमिक लक्ष्य कधीच नव्हते. सरांचे स्कूल सांदीपनी ऋषींच्या आश्रमासारखे गुरुकुल होते जिथे तुमचे सिनिअर्स तुम्हाला शिकवायचे. सर स्वतः प्रचंड रागीट, त्यामुळे दुर्वास ऋषींचा आश्रम म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल. तांत्रिक बाबी विद्यार्थी शिकतोच पण मुख्यतः स्कूल चे वातावरण असे होते की विद्यार्थ्यांची निर्णय घेण्याची क्षमता धसास लागावी, कोणीही मार्ग दाखवण्यास उभा नसताना स्वतःचे निर्णय कसे घ्यावेत, मोठ्या पदावरील सरकारी पदाधिकारी, अन्न आणि औषध विभागांचे प्रमुख, वेगवेगळ्या कंपनीतील अधिकारी वर्ग यांना कसे हाताळावे याचे एकहाती शिक्षण त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या उमेदीच्या वयात दिले. सर्व काम अंगावर न विचारता टाकायचे. न करून विद्यार्थी जाणार कुठे ? काम करायची गुणवत्ता आपोआप तयार होईल या भावनेवर कमालीचा विश्वास !

याच पद्धतीमुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या रूपात देशाच्या फार्मास्युटिकल क्षेत्राला तयार माणूस मिळत होता. दिवसाचे अक्षरशः २० तास दररोज काम करायचो आम्ही लॅब मध्ये त्याकाळात ! औद्योगिक क्षेत्राला अजून काय पाहिजे होते ? आमचे विद्यार्थी त्यामुळे पटापट कंपनीत उचलले जायचे. आम्हा सर्वांचा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन साने सरांनी बदलून टाकला. त्या काही वर्षात सर्व विद्यार्थ्यांच्या ‘इमोशनल कोशण्ट’ रूपी तलवारींना जी धार काढली गेली ती पुढे आयुष्यभर पुरून उरली. आमच्या थोड्याफार व्यावसायिक यशाचे सर्व श्रेय निःसंशय माझ्या या दुसऱ्या शाळेला आणि माझ्या आयुष्यात आलेल्या त्या सांदिपनी ऋषींनाच जाते.

लवकरच माझ्या लक्षात आले की औषधनिर्माण करणाऱ्या कंपनीत प्रवेश करणे ही त्यामानाने सहज गोष्ट आहे पण सर्वात कठिण काम मात्र वरच्या स्तरावर चढून अधिकारीवर्गात प्रवेश मिळवणे आहे. प्रत्येक कंपनीचे स्वतः चे असे ‘डीनए’ असते. ते ठरविते अधिकारीवर्गाची काय वागणूक असायला पाहिजे आणि काय निषिद्ध असू शकेल. तिथेच सुरु झाली माझी तिसरी शाळा.. माझ्या कंपनीची शिकवणी !

गेल्या अनेक वर्षात कंपनीच्या संस्कृतीमुळे अशा अनेक गोष्टी शिकावयास मिळाल्या ज्या बाहेरील जगात सहसा आढळत नाहीत. कंपनीच्या संस्थापकांनी सुमारे शंभर वर्षांमागे लिहून ठेवलेली विशिष्ट ‘मूल्ये /तत्वे ‘ आजही प्रतिदिनी जगभर शाखा असलेल्या या कंपनीत कशी कामी येतात हे अनुभवानेच कळू शकले.

उद्योगजगतातील निर्णय जेव्हा रुग्णाच्या आयुष्याशी निगडित होतात तेव्हा असे निर्णय कंपनीच्या नफातोट्याच्या आकड्यांवर विसंबून कधीच रहात नाहीत तर रुग्णाच्या आयुष्यात डोकावून बघत, शंभर वर्षांमागे लिहिलेल्या तत्वांच्या अनुसार मनाला पटणाऱ्या विचारांच्या आधारे कसे घेतले जातात हे या कंपनीत शिकायला मिळाले. ही तत्वे सुद्धा अगदी साध्या अन सोप्या भाषेतली. जगरहाटीनुसार ‘चांगले ‘ काय आणि ‘ वाईट ‘ काय याचे सार जणू. जेव्हा व्यवसायात तुम्हाला अशा निकषावर घासून निर्णय घेण्याची सवय लागतें तेव्हा साहजिकच तुम्ही वैयक्तिक आयुष्यात तसेच वागाल हे अपेक्षितच आहे. हा अगदी नकळत पण तुमच्या पर्सनल आयुष्यावर होणारा अनुकूल परिणाम आहे असे मलातरी वाटते.

ही आश्चर्याची गोष्ट आहे की जेव्हा मी कंपनीच्या विविध देशातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जवळून बघतो तेव्हा प्रकर्षाने जाणवते की ते सर्व जण अगदी एका मुशीतून आल्याप्रमाणे विचार करतात. आपल्या चालीरीतींतून ते सर्वांना घेऊन काम कसे करावे, प्रत्येकाला बाजू मांडण्याची संधी कशी द्यावी, बडेजाव कसा टाळावा वगैरे आपल्या मनावर बिंबवत असतात.

मी कंपनीत नवशिका असलेल्या काळापेक्षा आता सर्वस्वी वेगळा वागतो, बोलतो असे माझ्या कुटुंबियांचे प्रांजळ मत आहे. आयुष्याची गेली अनेक वर्षे दिवसाचे अठरा तास मी सतत कंपनीच्या कामात किंवा संबंधित लोकांच्या संपर्कातच असतो आणि हाच कालावधी तुमच्या अचेतन मनावर ( सब कॉन्शस माईंड ) सतत परिणाम करत असतो. हे समीकरण एकदा समजावून घेतले की हा बदल पचनी पडायला मदत होते. माझी सहधर्मचारिणी तर मला चेष्टेने चिडवते ‘ तुका म्हणे आता उरलो कंपनी पुरता’

अशा या माझ्या आयुष्यातील शाळा.. पारंपरिक शाळेने कोवळ्या वयापासून चांगल्या वाईटाची जाणीव करून दिली. नंतर आयुष्यात आलेल्या साने सरांनी पीएचडी स्कूल द्वारा जगाकडे पाहायची दृष्टीच जणू बदलून टाकली. त्या तीन चार वर्षात त्यांनी औद्योगिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अनेक शस्त्रात्रे ,साधने प्रदान केली . तरुण विद्यार्थ्यांच्या इमोशनल कोशण्टवर काम केले . त्या उर्जेसहित कंपनीत उडी मारल्यावर, पुढचे पैलू तिथे पडले. अचेतन मनावर सतत परिणाम करणारी कंपनीची शिकवण नकळत आत्मसात केली गेली. अशावेळेस मनाची चाळणी मात्र जागरूक ठेवावी लागते .जे चांगले आणि लाभदायक ठरेल तेच बहुतांशी निवडले जावे म्हणून आणि वाईटातून चांगले शोधायला मनाला तयार केले आधीच्या माझ्या दोन शाळांनी !

मला सतत ऋणी राहावयास भाग पाडणाऱ्या या तीन वेगवेगळ्या संस्था ! आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्या सामोऱ्या आल्या, परंतु मागे वळून पाहताना त्या एकेकट्या नसून त्यांचे धागेदोरे एकमेकांशी केवढे घट्ट गुंतले आहेत हे लक्षात येते. साच्यातून दृग्गोचर आकार तयार होताना फक्त एक घाव उपयोगी नसतो. त्यासाठी अनेक घाव वेगवेगळ्या वेळेला, वेगवेगळ्या साधनांनी पाडावे लागतात. माझ्यापुरते पाहता तिघांपैकी एक कालावधी वा शिकवण जरी तोकडी पडती तरी त्याचा संपूर्ण एकसंध आकारावर होणारा प्रतिकूल परिणाम निश्चित होता !

मला खात्री आहे तुम्हा सर्वांच्या आयुष्यात अशाच घटना घडल्या असतील. अशाच अनुभवांनी तुमचा ही आलेख सजला असेल. माझ्यापुरते केलेले हे फक्त एक विश्लेषण आहे. वयाच्या या टप्प्यावर, आयुष्य बांधताना कुठून काय वेचले, घेतले ते चांगले का वाईट.. हे सांगणे कठीण आहे, परंतु स्वतःला आकार देण्याच्या प्रयत्नांत माझ्या कुठल्या जीवनशाळा कामी आल्या हे मात्र मी नक्कीच सांगू शकेन.

हे ही नसावे थोडके !

उपेंद्र कुलकर्णी

— लेखन : उपेंद्र कुलकर्णी. सिंगापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments