डॉक्टर मंदाकिनी पुरंदरे यांच्या पहिल्या वहिल्या मुलाखतीने मुलाखत घेण्याच्या तंत्राचा परिचय करून दिला. तसा आणखी एका हुकमी तंत्राचा परिचय होण्याचा योग लवकरच आला.
त्याचं असं झालं एक दिवस आकाशवाणी कलावंत विमल जोशी यांनी मला गाठलं. मी अनेक वेळा कॉन्ट्रॅक्टवर नसतानाही आकाशवाणीत फेरी मारून जात असे. कोणाच रेकॉर्डिंग, डबिंग हौसेने करून देत असे. असाच एक हौसेचा मामला चालू होता. तिथे विमल जोशी अर्थात विमल मावशीने मला गाठलं आणि थेट विचारलं, “सध्या कोणत्या सेक्शनसाठी काम करतेस ?” मी म्हटलं, “कुठल्याच सेक्शनसाठी काम नाही करत सध्या’.
“मग हे डबिंग कोणाचं करतेस ? कशासाठी ?
“अं—सहज. वेळ आहे म्हणून !”
“ठीक आहे. सध्या फ्री आहेस ना ? ये माझ्याकडे कामगार सभेत. मी साहेबांना सांगून तुझं कॉन्ट्रॅक्ट टाकते. हे डबिंग झालं की माझ्या खोलीत ये.”
ही विमल मावशीची आज्ञा होती. तिचं उल्लंघन करण्याची माझ्यात हिम्मत नव्हती. खरंतर कॉलेजची फायनल एक्झाम तोंडावर आली होती. कॉलेजचा अटेंडन्स पुरेसा नव्हता. रिव्हिजन झालेली नव्हती. पण विमल मावशीला ही सगळी कारणं देण्याची माझी प्राज्ञा नव्हती. अगदी खरं सांगायचं तर आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा मोह आणि ओढ मलाच अनावर होती !
(ती ५० वर्ष तशीच टिकून आहे, अजूनही ! ) त्यामुळे पडत्या फळाची आज्ञा घेऊन डबिंग आटोपताच मी तिच्या खोलीकडे मोर्चा वळवला. ती वाटच बघत होती. म्हणाली, “मी आजपासूनच तुझं कॉन्ट्रॅक्ट टाकायला सांगितलय. त्याशिवाय तुला कार्यक्रम करता येणार नाही. आता थांबायला वेळ नाही. एक काम कर. आज सोमवार. श्रोत्यांच्या पत्रांना उत्तरं देण्याचा वार. तुला माहित आहे ना श्रोते आजचा पत्रोत्तराचा कार्यक्रम किती उत्सुकतेने ऐकतात ! तेव्हा ही पत्रं घे. त्यांतल्या तुला जमतील तेवढ्या पत्रांना उत्तरं दे. तुला कळणार नाही त्या पत्रांना मी उत्तरं देईन !”
माझ्या पुढ्यांत पत्रांचा गठ्ठा आपटून विमल मावशी अदृश्य झाली. जशी गेली तशी परत आली. “ए तुला कॉफी प्यायचीय का ग ? आज श्रोत्यांच्या पत्रांना तुला उत्तरं द्यायची आहेत. नाहीतर घशाला कोरड पडली तर बोलती बंद होईल तुझी. येतेस कॅन्टीन मध्ये ? मी चाललेय चहा प्यायला !”
मला समोरच्या टेबलावरचा पत्रांचा गठ्ठा दिसत होता. दुपार टळून गेली होती. साडेसहाला कामगार सभा सुरू होईल. त्याच्या आत जमतील तेवढ्या पत्रांना उत्तरं देणं गरजेचं होतं.
मी कॉफीची तल्लफ जिरवली आणि म्हटलं, “तू जा कॅन्टीनमध्ये. मी जरा ही पत्रं बघते. “सुदैवाने मी न चुकता युववाणी, वनिता मंडळ, कामगार सभा हे कार्यक्रम ऐकत असे. त्यामुळे आठवडाभरातील कार्यक्रमांची मला चांगली माहिती होती. मी प्रत्येक पत्र काळजीपूर्वक वाचून कागदावर त्याचे उत्तर लिहू लागले. थोडीफार पत्रोत्तरं लिहून होतायत नाही तोच विमल मावशी रूममध्ये टपकली. पत्रांना उत्तरं लिहिण्याचा माझा उद्योग पाहून खवळलीच. म्हणाली, “ए अग आकाशवाणीत ही कसली कारकुनी करत बसली आहेस ? आण ती पत्रं इकडे. काही पत्रं मी वाचेन. त्यांना तू थेट उत्तरं दे. काही पत्रातला मजकूर तू वाच. त्यांना मी उत्तरं देईन !”
“माय गॉड ! अग पण कामगार सभेचा हा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम Live असतो ना ?”
“त्यात काय झालं ? कार्यक्रम नेहमी ऐकतेस ना तू ? मग तुला ठाऊक नाही कशी उत्तरं द्यायची ? मी श्रोत्यांच्या पत्रांना उत्तरं देताना ऐकलेस ना तू ?”
माझा आवाज बंद ! म्हटल ‘आलिया भोगासी असावे सादर’. खरं तर माझी भीतीने गाळण उडाली होती. लाईव्ह कार्यक्रम करताना आपण अडखळलो, थांबलो तरी ते श्रोत्यांना लगेच कळतं. इतकच काय आपण उत्स्फूर्त बोलतोय की लिहून आणलेलं वाचतोय हे सुद्धा श्रोत्यांना लगेच समजतं. अगदी आपली घाबरगुंडी उडालेय की काय ते सुद्धा आपल्या आवाजावरून श्रोते अचूक ओळखतात आणि मग श्रोत्यांच्या पत्रांमध्ये त्याचे निश्चितपणे पडसाद उमटतात. आपल्या बाबतीत तसं झालं तर ? कायमची छुट्टीच की मग !
मला अक्षरशः तिथून पळून जावंसं वाटायला लागलं. इथे रेकॉर्डिंगमध्येसुद्धा घाम फुटतो आणि ही विमल मावशी मला थेट लाईव्ह कार्यक्रम करायला लावतेय. काय करावं ? मनांतल्या मनांत तिचा अस्सा राग येत होता ! पण आता माझ्या हातांत काहीच उरलं नव्हतं. चक्रव्यूहात फसलेल्या मला, सुटकेचा इवलासा मार्गसुद्धा दिसत नव्हता. सहा वाजून गेले तशी पत्रांचा गठ्ठा माझ्या हातात कोंबत मला घेऊन विमलमावशी स्टुडिओकडे निघाली. मी निमुटपणे तिच्या मागोमाग चालत राहिले. मी उत्तरं लिहिलेले कागद टेबलावर तसेच पडले होते. माझ्याकडे केवीलवाणेपणे बघत ! खरंच ! नक्की कोण केविलवाणं झालं होतं ? मी ? की ते चार कागद ?
आम्ही दोघी स्टुडिओतल्या माईक समोर उभ्या होतो. काही पत्रांचा गठ्ठा माझ्या हातांत. तर काही पत्रांचा गठ्ठा तिच्या हातांत! सगळी पत्रं संगतवार लावायलाही वेळ मिळाला नव्हता.
घड्याळाचे दोन्ही काटे बरोब्बर एकावर एक आले. साडेसहा वाजले. कामगार सभेची धून सुरू झाली. माझे पाय लटपटायला लागले. अंगाला दरदरून घाम सुटला. घशाला कोरड पडली. पण घोटभर पाणी पिण्याचीही आता उसंत नव्हती. विमल जोशीने माईकचा ताबा घेतला. सराईतपणे ओपनिंग अनाउन्समेंट केली आणि पहिलं पत्र वाचण्याची मला खूण केली.
मी थरथरत्या आवाजात पत्रावरचं श्रोत्याचं नांव वाचलं. मजकूर वाचला. विमल जोशी चटकन म्हणाली, “अगं पण हे पत्र आलय कुठून ?” “संगमनेरहून” मी उत्तरले. मला तिची खूण बरोबर कळली. प्रत्येक श्रोत्याच नांव आणि ठिकाण सांगून, नंतरच त्या पत्रातला मजकूर सांगायचा. मी थोडी स्थिरावते नाही तोच एका श्रोत्याच विमलमावशीने नांव गाव सांगितलं. मजकूर थेट पत्रातून वाचला आणि मला खूण केली. दे या पत्राला उत्तर ! मी गांगरले. मी बेसावध होते. या पत्राला काय उत्तर द्यावं या टेन्शनमध्ये माझ्या तोंडातून शब्द फुटेना. विमलमावशीने मला सांभाळून घेत स्वतःच त्या पत्राला उत्तर दिलं. मी तिचं उत्तर लक्षपूर्वक ऐकलं. एका क्षणात मला जबाबदारीची जाणीव झाली. ही श्रोत्यांच्या पत्राला उत्तरं देणारी “मी” कुणीही नाही. ती “मी” आज माधुरी प्रधान आहे. उद्या इतर कोणीही असू शकते. मी त्या माध्यमाची, आकाशवाणीची प्रतिनिधी म्हणून बोलणार आहे. तेव्हा मला प्रत्येक विधान अत्यंत जबाबदारीने करायला हवं. चोख करायला हवं.
मी सावध झाले. सावरले. आता माझा धीर थोडा चेपला. विमल मावशी पत्राचं वाचन करत होती. मी अत्यंत लक्षपूर्वक तिने वाचलेल्या प्रत्येक पत्रातला मजकूर ऐकत होते. मनाशी उत्तराची जुळवाजुळव करत होते. ती पत्राला उत्तर देण्यासाठी मला सूचना करत होती. माझं उत्तर चुकीचं अथवा अयोग्य वाटलं तर अत्यंत खेळीमेळीच्या स्वरात ती ते दुरुस्त करत होती. आता मी हा प्रश्नोत्तराचा Live कार्यक्रम एन्जॉय करू लागले. एकमेकींना प्रतिसाद देत, प्रत्येक पत्राला उत्स्फूर्त उत्तर देत कार्यक्रम रंगू लागला. हा खेळ खूपच मस्त होता. थ्रिलिंग होता.
कार्यक्रमाची वेळ संपत चालली होती. शेवटचे काही प्रश्न बाकी होते. आता मी सहज सराईतपणे उत्तरं देऊ लागले. कारण समोर उभी असलेली विमल जोशी अडखळत्या क्षणांना समर्थपणे आधार देत होती. एकमेकींना प्रतिसाद देत रंगलेला हा कार्यक्रम कधी संपत आला कळलच नाही.
सात वाजले. कामगार सभेचा कार्यक्रम संपला आणि ताणलेली स्प्रिंग सुटावी तसं काहीस माझं झालं. मी अक्षरशः स्टुडिओतल्या खुर्चीत बसकण मारली. विमल मावशी माझ्या जवळ आली. “काय ग कसं वाटलं लाईव्ह कार्यक्रम करताना ?” मी काहीच बोलले नाही. तिने माझ्या पाठीवर थोपटलं. “माधुरी तुला आकाशवाणीचे कार्यक्रम करायला आवडतं ना ? मग तुला इथल्या प्रत्येक कामाचा अनुभव घ्यायला हवा. त्यात तरबेज व्हायला हवं. लाईव्ह कार्यक्रम करणं सोपं नाही हे मला चांगलं ठाऊक आहे. लाईव्ह कार्यक्रमाचा ताण वेगळाच असतो. पण माधुरी रेकॉर्डेड कार्यक्रम आणि लाईव्ह कार्यक्रम यातला फरक तू लक्षात घे. लाईव्ह कार्यक्रमात चुकीला माफी नाही. चूक सुधारण्याची संधी नाही. परतीचा मार्ग नाही. माईक वरून आपल्या मुखातून गेलेला प्रत्येक शब्द जसाच्या तसा श्रोत्यांच्या कानांत आणि मनांत थेट पोचतो. म्हणूनच आपल्या फक्त आवाजावरून सुद्धा श्रोत्यांना आपली मन:स्थिती नेमकी कळते. कधीतरी आपलं चित्त विचलित करणाऱ्या घटना नुकत्याच घडलेल्या असतात. मन विस्कटलेलं असतं. विचार भरकटलेले असतात. पण ते सगळे विचार निग्रहाने दूर सारून अवघं चित्त कार्यक्रमावर एकवटून ते सादर करावे लागतात. आकाशवाणीच्या श्रोत्यांना अनभिज्ञ, अजाण समजण्याची चूक कधीही करू नकोस. आकाशवाणीचा प्रत्येक श्रोता जाणकार असतो. सजगपणे आपले कार्यक्रम ऐकत असतो. आकाशवाणीवर श्रोत्यांचा पूर्ण विश्वास असतो. मग ती बातमीपत्रातली बातमी असो अथवा एखाद्या कार्यक्रमातून मिळालेली माहिती ! तेव्हा या माध्यमाच प्रतिनिधित्व करताना नेहमी जबाबदारीची जाणीव ठेवून काम कर. मग तुला लाईव्ह कार्यक्रम करणं कधीच अवघड वाटणार नाही. तुला कळतंय मी काय म्हणतेय ते !” मी मान डोलवली.
विमल मावशीच्या त्या चार समजूतदार शब्दांनी डोळ्यांत पाणी आलं. खरंच ! लाईव्ह कार्यक्रम करणं कितीही अवघड असलं तरी समय सूचकता, एकाग्रता आणि अभ्यास या त्रिसूत्रीचा अंगीकार केला की लाईव्ह कार्यक्रमाचं आव्हान पेलणं तुलनेने सोपं जातं. फक्त त्यासाठी या माध्यमाशी बांधिलकी निर्माण व्हायला हवी. अशी बांधिलकी जाणली आणि जपली की कार्यक्रमाचे स्वरूप, त्यांची मांडणी आणि व्यक्त होण्याचं माध्यम कोणताही असलं तरी कार्यक्रम यशस्वी होतातच !
कालांतराने दूरदर्शनवर हॅलो सखी कार्यक्रम लाईव्ह करायची वेळ आली तेव्हा विमल जोशीने दिलेली शिकवण आणि सल्ला लाख मोलाचा ठरला.
क्रमशः
— लेखन : माधुरी ताम्हणे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 969484800
खूपच छान. असे वाटलं की मी आताच त्या कार्यक्रमाचा अनुभव घेतला
वाह वाह… खूप छान वाटतं हे सर्व वाचताना. आकाशवाणीवर माणूस समोर दिसत नसला तरी आवाजावरून पलिकडच्या माणसाची मानसिक अवस्था कशी कळत असेल त्याचा अनुभव तुमच्या लिखाणाच्या माध्यमातून आला आणि खूप गम्मत वाटली.
खूपच छान!! प्रश्नोत्तराचा लाईव्ह कार्यक्रम एकमेकींना प्रतिसाद देत, प्रत्येक पत्राला उत्स्फूर्त उत्तर देत कसा रंगू लागला हे वाचताना आजचा भाग कसा पटकन संपला ते कळलही नाही.
खूप सुंदर शब्दांकन. वाचल्यानंतर हा कार्यक्रम आपणही ऐकत होतो व आताच तो कार्यक्रम संपला आहे असं वाटलं.