Thursday, December 5, 2024
Homeलेख"माध्यम पन्नाशी" - भाग १३

“माध्यम पन्नाशी” – भाग १३

ऐन दिवाळीत, मुंबईतील वरळी येथील National Association For The Blind या संस्थेत मी रेकॉर्डिंगला गेले. ती दिवाळी मला एक वेगळीच “गिफ्ट” देऊन गेली.

“परिस्थितीचा समंजस स्वीकार” हा जगण्याचा मूलमंत्र मनापासून आत्मसात केला की आनंदाचा घडा आयुष्यात मुळी कधी रिताच होत नाही. एकदा हे सत्य मनांत रुजलं की भौतिक जगांतल्या नाशिवंत गोष्टीतल्या आनंदापेक्षा शाश्वत, चिरंतन मूल्य जपण्याचा आनंद मनाला व्यापून उरतो. या दुर्मिळ आनंदाचा शोध हेच खरं सकारात्मक जगणं! असा हा नवा दृष्टिकोन देणाऱ्या “दृष्टीचा” शोध मला National Association For The Blind या संस्थेमध्ये लागला. या नव्या “दृष्टीने” सबळ- दुर्बळ, व्यंग- अव्यंग या शब्दांचे जणू संदर्भच बदलले. आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला लावणाऱ्या “दृष्टीची” अनोखी दिवाळी भेट दृष्टी हिनांच्या त्या कार्यक्रमाने मला दिली. उमलत्या वयांत मिळालेली वेगळ्या “दृष्टीची” ही अमूल्य भेट पुढील आयुष्याची वाटचाल करताना खूप मार्गदर्शक ठरली. खाजगी आयुष्यातल्या एखाद्या अनाहूत उदास क्षणी अंधशाळेने मनांत उजळलेला हा आशा दिप मनाला सावरायला, प्रकाशाची वाट दाखवायला खूप उपयोगी पडला.

त्यादिवशी NAB या अंधशाळेतील रेकॉर्डिंग संपवून मी निघाले. पुन्हा एकदा प्रशस्त कॅरीडोर मध्ये पांढऱ्या काठ्यांची घंटा वाजवत अंध मुलांचा घोळका माझ्यासमोरून आला. मात्र आता मी दचकले नाही. बिचकले नाही. मला त्यांची किव करावीशी मुळीच वाटली नाही. उलट आत्मविश्वासाने निथळणाऱ्या त्या मुलांची ऊर्जा, मलाच चैतन्य देऊन गेली. ती सगळी मुलं हसत खेळत एकमेकांशी गप्पा मारत होती. एकमेकांची चेष्टा मस्करी करत होती. हातांवर टाळ्या देत, पाठीवर थाप मारत हास्यविनोद करत होती. मनमुराद खळखळून हसत होती. ते पाहून माझ्याही ओठांवर नकळत हसू फुटलं. खरंच! स्वतःच्या वैगुण्यावर मात करून आयुष्य समरसून आनंदात कसं जगायचं ते ह्या मुलांकडून शिकावं! उदासीनतेच्या, दुःखाच्या कोषांत गुरफटून न जाता, मनमुक्त आयुष्य जगण्याचा मंत्र या मुलांकडून जणू मिळाला. नुकत्याच भेटलेल्या शिरीनचे शब्द माझ्या कानांत घुमत होते.

“दीदी आमच्यात व्यंग असलं तरी कोणतीही उणीव नाही. कमतरता नाही. आम्ही सबळ आहोत. भक्कम आहोत. शरीराने आणि मनाने सुद्धा! म्हणूनच मी कळकळीने सर्वांना सांगते,” आम्हाला प्रेमाचे चार शब्द द्या. सहानुभूती, कणव नका दाखवू”. आम्ही सक्षम आहोत. नॉर्मल आहोत. आम्ही कोणत्याही विशेष सोयी सवलती मागत नाही. आम्ही सगळेजण तुमच्यासारखाच दूर दूर चा प्रवास रेल्वेने करतो, बसने करतो आणि कार्यालयात येतो. तिथं काम करतो. घरी सुद्धा सगळी कामं करतो.अगदी धडघाकट माणसांसारखी! आम्हाला समाजावर, कुटुंबावर आमचा भार टाकून जगायला नाही आवडत! त्याला कारण मुळांतच आमच्या पालकांनी आम्हाला स्वावलंबी केलय. स्वयंपूर्ण केलंय. माझ्या आई-वडिलांनी कधीही अंध मुलगी म्हणून माझे लाड केले नाहीत. ते मला बाजारात, शाळेत एकटीला पाठवत. माझ्यासोबत कोणीही येत नसे. ते म्हणत,”आम्ही तुला आयुष्याला पुरणार नाही. प्रत्येक वेळी तुझा मार्ग तुलाच शोधायचा आहे. त्याची सुरुवात आतापासून कर. तुला सगळं आलंच पाहिजे”.मी नव्याने स्वयंपाक शिकत होते तेव्हाची गोष्ट! एकदा मला तापलेल्या कढईचा जोरात चटका लागला. मी लहान होते. आईला म्हटलं,” आता मी कधीच स्वयंपाक करणार नाही.”आई शांतपणे एकच वाक्य बोलली. “पुढच्या वेळी तुला चटका लागणार नाही”. बस! No Pampering ! एकदा स्वयंपाक करताना मी गॅसवर वाकून भांड्यात बघत होते. अचानक माझ्या अंगावरच्या ओढणीने पेट घेतला. मला ते कळलंच नाही. आईने पटकन माझी ओढणी खांद्यावरून खाली खेचली. थोडंसं भाजलं . पण मी वाचले. आई तेव्हा एकच वाक्य बोलली, “इथून पुढे स्वयंपाक करताना ओढणी काढून ठेवत जा!” या अशा प्रसंगांतून गेल्यामुळे मी भक्कम झाले. आता मीच अंधमुलींना प्रशिक्षण देण्याचं काम करते!”

शिरीनचं बोलणं ऐकून मी थक्क होत होते. हातीपायी धडधाकट असूनही मनाने दुर्बळ असणाऱ्या, स्वतःच्याच कृत्रिम दुःखाच्या कोषांत गुरफटून घेत, घुसमट सहन करत जगणाऱ्या माणसांपेक्षा दृष्टीचं दान पदरात न पडताही सबळपणे, सक्षमपणे “आनंदाचे झाड” बनून सकारात्मक विचारांची प्राजक्ताच्या फुलांसारखी पखरण करणारी ही अंध मुलं-मुली! सलाम त्यांना! त्यांच्यातल्या चैतन्याला! ऊर्जेला!
त्यावर्षीच्या दीपावलीने माझ्या अंतरात आगळ्या अनुभवाचा एक दीप प्रज्वलित केला. झंझावाताला न भिता तोंड देणाऱ्या पणतीच्या त्या इवल्याशा आशा ज्योतीने मन लख्ख उजळलं. त्या उजळलेल्या प्रकाशात एक सत्य लखलखीतपणे दिसलं. जाणवलं. मिट्ट अंधारात आयुष्याची वाटचाल करताना, अंतरात उजळलेल्या आशेच्या इवल्याशा पणतीचा प्रकाशसुद्धा योग्य दिशेने पुढचं पाऊल टाकण्यासाठी पुरेसा असतो.

हे असे अनेक धडे बाह्यध्वनीमुद्रणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या तरुण वयात मी गिरवले. त्याचं कारण असं होतं की बाह्य ध्वनीमुद्रणाच्या कार्यक्रमांसाठी समाजात थेट मिसळावं लागत होतं. सर्व स्तरातल्या, सर्व वयोगटातल्या माणसांशी थेट संवाद साधावा लागत होता. हे कार्यक्रम करताना काल्पनिक विश्वात रमून एखादं कथानक रचण्या ऐवजी किंवा एखाद्या विषयाचा अथवा समस्येचा केवळ पुस्तकी अभ्यास करून, एखादा कार्यक्रम करण्याऐवजी समाजातील विविध समस्यांना थेट भिडणं, समाजातल्या सर्व स्तरातल्या घटकांशी थेट संवाद साधणं आणि त्यांच्यावर कार्यक्रम करणं हे अत्यंत गरजेचं होतं. एकूणच समाज जीवनात मिसळून सामाजिक स्पंदनं टिपणं आणि ती कौशल्याने आणि रंजकपणे आपल्या कार्यक्रमांद्वारे श्रोत्यांपर्यंत किंवा लेखाद्वारे वाचकांपर्यंत पोहोचवणं हे खरोखर आव्हानात्मक कार्य होतं.
त्यासाठी मुळांत स्वतःच्या मनाची मशागत करणं अनिवार्य होतं. एका मध्यमवर्गीय सुखवस्तू घरांतल्या विशीतल्या तरुणीला—– जिने अभावग्रस्त आयुष्य कधी पाहिलंच नाही, तिला समाजातल्या गोरगरीब, वंचित, उपेक्षित घटकांमध्ये थेट मिसळताना कितीतरी मर्यादा येतात. येऊ शकतात. हे प्रतिबंध अथवा मर्यादा शारीरिक, मानसिक, भावनिक कोणत्याही पातळीवरच्या असतात. उदाहरणार्थ माझ्या मध्यमवर्गीय मनाला हॉटेलीयर विठ्ठल कामत यांच्या मुलाखतीसाठी “ऑर्किड” या पंचतारांकित हॉटेलमध्ये जाताना किंचित अवघडलेपणाची कंपनं अनुभवणं अगदी स्वाभाविक होतं. पण फ्लॅट संस्कृतीत वाढलेल्या माझ्यासारखीला थेट धारावीच्या झोपडपट्टीत पाय टाकल्यावर बसणारा मानसिक धक्का हा आठ रिश्टरचा तीव्र स्वरूपाचा भूकंपाचा धक्काच होता. असे अनेक मानसिक, भावनिक धक्के पचवण्याची क्षमता या बाह्यध्वनिमुद्रणाच्या कार्यक्रमांमुळे उमेदवारीच्या काळांतच मला प्राप्त झाली.

पुढे विविध माध्यमांतून लिखाणासाठी, विशेषतः ‘लोकसत्ता’ दैनिकातील चतुरंग पुरवणीसाठी “भोगले जे दुःख त्याला” या सदराचं लिखाण करताना या क्षमतेचा खराखुरा उपयोग झाला.
बाह्यध्वनिमुद्रणाच्या कार्यक्रमांसाठी समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये मिसळताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षांत आली की हे मिसळणं कार्यक्रमाच्या निमित्ताने तात्कालीक कारणांसाठी असलं, तरी त्याचा हेतू केवळ रेकॉर्डिंग करणं एवढाच सीमित असू नये. केवळ रेकॉर्डिंगच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवल्यास, त्यांच्या वंचनांचा, समस्यांचा फक्त कोरडा अविष्कार मुलाखतींमधून घडेल! या मुलाखतींमध्ये जिवंतपणा, भावनिक ओलावा येणं आवश्यक आहे. तर त्यासाठी आपल्या मनाच्या मातींत संवेदनांचा ओलावा, ती आर्द्रता मुळांतअसायला हवी! त्यासाठी त्यांच्याशी बोलताना आपण कोणीतरी श्रेष्ठ आहोत आणि ही माणसं क:पदार्थ आहेत असा उच्चनीचतेचा भाव बोलण्या वागण्यात कदापि दिसता कामा नये. तसं झालं तरच त्यांच्या आणि आपल्या मधील अवघडलेपणाची नकळत उभी झालेली भिंत दूर होईल. तेव्हाच तळागाळातील माता भगिनी विश्वासाने आपल्याशी बोलतील. आपली दुःख, आपली वंचना, उपेक्षा व्यक्त करतील. त्यासाठी आपल्या शब्दांमध्ये, संवादांमध्ये भावनेचा ओलावा, आत्मीयतेचा स्पर्श असला पाहिजे. ही आत्मीयता दिखाऊ आणि मतलबी असेल, तर ते ओळखण्याची क्षमता या अशिक्षित वा अल्पशिक्षित गोरगरिबांच्या ठायी उपजत असते. त्यामुळेच जेव्हा स्वतःच्या मनांत अनुकंपेची, कणवेची भावना सच्चेपणाने रुजेल, तेव्हाच ती समोरच्या व्यक्तीच्या मनावर विश्वासाचं शिंपण करेल. आणि मग सहसंवेदनेची भावना त्यांच्याही मनांत निर्माण होईल. अशा भावना वेगात चिंब भिजलेल्या व्यक्तीशी मग संवाद साधणं सोपं होत जाईल! कारण तो मनामनाचा संवाद असेल! तिथे रेकॉर्डिंग, कार्यक्रम, लेखन या साऱ्याच गोष्टी दुय्यम ठरतील!

एकदा मनाने हा निर्वाळा दिल्यावर नजरच बदलली. त्या नजरेतला एरवीचा काहीसा श्रेष्ठतेचा भाव पूर्णतः मावळून गेला. उलट त्या नजरेत त्यांच्या जगण्याविषयी अनुकंपा, प्रेम, कणव, माया याच भावना दाटून आल्या. तिथे आकाशवाणी कलावंताची झूल पार गळून पडली. उरला तो फक्त सुसंवाद! माणसाने माणसाशी साधलेला माणूसकीचा सुसंवाद !
या सुसंवादाने या माध्यमांद्वारे जे विहित कार्य आपल्याला करायचं आहे, त्याची अत्यंत रास्त जाणीव करून दिली. केवळ लोकप्रियता अथवा प्रसिद्धी, हा, हे कार्यक्रम करण्यामागचा हेतू असूच शकत नाही. तर आकाशवाणीसारख्या संवेदनशील व प्रभावी माध्यमाद्वारे समाजातील सर्व स्तरांतल्या माणसांचं आयुष्य, त्यांच्या समस्या यांची श्रोत्यांना माहिती करून देणं, समाजात जागरूकता निर्माण करणं आणि त्यायोगे अशा पिडित समाज घटकांना आर्थिक वा इतर मदतीचा हात मिळवून देणं हाच या सर्व कार्यक्रमांचा व लेखनाचा प्रधान हेतू आहे. आणि तेच उद्दिष्ट असावं! असं म्हणतात ना, “इरादे नेक हो, तो सारी कायनात तुम्हे मदद करती है!” हे वचन पुढच्या काळांत शब्दशः खरं ठरण्याचे अनेक प्रसंग घडले. माध्यमांच्या द्वारे असं अनोखं कार्य आपल्या हातून घडावं हे विधीलिखित जाणवून मनाला खूप समाधान लाभलं. त्याचबरोबर संस्था असो वा समाज, प्रत्यक्ष त्या स्थळी जाऊन रेकॉर्डिंग करण्याचे, त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचे हे कार्यक्रम अथवा स्तंभलेखन अतिशय जबाबदारीने करायला हवं याचं नेमकं भानही आलं. माध्यमांच्या जगताने या कार्यक्रमांद्वारे आपल्यावर जणू एक जबाबदारी सोपवली आहे आणि आपल्याला ती निष्ठेने पार पाडायची आहे, याची अंतर्मनाला स्पष्ट जाणीव झाली. जसजसे हे बाह्यध्वनी मुद्रणाचे कार्यक्रम करत गेले, तसतशी ही जाणीव अधिकाधिक दृढ होत गेली. या जाणिवेतूनच एक निर्णय मनोमन घेऊन टाकला. इत:पर कोणत्याही सामाजिक संस्थेवर कार्यक्रम करताना आकाशवाणी कडून वा इतर कोणत्याही माध्यमातून मिळणाऱ्या मानधनामध्ये आपली फुल ना फुलाची पाकळी टाकून ते मानधन संस्थेच्या गंगाजळीत अर्पण करावं किंवा कोणत्याही सेवाभावी व्यक्तीला ते दान करावं.

‌‌गेली ५० वर्षे निष्ठेने हे व्रत पाळताना मनाच्या तळाशी एकच विचार दृढ होता. बाबा आमटे, इंदुताई पटवर्धन यांच्यासारखं महान कार्य आपल्या हातून घडत नसलं, तरी मानवतेचा सेतू उभारण्याच्या या कार्यात ईवलासा खारीचा वाटा उचलण्याचं काम तरी आपण करावं! ‌‌.
माध्यमांच्या ऋणातून उतराई होण्याची ही एक अल्पशी‌ कृती! मनाला अतीव समाधान देणारी!
क्रमशः

— लेखन : माधुरी ताम्हणे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. NAB ह्या अंधशाळेतला तुम्हाला आलेला निराळा अनुभव खरोखरच मन उजळवून टाकणाराच होता.बाह्यध्वनीमुद्रणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील गोरगरीब,वंचित,उपेक्षित व्यक्तींच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यामुळे त्यांच्या आयुष्याची तुम्हाला जवळून ओळख झाली.त्यामुळे माधुरीवहिनी, तुमच्या ऐन उमेदवारीच्या काळात आलेले हे अनुभव आयुष्यातील मानसिक आणि भावनिक धक्के सोसण्यासाठी तुमचं मन सक्षम करीत गेले आणि तुमचा माणुसकीशी सुसंवाद होत गेला. हे खूप महत्वाचे घडले. हे सगळे अनुभव तुमची पुढची कारकीर्द समृध्द करीत गेले ह्यात काहीही शंका नाही.
    तसेच विविध माध्यमांद्वारे कार्यक्रम केल्यानंतर मिळालेल्या मानधनातून आपल्याला शक्य होईल तितकी मदत कोणत्याही सेवाभावी संस्थेला करण्याची आपली कृती स्तुत्य आहे.

  2. Very nice contents and presentation.
    Good work and thinking .
    All the best for all your future work Madhuri madam!
    🙏🌹

  3. खूप छान शब्दांत त्यांच्या कर्तृत्वाची ओळख करून दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !