३ ऑक्टोबर १९७५ आणि १४ जानेवारी १९७६ या दोन्ही कॉन्ट्रॅक्टवर सही करताना याची तीळमात्र कल्पना नव्हती की आपला या निमित्ताने आवाजाच्या दुनियेत प्रवेश होत आहे. ही आवाजाची दुनिया आपल्या आवाजाला, आपल्या नावाला आणि आपल्या एकूण व्यक्तिमत्त्वालाच ओळख मिळवून देणार आहे. आयुष्यात आवाजाचं स्थान आणि महत्त्व या दोन्ही कॉन्ट्रॅक्टने पटवून दिलं.
हे आवाजाचं महत्व अधोरेखित करणारं आदर्श विद्यापीठ होतं नीलम प्रभू, प्रभाकर जोशी, प्रभू दिक्षित, लीलावती भागवत, विमल जोशी ही दिग्गज मंडळी !
मी सुरुवातीला सनदीसाहेब अथवा मिसेस. जोशी यांच्या मागे मागे स्टुडिओत जात असे. ते रेकॉर्डिंगचं मशीन, त्यावरचे फेडर यांचे निरीक्षण करत असे. एक फेडर ऑन करून आधी वक्त्याच्या आवाजाची लेव्हल घ्यायची, नंतरच मुख्य रेकॉर्डिंग सुरू करायचं हे तंत्र हळूहळू आत्मसात करून घेतलं. बदलत्या काळानुसार या तंत्राला आता कॉम्प्युटराईज्ड रेकॉर्डिंगची जोड मिळालेली असली, तरी रेकॉर्डिंगचा मुलमंत्र आजही तसाच आहे.
रोजच्या प्रॅक्टिसने वक्त्यांच्या आवाजाचा पोत, आवाजाची पट्टी कळू लागली. त्यानुसार ध्वनीमुद्रणाची पद्धत अनुसरण्याचं तंत्र जमू लागलं. रेकॉर्डिंग म्हणजे केवळ मशीन ऑन करून कार्यक्रम रेकॉर्ड करणं एवढच तांत्रिक काम नसतं हे ध्यानात आलं आणि मग त्या कामात मजा वाटू लागली. मात्र हे काम किती काळजीपूर्वक, अवघ चित्त एकवटून करायला हवं याचा धडा एका रेकॉर्डिंगमध्येच मिळाला.
एक दिवस एका वक्त्याचं रेकॉर्डिंग ठरलं होतं. अचानक त्याचवेळी सनदीसाहेबांना एक तातडीचं काम आलं. रेकॉर्डिंगसाठी दुसर कोणीच उपलब्ध नव्हतं. त्यांनी मला विचारलं, “तू ह्यांच रेकॉर्डिंग करशील ? जमेल तुला ?” सोप्प तर आहे ! मी मनात म्हटलं आणि जोरात होकार भरला.
स्टुडिओ बुकिंग झालेलं होतं तिथे मी त्या वक्त्यांना घेऊन गेले. आता मी माहितगार होते. सराईतपणे त्यांना खुर्चीत बसवलं. त्यांची व्हॉइस टेस्ट घेतली. रेकॉर्डिंग सुरू झालं. संपलं. मी मशीन ऑफ केलं. त्या दिवशी मी स्वतःवर खुश होते. आज पहिल्यांदा मी स्वतंत्रपणे एका वक्त्याच्या भाषणाचं रेकॉर्डिंग केलं होतं. कोणाच्याही मदतीशिवाय ! टेप गुंडाळली. क्यू शीट लिहिली. ती क्यू शीट आणि रेकॉर्डिंगची टेप व्यवस्थित खोक्यांत भरली आणि रूममध्ये आले. सनदी साहेब जागेवर नव्हते. मी घरी जायला निघता निघता ते आले. मी टेप त्यांच्या स्वाधीन केली आणि घरी निघाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी उत्साहात आकाशवाणीत पोहोचले. काल पहिल्यांदा स्वतंत्रपणे रेकॉर्डिंग केलं होतं आणि मला ते मशीन हाताळणं चांगलं जमलं होतं.
पहिला पडाव पार पडला होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी सनदी साहेबांना गुड मॉर्निंग करून जागेवर बसले. ते थोडे गंभीर होते. हातातलं काम संपवून त्यांनी मला बोलावलं. कालची टेप हातात ठेवली. मी प्रश्नार्थक मुद्रेने बघू लागले. ते म्हणाले, “काल रेकॉर्डिंग झाल्यावर टेप चेक केली होतीस ?” मी गप्प. मला आठवत होतं, रेकॉर्डिंग संपल्याबरोबर मी टेप गुंडाळून व्यवस्थित खोक्यांत ठेवली होती.
ते गंभीरपणे उद्गारले, “प्रत्येक टॉक रेकॉर्ड केल्यावर तो संपूर्ण टॉक ऐकायला हवा खरं तर ! पण तेवढा वेळ नसतो. तेव्हा व्याख्यानाची सुरुवात, शेवट आणि मधला मधला भाग ऐकायचा. तो व्यवस्थित रेकॉर्ड झालाय की नाही ते तपासायचं आणि नंतरच टेप सुपूर्द करायची. काल तू घरी गेल्यानंतर मी स्टुडिओत जाऊन टेप चेक केली. काहीतरी तांत्रिक गडबड झाली होती आणि मधला मधला भाग रेकॉर्डच झाला नव्हता. आता हे रेकॉर्डिंग परत करावे लागणार !”
त्यांचा गंभीर चेहरा मला हादरवून गेला. पण त्या मागचं कारणही तसंच होतं. त्या वक्त्याला पुन्हा रेकॉर्डिंगला बोलवण्यासाठी सनदी साहेबांनी माझ्यासमोर फोन लावला. कदाचित वेळेअभावी त्यांना येणं जमत नव्हतं. त्यांच्या कार्यक्रमाच्या ब्रॉडकास्टची तारीख दुसऱ्याच दिवशी होती. त्यामुळे त्या दिवशी रेकॉर्डिंग होणं अत्यंत गरजेचं होतं. सनदी साहेब आपल्या पदाच अवडंबर न माजवता त्या वक्त्याशी अजिजीने बोलत होते. त्यांना आकाशवाणीत पुनश्च येण्याची विनंती करत होते. अखेर त्यांनी संध्याकाळी उशिराची वेळ दिली. मला अत्यंत अवघडल्यासारखं होत होतं. सनदी साहेब फारसे मूडमध्ये नव्हते. ते कामात व्यस्त होते. पाच वाजले तरी मी बसून होते. सनदी साहेब वरिष्ठांकडील काम संपवून रूम मध्ये परतले. मला पाहून म्हणाले, “हे काय तू अजून निघाली नाहीस ? घरी जायचं नाही तुला ?” मी म्हटलं, “ते वक्ते येत आहेत ना रेकॉर्डिंगला ? रेकॉर्डिंग झालं की मी जाईन !” ते हंसले. “मी करतो रेकॉर्डिंग. तू थांबू नकोस. जा तू.” तरी मी बसून राहिले.
बऱ्याच वेळाने ते गृहस्थ आले. आम्ही तिघं स्टुडिओत गेलो. सनदी साहेब पुन्हा पुन्हा त्या वक्त्याची माफी मागत होते आणि मी शरमेने चक्काचूर होत होते.
सनदीसाहेब कन्नड मधील प्रख्यात पारितोषिक प्राप्त कवी ! साहित्यिक ! आकाशवाणीतील तत्कालीन वरिष्ठ अधिकारी ! केवळ माझ्या एका चुकीमुळे त्यांना मान खाली घालावी लागली होती.
दुसऱ्या दिवशी दबकत मी रूममध्ये पाय टाकला. सकाळची मीटिंग आटपून सनदी साहेब जागेवर येऊन बसले. “मूर चहा कळसदी !” असा टिपिकल कानडी हेल काढून त्यांनी कॅन्टीन वाल्याला चहाची ऑर्डर दिली आणि मला म्हणाले, “ये. बस समोर. चहा घे. इतकी नर्व्हस होऊ नकोस. नवीन आहेस. होतं असं कधी कधी. यालाच ‘रॅगिंग ऑफ द मीडिया’ म्हणतात. या रॅगिंग मधून सर्वांनाच जावं लागतं. या अशा चुकांमधूनच शिकायचं असतं. इथून पुढे टेप चेक करायला तू कधीच विसरणार नाहीस याची मला खात्री आहे. त्याचं कारण, काल घरी जायला उशीर होत असतानाही तू रेकॉर्डिंगला स्वतःहून थांबलीस. मी रेकॉर्ड करत असताना तू माझी प्रत्येक कृती एकाग्रतेने टिपत होतीस. तुझ्या हातून नकळत चूक झाली. पण तू बेजबाबदार मुलगी नाहीस हे माझ्या लक्षात आलंय. तेव्हा आता जे झालं त्याचा गील्टफिल न घेता इथून पुढे मोकळेपणाने रेकॉर्डिंग करत जा !”
त्यांचे ते आश्वस्त करणारे चार शब्द ! मनाच्या कोऱ्या पाटीवर कोरले गेले.
माध्यमाच्या मोकळ्या अवकाशात आत्मविश्वासाने स्वैर संचार करण्याचं बळ देणारे हे असे अधिकारी तिथल्या पदांवर काम करत असतात. म्हणूनच अनेक कलावंतांनी ही पंढरी गजबजून जाते.
केवळ अधिकारीच नव्हे, तिथे काम करणारे —— कोणत्याही पदावरचे कर्मचारी, अगदी कॅज्युअल आर्टिस्ट सुद्धा अत्यंत आत्मियतेने काम करतात. प्रत्येक कार्यक्रम अत्यंत जबाबदारीने आणि चोख सादर करतात. केवळ उपजीविकेचे साधन म्हणून नव्हे, तर आकाशवाणी या माध्यमावर मनःपूर्वक प्रेम करणाऱ्या प्रत्येकामुळे हा जगन्नाथाचा रथ गेली ९७ वर्षे निर्विघ्नपणे मार्गक्रमण करत आहे.
या रथयात्रेतील एका पथिकाची माझी भेट ही माझ्या आकाशवाणीतील वाटचालीसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरली. ती व्यक्ती होती विमल जोशी !
एकदा स्टुडिओतल काम संपवून मी कॉफी प्यायला कॅन्टीनमध्ये गेले. एका टेबलावर बसले, कॉफीची वाट बघत ! थोड्याच वेळात एक निमगोरी, कुरळ्या केसांत रुपेरी छटा असलेल्या काहीशा स्थूल स्त्रीने कॅन्टीनमध्ये प्रवेश केला. तिच्या हातांत खूपशा टेप्सचे खोके होते. तिने चौफेर नजर फिरवली. संपूर्ण कॅन्टीन भरलेलं होतं. हसत खेळत चहापान चालू होतं. तिची नजर माझ्या टेबलाकडे गेली. माझ्या टेबलावरची मंडळी नुकतीच उठून गेली होती. मी एकटीच बसले होते. ती डुलत डुलत माझ्या टेबलाजवळ आली. धाडकन टेप्स टेबलावर आपटल्या आणि धप्पकन माझ्यासमोरच्या बाकावर बसकण मारली.
दोन मिनिटांनी तिच्या बोलक्या डोळ्यांनी मला आपाद मस्तक न्याहाळत थेट विचारलं, “नवीन दिसतेस ! नाव काय ग तुझं ?” “अं—–अं —-माधुरी प्रधान !” “अरे वा आमच्यातलीच आहेस की !” “मी विमल जोशी. पूर्वाश्रमीची विमल दळवी. कामगार सभा बघते आणि काय ग अशी चोरी पकडल्यासारखी चाचरत का बोलतेस ? जरा ठासून बोल की ! घाबरतेस कशाला ?”
तिच्या सरबत्तीने मी जरा दडपूनच गेले. साधारणपणे माझ्या आईच्या वयाची ही बाई ! ओळखदेख नसताना मला मस्तपैकी झापत होती. पण ती तिची स्टाईल होती. अगदी खास अशी !
त्या दिवसापासून तिची माझी छान गट्टी जमली. माझ्याशी अधिकारवाणीने बोलणं हे जणू तिने मला दत्तक घेतल्याची निशाणी होती. “अरे वा ! तू आमच्यातलीच आहेस की !” आमच्या संभाषणातलं हे वाक्य केवळ औपचारिक वाक्य नव्हतं. तिने खरोखरच मला आपलं मानलं होतं. म्हणूनच अगदी सहजगत्या ती माझी विमल मावशी बनून गेली.
आकाशवाणीच्या त्या विशाल जगांत हे दत्तक घेणं तिने अखेरपर्यंत जीवाभावाने निभावलं. मी नवखी ! जग रहाटीची फारशी जाण नसलेली ! माणसांची पारख नसलेली! तिच्या अनुभवी नजरेने हे नेमकं ओळखलं होतं. म्हणूनच विमल मावशी माझ्यावर नजर ठेवून असे. मला माझी स्पेस देऊन, पुरेस स्वातंत्र्य देऊन ती हे काम चोखपणे करत असे. उदाहरणार्थ एखाद्या निर्मात्याने मला कार्यक्रमासाठी बोलवलं की तिचा मुखपट्टा सुरू होई. “काय गरज ग तुला त्याच्याकडे कार्यक्रम करायची ? माझ्याकडे कामगार सभेत, वनिता मंडळात मिळतात ना कार्यक्रम तुला ? मग कशाला हवा तुला त्याचा कार्यक्रम ?” सुरुवातीला यातला गर्भितार्थ न कळून मी कार्यक्रम घेत असे. मात्र ती खुबीने माझ्याकडून रेकॉर्डिंगची वेळ जाणून घेई. त्यावेळेला स्वतःच्या एखाद्या कार्यक्रमाच्या डबिंगच्या निमित्ताने माझ्या आजूबाजूला घोटाळत राही. माझ्यावर नजर ठेवी. समज येईपर्यंत विमल मावशी माझी अदृश्य संरक्षक कवच म्हणून वावरत असे.
विमल मावशी सारखी अशी माणसं माझी आकाशवाणीतली वाटचाल सुकर करत होती. आकाशवाणीची ही वाट माझी मलाच चालायची होती. पण माझी या वाटेवरची चाल कशी असावी ते प्रेमाने, प्रसंगी दटावून सांगणारी अशी ही विमल मावशी ! अर्थात विमल जोशी. (अभिनेत्री निवेदिता सराफची आई)
क्रमशः
— लेखन : माधुरी ताम्हणे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800
माधुरी वहिनी,”माध्यम पन्नाशी”तुन तुमचा आकाशवाणीवरील अनुभव प्रवास नव्याने समजतोय.निलम प्रभु,प्रभाकर जोशी,विमल जोशी,बाळ कुरतडकर ह्यांचे आवाज,त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा ह्या तर कायम स्मरणात राहिल्या.अजुनही त्यांचे आवाज कानात रुंजी घालत आहेत आणि तुमचा त्यांच्या सोबतचा आकाशवाणीवरचा सहवास .खरंच खूपच अभिमानास्पद.
आता खूप खूप उत्सुकता पुढचा भाग वाचण्याची ….
माधुरी ताम्हणे यांनी केलेल्या “माध्यम पन्नाशी ” ह्या लेखनातून, सादर करीत असलेला त्यांचा आकाशवाणीचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचे अनुभवाचे बोल व अजूनही त्यांना मिळत असलेल्या अनुभवाची शिदोरी खुप मोठी आहे. आम्ही लहानपापासूनच रेडिओवरील कार्यक्रम ऐकत ऐकत मोठे झालो. पण ते कार्यक्रम नुसतच सादर करण नव्हे तर त्यातले तंत्रज्ञान व त्यातले बारकावे लक्षात घेऊन ते सादर करण , हे तुमच्या सहजरीत्या सादर करीत असलेल्या सुंदर लेखणीतून उमगले. आज रेडिओवरील कार्यक्रमाच्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद!!! पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!!!
अप्रतिम शब्दांकन. जणू आताच ती घटना घडली आहे असं वाटतं.
माधुरी,तुझे अनुभवाचे बोल वाचताना मजा येतेय खरी पण चूक झाल्यावर कसं वाटलं, ते पण छान वर्णन केलं आहेस.तुझ्या साहेबांनी इतके छान समजून घेतले,त्यामुळे ती चूक परत कधीच झाली नसणार.अशी समजूतदार माणसे असली की काम करायला पण उत्साह येतो.असेच नवनवीन अनुभव वाचायला मिळत राहोत.