बाह्य ध्वनिमुद्रणाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने वेगवेगळ्या संस्थांमध्ये रेकॉर्डिंग करत असताना एक गोष्ट लक्षांत आली. तिथे आपल्याशी बोलायला खूप जण उत्सुक असतात. त्यांना व्यक्त होण्याची फारशी संधीच कधी मिळत नाही. त्यांच्या गाठीशी सांगण्यासारखे अनुभव खूप असतात. ते ऐकण्यासारखेही असतात. ही माणसं—– मग ते लाभार्थी असो, शिक्षक असो वा संस्थाचालक ! ते मोकळेपणाने बोलतात. आपल्या भावना व्यक्त करतात. ते असे मोकळेपणाने भरभरून बोलत असताना, त्यांना मध्येच थांबवणं, त्यांचं बोलणं तोडणं अनुचित वाटतं. मनातून पक्की जाणीव असते की त्यांनी त्यांचं दुःख, वेदना कितीही असासून उत्कटपणे मांडलेल्या असल्या आणि आपल्याला त्यांच्या भावनांचा आदर कितीही करावासा वाटला, तरी ते सगळं कथन रेडिओच्या मिनिटांच्या हिशोबात बसवणं अवघड आहे. या गोष्टीची जाणीव असूनही त्यांचा रसभंग करणं उचित वाटत नाही. त्यांच्या उत्कट निवेदनात बाधा आणणं मनाला पटत नाही. असं असंवेदनशील वागणं असंस्कृतपणाचं आणि निष्ठुरपणाचं वाटतं. त्यामुळे ते बोलत जातात आणि आपण ते बोलणं रेकॉर्ड करत जातो. त्यांच्या बोलण्याने टेप्स भरभरून जातात आणि मग कार्यक्रमासाठी आवश्यकतेपेक्षा खूप अधिक कथन जमा होतं.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट नकळत घडते. हे सर्व अनुभव ऐकताना स्वतःच्या मनांत खूप खळबळ माजते. एक प्रसंग सांगते. विनोद गुप्तांच्या “सावधान” या नेपाळी वेश्यांच्या संस्थेत एकदा रेकॉर्डिंगला गेले होते. त्या वेश्या आधी मोकळेपणाने बोलतच नव्हत्या. माझा आश्वस्त स्वर, स्नेहाळ बोलणं ऐकून त्यातली एक जण पुढे झाली. ती सांगू लागली, “हम नेपाल मे हमारे गाव नही जा सकते! हालाकी एक बार विनोदजी ने हमारा छुटकारा किया और एक पूरी ट्रेन भर के हमे हमारे गाव पहुंचाने का प्रयास किया! मगर एक एक करके हम सब बंबई लौट आए !”
“मगर क्यू ?” माझा त्रस्त प्रश्न !”
”दीदी गाव मे हमारे मा बाप है ! भाई बहन है ! उनको पता है, हम यहा क्या काम करते है !लेकिन गाववालोंको पता नही ना ! हम यहा से पैसा कमाके भेजते है तो हमारे घर के लोग बडे चैन से अपनी जिंदगी गुजारते है ! बहन की शादी, भाई की शिक्षा सब कुछ हमारे पैसोंसे होता है ! लेकिन गाव वालों को हमारे धंदे के बारे में पता चलेगा तो अपनी इज्जत मिट्टी मे मिल जायेगी ऐसा सोचके हमे अपने ही घरवाले इज्जत नही देते ! गाव मे वैसे भी हम रहेंगे तो उनका गुजारा कैसे होगा? ये सोचके हमारे मा बाप और भाई बहन हमे घर भी नही आने देते ! ये कडवा सच है हमारे जिंदगी का !”
मी चिडून म्हटलं, “ऐसे घरवाले लोगों के लिए ऐसी नरक जैसी जिंदगी जीने के बजाय अपने लिए कमाओ! चैनसे जियो ! भूल जावो उनको !”
“दीदी फिर बुढापे मे सहारा चाहिये. वो कौन देगा ?”
“फिर कम से कम कुछ अच्छा काम ढूंढो! घरेलू काम करके इज्जत की रोटी कमावो! बर्तन, कपडा, झाडू पोछा ऐसे काम तुम आसानी से कर सकते हो !”
“दीदी तुम रखोगी हमे अपने घर मे काम करने के लिए ?”
तिचा तीरासारखा प्रश्न आला आणि मी अक्षरशः हादरले !
समजून-उमजून वेश्येला घरकामाला ठेवू आपण ? अज्ञानवश जरी ठेवलं, तरी तिच्या धंद्याची माहिती कळल्यावर तिला कामावर ठेवू की काढून टाकू ?
मनातल्या प्रश्नाला प्रामाणिक उत्तर द्यायचं मी टाळलं.
घरात नवरा आहे. तरुण मुलगा आहे. मग कसं ठेवणार अशा बाईला ? ही आपल्या सारख्यांची सामान्य प्रतिक्रिया! मग मला प्रश्न पडतो, आपला आपल्या पतीच्या चारित्र्यावर विश्वास नाही? तरण्याताठ्या मुलावर आपणच केलेल्या संस्कारांवर विश्वास नाही ? तर मग जी बाई पोटाची खळगी भरण्यासाठी घराबाहेर पडलीय, जी उच्चभ्रू घरात जन्माला न आल्यामुळे, अशिक्षित राहिल्यामुळे कदाचित नाईलाजास्तव या वेश्या व्यवसायात आलेय तिच्याही सच्चेपणावर आपण माणूस म्हणून विश्वास ठेवू शकत नाही. तर मग त्यांना नसते शहाजोग सल्ले देण्याचा आपल्याला काय अधिकार ?
असे अनेक निरुत्तर करणारे प्रश्न अंगावर आदळतात . तेव्हा मनांत भावनांचा कल्लोळ उठतो. आपल्या संवेदनशील मनांत त्यांच्या प्रांजळ कथनाचे, त्यांच्या दर्दनाक कथा कहाण्यांचे तरंग दीर्घकाळ उमटत राहतात. केवळ रेकॉर्डिंगचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून तटस्थपणे या पिडितांचे, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांचं कार्य जाणून घेणं, ऐकून घेणं जमत नाही. त्यांच्या कथनात आपण पूर्णपणे गुंतून जातो आणि मग त्यावर मनांत प्रांजळ प्रतिक्रियांचे तरंग उमटतात. अनेक उलट सुलट विचार, प्रतिक्रिया, निरीक्षणं यांची मनात भाऊगर्दी होते आणि मग त्यांची नोंद करावीशी वाटू लागते. या श्रवण कथनाचे तरंग आपल्या संवेदनशील मनांत व्यक्त होण्याची एक वेगळी असोशी निर्माण करतात. ती एवढी तीव्र असते की हे सगळं कधी एकदा कागदावर उतरवतोय अशी तीव्र आस मनात निर्माण होते. त्यात अर्थातच आजूबाजूच्या घटनांचे, समाजातील वंचितांच्या वेदनांचे हूंकार मिसळतात. त्यावर कोरड्या असहिष्णुतेचे वार करण्याऱ्यांच्या निषेधाचे सूर सुद्धा नकळत मिसळून जातात आणि मग नेमकं काय घडतं ?
या वंचितांची अनुभवांच्या साचलेपणातून मोकळं होण्याची तीव्र असोशी आणि त्यावरचे स्वतःच्या मनातले प्रतिसादात्मक विचार यांचं एक रसायन मनात खदखदू लागतं. या विचारांच्या घुसळणीतून, अस्वस्थतेतून जे संचित हाती लागतं त्याला शब्दांचं रूप देऊन कधी एकदा वाचकांच्या हाती सुपूर्द करतोय असं होऊन जातं.
नेमक्या याच सगळ्या भावभावनांच्या कल्लोळातून पहिल्या ध्वनिमुद्रणाच्या कार्यक्रमाच्या असंख्य टेप्स मी पुन्हा एकवार ऐकू लागले. त्या टेप्स मधून जमा झालेली माहिती, अनुभव यामध्ये माझ्या प्रतिक्रियांची नोंद घालून एक चांगला लेख बालकल्याणनगरीवर तयार केला आणि तो माहेर मासिकाकडे पाठवून दिला.
माहेर मासिकात कथा छापून यावी असा प्रयत्न यापूर्वी अनेकदा केला होताच. आता हे वेगळ्या प्रकारचं लेखन छापून येईल का की पुन्हा साभार परतचं पार्सल हाती पडेल अशी एक शंका मनाला सतत कृरतडत होती. पण एक दिवस “साभार परत” च्या पुडक्याऐवजी मेनका प्रकाशनच चक्क हिरव्या शाईतलं पांढरं पोस्टकार्ड टपालने घरी आलं. अवघ्या चार ओळींचं पत्र ! लिखाण स्वीकारत आहे. मानधन यथावकाश रवाना करत आहोत असा मजकूर असलेलं पत्र! पत्राखाली…
पु. वि. बेहेरे,
संपादक, माहेर
अशी छोटी सही !
माझा आनंद गगनात मावेना. “माहेर” मासिकाकडून अशा स्वीकृती पत्राची आजवर चातकासारखी वाट पाहिलेली! “माहेर” मासिकाला त्याकाळी उदंड लोकप्रियता लाभलेली ! त्यांत आपलं लिखाण छापून यावं अशी बहुतेक नवोदित आणि प्रस्थापित लेखक, लेखिकांची तीव्र इच्छा! पु.भा. भावे, ज्योत्स्ना देवधर, शैलजा राजे यांच्या श्रेयनामावलीत आपलंही नाव असावं असं स्वप्न त्याकाळी बहुतेक लेखकांनी पाहिलेलं! त्याचं कारण असं होतं की त्याकाळी आपलं लिखाण पु.वि.बेहेरे (राजाभाऊ बेहेरे) यांच्यासारख्या अनुभवी, साक्षेपी संपादकाला योग्य वाटलं, त्यांना ते छापावसं वाटलं तर त्याचा अर्थ आपलं लिखाण अगदीच सुमार नसावं. मान्य आहे, आपलं लिखाण अक्षर वाङ्ममय नसेलही! ते मान्यवरांच्या पंक्तीत मान्यता पावणारं सुद्धा नसेल ! पण ते किमान दर्जेदार निश्चितपणे असावं ! म्हणूनच स्वीकृती योग्य आहे. याचा अर्थ आपल्या लिखाणाची पत आणि प्रत चांगली असावी ! ‘माहेर’ मासिकाच्या माध्यमातून आपलं लिखाण चोखंदळ वाचकांच्या हाती पडलं, त्यांनी ते वाचलं आणि त्यांना ते आवडलं तर खरोखर आपल्या लिखाणावर लोक मान्यतेची मोहर उमटेल. आपले विचार योग्य असल्याचा दाखला मिळेल. लेखिका म्हणून आपल्या नांवावर शिक्कामोर्तब होईल! “माहेर” मासिकाचे संपादक पु.वि. बेहेरे यांच्या त्या स्वीकृतीच्या एका पत्राने इतके सगळे विचार मनाच्या तळाशी दाटून आले.
मी नव्या उमेदीने N A.B इथल्या रेकॉर्डिंगच्या टेप्स पुन्हा एकवार ऐकल्या आणि लक्षात आलं की आकाशवाणीच्या कार्यक्रमात त्यांतल्या फार थोड्या मजकुराचा वापर करता आला होता. त्यामुळे अंधत्वाच्या समस्येविषयी, त्या अंध मुला-मुलींच्या अनुभवांविषयी आणि संस्थेविषयी माझ्या मनांत उमटलेल्या विचारांचे प्रकटीकरण रेडिओच्या कार्यक्रमात अल्पांशानेही झालं नव्हतं. बाह्यध्वनी मुद्रणाचा प्रत्येक कार्यक्रम “रिपोर्टाज” याच श्रेणीत समाविष्ट होत असल्याने, केवळ तिथल्या हकीकतींचे तटस्थ रिपोर्टिंग एवढीच या माध्यमाची गरज असते. दोन मुलाखतींमध्ये निवेदनातून जे विचार व्यक्त करता येतील ते आणि तेवढेच वेळेच्या चौकटीत बसवणं आकाशवाणीच्या कार्यक्रमातून अपेक्षित होतं आणि ते पुरेसं नव्हतं. स्वसंवादाची अर्थात सेल्फटॉकची आकाशवाणीच्या या माध्यमात मुळी मुभाच नव्हती. बाह्यध्वनी मुद्रणाचे कार्यक्रम करताना स्वतःच्या विचारांच्या प्रकटीकरणाचं स्वातंत्र्य हे श्राव्य माध्यम फारसं देतच नाही. त्या उलट प्रिंट मीडियाच्या माध्यमांत मात्र अशी कोणतीही बंधन नव्हती. मर्यादा नव्हत्या. मुद्रित माध्यमात अभिव्यक्तीचं पूर्ण स्वातंत्र्य होतं. समस्यांचं वा कथनाचं केवळ रिपोर्टिंग ही मर्यादा ओलांडून मनातल्या स्पंदनांचं, आंदोलनांचं लेखातून घडणारं दर्शन प्रिंट मिडियाला भावलं. एका संवेदनशील व्यक्तीने टिपलेल्या निरीक्षणाचं, सामाजिक स्पंदनांचं, वैचारिक अभिव्यक्तीचं आणि तरल मनो व्यापाऱ्यांचं प्रिंट मीडियाने हात पसरून मनापासून स्वागत केलं
बालकल्याण नगरीवरील माझ्या लेखापाठोपाठ माहेरच्या संपादकांनी माझ्या NAB वरील दुसऱ्या लेखाला स्वीकृतीची पावती दिली आणि मला लिखाणाचा सूर सापडला. माझ्यातल्या लेखकाला जणू पंख फुटले आणि मुद्रित माध्यमाच्या मोकळ्या अवकाशात स्वच्छंदपणे विहरण्याचं बळ बेहेरे साहेबांच्या स्वीकृतीच्या त्या चार शब्दांनी मला बहाल केलं.
पुढची पन्नास वर्ष मुद्रित माध्यमात माझा मुक्त संचार असा सुरू झाला. “माहेर” मासिकात छापून आलेल्या त्या दोन लेखांनी त्याची जणू नांदीच केली. आकाशवाणी या श्राव्य माध्यमापाठोपाठ मुद्रित माध्यमातली मुशाफिरी अशी सुरू झाली. गो.नी. दांडेकरांनी म्हटल्याप्रमाणे, खरोखर असंख्य विषय सभोवती विहरत होते. ते लेखणीला चालना देऊ लागले. मजकुराला आणि जोडीने नांवाला प्रसिद्धी देऊ लागले.
प्रत्येक माध्यमाची बलस्थानं वेगवेगळी असतात. त्यानुसार अभिव्यक्तीचं स्वरूप बदलतं. अशा बदलत्या स्वरूपाशी जुळवून घेत त्या माध्यमात रमणं हे खरं आनंदनिधान !
क्रमशः
— लेखन : माधुरी ताम्हणे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
माधुरी, तुम्हाला आलेले अनुभव छान शब्दबद्ध केले आहेत. त्यामुळे बरीच माहिती मिळाली.
बाह्य ध्वनीमुद्रणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध संस्था आणि संस्थेतील व्यक्तींच्या ऐकलेल्या धक्कादायक अनुभवांना स्वत:च्या प्रतिक्रियेची जोड देऊन ते शब्दबध्द करावे आणि ते लिखाण”माहेर” सारख्या अमाप लोकप्रियता लाभलेल्या मासिकात छापून यावे म्हणजे आनंदाची पर्वणीच.श्राव्य माध्यमासोबत मुद्रित माध्यमातला आपला यशस्वी प्रवास अचंबीत करतो.ह्या मागची आपली मेहनत,परिश्रम दिसून येतात.प्रत्येक माध्यमाची भिन्न भिन्न बलस्थानं,त्यांचे बदलणारे स्वरुप आणि ह्या सर्व माध्यमात मनापासून,आनंदाने वावरणं खरंच कौतुकास्पद.
आरोग्यदायी जीवन जगू या !! ह्या अलका भुजबळ ह्यांच्या लेखनातून “मधुमेह” विषयी खुप छान महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे.
माधुरी ताम्हणे, ह्यांच्या प्रत्येक वेळच्या लेखनातून वेगवेगळे विषय हाताळले गेलेल्याचे वर्णन अतिशय उत्कृषटपणे मांडले आहे. सुन्दर लेखन व भाषेवरील प्रभुत्व खुप मस्त !!!!