Friday, December 6, 2024
Homeसाहित्य"माध्यम पन्नाशी" : १५

“माध्यम पन्नाशी” : १५

आकाशवाणीवरील बाह्यध्वनीमुद्रणाच्या कार्यक्रमांमुळे मनांतल्या विचारांना प्रकटीकरणाचा आयाम लाभला. त्यामुळे प्रत्येक वेळी तिथलं वातावरण, लाभार्थींचे कथन याला स्वतःच्या विचारांची जोड लाभली आणि मग लिखाणाला वेग आला.

या लिखाणाने छापील स्वरूप मात्र स्वतःच निवडलं. कधी तिथे भेटलेली माणसं, कथा व लघुकादंबरीच्या कथानकातल्या व्यक्तिरेखा बनून जिवंत झाली. तर कधी वैचारिक स्पंदनं टिपण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या लेखांमधून होत गेला. लिखाणाच्या स्वरूपानेच प्रसिद्धीचं माध्यम ही निवडलं. अल्पाक्षरी शैलीत टोकदार भावना प्रकट करण्यासाठी वृत्तपत्र (लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामना) आणि त्यातले चार स्तंभ पुरेसे असत. तर हजार शब्दांची मर्यादा ओलांडलेल्या लेखाने पाक्षिक (चंदेरी) अथवा साप्ताहिक (श्री साप्ताहिक, लोकप्रभा) अशी माध्यमं निवडली. त्याही पलीकडील शब्दसंख्येत शब्दबद्ध झालेल्या मजकुराने ‘माहेर’ मासिकाला प्राधान्य दिलं. अर्थात त्याचबरोबर कथा या लेखन प्रकाराने स्त्री, किर्लोस्कर, मेनका, ललना, अनुराधा, हंस, मोहिनी, प्रपंच, मानिनी आणि गृहलक्ष्मी अशी विविध मासिकं निवडली. विषयानुसार भावनांच्या अविष्कारासाठी कथा, ललित लेख असं जे स्वरूप आकाराला येईल ते ते लिहीत गेले. मग एकदा पुण्याला गेल्यावर ‘माहेर’ मासिकाचे संपादक पु.वि. बेहेरे तथा राजाभाऊ बेहेरे यांना भेटण्याचं निश्चित केलं.

‘माहेर’ मासिकावर पत्ता होताच. तो पत्ता शोधत शोधत नारायण पेठेतल्या जुन्या वाड्यातल्या कार्यालयात थेट पाऊल टाकलं. अर्थात त्याकाळी फोन करून वा मेसेज टाकून अपॉइंटमेंट घेण्याची सोय आणि पद्धत दोन्हीही नव्हती. ‘माहेर’ मासिकाच्या कार्यालयात मासिकं आणि पुस्तकांच्या कोऱ्या कागदांचा वास सर्वत्र भरून राहिला होता. त्या वासाने माझं छान स्वागत केलं. मी ऊर भरून तो वास हृदयात साठवला. या वासाशी माझं काहीतरी अनाम नातं आहे असं मला जाणवलं. माहेर मासिकाच्या कार्यालयाची पुण्याई अशी की पु. भा. भावे, व. पु. काळे, मधु मंगेश कर्णिक, ज्योत्स्ना देवधर अशा थोर साहित्यिकांचा तिथे राबता असे. त्यामुळे माहेरच्या कार्यालयात पाय टाकताना, वय अनुभव, अधिकार आणि संपादकीय ज्ञान अशा सर्वच दृष्टीने माझ्यापेक्षा खूप मोठे असलेले संपादक श्री पु.वि. बेहेरे आपल्यासारख्या विशीतल्या नवोदित लेखिकेचं कसं स्वागत करतील याचं मनावर दडपण आलं होतं. थोड्याच वेळात बेहेरेसाहेबांनी आंत बोलावलं. मी दबकत त्यांच्या छोट्याशा केबिनमध्ये पाय टाकला. अत्यंत नीटनेटक्या केबिन मधल्या टेबलासमोरच्या खुर्चीत गोरे, पिंगट घाऱ्या डोळ्यांचे, चष्मा लावलेले बेहेरे साहेब हातातल्या पाईपचा शांतपणे झुरका घेत बसलेले होते. वडिलांच्या वयाच्या गंभीर पण स्नेहाळ अशा बेहेरे साहेबांना पाहून माझा धीर चेपला. अत्यंत शांत, संयमी आणि मोजकं बोलणाऱ्या मितभाषी अशा बेहेरे साहेबांनी माझी उत्साही बडबड, आकाशवाणीचे अनुभव शांतपणे ऐकून घेतले. त्यांच्या अत्यंत अनुभवी भेदक नजरेने माझा विशीतला उत्साह, लिखाणाची आवड आणि यापूर्वी छापलेले लेख या सगळ्याची अचूक नोंद घेतली. माझ्या अर्ध्या तासाच्या अखंड बडबडीनंतर बेहेरे साहेबांनी हातातला पाईप बाजूला ठेवला. ते म्हणाले,

“माझ्या मनांत एका नव्या सदराची कल्पना घोळते आहे. हल्ली स्त्रिया बऱ्याच नव्या नव्या क्षेत्रात येत आहेत. त्यांच्या नव्या आणि वेगवेगळ्या व्यवसायांवर आधारित अशी मुलाखतींची लेखमाला सुरू करण्याचा मी विचार करतोय.”
“अरे वा ! छान कल्पना आहे. मोहिनी निमकर, ज्योत्स्ना देवधर या सगळ्या अनुभवी लेखिका छान लिहीतील ही लेखमाला”.
आता एवढ्या वेळानंतर पहिल्यांदाच बेहेरे साहेबांच्या चेहऱ्यावर हसू फुटलं.
“तुमच्या उत्साहाचा फायदा घेऊन मी तुम्हालाच ही लेखमाला लिहायला सुचवतोय !”
“छे छे ! मला कसं जमेल ?”
“जमवलं की सगळं जमतं !’ त्यांचा ठाम आग्रही स्वर! त्यांच्या स्वरातील संयत जरब मला जाणवली आणि माझी बोलती बंद झाली. आपल्याला एखादा लेख लिहायची संधी दिली तरी खूप झालं अशा विचारांत त्यांना भेटायला गेलेल्या मला, त्यांचा हा लेखमालेचा प्रस्ताव ऐकून धक्काच बसला.

हे शिवधनुष्य पेलणं अवघड आहे याची मला पूर्ण कल्पना आली.८० च्या दशकात अनेक पुरुषप्रधान क्षेत्रं स्त्रियांनी काबीज करायला सुरुवात केली होती हे खरं! पण अशी नवनवीन क्षेत्रं आणि त्यातील बिनीच्या शिलेदार स्त्रिया यांना शोधायचं कसं हा मोठाच यक्षप्रश्न होता. आता सारखी समाज माध्यमं तेव्हा हाताशी नव्हती. Google, Youtube ची मदत उपलब्ध नव्हती. मग त्यांच्याशी संपर्क कसा साधायचा? बरं अशा स्त्रिया मिळाल्या, तरी त्यांना गाठायचं कसं ? घरी फोन नव्हता. मग दरवेळी पी. सीओ.वरून त्यांच्याशी नेमका संपर्क कसा साधायचा? या नव्या नव्या क्षेत्रांची माहिती नेमकी कुठून आणि कशी मिळवायची ?

बरं अशा स्त्रिया मिळाल्या तरी त्यांच्याशी संवाद कसा साधायचा ? एक ना दोन अनेक प्रश्न मनांत! माहितीच्या महाजालाच्या महाप्रपातात आज हे सगळे प्रश्न खूपच क्षुल्लक वाटतात. पण तेव्हा ते खूपच जटील होते.

बेहेरे साहेबांच्या प्रस्तावावर माझी मती खरंच कुंठित झाली होती. पण माझ्या भिडस्त स्वभावानुसार मी गप्प बसले. बेहेरे साहेबांनी माझं मौन हीच मूक संमती समजून माझ्यावर या लेखमालेची जबाबदारी सोपवली. ” याबाबतीत मी तुम्हाला मदत करू शकणार नाही. ही नवी क्षेत्रं आणि त्यातल्या पायोनियर स्त्रिया तुमच्या तुम्हालाच शोधायच्या आहेत” हे परखडपणे सुनवायलाही त्यांनी कमी केलं नाही. माझा होकार नकार, संमती याचा काहीही विचार न करता एक प्रकारे आपलं वय, पद यांचा दबाव टाकून ते मोकळे झाले. इतके मोकळे की त्यांनी पुढच्या चर्चेला पूर्णविरामच दिला आणि पुढ्यातले कागद समोर ओढले. ही एक प्रकारे मला निघण्याची खूण होती हे मी ताडलं आणि मनावर मणामणाचं ओझं घेऊन तिथून निघाले. मला खरोखर कळत नव्हतं की ज्या माहेर मासिकात आपली एखादी तरी कथा वा लेख छापून यावा अशी स्वप्न मी अनेक वर्ष पाहत होते, त्या माहेर मासिकामध्ये थेट लेखमाला लिहिण्याची संधी मिळते याचा आनंद मानावा की या लेखमालेसाठी नव्या आणि वेगळ्या व्यवसायातल्या स्त्रिया कशा मिळवायच्या या विवंचनेचा ताण घ्यायचा ?

‌माहेर मासिकाच्या कार्यालयातून बाहेर पडले. शून्य अवस्थेत रस्त्यावर उभी राहिले.अचानक मनात एक विचार चमकला. आत्ता जर आपण माघार घेतली, तर कदाचित “माहेर” मासिकाचं दार आपल्याला कायमचं बंद होईल. मग ते लेखिका म्हणून नावारूपाला येण्याचं स्वप्न, लिखाणाची उर्मी, प्रसिद्धीची लागलेली चटक या सगळ्याचं काय करायचं ? संधी दार ठोठावतेय. पण दार उघडणारी किल्लीच हाताला गवसत नाहीये. काय करावं मला काहीच सुचत नव्हतं. मी नारायण पेठेतल्या त्या रस्त्यावर नुसतीच उभी होते. वेगाने वाहणाऱ्या वाहनांच्या, अखंड वाहत्या रस्त्यावरून घंटा वाजवत वाट काढत जाणाऱ्या दुचाकी सायकलींना पहात ! अचानक मनाने उसळी मारली. पुढे काय होणार ठाऊक नाही. पण हातात आलेली संधी सोडायची नाही. या अवघड रस्त्यावरून वाट काढत पुढे जायचं, या सायकलींसारखं !
दरम्यान “न्यू इंडिया इन्शुरन्स” कंपनीत नोकरी लागली. दररोज व्हिटी (तेव्हा त्याचं सीएसटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं नामकरण झालेलं नव्हतं) ते ठाणे लोकलचा प्रवास सुरू झाला होता. व्हिटीला गाडीत तुरळक गर्दी असे. त्यामुळे माझी आवडती डावीकडची सीट नक्की मिळून जायची.

त्यादिवशी अशीच खिडकीतली जागा मिळाली. रोज या एक तासात एखाद्या छान पुस्तकात रमून जायची माझी सवय! तसं गौरी देशपांडे यांचं “तेरिओ आणि काही—–‘ उघडलं. चार पानं वाचली. पण वाचनात मन रमेना. बेहेरे साहेबांनी सोपवलेल्या नव्या व्यवसायातील महिलांच्या मुलाखतमालेचा विचार काही केल्या डोक्यातून जाईना. गाडीने भायखळा स्टेशन सोडलं. गाडीत बऱ्यापैकी गर्दी झाली. भराभर एकेक स्टेशनं मागे पडत होती. गाडीने परळ स्टेशनात प्रवेश केला. माझी नजर नकळत डावीकडे वळली आणि “तो” चमकला. टीव्हीच्या उंच उंच मनोऱ्यावरचा लखलखता लाल दिवा! हा लाल दिवा रोज मला खुणावत असे. बोलवत असे. रोजच्याप्रमाणे मनाने हेका धरला. होय! मला तिथे पोहोचायचंय. एक ना एक दिवस मी त्या उंच मनोऱ्या खालच्या दूरदर्शनच्या विशाल प्रांगणात पाऊल टाकणार आहे. कधी? कसं? ते ठाऊक नाही. पण मला तिथे पोहोचायचयं.

आकाशवाणीच्या कार्यक्रमांना सरावल्यानंतर नुकत्याच सुरू झालेल्या दूरदर्शनच्या मनोऱ्याकडे मनाने झेप घेतली नसती तरच नवल! तिथवर पोहोचायचं कसं ?
हा दुर्घट रस्ता कसा पार करायचा ? काहीच ठाऊक नाही. कुणाची ओळखदेख नाही. या क्षेत्राच ज्ञान नाही. त्यासाठी आवश्यक ती पदवी / पदविका नाही. अशा शून्य भांडवलावर दूरदर्शन कलावंत बनण्याच स्वप्न पाहणं म्हणजे मृगजळामागे धावणं! पण उमलत्या वयातल्या ऊर्जेला अडथळ्यांची कांटेरी कुंपणं अडवू शकत नाहीत ना !
त्यादिवशी पुन्हा एकदा तो टीव्हीच्या मनोऱ्यावरचा लाल दिवा डोळ्यांसमोर चमकला. तेव्हा अप्पर वरळीतल्या गगनचुंबी इमारतींचा मनोर्‍याला वेढा पडला नव्हता. त्यामुळे निरभ्र आकाशाच्या पार्श्वभूमीवर काळोखात तो लाल दिवा लखलख चमकताना दिसे.
अचानक मी सावरून ताठ बसले. गाडीने वेग घेतला तसा माझ्या विचारांनी ही वेग घेतला. नुकतीच आकाशवाणीत एका रेकॉर्डिंगला गेले होते. आकाशवाणीतल्या टेप लायब्ररीचे प्रमुख प्रख्यात गायक मित्रवर्य शरद जांभेकर यांच्याबरोबर कॅन्टीन मध्ये कॉफी पीत असताना आमच्यात संवाद झडला होता. ते तळमळीने सांगत होते. “माधुरी आता आकाशवाणीचा पुरेसा अनुभव तुझ्या गाठीशी आहे. आता दूरदर्शन कडे वळ. सुहासिनीबाई मुळगावकरांना मी ओळखतो. त्या कडक आहेत. शिस्तप्रिय आहेत. स्पष्टवक्त्या आहेत. पण गुणग्राहक आहेत. त्यांना तुझा अनुभव आणि बोलणं, वागणं, दिसणं पटलं तर कोणत्याही ओळखी देखी शिवाय त्या तुला संधी देतील. तू एकदा त्यांना जाऊन तर भेट !”

असं थेट कस जायचं त्यांना भेटायला ? हा प्रश्न जणू अचानक सुटला. त्यांना भेटण्याची नामी संधी या मुलाखतीच्या रूपाने चालून आलेय असा मनाने कौल दिला. त्या चमकणाऱ्या लाल दिव्याकडे पाहत असताना माझ्या मनात एक विचार उजळला. मुंबई दूरदर्शन केंद्रावरील निर्माती हा वेगळा व्यवसाय करणाऱ्या आणि तेव्हा प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या सुहासिनी मुळगावकर यांचं कर्तृत्व वादातीत होतं. “माहेर” मासिकाच्या माध्यमातून ते जाणून घ्यायला “सुंदर माझं घर” या त्यांच्या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल! या वेगळ्या वाटेवरच्या प्रवासिनीचा अनुभव निश्चितच रोमांचक असेल असा मनाने निर्वाळा दिला आणि या मुलाखत मालेतील पहिली मुलाखत मनाशी नक्की झाली.
माझं उतरण्याचं स्थानक येईपर्यंत “माहेर” मासिकातील नव्या सदराचं मी मनातल्या मनात नामकरण सुद्धा करून टाकलं!
“अनोळखी पाऊलवाटा”

“अनोळखी पाऊलवाटा” या “माहेर” मासिकातील सदराचा जन्मच मुळी असा रेल्वेच्या प्रवासात झाला आणि माझाच जणू एका अनोळखी पाऊलवाटेवरचा प्रवास सुरू झाला.
या सदराच्या निमित्ताने कितीतरी नव्या व्यवसायांचा शोध लागला. सतत नऊ वर्ष नियमित दर महिन्याला छापून येणाऱ्या या मुलाखतमालेने नवनवीन क्षेत्रांत पाय टाकणाऱ्या यशस्वी व्यावसायिक भगिनींचा वाचकांना परिचय करून दिला. वाचकांच्या पसंतीची पावती मिळालेल्या या सदराने पुढे अनेक मापदंड निर्माण केले. माझ्या वैयक्तिक लेखन प्रवासात पुढे अनेक मासिकं, वृत्तपत्र आणि पाक्षिकांसाठी सदर लेखनाचा शुभारंभ “अनोळखी पाऊलवाटा” या सदराने केला. ‌‌कालांतराने दूरदर्शनच्या माध्यमातील माझा प्रवाससुद्धा या सदरानेच सुरू केला.
“अनोळखी पाऊलवाटा” या सदराच्या यशाचे श्रेय मला मिळालं असलं, तरी त्याचे खरे मानकरी त्या सदरासाठी लेखिका म्हणून माझी निवड करणाऱ्या आणि माझ्या सारख्या नवोदित लेखिकेवर नि:शंकपणे आणि विश्वासाने जबाबदारी सोपवणाऱ्या “माहेर” मासिकाचे साक्षेपी संपादक पु.वि. बेहेरे यांनाच जातं.
क्रमशः

— लेखन : माधुरी ताम्हणे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. मासिक,वृत्तपत्र,पाक्षिक ह्या सर्वांसाठीच्या लेखनाचा शुभारंभ तसेच दूरदर्शनच्या माध्यमातील आपला प्रवास ” अनोळखी पायवाटा” ह्या सदराने सुरू झाला.ह्या यशाचे खरे मानकरी “माहेर”चे संपादक पु.वि.बेहरे आहेत हे खरंच आहे पण त्यांनी ह्या सदरासाठी एका नवोदित लेखिकेची केलेली निवड आपण सार्थ ठरविलीत,विश्वासाने सोपविलेली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडलीत हे देखिल तितकच खरंआहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on अशी होती माझी आई !
राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !