सुमारे चार दशकांपूर्वीची गोष्ट!आषाढ सरींचं बेधुंद कोसळणं मुंबईला आणि मुंबईकरांना चिंब भिजवत असताना खरं तर कागदांच्या कोरड्या विश्वाऐवजी आषाढ सरींंत सचैल स्नान करावं असा मनाला मोह होत असतो. पण तो काव्यमय मूड थोडासा बाजूला सारत ओलेत्या अंगाने, गर्दीने ओसंडणाऱ्या स्टेशनात मी प्रवेश करते झाले.
स्टेशनात शिरणाऱ्या गाडीत तुफान गर्दी! पण तरी सूर मारून त्या गर्दीला छेदत, भेदत मी आंत शिरते. खिडकीतून बघावं तर वरून कोसळणारा जलप्रपात आणि रुळांमध्ये पाण्याची खळाळती नदी !
आता झुक झुक गाडीची चक्क होडी होते. कागदाच्या होडी सारखे हेलकावे खात रेल्वेची चाकं पाणी कापत पुढे पुढे जात राहतात. गोगलगायीच्या गतीने! घाटकोपर स्टेशन येतं आणि एक मोठा आंचका देत गाडी विश्राम अवस्थेत जाते. अर्धा तास, एक तास उलटून जातो. घाटकोपर स्टेशन अगदी समोर दिसत असतं. मैत्रिणींमध्ये चर्चा झडते आणि सर्वानुमते गाडीतून उड्या मारण्याचा बेत पक्का होतो. स्टेशन जवळच्या परिसरात पाणी थोडंसं साचलेलं! त्या चिखलाच्या पाण्यांत मी पहिली उडी मारते. पाठोपाठ अख्खा ग्रुप उड्या मारतो. चालत चालत आम्ही स्टेशन गाठतो.
आता ऑफिसला व्हिटी पर्यंत पोहोचण्यासारखी परिस्थिती आणि मूड दोन्हीही नसतं. स्टेशन जवळच्या “वेलकम” मध्ये डोसा खाऊन “श्रेयस”ला जाऊन पिक्चर बघण्यावर सर्व मैत्रिणींचं एकमत होतं. (एरवी असं शंभर टक्के एकमत कोणत्याही विषयावर होणं अशक्य !) ओल्या गच्च कपड्यांची क्षती न बाळगता आधी “वेलकम” नंतर आमचा मोर्चा वळतो “श्रेयस” टॉकीजकडे ! श्रेयसला “चष्मेबहादूर” चित्रपट लागलेला ! आम्ही खुश ! फारुक शेख आणि दीप्ती नवल यांच्या निर्मळ अभिनयाच्या प्रेमात सगळ्याचजणी ! त्यामुळे आमची वरात थेटर मध्ये ! ओलेत्या अंगाने आंतल्या एसीमध्ये सिनेमा पाहताना सुरुवातीला कुडकुडणाऱ्या आम्ही सगळ्याजणी हळूहळू ती थंडी, कुडकुडणं सगळं काही विसरून जातो. गरम कॉफीची चव तोंडात रेंगाळत असताना “चष्मेबहादूर” सुरू होतो. एक हलकीफुलकी प्रेमकथा आम्हा सगळ्याजणींना उबदार, सुखावह, हवहवसं वाटणारं फिलिंग देते.
चित्रपट संपतो. साध्या प्रेमकथेला दिलेला निर्मळ टच उच्च अभिरुचीचा आस्वाद घेतल्याचं अतीव समाधान देऊन जातो. चित्रपटाच्या श्रेयनामावलीत दिग्दर्शकाच नांव लक्ष वेधून घेत असत.
“सई परांजपे”
होय ! त्या काळांत अतिशय चर्चेत असलेलं नांव ! चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे! पहावं त्या मासिकांत, पेपरांत साप्ताहिकांत सई परांजपे यांच्या मुलाखती छापलेल्या सतत आढळत होत्या. त्याला कारणही तसंच होतं. त्यांचं “जास्वंदी” नाटक गाजत होतच. त्याचवेळी त्यांचे एकापाठोपाठ हिट चित्रपट येत होते. स्पर्श, कथा, चष्मेबद्दूर, आणखी कितीतरी ! प्रत्येक चित्रपटाचं कथानक वेगळं आणि त्या कथानकाला दिलेली ट्रीटमेंटसुद्धा अतिशय वेगळी! त्यामुळे त्यांचं दिग्दर्शकीय कौशल्य सगळ्यांच्याच नजरेत भरत होतं.
“अनोळखी पाऊलवाटा” सदरासाठी चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे हे नांव अगदी चपखल होतं. त्या दोन अनुभवी डोळ्यांच्या अथांग निळाईत डुंबून निघालेल्या क्षणांचं आलेखन हीच सई परांजपेंशी केलेली बातचीत !
आकाशातून बरसणाऱ्या पावसाच्या सरी पृथ्वीच्या कवेत आवेगाने शिरत असताना, काचेच्या तावदानातून झिरपणाऱ्या सांद्र प्रकाशात विसावलेल्या त्या देखण्या, मनोरम आणि गप्पिष्ठ व्यक्तिमत्त्वाच्या सहवासात वेचलेले ते चार क्षण आजही माझ्या स्मरणकुपीत बंदिस्त आहेत.
त्यांची मनमोकळी बातचीत, त्यांचे प्रगल्भ विचार मला स्वतःला खूप प्रभावीत करून गेले. आपल्या सर्जनशीलतेचं गमक सांगताना त्या बोलून गेल्या होत्या, “तुमच्या डोक्यातून नवीन नवीन कल्पना कधी निघतात ? जेव्हा बाहेरच्या काही गोष्टी तुम्ही न्याहाळता, काही तुम्ही स्वतः अनुभवता, कधी काही लोकांचे अनुभव ऐकता पाहता किंवा जेव्हा बाहेरच्या काही गोष्टींचे आकलन करून घेता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तटस्थ न राहता जीवन अनुभवता तेव्हाच तुमच्या मनांत काही प्रसंग, घटना, गोष्टी रुजतात आणि त्या पुढे साहित्यरूपात बाहेर पडतात. मग कधी त्यांची कथा होते. कविता होते. कधी चित्रपट होतो तर कधी नाटक होतं. “लेखकाच्या जीवनातील कालातीत सत्यच सांगितलं त्यांनी! त्या पुढे सांगत होत्या,” मी कामगारांवर सध्या एक फिल्म करते. त्यासाठी चाळीचाळीतून फिरते. गेल्या आठवड्यात मी त्यांचे काही गाळे पाहायला गेले होते. जे कामगार मुंबईत राहतात ते बहुदा खेड्यापाड्यातून येतात. आणि ३० ते ४० लोकं एक खोली भाड्याने घेऊन राहतात. या गाळ्यांमध्ये ते फक्त आठ तास झोपू शकतात. गिरणीतील पाळीनुसार नवव्या तासाला दुसरा कामगार येतो आणि पहिल्याला उठवून त्याची जागा घेतो. एका कामगाराला मी सहज म्हटलं, “म्हणजे तुम्हाला फक्त झोपायला जागा असते इथे ?”
‘फक्त झोपायला जागा असते ताई ! कुशीवर वळायला नसते”. तो ताडकन उत्तरला.
सई परांजपे यांच्या दर्जेदार चित्रपटांतील संवाद प्रेक्षकांच्या मनांत घर करतात. त्याचं कारण ते वास्तवदर्शी असतात. कधीतरी कुठेतरी त्यांनी ते संवेदनशीलतेने टिपलेले असतात.
सई परांजपे यांच्या मुलाखतीचा शेवट करताना मी लिहिलं होतं, ”जीवनातल्या तरल अनुभवांचं स्फटिक प्रकटीकरण हा सई परांजपे यांचा हातखंडा आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीरेखेला जीवनदान देणं हा त्यांचा लाडका छंद !”
इथे “जीवन” हा शब्द मी व्यापक अर्थाने वापरलाय. सामान्य माणसाच्या जगण्याला अनुभूतीच्या अर्थवाही छेदाने कंगोरे लाभून लखलखतं ते जीवन! अन्यथा तुम्ही आम्ही जगतो ते केवळ उगवत्या मावळत्या चंद्र सूर्याला साक्ष ठेवून जगलेले चार निष्फळ क्षण ! कधीतरी अवचित सई परांजपें सारखी माणसं भेटतात आणि मग ते चार निष्फळ क्षणही फळाला येतात !
असे निष्फळ क्षण ज्यांच्यामुळे फळाला आले अशा व्यक्तींना जवळून भेटणं, त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांचे विचार ऐकणं हे मला स्वतःलाही समृद्ध करून जात होतं.
एकीकडे “अनोळखी पाऊलवाटा” या सदरामध्ये अशी गुंतलेली असतानाच दुसरीकडे “नवलाई” या दूरदर्शनवरील कार्यक्रम मालिकेतून अनेक आगळीवेगळी व्यक्तीमत्वं मला भेटत होती. शिवाय त्या निमित्ताने सुहासिनी बाईंचा सहवास लाभत होता. हे म्हणजे चेरी ऑन द केकच !
पण कधी कधी ही चेरी तुरट ही बनून जायची. एकदा अशीच कार्यक्रमाच्या चर्चेसाठी सुहासिनीबाईंकडे पोहोचले. चर्चा आटपली. बाईंनी सही साठी कॉन्ट्रॅक्ट टेबलावर माझ्यासमोर ठेवलं. मी पर्स उघडली. सगळे कप्पे चांचपले. पण पेन काही सापडेना. म्हटलं “बाई जरा पेन देता का सही करायला ?” सुहासिनीबाईंनी पेन दिले,
पण खाडकन सुनावल,
“माधुरी तुझ्यासारख्या लेखिकेच्या पर्समध्ये एक तरी पेन असायलाच हवं. शिवाय काही कोरे कागद सुद्धा पर्समध्ये ठेवत जा.”
मी मान हलवली. पण त्यांतून एक बोध नक्की घेतला. त्या प्रसंगानंतर आजपर्यंत पर्समध्ये एक नव्हे किमान दोन ते तीन पेन्स असतातच. ती लिहिली जात आहेत ना याची सुद्धा खात्री केलेली असते आणि एक छोटे रायटिंग पॅड सुद्धा पर्समध्ये असते. मुख्य म्हणजे अनेकदा स्टेशनवरच्या बाकावर बसले असताना, रेल्वे किंवा बस मधून प्रवास करत असताना या पेन आणि रायटिंग पॅड चा अचानक सुचलेले विचार लिहून घ्यायला अनेकदा खूपच उपयोग झालेला आहे.
शेवटी एकच गोष्ट महत्त्वाची ! मनाला जखम करून जाणारी, काळजावर घाव घालणारी कोणतीही गोष्ट आपण कशी स्वीकारतो, त्या गोष्टीतून काही चांगलं कसं निर्माण करतो, ते महत्त्वाचं! मन विचलित करणाऱ्या छोट्या मोठ्या कटू प्रसंगांतून जर सकारात्मक मानसिकतेचे गोड मधु घट निर्माण होत असतील तर काय हरकत आहे, थोडे कडू घोट अधून मधून गिळले तर, नाही का ?
क्रमश:
— लेखन : माधुरी ताम्हणे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800