Saturday, April 13, 2024
Homeलेखमाननीय “स्वातंत्र्यवीर सावरकर” ह्यांना…

माननीय “स्वातंत्र्यवीर सावरकर” ह्यांना…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी पत्र रूपाने साधलेला संवाद.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन.

– संपादक

माननीय “स्वातंत्र्यवीर सावरकर” ह्यांना,
सप्रेम नमस्कार!
“माननीय “लिहील्यानंतर मायना काय लिहावा, यासाठी दोन मिनीटं थांबले. असं पत्र लिहायची कधी वेळ येईल, असे वाटलेच नाही ! आपण आमच्या सर्व भारतीयांच्या मनांत, एक आदरणीय, स्फूर्तीस्थान बनून, धृवपद मिळवलेले आहे. पण, ”स्वातंत्र्यावीर सावरकर” ह्या पेक्षा कुठलाच शब्द, त्याला योग्य वाटला नाही ..

आपण, आम्ही लहान असल्यापासून, वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या संदर्भात आमच्या समोर आलात. शोभादर्शक यंत्रात जसे थोडे काचेचे तुकडे, सतत बदलणारी सुंदर नक्षी दाखवतात, तसेच तुम्ही आमच्या समोर, सुंदर रितीने प्रगट होत गेलात. आणि आपली प्रतिमा मोठी मोठी होत, अनाकलनीय होत गेली.

“ने मजसी ने“ ह्या शाळेतल्या पाठ्यपुस्तकातील कवितेतून, तुम्ही प्रथम भेटलात.. शाळेतल्या बाईंनी ती कविता इतक्या सुंदर पध्दतीने शिकवली की न पाहिलेले, तुम्ही नजरे समोर आलात. मंगेशकरांच्या मधुर गायकीतून जेव्हा ही कविता, गाणे बनून पुढे आली, तेव्हा ती हृदयाला भिडून डोळ्यातून वहायला लागली.

इतिहासाच्या धड्यातून, तुमचे पराक्रम, चळवळ्या थोड्या थोड्या कळायला लागल्या. जवळच्या देवळांत एकदा किर्तनाचा विषय आपण होतात.. आणि ते ऐकतांना इतके भारावून व्हायला झाले ! नंतर पहायला मिळाला, सुधीर फडके ह्यांनी जिद्दीने बनवलेला सिनेमा.. आपला जीवनपट आणखी उलगडत गेला.. बोट पाहिली की कित्येक वर्ष आपली उडी आठवत रहायची..!

नंतर जाणिवपूर्वक आपली काही पुस्तक वाचली. अंदमान मधले आपले हाल वाचतांना, मला सारखा संभाजी आठवत राहिला.. मनस्वी, बाणेदार.. सर्व शारिरीक हाल अपेष्टांना सामोरा जाणारा.. पण न वागणारा….
२६ फेब्रुवारी १९६६ मध्ये आपण प्रयोपवेशन करून, २३ दिवसानंतर, ह्या जगाच्या निरोप घेतलात.. ह्या साठी लागणारे मनोधैर्य, तेव्हा कळले नव्हते. पण किती मोठी मानसिक ताकद, त्या वेळी ही आपल्याकडे होती, हे पाहून अचंबित व्हायला होते.

एकदा मी आपली रांगोळी काढली होती. ती काढायला १५/१६ तास लागले होते, आपला फोटो समोर होता … आणि पूर्णवेळ मी जणू आपल्याशी गप्पा मारत आहे असा मला भास होत होता.
मला अजून अंदमानला जायचा योग नाही आला, पण रत्नागिरीच्या पतित पावन मंदीराचे दर्शन घ्यायचा योग आला. आणि वाटले .. धन्य झाले !

आपल्या मुळे सर्वाना खुले झालेले मंदीर ! आपली उपस्थिती आताही तिथे असावी, असेच जाणवत होते.
आपले लिखाण, पाठांतर, विद्वत्ता, देशप्रेम, वैज्ञानिक दृष्टिकोन, तत्व, त्याग हे सर्व सर्व आम्हाल कायम स्फूर्तिदेणारे रहाणार आहे. काही दुर्दैवी कारणांमुळे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपली उपेक्षा झाली, ह्याचे दुःख ही आमच्या मनात कायम रहाणार आहे. मी एक सामान्य नागरिक, आपल्या काळात जन्मले असते, तर आपल्या लढ्यात सामिल होण्याचे धैर्य कदाचित दाखवले असते. ते आता नाही दाखवता येत आहे. त्याबद्दल क्षमस्व ! पण वैयक्तिक आयुष्यात, जास्तीत जास्त सचोटीने राहून, वैज्ञानिक दृष्टीने वागून, अन्यायाला विरोध करून, समाजपयोगी कार्य करत आहे आणि पुढेही करीन, असे वचन मी तुम्हाला देते.

काही कमी जास्त चुकून लिहीले असल्यास क्षमस्व !
आपल्या ऋणांत सदैव राहू इच्छित असणारी, आपल्याला वंदन करून हे पत्र संपवते.
कळावे,
चित्रा.

— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका. ह. मु.मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments