Saturday, April 13, 2024
Homeसाहित्यमायेचा ओलावा

मायेचा ओलावा

भाग १

आज मला चुकल्या चुकल्या सारखं वाटतंय. का बरं ?
रोजच्या प्रमाणे हात रूटीन कामा साठी गुंतले. सकाळचा चहा, पेपर, नाश्ता, मुलीचा डबा, शाळा सगळं ठीक चाललंय. घरकाम करणारी मावशीही वेळेवर आली. घर आवरणं रोजची औषधं  वगैरे.

मग असं का चुकल्या चुकल्या सारखं वाटतंय ?
अश्यातच ऑफिसची बॅग काखेत अडकवली व धावत पळत बस स्टॉप. अरे वा ! बस पण वेळेवर, बसायला जागा नाहीय, ठीक आहे. ऑफिसला वेळेवर पोहचली. टेबलावरचा पी सी ऑन केला आणि की बोर्ड वर बोटं फिरायला लागली. हात कामात गुंतले. अर्धा एक तासानंतर परत मनात काहीतरी चुकतंय. का ? 
असं का ? विचार केला अरे हो ! आज आईचा नेहमी प्रमाणे फोन नाही आला.

माझी आई माझ्या घरापासून पंधरा वीस मिनीटाच्या अंतरावर राहते. एकटीच राहते. स्वतःचे घर .मी तिची एकुलती एक लेक. एकमेकींना फोन केल्याशिवाय एक दिवस जात नाही.चार आठ दिवसांत भेट होतेच. कधी डाॅक्टरकडे जायचे असेल तर किंवा छोटी मोठी खरेदी असेल तर अगदी नाहीतर लायब्ररीत मासिकं बदलायची असताना एकत्रच असतो. कधी मधी एखाद महिन्याला नाटक सिनेमा चालूच असतो.

पण आज का नाही केला फोन आईने. तब्येत वगैरे ठीक असेल ना, मीच करते  ना फोन. फोन करणार तेवढ्यात मातोश्रीचाच फोन आला.
आई : बेटा फोन का नाही केला आज..?
मी : अग तू करते ना नेहमी ….
आई : ते जाऊ दे…जावईबापू कसे आहेत ?
पिंकीची चित्रकला स्पर्धा कशी झाली ?
तिचा ताप उतरला का…? थंड पाणी आणि तेलकट देऊ नको तिला. वेळेवर औषध दे.
आईचे रोजचेच प्रश्न रोजचीच उत्तरे,
पण ? रोज फोन हवाच.
जुजबी बोलणे झाले. फोन ठेवला.

असाच थोडावेळ गेला. विचार आला. आई शक्यतो ऑफिसमध्ये फोन करत नाही. ठीक आहे. राहवलं नसेल म्हणून केला असेल. असाच थोडावेळ गेला. तरीही काहीतरी चुकल्या चुकल्या सारखं वाटत होतं. सहजच समोरच्या मोठ्या कॅलेंडर कडे लक्ष गेलं कॅलेडंरची पानं उडत होती, जसं काही माझं लक्ष ती वेधून घेत होती.

ओ ! हो ! कधीच न विसरणारी मी, चक्क आईचा वाढदिवस किती सहजतेने विसरली ! काहीही कारण नाही पण मी विसरली. मन अपराधी झाले. माझी बेचैनी वाढली. कामातून लक्ष पार उडालं.
एकतर मी फोन करायचा तो केला नाही. तिने केला तेव्हातरी आठवावं, ते आठवलं नाही. छे, काय हे विसरणं या रोजच्या रूटीन मध्ये दिवस रात्रीचा मेळ घालताना  सहजच विसरलो तिचा वाढदिवस.

आईच ती. रागावणार नाही पण मन खट्टू झालं असेलच.
बाबा अचानक गेल्यावर आईने मला वाढवताना किती खस्ता काढल्या. बाबांची उणीव भासू नाही दिली. शालेय जीवन, कॉलेजची फी, पुस्तकं, कपडे, हौस मौज कशातच कमी नाही केले. नोकरीत मला स्थिरस्थावर केलं. लग्न लावून दिलं. वाढवताना ते दिवस आठवले. माझ्या बाळंतपणात पहिली कोण होती तर ती आई. माझं सर्वस्व तीच असताना मी चक्क आईचा वाढदिवस विसरली.
बरं विसरली तर विसरली पण तिने केला तेव्हा तरी छे !
लगेच करू का फोन. काय वाटेल ?
वाईट नाही वाटणार पण नाराज नक्कीच झाली असेल.
का नाही होणार, आईची ही अपेक्षा मुलीकडून तर असायलाच हवी.
क्रमशः

पूर्णिमा शेंडे.

— लेखन : पूर्णिमा शेंडे. मुंबई
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments