माय टाईम, किती सुंदर कल्पना आहे ना…..? माय टाईम…… स्वतःवर आपले किती प्रेम आहे, याची जाणीव ही कल्पना करून देते…या दोन शब्दांची जादूच काही वेगळी….!
नेहमी सांगितले जाते की, स्वतःसाठी जगणे म्हणजे जगणे नव्हे तर इतरांसाठी जगण्यातच जीवन आहे. पण वास्तवात आपण स्वतः आनंदी राहिलो तरच दुसऱ्यांना आनंद देऊ शकतो. म्हणजे स्वतःचे महत्व जाणणे व जपणे देखील तितकेच महत्वाचे आहे. जेव्हा आपण स्वतःसाठी काही करू तरच इतरांसाठी काही करता येऊ शकते….हो ना ?
पण…….जमते का हो ! सर्वांना असा माय टाईम द्यायला.?
माय टाइम म्हणजे काय…..? तर स्वतःला वेळ देणे….. स्वतःचे अस्तित्व जपणे….. पण अनेकदा तर हे कळायला अथवा याची जाणीव जेव्हा होते…… तेव्हा आयुष्यातील किती तरी वर्षे निघून गेलेली असतात.
पुरुषांच्या तुलनेत महिलांना हा माय टाईम फार कमी प्रमाणात मिळतो. कारण तिची बिचारीची दुहेरी कसरत असते. मग ती नोकरी करणारी महिला असो अथवा गृहिणी, कारण रविवारचीही सुट्टी तिच्या नशिबी नसते. उलट बाकी सर्वांची सुट्टी म्हणजे गृहिणीला रोजच्या पेक्षा आणखीन काम. सर्वांच्या आवडीचे पदार्थ करण्यात आणि सर्वांची मर्जी सांभाळण्यातच तिचा सर्व वेळ जातो. अर्थात ती हे सर्व सर्वांसाठी आनंदाने करते कारण तिचे कुटूंबावर खूप प्रेम असते…..पण या गडबडीत तिचे स्वतःवर प्रेम करायचे राहूनच जाते. तिला कधी सुट्टी असते ?
कर्तव्य, जबाबदारी, स्वतःला सिद्ध करण्याचे स्वप्न हे करता करता कधी चाळीशी उलटून जाते हेच कळत नाही. मग अचानक एके दिवशी एखादा चित्रपट पाहिला अथवा असे काही वाचण्यात, ऐकण्यात आले की जाणीव होते, हो हे खरे आहे ! आपण स्वतःसाठी तर जगलोच नाही…..!
आजची तरुण पिढी मात्र देत असते स्वतःला हा माय टाईम. रोज नाही जमले तर किमान शनिवार – रविवार ते मनसोक्त जगतात स्वतःसाठी.
पण आपण तर कधीच विचार केला नाही….!
सर्व गोष्टी परफेक्ट करण्याचा उगाच आपलाच अट्टाहास…… आणि ते सर्व मीच केले पाहिजे हे आपलेच मत. पण सर्व गोष्टी एकट्याने शक्य नसते मग नुसती ओढाताण शरीरावर व मनावर देखील होत राहते….
खरे तर आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारता आले पाहिजे…..आरशासमोर उभे राहून स्वतःच्या मनात डोकावून बघितले पाहिजे मात्र स्वतःसाठी वेळ नसतो.
फक्त काम म्हणजे आयुष्य नसल्यामुळे व्यक्तिगत जीवनासाठी सुद्धा वेळ ठेवावा लागतो.
स्वतःचे छंद, आवडी निवडी याकडे नेहमीच दुर्लक्ष करतो. आपणही एक स्वतंत्र व्यक्ती आहोत हेच जणू विसरून जातो.
आणि हो…….सर्वात मोठा गैरसमज की स्वतःसाठी जगणे म्हणजे स्वार्थी…..हे जणू आपणच मनाशी पक्के केले असते…. आपल्याला देखील भावना आहेत, अनेक इच्छा अपेक्षा होत्या ,अजूनही असतात ……पण त्याला कधी महत्त्व दिले नाही.
असे का होते……?
आपण इतके निष्काळजी कसे होतो ? घर, प्रपंच, मुलं जणू हेच आपले विश्व, त्यापलीकडे कधीच काहीही पाहिले नाही. !
मग…..याला जबाबदार कोण ? आपण स्वतःच ना….? आज करू, उद्या करू….असे करता करता अनेक गोष्टी करायच्या राहूनच जातात. आता काय ? ……….
हरकत नाही….अजूनही वेळ गेलेली नाही….देर आये दुरुस्त आये असे म्हणून नव्या उमेदीने पुन्हा सुरवात करू.
आनंदाला वयाचे बंधन नसते आणि हो कोणतीही नवीन सुरवात करायला देखील. वय केवळ एक आकडा आहे. आपल्या अवती भवती डोळसपणे पाहिल्यास अशी अनेक उदाहरणे दिसतील ज्यांनी नव्या उमेदीने पन्नाशीत,साठीत देखील नवी सुरूवात केली व आज ते यशस्वीपणे,आनंदाने आपले नवे जीवन जगत आहेत.पण प्रबळ इच्छाशक्ती असेल तरच हे सर्व शक्य आहे.
यासाठी आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकू, त्यासाठी स्वतःशीच हितगुज करू.
आयुष्य खूप सुंदर आहे, त्याचा आनंद घेऊ. उगाच दुसऱ्यांचा हेवा, निंदा अथवा तुलना करण्यापेक्षा जे आपल्याला हातात आहे ते करू या. तोच वेळ सत्कारणी लावू कारण आपल्याकडे जे आहे ते तर अनेकांच्या नशिबात देखील नाही.
त्यामुळे…..स्पर्धा आपली स्वतःशीच आहे, आज पेक्षा उद्या उत्तम करण्याची.
लहान लहान गोष्टीतून आनंद घेऊ. मैत्रिणींसोबत एखादी सहल म्हणा ,मस्त दंगा मस्ती, नाच गाणी, स्वतःला ज्या ज्या गोष्टीतून आनंद मिळतो त्या करू. एखादा सिनेमा पाहून मस्त बाहेरून जेवण करून येऊ.
निवांत निसर्गाच्या सानिध्यात राहू.जमल्यास एखादी सोलो ट्रिप करून तर पाहू कदाचित स्वतःची नव्याने ओळख होऊ शकते. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो.
वाचन, नृत्य , खेळ एखादी कला ज्यातून आपल्याला समाधान मिळेल असे काही तरी करू. जुने फोटो पाहणे, जुन्या आठवणींना उजाळा देणे, मस्त निवांत गप्पा मारणे, गाणी ऐकणे , योगा, व्यायाम असे काहीही रोज किमान अर्धा तास स्वतःसाठी आपले हे वेगळे विश्व निर्माण करू या.
स्वतःला आनंदी ठेवणे ही देखील आपलीच जबाबदारी आहे. यातून एक सकारात्मक ऊर्जा मिळेल . स्वतःसाठी जगण्याचा आनंद ही मिळेल. आत्मिक समाधान व शांती लाभेल.
प्रयत्न करायला काय हरकत आहे !
आपल्यातील मुल ते बालपण जर जपता आले तर ते खऱ्या अर्थाने जिवंत असल्याचे लक्षण असेल.
मनुष्य जन्म ही एक अनमोल देणगी आहे.
आपल्या हातूनही कळत – नकळत अनेक चुका झाल्या असतील तर त्यासाठी स्वतःलाही माफ करता आले पाहिजे. कदाचित दुसर्यांकडून काही चुका झाल्या असतील तर आपण त्यांना माफ केले पाहिजे.
ज्या गोष्टीतुन त्रास होतो तेथे कोणाचे मन न दुखवता शालीनतेने व स्पष्टपणे नाही देखील म्हणता आला पाहिजे. त्यात अपराधीपणा वाटण्याचे काही कारण नसते. आपण प्रत्येकाला खुश नाही ठेऊ शकत ही गोष्ट जेवढ्या लवकर लक्षात येईल तेवढे चांगले स्वतःसाठी….आपल्या आनंदासाठी.
प्रत्येक वेळी कोणीही आपल्याला गृहीत नाही धरू शकत आणि याच गोष्टीसाठी सौम्य शब्दत नकार देता आला पाहिजे. भाषा आणि शब्दांच्या योग्य वापरातून हे साध्य करता येईल.
नेहमी समोरच्याला काय वाटेल ? यासाठी अन्याय सहन करणे हे देखील चुकीचे आहे. आपला आत्मसन्मान जपणे हे देखील खूप महत्वाचे असते आपल्या मानसिक आरोग्यासाठी.
आपल्या घरच्या जबाबदाऱ्या, कर्तव्ये चोख बजावून स्वतःसाठी काही वेळ राखुन ठेवणे चुकीचे नसते. कोण काय म्हणेल ? प्रत्येकवेळी जगाचा विचार न करता कधीतरी आपल्याला काय वाटते हे देखील महत्वाचे असते.
कधीतरी आपल्या मनाचे ऐकू, स्वतःचे लाड पुरवू, स्वतःच स्वतःला शाबासकी देऊ, स्वतःचे कौतुक करू नेहमीच समोरच्यांकडून अपेक्षा का करावी ?
सगळ्यात जास्त वेळ तर आपण स्वतःशीच बोलत असतो. आणि बोलत नसू तर मग स्वतःशीही बोलले पाहिजे.
म्हणजे…… आपल्या सर्वात जवळची मैत्रीण तर आपण स्वतःच असतो जी अंतर्मनात लपली असते तिला तर सगळंच माहीत आहे….. आपले यश – अपयश, दुःख – सुख, सगळं सगळं…..मग जरा तिच्याशीच मैत्री करू.
हे खरे तर किती सोपं आहे उगाच आपण ते अवघड करून ठेवले आहे. आयुष्यातील हेच क्षण या आठवणींचा साठा म्हणजे खरा खजिना आहे व तोच तर कायम आपल्या सोबत असणार.
हे जग सोडताना कोणती खंत नसावी…. हे करायचे राहून गेले, ते करायचे राहून गेले फार वेळ होण्याआधी…… स्वतःसाठी जगू या…
तुम्हाला काय वाटते ‘ माय टाईम ‘ बद्दल जरूर सांगा….
— लेखन : रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800.