मराठी ही भारताच्या अधिकृत 22 भाषांपैकी भारतात 15 कोटी लोकांची गोव्यासह आणि महाराष्ट्राच्या सीमारेषेवरील राज्यातील लोकांची बोलीभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्यां लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे.
समृद्ध भाषिक वारसा असलेली मराठी भाषा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख घडविण्यात महत्त्वपूर्ण भुमिका बजावते. संस्कत भाषेतून या प्राकृत भाषेची वाटचाल सुरू झाली. भारतातील अनेक प्राचीन भाषापैकी मराठी एक प्रमुख भाषा असून तिचा इतिहास संस्कृत भाषेपर्यंत शोधला जाऊ शकतो.
मराठी भाषेतील पहिले वाक्य श्रवणबेळगोळ येथील शिलालेखावर सापडले. हे वाक्य शके 905 मधील असून माय मराठी विषयी बोलू कौतुके
“चामुण्डेराये करविले” असे शब्द शिलालेखावर कोरलेलेआहेत. दुसरा मराठीतील प्राचीन शिलालेख अलिबागपासून पांच सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या आक्षी गावात आजही उपलब्ध आहे. या दोन्ही आद्य लेखांतून माय मराठीचे प्राचीनत्व स्पष्ट होत आहे.
अभिजात मराठीतील सर्वात जुनी साहित्यकृती म्हणजे “लीळाचरित्र” होय. म्हाइंमभटांनी या ग्रथांची निर्मिती केली. या साहित्यिककृतीतून मराठी भाषेचे सौंदर्य, तिच्यातील अर्थगर्भता आणि महत्त्वपूर्णता आपणांस समजून येते. ही मराठी भाषा किती नावीन्यपूर्ण आणि संपन्न होती याची कल्पना येते. यातील प्रचंड ग्रंथसंपदा उपलब्ध असून तिचे संर्वधंन शासन स्तरावर केले जात आहे. अभ्यासली जात आहे.
मराठी भाषेचा इतिहास हा जवळजवळ 1500 वर्षापासूनचा आहे. ती उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगापासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रातापर्यंत, उत्तरेकडील दमण पासून दक्षिणेकडील गोव्यापर्यंत मराठी भाषेचा विस्तार झालेला दिसून येतो. पैठण येथील सातवाहन साम्राज्याने तिचा प्रशासनात प्रथम वापर केला.
ज्ञानेश्वर माउलीने माझी मराठीची बोलु कौतुके ! अमृतातेंही पैजां जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवीन म्हणून तेराव्या शतकात मराठीला सोनियाचे दिवस लाभून दिले. पुढे संत एकनाथ महाराज, त्यानंतर संत तुकाराम महाराजांनी आणि महाराष्ट्र ही संताची भूमी म्हणून ओळखली जात असल्याने त्यातील सर्वच संत मांदियाळीने आपआपल्या रचनामधून या मायबोलीला अधिक लोकाभिमुख केले. लोकप्रिय केले, सर्व सामान्यांच्या ओठांवर तिची अविट गोडी वाढविली. शिवप्रभुंनी राज्यभिषेकानतंर मराठीत भाषाकोष तयार करून तिचा प्रचार आणि प्रसार करविला.
पुढे 19 व्या शतकात मराठी साहित्य आणि भाषा, अस्मितेची एक प्रचंड जागरूकता निर्माण झाली. त्यात अनेक लेखक, कवि, साहित्यिक यांनी भरीव योगदान देऊन मराठी भाषेच्या वैभवात मोलाची भर घातली. आजही ही समृद्ध परंपरा अव्याहत चालूच आहे. महात्मा ज्योतीराव फुले सारख्या थोर समाजसुधारकांनी मराठी भाषेला शिक्षणात आणि सक्षमीकरणाची भाषा म्हणून समर्थन दिले आणि त्यासाठी सर्वसामान्यांना समजेल, उमजेल अशा साध्या, सोप्या सहजसुंदर भाषेतून साहित्य निर्मिती केली.
आज मराठी भाषा दिन म्हणून प्रख्यात साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठीतील कवि, नाटककार, लेखक आणि समाजसुधारक विष्णु वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या स्मरणार्थ त्यांनी मराठी साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले, मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनात मोलाचे कार्य केल्याबद्दल पाळला जातो.महाराष्ट्रात आणि जेथे जेथे मराठी भाषा बोलली जाते तेथे उत्साहाने साजरा करतात.
या मराठी भाषेची अनेक वैशिष्ट्ये असून त्यात विभागीय भाषेचा लहेजा, विविध ध्वन्यात्मक, व्याकरणात्मक, आणि विपुल शब्दसंग्रहाचा भरणा आहे.तिचा बाराकोसावर बोलीभाषा बदलते.प्रत्येक बोलीभाषेतील गोडवा आणि त्याचा ठसका आपला आनंद द्विगुणित करते. खान्देशी, माणदेशी, वऱ्हाडी, मालवणी, कोकणी, कोल्हापूरी, अशा कितीतरी तिच्या शाखा, उपशाखा, आहेत या सर्वानाच देवनागरी लिपीने जोडून ठेवले आहे.
अशा या अमृताहून गोड आणि वैभवसंपन्न माझ्या मातृभाषेला माझा मानाचा मुजरा ! आणि समस्त मराठी भाषिकांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा !
— लेखन : डाॅ.भास्कर धाटावकर.
निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800