Wednesday, April 23, 2025
Homeबातम्यामालवणी : प्रदेशनिष्ठ संस्कृतीची वाहक - सतीश लळीत

मालवणी : प्रदेशनिष्ठ संस्कृतीची वाहक – सतीश लळीत

मालवणी ही केवळ मराठीची एक बोली नसून ती लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृती, निसर्ग,पर्यावरण, आतिथ्यशीलता, प्राचीन परंपरा आणि चिकित्सकपणा यांचा संगम असलेल्या प्रदेशनिष्ठ संस्कृतीची वाहक आहे, असे प्रतिपादन येथे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा येथे भरलेल्या मालवणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी येथे केले.

आजगाव येथील ‘साहित्य प्रेरणा कट्टा’ या संस्थेने शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयात आयोजित केलेल्या मालवणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाचे निमंत्रक तथा साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर, उद्योजक रघुवीर तथा भाई मंत्री, ग्रंथालयाचे अध्यक्ष राजन शिरोडकर, कार्यवाह सचिन गावडे, कवी रुजारीओ पिंटो आणि मालवणी भाषाप्रेमी तथा व्यापारी नितीन वाळके आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलन व गाऱ्हाण्याने संमेलनाची सुरुवात झाली. स्थानिक कलावंत रवी पणशीकर याने दणक्यात गाऱ्हाणे घातले.

श्री. लळीत आपल्या भाषणात म्हणाले, मी मालवणी लेखक नसतानाही मालवणी बोलीच्या प्रसार व विकासासाठी केलेले काम लक्षात घेऊन आयोजकांनी माझी निवड अध्यक्षपदासाठी केली. लेखक नसलेल्या एका कार्यकर्त्याला हा मान देऊन त्यांनी मालवणीसाठी झटणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान केला आहे. आधुनिकीकरणाच्या धबडग्यात सगळ्याच प्रादेशिक भाषा आणि विशेषतः बोलीभाषा यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्हे उभी राहिली आहेत. परंतु केवळ ‘बोली कशा टिकणार?’ ही चिंता व्यक्त करून काही साध्य होणार नाही. त्यासाठी अशी छोटी छोटी बोली साहित्याची संमेलने होणे आवश्यक आहे. अशा प्रामाणिक हेतूने भरवलेल्या संमेलनामुळेच बोलीभाषा टिकून राहण्यास खरी मदत होणार आहे. या संमेलनाच्या व्यासपीठावरून होणारे मंथन मालवणीच्या विकासासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरेल.’

श्री सतीश लळीत

श्री लळीत पुढे म्हणाले की, मालवणी बोलीबद्दल बरेचसे गैरसमज आहेत. मालवणी बोली ही शिव्यांची बोली असून ती उथळ विनोदी लेखनासाठी योग्य आहे, असा एक गैरसमज पसरलेला आहे. तो दूर करण्यासाठी मालवणी बोलीत लेखन करणाऱ्यांनी केवळ विनोद किंवा मनोरंजनासाठी लेखन न करता गंभीर विषयावरही लेखन करणे आवश्यक आहे. मालवणी बोलीतील लोककथा, लोकगीते, ओव्या, कोडी, म्हणी ही एक फार मोठी मौखिक परंपरा आहे.
या मौखिक परंपरेचे संकलन आणि संशोधन होणे आवश्यक आहे. अन्यथा काळाच्या ओघात हा मौल्यवान खजिना नष्ट होऊन जाईल. गंभीर लेखनासाठी मालवणी बोलीचा वापर झाल्याची उदाहरणे यापूर्वीही घडली आहेत. कोकण रेल्वेचे आद्य प्रवर्तक अ. ब. वालावलकर यांनी गीतेचे मालवणीमध्ये रूपांतर केले आहे. त्यांनी मालवणीत केलेले रूपांतर अतिशय अर्थपूर्ण आणि सहजसोपे आहे. यावरून मालवणी ही केवळ उथळ आणि वरवरची बोली नसून वेदांत समजावून सांगण्याची ताकदसुद्धा तिच्यात आहे, हे सिद्ध होते.

मालवणी म्हटले की केवळ मालवणी बोली असे गृहीत धरले जाते. परंतु ते खरे नाही, असे सांगून श्री. लळीत म्हणाले की, मालवणी ही एक वेगळी संस्कृती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामरचना, वास्तुशैली, मंदिरे, रुढीपरंपरा, इथली खाद्यसंस्कृती, लोककला, गावोगावच्या जत्रा, इथला निसर्ग आणि पर्यावरण, चिकित्सक बेरकी आणि आतिथ्यशील मालवणी माणूस हे सगळे मिळून एक बहुरंगी बहुढंगी अशी संस्कृती इथे बहरली आहे. इथला माणूस जी बोली बोलतो, ती या संस्कृतीची वाहक आहे. आधुनिकीकरणाच्या जमान्यात जीवनाच्या सर्वच अंगावर बरे वाईट परिणाम होत आहेत. मालवणी बोलीवरही असा परिणाम होत आहे. परंतु इथली संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने मालवणी बोलीचा वापर करायला हवा. जोपर्यंत मालवणी संस्कृती, मालवणी मुलखाची वैशिष्ट्ये जिवंत आहेत, तोपर्यंत मालवणी बोलीला कोणतीही भीती नाही, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

आजगाव साहित्य कट्ट्याचा त्रेपन्नाव्या कार्यक्रमाचे औचित्य साधून खटखटे ग्रंथालयाच्या मच्छिंद्र कांबळी सभागृहात हे संमेलन आयोजित केले होते. कवी सौदागर यांनी प्रास्ताविक केले.नितीन वाळके यांनी मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर ‘मालवणी साहित्यात काय असावे आणि काय नसावे’ या परिसंवादाला सुरुवात झाली. ओरोस येथील साहित्यिका कल्पना मळये आणि कणकवलीतील मालवणीच्या अभ्यासिका तनुजा तांबे यांनी यात विचार मांडले. निसर्गाचे दाखले देत अध्यक्ष भाऊसाहेब गोसावी यांनी परिसंवादाचा नेटका समारोप केला.

अल्पोपाहाराच्या मध्यंतरानंतर कवी संमेलनाला सुरुवात झाली. दीपक पटेकर, रुजारीओ पिंटो, नितीन वाळके, विनय सौदागर, रामचंद्र शिरोडकर, उर्जित परब, सोमा गावडे, स्नेहा नारींगणेकर ,भालचंद्र दिक्षित ,रामदास पारकर या कवींनी आपल्या कविता सुरेख पद्धतीने सादर केल्या. सर्वच कविता आवडल्याचे सांगत कविसंमेलनाच्या अध्यक्षा डाॅ. सई लळीत यानी कवितेचा मूळ प्रवास उलगडून दाखवला. शेवटी शबय ही अप्रतिम कविता त्यानी सादर केली.

यावेळी ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष श्रीराम दीक्षित यानी ग्रंथालयात चालणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.

संमेलनाच्या प्रवेशद्वाराजवळ काजू, आंबे, करवंदे, फणस, पेरू, अबोली, सोनचाफा, मोगरा आदी फळाफुलांची नेत्रदीपक आरास केली होती.

सर्व मान्यवरांचा पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.

ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे यांचे हस्ते लळीत यांचा सन्मान करण्यात आला.

आपल्या खुसखुशीत शैलीत सचिन दळवीं यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून संमेलनात रंग भरले.

या कार्यक्रमास श्याम नाडकर्णी, प्रदीप पेडणेकर, गुरुनाथ परब, लक्ष्मीकांत कर्पे, पत्रकार अनिल निखार्गे, डाॅ.बापू भोगटे, वैद्य मुरलीधर देसाई, ज्ञानेश्वर मांजरेकर, चंद्रसेन वेंगुर्लेकर गुरुनाथ जोशी, अर्जुन मुळीक, एडवीन डिसोझा आदी उपस्थित होते.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी on चला, कास पठार पाहू या !
शितल अहेर on काही अ ल क
शितल अहेर on काही कविता