“माहिती”तील आठवणी या सदरात आज आपण वाचू या नोकरी निवृत्त माहिती अधिकारी श्री रणजित चंदेल यांच्या आठवणी. श्री चंदेल यांच्या विषयी च्या कौतुकाच्या दोन ठळक बाबी म्हणजे त्यांचे इंग्रजी भाषेवर असलेले प्रभुत्व आणि ७३ वर्षांचे वय झालं तरी ते अजूनही इंग्रजी वृत्तपत्रासाठी वृत्तांकन करीत असतात आणि अनेक सामाजिक, साहित्यिक उपक्रमात हिरीरीने सहभागी होत असतात. शंभरी पर्यंत ते असेच सक्रिय राहोत, या मनःपूर्वक शुभेच्छा.
– संपादक
एप्रिल १९८५ मध्ये मी माहिती विभागात माहिती सहाय्यक म्हणून यवतमाळला रूजू झालो. माहिती विभागात करिअर करायचे हे माझ्या ध्यानीमनी नव्हते. त्यामुळे त्याकरिता लागणारी पत्रकारिता पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता प्राप्त करण्याचे या आधी कोणतेही नियोजन मी करू शकलो नाही. वयाच्या ३५ व्या वर्षी अपघाताने मी ह्या विभागात आलो. तत्पूर्वी मी भाषा संचालनालय मुंबई येथे अनुवादक (भाषांतरकार) म्हणून (१९७३ ते १९८५) तब्बल १२ वर्षे कार्यरत होतो.
भाषा विभाग सोडून बाहेर पडण्यामागे एक प्रयोजन नक्कीच होते. बाबा पोलीस जमादार म्हणून नुकतेच निवृत्त झाले होते. बाबा पोलीस मधून जरी निवृत्त झाले असले तरी ते अत्यंत सरळमार्गी असल्याने त्यांच्या कारकिर्दीत स्वत:चे घर पण आम्हाला नव्हते. पाच भाऊ, दोन बहिणी आणि आई-बाबा असे आम्ही नऊ जणांचे कुटुंब यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे भाड्याच्या घरात राहात असू. आमच्या पैकी कोणाचेही लग्न तसेच मी सोडून इतर कोणाचेही शिक्षण झालेले नव्हते. मला गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळाल्याने मी जेमतेम बी.ए. पर्यंत शिकू शकलो. अर्थात नोकरी लागल्यावर मुंबईला मी रात्रीचे क्लासेस करून एम.ए., एल.एल.बी. पर्यंतचे शिक्षण घेतले.
माझ्यावर घरची जबाबदारी आभाळाएवढी असल्याने मला ती मुंबईला राहून पेलता येणे दुरापास्त होते. मुंबईला असतानाच माझे न्यायालयात नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न झाले. घरच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याकरिता मी मुंबईतून कसे बाहरे पडता येईल ? ह्या प्रयत्नात होतो. भाषा विभागातील माझी नोकरी स्थानांतरणीय नव्हती. त्यामुळे इतरत्र नोकरी मिळविण्याच्या मी प्रयत्नात होतो. अशात माहिती विभागातील तत्कालिन कार्यालय अधीक्षक प्रभाकरराव पेंडसे साहेबांशी माझी ओळख झाली. पेंडसे साहेब अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांना जेव्हा मी माझ्या प्रश्नांची जाणीव करून दिली तेव्हा ते म्हणाले, “तुम्ही माहिती विभगात नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला थेट यवतमाळला बदली मिळू शकेल.” योगायोगाने त्यावेळी माहिती सहाय्यकांच्या जागा भरण्याकरिता जाहिरात निघाली. त्यांनी मला अर्ज करण्याचा सल्ला दिला. मी अर्ज केला. तत्कालिन माहिती संचालक आदरणीय रमेश वाबगावकर यांनी मुलाखत घेतली. माझी निवड पण झाली. पोस्टिंगचा प्रश्न पेंडसे साहेबांनी सोडविला. मला यवतमाळला पोस्टिंग मिळाली. मी तेथील जिल्हा माहिती कार्यालयात रूजू झालो. माझ्या पत्नीला न्यायालयातून जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे नोकरी बदली मिळविण्यातही मी यशस्वी झालो.
यवतमाळ येथून अवघ्या दोन तासाच्या अंतरावर आमचे महागाव हे गाव होते. त्यामुळे कौटुंबिक प्रश्न सोडविण्याचा मार्ग थोडा सोपा झाला. तेव्हा यवतमाळ येथे मनोहरराव गोसावी हे जिल्हा माहिती अधिकारी होते. मी यवतमाळला रूजू झाल्या झाल्या मा. मंत्री श्री. शिवाजीराव मोघे यांचा धामणगाव (देव) येथे दौरा लागला. ते बालक-पालक मेळाव्याला मार्गदर्शन करणार होते. त्यांच्या वृत्त संकलनाची जबाबदारी गोसावी साहेबांनी माझ्यावर सोपविली. त्यांनी वृत्त संकलनाचा थोडा अनुभव असलेले सामान्य सहाय्यक अशोक खडसे यांना माझ्या सोबत दिले. रामजी आहुजा नावाचे छायाचित्रकारही गाडीत आमच्या सोबत होते. मोघे साहेबांचे भाषण झाले. कार्यक्रम आटोपला. आता बातमी लिहायची कशी ? हा मोठा प्रश्न होता. मला तर बातमी लिहायची कशी याची बाराखडी देखील माहित नव्हती. त्या कामी अशोक खडसे यांची मोलाची मदत झाली. अशा प्रकारे मी पहिली बातमी लिहिली. कार्यालयात आल्यावर गोसावी साहेबांसमोर मी बातमी ठेवली. ते ठीक आहे म्हणाले. मात्र बातमी लिहिणे म्हणजे निबंध लिहिणे नव्हे हे देखील सांगायला ते विसरले नाही. ईन्ट्रो कसा लिहावा, 5 W आणि 1 H म्हणजे काय ? आदिबाबत त्यांनी थोडे रागारागाने का होईना पण मार्गदर्शन केले. काही महिन्यातच त्यांचे अमरावतीला स्थानांतरण झाले.
गोसावी साहेबांनंतर बलवंत घुसे हे नवीन जिल्हा माहिती अधिकारी यवतमाळला रूजू झाले. घुसे साहेब उत्कृष्ट व्यंगचित्रकार होते आणि काहीसे मृदू स्वभावाचे देखील. त्यांचे कुटुंबीय नागपूरला राहत असल्याने त्यांना यवतमाळला फारसा रस नसे. ते वृत्त संकलनाची जबाबदारी माझ्यावर सोपवून बरेचदा नागपूरला निघून जात असत. अर्थात ते रूजू होण्यापूर्वी मी बऱ्यापैकी बातमी लिहू लागलो होतो.
दरम्यानचे काळात मी सुरूवातीला नाशिक मुक्त विद्यापीठातून पत्रकारिता प्रमाणपत्र परिक्षा आणि पुढे अमरावती विद्यापीठातून पत्रकारिता पदवी अभ्यासक्रमही पूर्ण केला. मुंबईला कर्णीक साहेबांच्या संघटनेत काम केले असल्याने जनसंपर्काची चांगली आवड निर्माण झाली होती. त्यामुळे घुसे साहेबांच्या गैरहजरीत मी त्यांची जबाबदारी अत्यंत कार्यक्षमतेने सांभाळत होतो. त्यावेळी जिल्ह्यात तीन मंत्री होते. मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जिल्हा असल्याने त्यांच्याही भेटी वारंवार होत असत. तरी देखील त्यांना जिल्हा माहिती अधिकरी नसल्याची उणीव मी भासू दिली नाही. घुसे साहेब नागपूरला जाताना मला म्हणायचे, “सांभाळा आता हे राज्य” आणि आल्यावर विचारायचे “आपले राज्य ठीक चालू आहे ना ?” मी होय म्हणत असे.

मी दौऱ्यावरून परत येताना गाडीतच बातमी लिहित असे आणि त्याच्या प्रती काढून महत्त्वाच्या वृत्तपत्रांना स्वत: वितरित केल्यावरच ऑफिसला जात असे. त्यामुळे दुसरेच दिवशी बातमी उमटत असे. ती वाचून मंत्री महोदय एकदम खूष होत असत.
घुसे साहेब बदलून गेल्यावर श्री. सुरेंद्र पाराशर साहेब, श्री. मोहन राठोड हे मला जिल्हा माहिती अधिकारी लाभले. त्यांच्यापासूनही बरेच काही शिकायला मिळाले.
१९९३-९४ दरम्यान माझी बदली वर्धा येथे झाली. तेथे भि.म. कौसल साहेब जिल्हा माहिती अधिकारी होते. मी वर्धा येथे रूजू झाल्यानंतर ते अमरावतीला जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बदलून गेले. त्यांचा प्रभारही काही दिवस माझ्याकडे होता.
मी वर्धा येथे माहिती सहाय्यक असतानाच एप्रिल १९९७ मध्ये हिंगणघाट येथे उपमाहिती कार्यालय उघडण्यात आले. या उपमाहिती कार्यालयाचा प्रभार देखील माझ्याकडे सोपविण्यात आला होता. त्यावेळी हरिष लोखंडे हे जिल्हा माहिती अधिकारी होते. यवतमाळला असताना मा.मंत्री श्री. शिवाजीराव मोघे साहेबांच्या अनेक कार्यक्रमांचे मी कव्हरेज केले होते. एकदा ते वर्ध्याला रोहणा येथे आदिवासी मेळाव्यासाठी दौऱ्यावर आले. “चंदेल तुम्ही यवतमाळला याल काय ?” असे त्यांनीच मला विचारले. मला तर ते हवेच होते, मी होय म्हटले आणि इस २००० मध्ये मी पुन्हा यवतमाळला आलो. मला लगेच जिल्हा माहिती अधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार ही सोपविण्यात आला. पुढे सतत सात वर्षे पेक्षा अधिक हा प्रभार मी सांभाळला.
एखाद्या माहिती सहाय्यकाला यवतमाळ सारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील जिल्ह्याचा प्रभार सात वर्षे सांभाळण्याची संधी देण्यात यावी, हा राज्यातील एक रेकॉर्ड म्हणावा लागेल. मी यवतमाळला रूजू झालो तेव्हा प्रा. वसंतराव पुरके हे देखील तेथे मंत्री होते. त्यांच्याशी माझी फारशी ओळख नसल्याने ते मला म्हणाले “एक प्रभारी अधिकारी आम्हाला न्याय देऊ शकेल काय ?, आम्हाला फुलफ्लेजड् जिल्हा माहिती अधिकारी हवे आहेत.” अर्थात माझ्या कार्यप्रणालीतून त्यांचा हा समज काही दिवसातच दूर झाला आणि त्यांच्याशीही माझी चांगली गट्टी जमली. त्यांनी जिल्ह्यातील उत्तम सहकार्य करणारे पत्रकार आणि जिल्हा माहिती अधिकारी यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवला. त्यावेळी त्यांनी मला एक घड्याळ भेट दिले. भाषणातही वाहवा केली. त्यांचे ते घड्याळ आजही माझ्या घरच्या भिंतीवर टिक-टिक करीत आहे.
माझ्या कारकिर्दीत ‘ध्यास गोदरीमुक्त महाराष्ट्राचा’ ही पुस्तिका आम्ही इ.स.२००५ मध्ये प्रकाशित केली. त्यावेळी ना. श्री. अजीत पवार हे महाराष्ट्राचे जलसंधारण व स्वच्छता मंत्री होते. ह्या पुस्तिकेत जिल्ह्यातील स्वच्छता मोहिमेचा आढावा घेण्यात आला होता. पुस्तकाचे संपादन करण्याकरिता ज्येष्ठ पत्रकार विवेक कवठेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ह्या पुस्तिकेचीही राज्यभर वाहवा झाली. त्यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी साहेब यांनी या कामाचे खूप कौतुक केले. त्यांनी ही पुस्तिका आमचे महासंचालक मा. भूषण गगराणी साहेबांना स्वहस्ते मंत्रालयात नेऊन दिली. त्यावेळी गगराणी साहेबांनी देखील आमच्या कामाचे खूप कौतुक केले.

गगराणी साहेब माझ्यावर मेहेरबान होण्यामागे आणखी एक कारण घडले. त्या काळात अनेक छोटी वृत्तपत्रे नियमित अंक न काढता निव्वळ शासनाच्या जाहिराती लाटत असत. ही बाब गगराणी साहेबांच्य लक्षात आली. त्यांनी त्यांची वक्रदृष्टी अशा वृत्तपत्रांकडे वळविली. जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना अशा वृत्तपत्रांची हजेरी ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आणि त्याचा त्रैमासिक अहवाल मागविला. त्यात त्यांनी राज्यातील शेकडो अनियमित वृत्तपत्रांना शासनाच्या यादीवरून काढून टाकले. ह्या कामगिरीतही यवतमाळ जिल्हा आघाडीवर राहिला. २५ ते ३० अनियमित वृत्तपत्रांचा आम्ही अहवाल पाठविला.त्यामुळे शासनाने त्या वृत्तपत्रांना यादीवरून काढून टाकले. या कामगिरीची त्यांनी मुंबई येथे आयोजित जिल्हा माहित अधिकाऱ्यांच्या परिषदेत तोंड भरून प्रशंसा केली. एक प्रभारी अधिकारी हे करू शकले ते तुम्ही का करू शकला नाहीत ? असा प्रश्न त्यांनी या कामगिरीत माघारलेल्या जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना विचारला.
मी माहिती विभागात अत्यंत उशिरा म्हणजे वयाच्या ३५ व्या वर्षी रूजू झालो. नवीन डिपार्टमेंटला आल्याने माझी मुंबईतील १२ वर्षांची सेवा ज्येष्ठतेच्या दृष्टीने वाया गेली. मी माहिती विभागात ज्येष्ठता यादीत बराच मागे पडलो. माझी शैक्षणिक अर्हता इतर कोणापेक्षाही कमी नसताना देखील ज्येष्ठता यादीत मी खाली असल्याने मला माहिती विभागात वरच्या पदांवर पाहिजे तशा बढत्या मिळू शकल्या नाहीत. अर्थातच याची मला मुळीच खंत नाही. माझे आई-वडील व कुटुंबीय यांच्याकडे मला लक्ष देता आले, यातच मला सर्वकाही मिळाले.

इ.स. २००८ साली आदरणीय श्री. राधाकृष्ण मुळी साहेब यवतमाळला रूजू झाले आणि पदोन्नतीवर माहिती अधिकारी म्हणून माझी मुंबईला बदली झाली. १ जुलै २००८ रोजी मी तेथूनच निवृत्त झालो.
लेखाचा समारोप करण्यापूर्वी माझ्याकडे प्रभार असतानाच्या कालावधितील पुढील काही घटनांचा येथे उल्लेख करणे आवश्यक आहे…
पत्रकार आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांसाठी यवतमाळ जिल्हा माहिती कार्यालयाव्दारे रोटरी क्लबच्या सौजन्याने २७ मार्च२००६ रोजी आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात जिल्हाभरातील पत्रकार, त्यांच्या कार्यालयात कार्यरत कर्मचारी तसेच माहिती कार्यालयातील कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. माहिती कार्यालयाव्दारे अशाप्रकारचे आरोग्य शिबिर पत्रकारांकरिता जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाची पत्रकार बांधवानी देखील वाहवा केली.

जिल्हा माहिती अधिकारी पदाची सतत सात वर्षे जबाबदारी सांभाळताना एक अत्यंत सनसनाटी घटना घडली. झरी जामणी तालुक्यात कोलाम या आदिवासी बांधवांची संख्या लक्षणीय असून, हा समाज दारिद्र्याने पिचलेला आणि अजूनही अज्ञान अंधकारात जगण्याची वाट शोधणारा आहे. त्यावेळी शासनाच्या अन्न सुरक्षा योजना त्यांच्यापर्यंत पोहचल्या नव्हत्या. ही घटना आहे इ.स. २००१ ची ‘कोलाम पोडातील लोक अन्नधान्याअभावी उंदिर खाऊन जगतात’, अशी अत्यंत सनसनाटी बातमी एनडीटीव्ही आणि मुंबई सकाळमध्ये झळकली. गल्ली ते दिल्लीपर्यंतचे शासन हादरले. आदिवासी नेते व तत्कालिन परिवहन मंत्री मा. श्री. शिवाजीराव मोघे यांनी सतत दौरे करून समस्येचा मागोवा घेतला. जिल्हा माहिती अधिकारी म्हणून वस्तुस्थितीचा शोध घेण्यासाठी मी टीव्ही कॅमेरामेन चंद्रकांत आढाव यांना घेऊन या भागातील कोलामांच्या मुलाखती घेतल्या. भरणपोषणाच्या समस्या तेथे नक्कीच होत्या. तथापि उपासमारीमुळे ते उंदिर खातात, हे मात्र राईचा पर्वत करण्यासारखे असल्याचे आढळले. काही कोलाम बांधवांनी त्यांच्या मुलाखतीत उंदिर हा त्यांच्या अन्नाचाच भाग असल्याचे सांगितले. ह्या मुलाखती मी मुंबई मुख्यालयाला पाठविल्या. मुख्यालयामार्फत हे चित्रीकरण वेगवेगळ्या वृत्तहिन्यांवर देऊन खुलासा करण्यात आला. आमच्या ह्या कामगिरीची दखल तत्कालिन महासंचालक श्री. भूषण गगराणी साहेबांनी घेतली. त्यांनी आम्हाला दूरध्वनी करून आणि लेखी प्रश्स्तीपत्र देऊन शाबासकी दिली. आदिवासींच्या समस्येला मिडियाच्या मदतीने वाचा फोडण्याची कामगिरी विदर्भ जन आंदोलन समितीचे नेते श्री. किशोर तिवारी यांनी बजावली होती. त्या भागात अन्न सुरक्षा योजना नसणे ही बाब खरोखरच गंभीर होती. तिवारी साहेबांनी प्रसिध्दी माध्यमाच्या सहाय्याने त्यांच्या समस्या मांडल्या. परिणामी शासनाला सर्व कोलाम बांधवांकरिता अंत्योदय योजना लागू करावी लागली. हे किशोर तिवारींचे मोठे यश म्हणावे लागेल. या जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यात तिवारी नेहमीच अग्रेसर राहिले आहेत.

दुसरी थोडी खेदजनक तेवढीच महत्त्वाची घटना अशी की, जिल्ह्यात मी इतके वर्ष जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम करतो आहे आणि तेही मुंबई मुख्यालयाने त्याची दखल घेईपर्यंत मी यशस्वी झालो, ही बाब माझ्याच अमरावती येथील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला बोचत होती. त्याचे कारणही तसेच होते ते मूळचे यवतमाळ जिल्ह्याचे. त्यामुळे वारंवार यवतमाळ दौऱ्यावर येत असत. मी माझ्या परीने त्यांचे आगतस्वागत करीत असे, पण त्यांच्या काही अवाजवी अपेक्षा असायच्या. त्याला मात्र माझी ना असायची. ह्यामुळे त्यांची नाराजी माझ्यावर होती. मुख्यालयाने माझ्या कामाची नोंद घेतली असल्याने ते मला येथून हटवू शकत नव्हते. मात्र त्यांनी मला छळण्याचे अन्य मार्ग शोधले. कार्यालयात बरेचदा मला व माझ्या कर्मचाऱ्यांना कामानिमित्त उशीरा बसावे लागत असे. आमच्यापैकी एका कर्मचाऱ्याचा कामाच्या तणावामुळे रक्तदाब वाढला. त्यास दवाखन्यात भरती करण्यात आले. दुर्दैवाने त्यात त्याचा मृत्यू झाला. ह्या परिस्थितीचा वरील अधिकाऱ्याने गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जवळच्या काही कर्मचाऱ्यांना त्या मृत कर्मचाऱ्याच्या घरी पाठवून चंदेल साहेबांच्या कामाच्या प्रेशरमुळेच तुमच्या पतीचा मृत्यू झाला, असे त्याच्या पत्नीला कळविण्यात आले. तुम्ही एफआयआर दाखल करा, असा सल्लाही दिला गेला. एफआयआर दाखल होईपर्यंत अंत्यविधी करू नका असेही सांगण्यात आले. मृत कर्मचाऱ्याचा मी वरिष्ठ या नात्याने त्यांच्या कुटुंबियांना भेटणे, सांत्वन करणे हा माझ्या कर्तव्याचाच भाग होता. एकीकडे एफआयआरची भीती तर दुसरीकडे आपले कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी, असा दुहेरी संघर्ष माझ्या मनात सुरू होता. शेवटी मी कर्तव्य बजावण्याचा निर्धार करून त्यांच्या घरी गेलो. सर्वांसोबत भाषणातून शोक संवेदना व्यक्त केल्या. अर्थातच जाताना माझी पत्नी आणि मुलांना मी सांगून गेलो, “तुम्ही घाबरून जाऊ नका, एखाद वेळी मला अटक ही होऊ शकते. तथापि मी निर्दोष असल्याने त्यातून सुखरूप बाहेर पडेल, याची खात्री बाळगा.” तेथे मी गेल्यावर मृतकाच्या मेहुण्याने प्रकरण भडकविण्याचा कसा प्रयत्न झाला, हे मला सांगितले, आम्ही त्यांचे ऐकून घेतले, मात्र तसे काहीही आम्ही करणार नाही. वास्तविक त्या कुटुंबियांशी माझे आधीपासून चांगले संबंध होते. त्यांच्या अडीअडचणीला मी कामी आलो होतो. इंग्रजीत म्हण आहे ‘A good turn is never lost.’ त्याची प्रचिती मला आली.
वरील प्रकरणातून माझी सुटका झाली, हे काही त्या अधिकाऱ्याला पहावले नाही. त्याने नंतर पत्रकारांना देण्यात आलेल्या जाहिरातीच्या पेमेंटच्या पावत्या इ. अभिलेखच कार्यालयातून गायब करविले. माझ्यावर ऑडिट लागले. तशाही परिस्थितीत मी, आमचे रोखपाल श्री. जयंत पालटकर आम्ही दोघेही संबंधित पत्रकारांना भेटलो. त्यांच्या कडून पुन्हा पावत्या मिळविल्या. सर्व पत्रकारांनी या कामी आम्हाला मोलाचे सहकार्य केले. निवृत्त माहिती संचालक श्री. शरद चौधरी यांचेही मार्गदर्शन लाभाले. श्रीमती मनिषा पाटणकर महोदया त्यावेळी महासंचालिका होत्या. त्यांना देखील ह्या अधिकाऱ्याचे प्रताप माहित होते. त्या देखील माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या. पुन्हा एकदा मी बचावलो. माझ्याच अधिकाऱ्याने मला दोनदा कारागृहात पाठविण्याची व्यवस्था केली. असे कटू अनुभवही नोकरी करताना आले. अशा वेळी तुम्ही लोकांशी चांगले वागला असाल तर ते तुमच्या पाठीशी नक्कीच उभे राहतात. “तुम्ही सर्वांशी चांगले वागा. तुमचे कोणीही काही बिघडवू शकणार नाही,” असा प्रेमाचा सल्ला नवागत अधिकाऱ्यांना देऊन मी लेखाला पुर्णविराम देतो.
— लेखन : रणजित चंदेल.
निवृत्त माहिती अधिकारी, यवतमाळ
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
प्रामाणिक व्यक्तिमत्त्व
आदरणीय चंदेल सर, तुम्ही जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कधी वागलाच नाहीत. एक अधिकारी आणि पत्रकाराचे संबंध मैत्रीपूर्ण कसे असावे, याचा आदर्श पायंडा तुम्ही घालून दिला. तुमचे मार्गदर्शन घेवून DGIPR मध्ये कार्य करण्याची संधीही मिळाली. तुमचे हे अनुभव खूप मौलिक आहेत. 🙏💐
सहृदय व्यक्ती म्हणजे चंदेल साहेब