Thursday, May 30, 2024
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तकं : ५१

मी वाचलेलं पुस्तकं : ५१

रारंगढांग”

‘रारंगढांग’ ही प्रभाकर पेंढारकर यांच्या काहीशा अनाकर्षक शिर्षकाच्या कादंबरीची तिसरी आवृत्ती १९८९ च्या सुमारास वाचून काढली. फारच आवडली. नेहमी प्रमाणे वाचल्यानंतर बुक रॅक मध्ये ते पुस्तक संग्रही ठेवून दिले.गेल्याच शनिवारच्या म.टा.मध्ये ‘एव्हरेस्टला हवा मोकळा श्वास’ याविषयावरचा अग्रलेख वाचला.आणि बुक सेल्फ वरचे ‘रारंगढांग’ पुन्हा एकदा वाचून काढलं.

या पुस्तकाच्या जवळपास दहा अकरा आवृत्या निघाल्याचं साहित्य मित्रांच्या चर्चेतून निदर्शनास आलं होत. कादंबरीतील अनेक पात्रे आणि प्रसंग माझे या अगोदरही लक्षात होते. त्यामुळे दुसऱ्या वाचनातही तितकाच आनंद वाटला.

या कादंबरीची पहिली आवृत्ती १९८१ मध्ये प्रकाशित झाली. म्हणजे सुमारे ४४ वर्षांनंतर मी ‘रारंगढांग’ कादंबरीचा वाचक म्हणून आता या माध्यमासाठी लिहित आहे.हिमालयातील रस्त्यांमध्ये आता पुष्कळ मोठ्या प्रमाणात विस्तार, विकास, प्रगती झालेलीच दिसत आहे. तथापि कादंबरीची पार्श्वभूमी सुमारे पन्नास वर्षा पूर्वीची आहे.

कादंबरीचा नायक आहे मुंबईचा निवासी आणि विद्यापीठात पहिला आलेला इंजिनिअरिंगचा गोल्ड मेडल मिळविलेला विद्यार्थी विश्वनाथ मेहेंदळे ! युनायटेड कन्स्ट्रक्शन या मुंबईतील मोठ्या क़ंपनी मध्ये सेवेत असताना भरपूर पगार व सुखसोयी असतांनाच ते सोडून केवळ हिमालयात रस्ते बांधण्याची मनापासून इच्छा असलेल्या या तरुणाने बाॅर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये कमी पगार व आधुनिक सुखसोयी नसलेल्या जागी सिव्हिलियन अधिकारी म्हणून रुजू होण्याचे धाडस केले.

कादंबरीची पार्श्र्वभूमी म्हणून सर्व प्रथम हिमालय व या बाॅर्डर रोड ऑर्गनायझेशनची माहिती अशी आहे की, हिमालयात ज्या उंचीवर रस्ते बांधत आहे त्या उंचीवर जगातल्या दुसऱ्या कोणत्याही देशाने क्वचितच रस्ते बांधले असतील. माणसांना आणि यंत्रांना थकवणारी ही उंची, विरळ ऑक्सिजन, लहरी निसर्ग, विलक्षण थंडी, हिवाळ्यात रस्त्यावर साठणारे ७०-८०फूट बर्फ, अकल्पित लॅंडस्लाइड्स आणि या सर्वांचा मानवी मनावर होणारा परिणाम या त्यातल्या काही अडचणी! भारतीय सैन्यातील इंजिनिअरिंग विभागाचा मेजर जनरल च्या हुद्याचा अधिकारी हा बॉर्डर रोडचा प्रमुख ‘डायरेक्टर जनरल’ असतो. प्रत्येक प्रकल्पावर एक प्रमुख इंजिनिअर आणि त्याच्या हाताखाली अनेक ठिकाणी चाललेल्या या रस्त्याच्या वेगवेगळ्या कामांवर देखरेख करण्यासाठी, टास्क फोर्स कमांडर असतात. कामाच्या स्वरूपानुसार ठिकठिकाणी फिल्ड कंपन्यांची ऑफिसेस अथवा डिटॅचमेंट्स उभारल्या जातात. त्यावर सैन्यामधून इंजिनियर्स घेतात तसेच मुलकी इंजिनिअर्सची तीन किंवा पाच वर्षांसाठी नेमणूक केली जाते. प्रत्येक टास्क फोर्स मध्ये आठ ते दहा हजार माणसे असतात. त्यातले काही सैन्यातले जवान, तर बरेचसे जनरल रिझर्व इंजिनिअरिंग फोर्स ‘ग्रेफ’ चे जवान असतात. या व्यतिरिक्त आजूबाजूच्या भागातले लोकही ‘लोकल लेबर’ म्हणून कामावर घेतले जातात. या रस्ता बांधणीतील सर्वात अवघड भाग हा उभ्या कडे मधून रस्ता खोदून काढण्याचा!या नितळ, उभ्या कड्यांना स्थानिक भाषेत ‘ढांग’ म्हणतात. एका बाजूला हिमालय व लहरी निसर्ग, दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या स्वरूपाची पण सारख्या जिद्दीची माणसे!निसर्गात आणि माणसांत जशी येथे रस्सीखेच व संघर्ष तसाच प्रसंगी माणसा माणसातही त्यांची ही कथा आहे. या कादंबरीतील अनेक मानवी पात्रांच्या कामातून आणि संवादातून जिवंतपणा पानापानातून प्रकर्षाने दिसून येतो.

कादंबरीचा नायक लेफ्टनंट विश्वनाथ यांचा मुंबईतील आपल्या वडिलांनी-बाबांनी व अल्प काळात मैत्रिण झालेल्या उमा ने केलेला पत्रव्यवहारातील मराठमोळी काहीश्या काळजीची भाषा सोडल्यास बाकी सर्व रस्ता व ढांग खोदण्याच्या कामातील गती प्रगती संदर्भात तसेच मानवी भावभावना स्वरूपात कादंबरी भरपूर प्रमाणात पुढे पुढे जाते.

मराठवाड्यातील एक जवान सर्जेरावाचे प्रसंगाचे वर्णन तर आपल्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणते. अर्थात ती सर्व हकिकत कादंबरीत पेंढारकरांनी फार सहृदयतेने साकारली आहे.ती कादंबरीतच वाचलेली बरी !

विश्वनाथ ज्यावेळी कामावर रुजू होण्यासाठी गेला त्यावेळी टास्क फोर्स कमांडर लेफ्टनंट कर्नल जेम्स राईट यांच्याशी प्रारंभी झालेला संवाद कादंबरीत फारच छान पध्दतीने रंगविला आहे. चोविसीचा हा तरुण खरोखरच एक चांगली नोकरी सोडून केवळ हिमालयात रस्ते बांधण्यासाठी आला आहे याचे त्यांना फारच कुतहूल वाटले. त्यांनी विश्वनाथला समजावून सांगितले की हिमालय परिसरातील जमिनींची वैशिष्ट्य आणि निसर्गाच्या लहरी याच बरोबर इथली माणसंही समजावून घ्या. आर्मी मध्ये कामाची एक विशिष्ट पद्धत असते. एक वेगळीच बोलीभाषा असते.वागण्याची त-हाही वेगळीच असते. पहिले काही दिवस तुम्हाला ते अंगवळणी पडेपर्यंत अवघड वाटेल. काही वेळा रुचायचही नाही. थोड्या दिवसात सराव होईल.

विश्वनाथला मेजर बंब यांच्या विभागात पाठविण्यात आलं. सिव्हिलियन अधिका-यांपेक्षा मिलिटरी इंजिनिअर्स अधिक चांगले, कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याची त्यांची तयारी असते‌ अशा ठिकाणी काम करण्यासाठी आवश्यक असणारी शिस्त आणि मनाचा कणखरपणा त्यांच्या अंगी आलेला असतो हे मेजर बंबचे विचार देखील विश्वनाथने लक्षात घेतले आणि कामाच्या जागी आला.

एका बाजूला सतलज दुसऱ्या बाजूला हा अवाढव्य ‘रारंगढांग’ !इथं काम करताना नेहमी लक्षात ठेवा हा प्रदेश अनोळखी, इथले हवामान क्षणोक्षणी बदलणार, इथल्या निसर्गात माणसावर दडपण येतं, त्याचा परिणाम माणसांच्या स्वभावावर आणि पर्यायाने कामावर होत असतो. हा लहरी निसर्ग या उंचीवरील विरळ प्राणवायू आणि सभोवतालची हिमशिखरे या सर्वांचा माणसांवर होणारा परिणाम या गोष्टी इंजिनिअरिंगच्या पुस्तकात दिलेल्या नसतात, पण इथे त्याच अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्याचे स्वरूप जाणून घेतल्या खेरीज तिथं काम करता येणे अशक्य ! साधारणपणे ९००० फुटापेक्षा अधिक उंचीवर काम करताना माणूस आणि मशीन दोघेही लवकर थकतात. अपेक्षेप्रमाणे त्यांच्याकडून काम होऊ शकत नाही. जगातल्या कोणत्याही देशात एवढ्या उंचीवर रस्ते बांधले गेलेले नाहीत. हा रारंगढांग खोदून त्यातून रस्ता काढायचा आहे. तो पार झाला की सतलज ओलांडून त्यापुढे सहा एक किलोमीटर पर्यंत रस्ता करायचा आहे या दोन्ही विभागांची पाहणी पूर्ण होऊन रस्त्यांची अलाइनमेंट ठरली आहे. पण बारीक-बारीक गोष्टी पाहून तुम्ही तुमच्या गरजा, माणसं, साहित्य, ते हवं असणार्‍या तारखा, सर्व निश्चित करा आणि एकदा कार्यक्रम नक्की झाला की ठरलेल्या तारखांना काम संपत गेलं पाहिजे हे लक्षात घ्या. असेही मेजर बंब यांनी सांगून या कामाची जबाबदारी विश्वनाथवर सोपविली. पुढे त्यात काय काय अडचणी आल्या, साहित्यासाठी कशी यातायात करावी लागली,अकस्मात होणारे अपघात, सात जवानांचे मृत्यू इत्यादी तपशीलवार वर्णन आणि विश्वनाथने नेमके काय केले याचे विवेचन कादंबरीत प्रदीर्घ स्वरूपात केले आहे.ते एखाद्या चित्रपटातील वेगवान कथेसारखे आहे म्हणून ते मुळातच सर्व वाचले पाहिजे.

कादंबरी वाचतांना हिमालयातील विविध दृष्ये, उत्कट हृदयस्पर्शी प्रसंग, एकदम फटकेबाज संवाद, माणसांच्या स्वभावातले विविध नमुने, रुबाब दाखविणारे अधिकारी, कामसू पण दारिद्र्यात पिडलेले कामगार, भयानक कडे- कोसळणी व या सर्वांच्या तळाशी वाहणारा एक अंत: प्रवाह: “जब आदमी मर जाता है तो उसका क्या रहता है ? एक यादगारी”!

कादंबरीचा शेवट विश्वनाथ च्या ‘कोर्ट मार्शल’ मध्ये फार छान पैकी रंगविला आहे. आरोप, साक्षीदार, वकिलांचे प्रतिपादन, आरोपीचे सर्व आरोप नाकारण्याचे उत्तर,व कोर्ट मार्शलचा न्याय! आरोपी म्हणून विश्वनाथ कोर्ट मार्शल समोर जे सांगतो ते असे… “माझ्यावरचे आरोप मला मान्य नाही. माझ्यावरचा पहिला आरोप अफरातफर ! सरकारी मालाचं म्हणजेच पर्यायाने पैशाचं मिस अॅप्रोप्रिएशनचा केल्याचा आरोप ! माझ्या माहितीप्रमाणं ज्या व्यक्तीचा अप्रमाणिक मार्गानं वैयक्तिक फायदा करून घेण्याचा उद्देश गृहीत धरलेला असतो. हे खांब उभारण्या मागे माझा काही वैयक्तिक फायदा नव्हता हे सरकारी वकीलही मान्य करतील. सरकारी साहित्याचा गैरवापर हा जर माझ्यावर आरोप असेल, तर हा गैरवापर थोडा अगोदर झाला असता, तर सात माणसांचे प्राण वाचले असते हे आता स्पष्ट झाल्यावर त्याला ‘गैरवापर’ म्हणता येईल काय ? वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगी वाचून काही गोष्टी करणे या आरोपाबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे की आघाडीवर लढणाऱ्या अधिकाऱ्याला आणि साइटवर काम करणाऱ्या इंजिनीयरला काही स्वातंत्र्य असू शकत नाही काय ? कां केवळ वरून आलेल्या आज्ञा पालन करणे हा एकच आणि एवढाच सैन्यातल्या अधिकाऱ्यांचा सर्व श्रेष्ठ गुण आहे ? मला वाटतं की वरिष्ठांचा सगळ्यात महत्त्वाचं काम हे की त्यांच्या हाताखाली लोकांचं कर्तृत्व आणि बुद्धी ओळखून त्यांचा योग्य उपयोग करून घेणे.माझ्या बाबतीत दुर्दैवाने ते घडलं नाही. मी सुचवलेल्या गोष्टी सैन्याच्या नियमात बसू शकत नाहीत हे मला सांगण्यात आलं !”

कोर्ट मार्शलनी यावर निकाल असा दिला की. “आरोपीचं त्याच्या शास्त्रातलं ज्ञान, बांधकामा मागील उद्देश, ज्या परिस्थितीत त्याने सरकारी साहित्य वापरलं आणि वरिष्ठांच्या परवानगी वाचून हे बांधकाम केलं, हे सर्व विचारात घेतात आरोपीला दोषमुक्त करण्याची शिफारस कोर्ट करत आहे.पण आरोपीची वृत्ती, स्वतंत्र बुद्धी, आणि विचारांची पद्धती पाहता असा माणूस सैन्याच्या शिस्तीत आणि कार्यपद्धती बसण्याची शक्यता नसल्याने, त्याचा तीन वर्षाचा करार रद्द करून, त्याला निवृत्त करण्यात यावं असंही आपलं मत कोर्ट इथं नमूद करत आहे”… कादंबरी एखाद्या चित्रपटाप्रमाणे इथं संपते. केंद्र सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनने प्रभाकर पेंढारकर यांना बाॅर्डर रोड ऑर्गनायझेशनसाठी अनुबोधपट करण्याची संधी दिली.वरिष्ट लष्करी अधिकारी यांच्याशी चर्चा, तसेच हिमालयातील वास्तव्यात भेटलेल्या अनेक व्यक्तींच्या अनुभवातून या कादंबरीला उत्तमपैकी जिवंतपणा आणला आहे.

सुधाकर तोरणे

— परीक्षण : सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक, नासिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments