Saturday, April 13, 2024
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक : ४१

मी वाचलेलं पुस्तक : ४१

प्रशासन भाग – ५

“प्रशासन” पुस्तकाच्या पाचव्या भागात शेतकरी आणि सहकार या क्षेत्रातील दोघा मातब्बर नेत्यांच्या डॉ.मनोहर जोशी सरांनी घेतलेल्या मुलाखतीकडे मी लक्ष वेधत आहे. त्यापैकी एक आहेत खासदार श्री राजू शेट्टी व दुसरे आहेत वारणा प्रकल्पाचे अध्यक्ष श्री विनय कोरे.

एकत्र कुटुंबाची ५ एकर शेती असलेले श्री राजू शेट्टी यांनी सर्व भावंडांचा नोकरीकडे कल असतांनाच आपण मात्र शेतीत लक्ष देण्याचे ठरविले. तसा त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरचा डिप्लोमा घेतला होता. पुढे शेतीत विविध प्रयोग करून त्यांनी प्रयोगशील शेतकरी म्हणून लौकिक मिळविला. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी कार्य केले. पुढे स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन केली. २००१ मध्ये जिल्हा परिषदेत, २००४ मध्ये विधानसभेचे आमदार, २०१४ मध्ये लोकसभेचे खासदार म्हणून ते निवडणूक जिंकले. २०११ साली त्यांनी दूधाचे आंदोलन केले, नंतर ऍग्रो प्रोड्यूसर कंपनी स्थापन करून दूधाचे संकलन व मार्केटिंग करायला सुरुवात केली. महाराष्ट्रात दूधाचा सगळ्यात जास्त भाव आपल्या कंपनीतर्फे शेतकऱ्यांना दिला जातो, असे अभिमानाने सांगितल्यावर सरांनी त्यांना प्रश्न केला की शेतकऱ्यांचे प्रश्न असे कोणते की सरकार सोडवू शकेल परंतु ते सोडवत नाही ? त्यावर राजूजी म्हणाले की, एकतर शेत जमिनीचे तुकडे लहान -लहान झाले आहेत त्यामुळे शेतीचे व्यवस्थापन परवडत नाही. दुसरी चूक ही की कुळ कायदा. ‘कसेल त्याची जमीन’ हे धोरण शेतकऱ्यांचे मुळावर उठलेलं आहे. त्यामुळे शेतीतून बाहेर पडता येत नाही. बाहेर पडलं की कुळ कायदा लागू. जर शेतीत राहिलं तर तेव्हढ्याशा जमिनीच्या तुकड्यात भागत नाही. यावर आपण काय उपाय सुचवले ? असे सरांनी विचारले. त्यावर एक तर लॅंड बॅंक निर्माण झाली पाहिजे किंवा करारपदतीच्या शेतीचा नवा कायदा होणे आवश्यक आहे. सरकारने याबाबत गांभीर्याने विचार केलेला नाही. यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता तयार करणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांना चांगले दिवस येण्यासाठी सरकारने काय करायला हवं ? असा प्रश्न सरांनी विचारला. त्यावर राजू शेट्टी म्हणाले की, पायाभूत सुविधा व तंत्रज्ञान सरकारने पुरविलेच पाहिजे.वैश्विक तापमान वाढीवर निसर्गावर अवलंबून शेती करणे धोक्याचे झाले आहे. पूर्वी ७ जून म्हटला की पाऊस आलाच म्हणून समजा. आता तसं वातावरण मुळीच नाही. हरित क्रांती नंतर हायब्रीड बियाणे उत्पादन वाढीसाठी वापरले जाते. निसर्गामध्ये होणा-या बदलामुळे त्याला प्रतिकार करण्याची क्षमता कमी झाली आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे ड्रग घेतलेल्या माणसाची जशी अवस्था होते तशीच अवस्था या पिकांची होते. वातावरणातील बदल ते सहन करू शकत नाही. रोगराई वाढते आहे. कीटक नाशकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वापरावं लागतं हा खर्च वाढत चालला आहे. अशावेळी जगभरात जे नवीन तंत्रज्ञान वापरलं जातं ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे.

आपल्या दृष्टीने प्रशासन म्हणून शेतकऱ्यांना काय वाटते ? असा प्रश्न सरांनी विचारल्यावर श्री राजू शेट्टी म्हणाले की, प्रशासनात आलेले बरेचसे लोक शेतकरी कुटुंबातीलच आहेत. त्यांना ‘यशदा’ किंवा महसूलीमध्ये कसलं ट्रेनिंग दिलं जातं ? पण शेतकऱ्यांची पोरं प्रशासनात आल्यानंतर त्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक कां होतो हे मलाही न सुटलेलं कोडं आहे. कळत नाही नेमकं असं कां होतं ? मी कुठल्या एका सरकारवर दोषारोप करणार नाही. मुळामध्ये सरकारमध्ये गेल्यानंतर आमचे शेतकरी आणि ग्रामीण भागातून आलेल्या लोकप्रतिनिधींची सुध्दा मानसिकता प्रशासनात आलेल्यांप्रमाणेच होते. या सर्वांचा परिणाम आज आपण पहातोच आहोत.

वारणा चे अध्यक्ष श्री विनय कोरे आहेत. त्यांच्यावर जे संस्कार आहेत ते त्यांचे आजोबा तात्यासाहेब कोरे यांचे ! तो वारसा मिळाल्यामुळे आपण सहकार क्षेत्राकडे वळलो. वारणा समूहाचे जे नाव निर्माण झाले ते वारणा नदीमुळे. नदीच्या दोन्ही तीरावर ६९ गावं एकत्र करून, त्याला सहकाराच्या तत्वांमध्ये बांधून वारणेच्या विकासाची कामं सुरू झालीत. या ६९ गावच्या गरजा विचारात घेऊन त्यांना चालना देणं, सहकाराच्या ताकदीने गावातील लोकांना उभं करून ज्या ज्या नव्या गोष्टी आपल्याला करता येतील त्या कराव्यात या तात्यासाहेबांच्या विचारातून सहकाराचा श्री गणेशा साखर कारखानदारीतून झाला. वारणा समूहाचे जवळजवळ २३ उद्योग असून ते मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. काही उद्योगा़ंची नव्याने वाढ झाली आहे.

प्रशासन हा माझ्या पुस्तकाचा विषय असला तरीही प्रशासनाविषयी आपले मनोगत सांगण्यापूर्वी वारणा प्रकल्पात नव्याने कोणते उद्योग सुरू झाले ते अवश्य सांगावेत असे सरांनी सांगितल्यावर श्री विनयजी म्हणाले की, नव्याने काही उद्योगात वाढ केली आहे. आता नवीन मिनी हायड्रोप्रोजेक्ट निर्माण केले आहेत. को- -जनरेशन प्रोजेक्ट सुरू झाला आहे, म्हणजे बायो गॅसपासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू झाला आहे. साखरेला नवीन तंत्रज्ञानाचा रिफाईंडींग प्रकल्प सुरू झाला आहे. आता सगळ्यात महत्वाकांक्षी असलेला’बायोचेंज’ म्हणजे दहा हजार लिटर पेट्रोलशी ज्यांची तुलना होऊ शकेल असा बायोगॅस वारणानगरमध्ये बनवतो आहे. यावर्षी आपल्या पेट्रोलिअम कंपन्यांना तो विकायची आणि वाहनांमध्ये हा गॅस वापरण्याची परवानगी मिळाली आहे. टेट्रापॅक प्रकल्पाची संकल्पनेतून त्याचे काम सुरू आहे. कॅडबरी कंपनी ला ‘बोर्नविटा’ गेली २२ वर्षे वारणानगरातून बनवून देत असतोच. आईस्क्रीम निर्मितीही झाली आहे.

प्रशासन कुणासाठी आहे असे अनेक प्रश्न मनामध्ये उभे रहातात. असे सांगून विनयजी यांनी सांगितले की, प्रशासनातील दिरंगाईमुळे प्रकल्पांची किंमत कितीतरी पट वाढते. काही चांगले प्रकल्प तंत्रज्ञान वापरून पूर्ण होऊ शकतात पण ते कां राबविले जात नाही असे अनेक प्रश्न या संदर्भात उभे राहतात. प्रशासन सुधारण्यास तसा खूप वाव आहे. सहकार क्षेत्रात प्रशासन अतिशय महत्त्वाचे आहे.

या मुलाखतीत त्यांनी अनेक उपाय योजना सुचविल्या. तरुणाईला काॅम्पीटरमुळे सर्व ज्ञान मिळत आहे. ते अधिकाधिक वाढवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे असे त्यांनी सुचविले. सहकार, उद्योग आणि राजकारण अशा तिन्ही क्षेत्रांच्या कामाचा, प्रशासनाचा अनुभव विनय कोरे यांनी घेतला असल्याने प्रशासन, भ्रष्टाचार, दिरंगाई व धोरणाबाबत बद्दल बरेच अनुभव सडेतोडपणे अनेक उदाहरणे देऊन सांगितले ते मात्र डॉ मनोहर जोशी सरांच्या या पुस्तकातून वाचलेच पाहिजे.
क्रमशः

सुधाकर तोरणे

— परीक्षण : सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक, नासिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments