Wednesday, September 11, 2024
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक : ४१

मी वाचलेलं पुस्तक : ४१

प्रशासन-भाग ६

प्रशासन‘ पुस्तकात लेखक डॉ.मनोहर जोशी यांनी प्रशासन पीडित संघटना, व्यक्ती व प्रशासन ढिलाईवर तीन स्वतंत्र मुलाखती घेतल्या आहेत. त्यापैकी प्रथम मुंबईचे डबेवाले चे नेते व सहकारी यांच्या दीर्घ स्वरुपात मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत वेगवेगळ्या प्रश्नांतून १८९० सालापासून एक व्यवसाय म्हणून सुरू झालेल्या डबेवाल्यांची कार्यपध्दती समजून घेतली. आपले प्रशासन कसे चालते ? असा प्रश्न सरांनी विचारल्यावर श्री मुके यांनी सांगितले की प्रत्येक रेल्वे स्टेशनवर आमचे चार ग्रुप असतात. दहा माणसावर देखरेख करायला एक सुपरवायझर असतो. एक माणूस साधारण पाच डबे घेऊन जात असतो. हे डबे पोहचवतांना त्याला एक तास लागतो. एका इमारतीत जर दोन -तीनशे डबे असतील तर तिथं चार- पांच जणांचा गट काम करतो. एका कंपनीत तर आमचे हजार डबे पोचवण्याचे काम असते. येथे माणसाच्या मेहनतीवर मोबदला ठरला जातो. सरासरी बारा ते पंधरा हजार प्रत्येक डबेवाला उत्पन्न मिळवत असतो. आमच्याकडे वयाचे बंधन नाही दोघे तर ७५-८० वर्षाचे आहेत. तरुणाला लाजवेल असे त्यांचे काम आहे. आयुष्याची साठ वर्षे डबे पोचवणारी मंडळी संघटनेत आहेत. आमचं काम अचूकपणे चालते कारण संस्थेचे काही नियम आहेत. आमची साखळी तयार झाली आहे. जर एखाद्याची चूक झाली तर गटाकडून त्याला दंड केला जातो. म्हणून प्रत्येक जण जबाबदारीने काम करतो.

घरचं गरमागरम जेवण आम्ही वेळीच पोचवत असल्याने एका डब्यात हजार – बाराशे रुपये महिना द्यायला माणसं तयार असतात असे सांगून श्री मुके म्हणाले की, असे रोज दोन लाख डब्यांचे वहन आमच्या कडून केले जात असते. संघटनेचे आजमितीस साडेचार हजार सदस्य आहेत. लिखित नियमावली आहे. डोक्यावर टोपी नसेल तर दंड, डब्यांची हाताळणी जर चुकीच्या पध्दतीने झाली तर दंड, डबा पोहचवतांना जर काही व्यसनकरुन आला असेल तर दंड. या नियमावली मुळे डबा वाटप साखळी पध्दतीने सुरळीत सुरू आहे.

आमच्यातले ९० टक्के लोक अशिक्षित आहेत. आणि सगळे मराठी आहेत. स्वत:ला वेळेचे बंधन घातले आहे. १३७ वर्षे हे व्रत अखंडपणे आचरणात आणत आहोत.

तुमच्या संघटनेबद्दल कुणी पुस्तकरूपाने लिहिले आहे कां ? तुमच्या कामाची कोणी दखल घेतली आहे कां ? असे सरांनी विचारताच श्री मुके उत्तरले ‘मुंबईचा अन्नदाता’ हे शोभा बोंद्रे यांच पुस्तक, शिवाय ‘मुंबईचा डबेवाला’, ‘मॅनेजमेंट गुरू’ ही पुस्तके डबेवाल्यांवर उपलब्ध आहेत. आमचं काम बघायला आठ पंधरा दिवसांनी कोणी ना कोणी विदेशी पाहुणा येतच असतो. प्रिन्स चार्ल्स, नेदरलँडची मॅक्झिम हे देखील आमचं काम बघायला आले होते.

तुम्हाला कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते ? समस्या कोणत्या आहेत ? सरकारकडे काही काम निघतं कां ? असे प्रश्न विचारल्यावर श्री मुके व सहकारी यांनी सांगितले की कधी कधी आम्हाला सायकली लावायला जागा मिळत नाही. डब्यांची मांडणी रेल्वे स्टेशन जवळपास फुटपाथवरच होत असते. जे जुने अधिकारी असतात त्यांना आमच्या कामाची माहिती असते. परंतु नवीन अधिकारी आपल्या अधिकाराचा वापर करून आम्हाला तेथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत असतात. थोडे दिवस जाच होतो.तसा आमचा व्यवसाय मॅनेजमेंट स्टडीमध्ये नावाजला गेला आहे. रेल्वे प्रवास करताना मात्र रेल्वे पोलिसांकडून नेहमी त्रास सहन करावा लागतो. सरकारकडे आम्हाला कुठे तरी भुखंड द्यावा एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. आमच्या डबेवाल्यांनी पैसे गोळा करून अडीच कोटींची आळंदीला धर्मशाळा बांधली आहे. त्यावेळी आम्हाला प्रशासकीय अडथळा आला होता. अजूनही थोडे काम बाकी आहे.

शेवटी डॉ मनोहर जोशी सरांनी सांगितलं की तुमचे काम अभिमानास्पद आहे. तुमचे सभासद वाढले तरीसुद्धा तुमची पुढची पिढी या व्यवसायातून वाढू नये असे माझे प्रामाणिक मत आहे. त्यावर आमची देखील तीच इच्छा आहे असे सांगून श्री मुके यांनी आम्हाला देखील असेच वाटते की आमची मुलं इंजिनिअर, डॉक्टर, वकील व्हावीत त्यासाठी आम्ही या सर्व गोष्टी करत असतो. परंतु सध्याचं शिक्षण एवढं महाग झालंय की आमचं महिन्यांचं दहा बारा हजारांचं उत्पन्न संसार चालविण्यासाठी तुटपुंजच ठरत असतं.

मुंबईतील फुटपाथवर फेरीवाल्यांना कायमस्वरूपी जागा मिळवून देण्यात नगरसेवक म्हणून अथक प्रयत्नानंतर डॉ मनोहर जोशी सरांना २००१ साली यश आलं. प्लाझा मार्केट मध्ये पहिल्या दोन मजल्यांवर १२५ फेरीवाल्यांना कायमस्वरूपी जागा परवान्यासाठी मिळाली. तेव्हा पासून फेरीवाले व्यवस्थित व्यवसाय करत आहेत परंतु २००२ पासून त्यांना दिलेली १५ फुटांची जागा अपुरी पडत असल्यामुळे त्यांच्या बाजुलाच असलेली १५ फुटांची अतिरिक्त जागा प्रत्येकासाठी ते महापालिकेकडे मागत आहेत. अनेक प्रयत्न केलेत व अनेक पत्रे लिहिली होती परंतु महापालिकेच्या विलक्षण दिरंगाईला फेरीवाले कंटाळून गेले आहेत. सरांनी यासंबंधात एक फेरीवाले श्री शरद साईल आणि त्यांच्या फेरीवाले सहका-याची मुलाखत घेऊन आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती घेतली. मनपाच्या अधिका-यांनी असंख्य अडचणींचा डोंगर या फेरीवाल्यांच्या समस्येवर उभा करून ठेवला आहे. सरांनी संबंधित अधिकारी, महापौर यांच्याशी अनेकवेळा मार्ग काढण्याचे प्रयत्न केले परंतु त्यांच्या कडून नकारात्मक उत्तरही नाही आणि प्रत्यक्ष काम करण्याची प्रवृत्ती ही नाही म्हणून या पुस्तकाच्या माध्यमातून लेखन प्रपंच केला असल्याचे सरांनी म्हटले आहे.

अशीच बाब श्री मनोहर भोसले व सोनी सिंह या प्रशासन पीडित व्यक्तींची मुलाखत घेतली. ती बरीचशी व्यक्तिगत स्वरुपात व प्रशासन दिरंगाई संदर्भात आहे तो सर्वभाग पुस्तकातच वाचला पाहिजे. तसेच क्रिस्टल टाॅवर दुर्घटना या संदर्भात बिल्डर, नगरसेविका, रहिवासी यांच्याशी जो संवाद साधला तोही पुस्तकातच वाचला पाहिजे.

थोडक्यात प्रशासनात नोकरशाही ची काम करण्याची प्रवृत्ती कशी असते यावर सरांनी चांगला प्रकाश टाकला आहे.
क्रमश:

सुधाकर तोरणे

— परीक्षण : सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक, नाशिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. मुंबईचे डबेवाले ही मुंबईच्या जीवनातील एक महत्वपूर्ण संस्था.
    या अन्नदात्यांचे सुरेख शब्दांकन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments