“प्रशासन” भाग ७
डॉ मनोहर जोशी सरांनी या पुस्तकात प्रशासन विषयात बहुतेक सर्व मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या. त्यात सर्वांनी अधिकारी, कर्मचारी वर्गावर कामात दिरंगाई करणे, भ्रष्टाचाराचा अवलंब करणे, कामात चालढकल करणे इत्यादी दोषांवर प्रामुख्याने सांगितले आहे. तथापि अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी उत्तमपणे काम अत्यंत प्रामाणिकपणे, वेळेचे भान राखून निष्ठापूर्वक केले आहे हे सरांनी आपल्या अनुभवातून सांगितले आहे. त्यांनी एकच उदाहरण दिले ते म्हणजे देशात धरणे निर्मितीचे कामे उत्तम प्रकारे केल्या गेले आहेत. अशी कामाची निष्ठा, प्रामाणिकपणा सर्व क्षेत्रात असला पाहिजे अशी अपेक्षा सरांनी व्यक्त करून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी ती अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
कुतहूल म्हणून डॉ.मनोहर जोशी सर या पुस्तकामागील दुसरी बाजू सांगताना म्हणतात “माणसाने ध्येयवादी असावे. साधा शिपाई सुध्दा कमिशनर होण्याचे स्वप्न पाहू शकतो. प्रयत्नांती परिश्रम करून आणि पदव्या घेऊन तो कमिशनर बनू शकतो. इच्छाशक्ती हवी. कष्ट असावेत आणि मोठा ध्येयवाद असावा. माणसाचे जीवन त्यांच्याच मनगटात आहे. त्यासाठी सरांनी आपले स्वतःचे उदाहरण दिले आहे. ते म्हणतात, “गरिबी असल्याने मी वारावर शिकलो. प्रो.सहस्त्रबुध्दे यांच्या क्लासमध्ये शिपाई म्हणून काम केले. मुंबई महापालिकेत क्लार्क म्हणून नोकरीला लागलो. पण शिक्षण सोडले नाही. बी.ए.एम् ए, एल एल बी, पी.एच.डी झालो. मोठा ध्येयवाद बाळगल्याने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देखील झालो. या पुस्तकाचा मूळ उद्देश अधिकाधिक कर्मचाऱ्यांनी कामात प्रगती करावी. सरकारी व खासगी नोकरीत अत्यंत कार्यक्षम व प्रामाणिक माणसे आहेत पण काम होत नाही. अशी तक्रार करणा-यांची संख्या मोठी आहे. कामचुकार कर्मचाऱ्यांना कार्यप्रवण करणे, सुधारणे यासाठी हे पुस्तक म्हणजे छोटासा प्रयत्न ! पध्दतशीर प्रयत्न केल्यास माणूस भरपूर काम करू शकतो असा माझा अनुभव आहे.
“या पुस्तकाचे हे सार नव्या पिढीला प्रेरणा देणारे, मार्गदर्शक म्हणून अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे. या पुस्तकातील काही मान्यवरांनी व्यक्त केलेल्या भावनांवर आपण गेल्या सहा लेखात, त्यांच्या सडेतोड मनोगतावर निश्चितच साकल्याने विचार केला असेलच असे गृहित धरून या सात प्रकरणाचा येथे समारोप करू या. म्हणून येथे थांबतो.
समाप्त.
— परीक्षण : सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक, नासिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800