“न-नायक”
चित्रपट विषयक अनेक नायक, नायिका, संगीतकार, पार्श्वगायक-गायिका, निर्माते दिग्दर्शक यांच्यावरील अनेक पुस्तके मी यापूर्वी वाचली आहेत. अशाच एखाद्या पुस्तकाचा शोध घेतांना ‘न-नायक’ या वेगळ्याच नावाचे पुस्तक आढळले आणि मग ते अतिशय उत्सुकतेपोटी मी ते प्रस्तावना, अनुक्रमणिका पासून ते ४३ व्या अखेरच्या प्रकरणा पर्यंत अखंडपणे वाचून काढले.
पुस्तकाचे लेखक आहेत एका छोट्या खेड्यातून आलेले श्री.अमोल उदगीरकर. अलीकडच्या चित्रपट दुनियेत ख-या समीक्षेने वेध घेणारे एक खंदे समीक्षक. त्यांचे दीड वर्षांपूर्वीच प्रसिद्ध झालेले हे पहिलेच पुस्तक ‘न-नायक’ !
पुस्तकाच्या शीर्षकामुळे मी थोडासा गोंधळलो. कारण चित्रपट रसिकांना नायक, नायिका, फार तर खलनायक हे माहित असतात. पण न-नायक ही काय भानगड आहे ? तेंव्हा माझ्या लक्षात आलं की सिनेमा सृष्टीत फारसे परिचित नसलेले वा लोकप्रिय होण्यासाठी आवश्यक साचेबंद असे ‘आकर्षक’ व्यक्तिमत्त्व त्यांच्यापाशी नव्हते. पण ते बाकायदा स्टार आहेत. मुख्य प्रवाहातले नायक-नायिका म्हणून यशस्वी असलेले, संघर्ष करून यशस्वी झालेले आणि संघर्ष अजूनही सुरू असलेले अशा तिन्ही प्रकारच्या कलावंतांची भेट अमोल उदगीरकरांनी या पुस्तकात घालून दिली आहे.

मुखपृष्ठावरील नावे आणि अनुक्रमणिका पाहून मी काहींसा बिचकलोच! कारण यातील ऋषी कपूर, तब्बु,अक्षय खन्ना, फरहान अख्तर, अनु अग्रवाल यांच्या सारखी नावं आपल्या प्रस्थापित धाटणीची, मुख्य प्रवाहातील नायक नायिका म्हणून ज्ञात आहेत. डॅनी डेंग्झोपा, मोहनिश बहल, बोमन इराणी यांच्यासारखे काही अभिनेते थेट नायक नसले तरी मुख्य प्रवाहात दमदार भूमिकेमुळे स्टार आहेत. अर्शद वारसी, जिमी शेरगिल हे नायक पदाला स्पर्श करुन आलेले आणि तिसरे म्हणजे अनेक प्रस्थापित नायकांपेक्षा अधिक टॅलेंटेड असूनही दुर्दैवाने दुय्यम भूमिकांमध्ये जखडून राहिलेले अभिनेते मनोज बाजपेयी, राधिका आपटे, स्वरा भास्कर, इरफान, नवाजुद्दीन सिद्दिकी, पंकज त्रिपाठी, रिचा चढ्ढा, राजकुमार राव यांच्या सारखे अभिनेते-अभिनेत्री चित्रपटसृष्टीत आले तेंव्हा फारसे परिचित नव्हते. प्रकाश बेलवडी, शफीक खान, राजेश विवेक यासारखी कांहीं नावे तर आजही आपल्याला नीट माहितीची नाहीत. त्यांचे फोटो पाहिल्यानंतर लक्षात येईल की “अरे हा होय, याला पाहिलं अमुक सिनेमात, फार छान काम करतो. पण नाव लक्षात नव्हतं. तर असे हे ‘न-नायक’ ! या सर्वांची दिलखुलास भेट अमोल उदगिरकरांनी अतिशय उत्तम प्रकारे घडवून आणली आहे.
हिंदी सिनेमाचा सगळा चेहरा मोहरा बदलून टाकणा-या बदलाचे आणि न-नायकांची सद्दी सुरू करण्याचे श्रेय दोन दिग्दर्शकाकडे जाईल असे अमोलजींनी निर्विवादपणे म्हटले आहे. त्यात एक आहेत. ‘बॅंडिट क्वीन’ सिनेमाचे शेखर कपूर आणि दुसरे आहेत ‘सत्या’ चित्रपटाचे रामगोपाल वर्मा ! या दोघांनी ‘लोकप्रिय’ सिनेमाची व्याख्याच सैल करुन टाकली आणि त्या व्याख्येत अचाट प्रयोग बसू शकतील याची व्यवस्था केली. न-नायक म्हणजे कोण ? याचे उत्तर पुस्तकांचे प्रस्तावनाकार श्री मुकेश माचकर यांनी सांगितले आहे आणि ते म्हणजे “टिपिकल नायकाचं रंगरूप नसतांना ज्यांच्या भोवती कथा गुंफल्या जात आहेत, ज्यांना मुख्य व्यक्तिरेखेचा मान मिळतो आहे ते तर बाय डिफॉल्ट न-नायक आहेतच पण जे सिनेमात मुख्य भूमिकेत नाहीत, तरीही सिनेमाची जातकुळी कोणतीही असली तरीही स्वतः कडे सहजाभिनयाने लक्ष वेधून घेतात. सिनेमा संपल्यानंतर नायक नायिकेच्या व्यक्तीरेखेपेक्षा अधिक लक्षात राहतात ते म्हणजे न-नायक” !
या पुस्तकात सुमारे ४३ न-नायकांच्या व्यक्तिशः त्यांच्या सिनेमा विषयी कामगिरीचेच मुल्यमापन लेखकाने प्राजंळपणे केले आहे. त्यांचे समग्र जीवनचरित्र न देता ओघात, केवळ एखाददोन ओळींची भर घातली आहे. ब-याच सिनेमाचे कथासार अगदी संक्षिप्त स्वरुपात, कलाकारांच्या भूमिकेतील गुणांचे संदर्भात मात्र दिले आहे. यातील काही निवडक न- नायकांच्या भूमिकेतील काहीसा तपशील वाचकांच्या सहज लक्षात येईल. तथापि यापुर्वी गेल्या काही वर्षांत स्टार्स , सुपरस्टार्सला समांतर व्यवस्था आपण ओम पुरी, नसरुद्दीन शाह, पंकज कपूर ही मंडळी ७०-८०च्या दशकातून आल्याचे पाहिले आहेच तथापि त्यानंतर एक खूप मोठ्या कालखंडाचा गॅप पडला होता. हा समांतर नायकांच्या प्रवाह पुनरुज्जीवित करण्याच श्रेय ‘सत्या’ सिनेमाच्या मनोज वाजपेयीलाच असल्याचे लेखकाने म्हटले आहे. मनोज भारत नेपाळ सीमेजवळील बेलवा नावाच्या खेड्यातून आला आणि ब-याच संघर्षानंतर स्टार झाला. ‘सत्या’मधील भिकू म्हात्रे ची व्यक्तिरेखा अरुण गवळीच्या व्यक्तिमत्वावरून घेतल्याचे म्हटले जाते. त्या व्यक्तिमत्वाच्या अनेक शेड होत्या त्या प्रत्येक शेडला मनोजने न्याय दिला. त्याचा भिकू म्हात्रे बघून अभिनेता होण्याचा जवळपास अडिचशे अभिनेत्यांनी सांगितल्याचा दावा ही पुस्तकात नमूद केला आहे. त्यानंतरच्याही अनेक चित्रपटातील मनोजच्या भुमिका चांगल्याच गाजल्या. मनोज वाजपेयीचा एक किस्सा मात्र खरा आहे. नाटकाची त्याला आवड होती. एनएसडीने त्याला सतत तीन वेळा प्रवेश नाकारला, आता तिथे तो लेक्चर्स घेतो. त्यांनी दिलेले चेक्स वटवत नाही तर जपून ठेवतो.
‘सर्किट’ म्हणून ओळखला जाणारा अर्शद वारसी हा नायक म्हणून किती दमदार आहे ते ‘जाॅली एलएलबी’ सारख्या सिनेमातून कळतं. पण कर्मदरिद्री सिनेसृष्टीत त्याला नायकपद मिळत नाही. मात्र तो मिळालेल्या अफाट संधीचे सोनं करतो. ‘बॅंडिट क्विन’ , ‘सत्या’, आणि ‘गॅग्ज ऑफ वासेपूर’ हे तीन सिनेमे बाॅलिवुडला वेगळे वळण देणारे सिनेमे असून त्यामध्ये झाकलेले कित्येक अभिनेते पुढे चित्रपटसृष्टीत स्थापित झालेले दिसतात. त्यातील संजय मिश्रा याने सात वर्षे संघर्ष केला.त्याचे ‘गोलमाल’ ‘ऑल द बेस्ट’ सारखे चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरले. ‘ऑफिसऑफिस’ या मालिकेतील कामचुकार सरकारी बाबूची भूमिका गाजली.अस्तित्ववादावर अतिशय तरल भाष्य करणारा ‘ऑंखों देखी’ हा चित्रपट दशकातल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे.यातली बाऊजींच्या भूमिकेमुळे संजय मिश्रांच्या अभिनय कारकिर्दीला नवसंजीवनी मिळाली.
अमोल उदगिरकरांनी या सव्वादोनशे हून अधिक पानांच्या पुस्तकात वर नमूद केलेल्या कलावंताशिवाय अप्रतिम भुमिका करणारे सौरभ शुक्ला, ‘के.के’ मेनन,स्वरा भास्कर, श्वेता बसू, दीपक शिर्के, फरहान अख्तर, जावेद जाफरी, पंकज त्रिपाठी, पवन मल्होत्रा जसपाल भट्टी, रजत कपूर, नासर, पीयूष मिश्रा, जोगिंदर, ब्रम्हानंदम, प्रकाश बेलावडी, रझाक खान, विरेंद्र सक्सेना, गजराज राव, दीपक डेब्रियाल, इरफान, टुनटून, कादर खान, राजेश उपाध्याय, रिया चढ्ढा,मोहनीश बहल आदी कलावंतापासून मालेगावचा सुपरस्टार शफीक शेख या सर्वांच्या अभिनयासंदर्भातील यश- अपयश यासह बरीच माहिती नसलेली ‘माहिती’ दिली आहे हे या पुस्तकाचे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं मला तरी प्रामाणिकपणं वाटतं !
सिनेमाचं वेड असलेल्या नव्या पिढीतील, चित्रपट सृष्टीत जाऊ पहाणा-या तरुणांनी हे पुस्तक प्रथम हाताळावं, वाचावं, अभ्यासावं असं मला तरी या निमित्ताने सांगावसं वाटतं !
अशा धडाडीच्या पऱंतू कायम लक्षात राहिलेल्या अभिनयाची चुणूक दाखविणा-या ‘न- नायकां’च्या कथा अमोल उदगिरकरांनी अतिशय जिव्हाळ्याने सादर केल्या आहेत. त्या या पुस्तकातून वाचलेल्या ब-या!बाॅलिवुडमध्ये दरवर्षी अनेक नवोदित कलाकार पदार्पण करत असतात. त्यातले बहुतेक जण ‘वन फिल्म वंडर’ असतात. ज्यांचा पहिला चित्रपट सुपरहिट असतो.घराघरात त्यांचं नांव पोहोचतं. त्यांना पुढे आणखी प्रोजेक्ट मिळतात तरीही त्यांचे करिअर अपेक्षित वळण घेत नाही.bपाणी आणि प्रकाश न मिळाल्याने जसं झाड सुकत जातं तसं त्यांचं करिअरही हळूहळू संपत जातं. अनु अग्रवाल आणि राहुल राॅय यांचं तेच झालं. पहिला चित्रपट दणकून आपटल्यावर अशांचा दुसरा चित्रपट पडद्यावर येत नाही असे काही दुदैवी लोक असतात. सर्वांनाच वाटतं असतं की आपण अमिताभ बच्चन सारखा ससाणा खांद्यावर घेऊन अवतारावं. काहींना शाहरुख खान सारखे हात पसरावे,काहींना वाटतं असतं सनी सारखा हॅंडपंप उखडावा. काहींना वाटतं लाखो करोडांच्या हृदयावर अधिराज्य करावं.या वाटण्याच्या आणि प्रत्यक्ष घडण्याच्या तफावतीतूनच ‘न-नायक’ जन्माला येतात. या अयशस्वी किंवा हरलेल्या माणसांच्या गोष्टी नाहीत तर या आहेत सिनेमा सृष्टीच्या चकाकत्या जगात सामोरे येणाऱ्या कोरड्या, हिशेबी वास्तवाच्या गोष्टी ! यात असेही आहेत ज्यांच्या हाती कधी कांहीं लागलं नाही तर असेही आहेत ज्यांच्या हाती लागलेलं राखलं नाही. अमोल उदगिरकरांनी आपल्या लेखणीतून जे उतरलयं ते सिनेमाच्या पटकथे इतकंच मनोरंजक आहे. कारण शेवटी ‘न’ असले तरी ते आहेत ‘नायक’चं !

— परीक्षण : सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक, नाशिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
चांगला परिचय करून दिला. अनैक न-नायक कलाकारांची माहिती कळाली व मूळ पुस्तक वाचण्याची इच्छा निर्माण केली. धन्यवाद