“झगमगत्या दुनियेत“
अनेक पुस्तकांच्या गर्दीतून थोडं ‘लाईट’ घ्यावं म्हणून आमचे मित्र सुधीर गाडगीळ यांच्या २०१६ मध्ये दुस-या आवृत्तीत प्रसिद्ध झालेलं ‘झगमगत्या दुनियेत ‘ या पुस्तकाची मी निवड केली. तशी त्यांची ‘लाईफ टाईम’ ‘मुक्काम’, ‘ताजतवानं’ ही पुस्तके आणि शाहू मोडकांचं चरित्र यापूर्वीच वाचलेलं आहे. त्यांच्या लिखाणाची शैली त्यांच्या वलयांकित कलावंतांच्या दमदार मुलाखती सारखीच आहे. तसं पाहिलं तर पत्रकारितेत जवळपास ४५ वर्षे आणि दृक-श्राव्य माध्यमातही तेवढीच वर्षे सुधीर गाडगीळ यांनी अतिशय यशस्वीपणे काढली असल्याने आज त्यांच्या लेखी तीन हजारांच्यावर कलावंतांना बोलके केल्याच्या मुलाखती अक्षरबध्द तसेच ध्वनीचित्रबध्दीत झाल्या आहेत. तसा हा आगळावेगळा विक्रमच मी तरी मानतो.
‘फोटो’ काढताना नॅचरल पोच द्या, असं म्हणणं सर्वात ‘नॅचरल’ अशी मार्मिक टिप्पणी करणारा ज्येष्ठ स्नेही छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष, क्षणात सरदार पटेल उभा करणारा ‘देवाचा हात’ असलेला ‘मेकअपमन’ विक्रम गायकवाड, ‘पांडू हवालदार’ चित्रपटाचा जनक पटकथाकार राजेश मुजुमदार, आता अमेरिकेत स्थायिक झालेल्या अर्चना जोगळेकर आणि अश्विनी भावे यांच्या मुलाखतीही या पुस्तकात आहेत.
त्याबरोबरच ‘तू तिथं मी’घरकुल’, ‘कळत नकळत’ चित्रपट आणि ‘गुंतता हृदय हे’ ‘धुम्मस’ ‘गहिरे रंग’ इत्यादी गाजलेल्या नाटकांचे लेखक साहित्यिक शं.ना नवरे आणि प्रयोगशील कसदार नाटककार सतीश आळेकर या दोन पिढ्यातल्या नाटककारांची ओळख ही करून दिली आहे राम गणेश गडकरी- वसंत कानेटकर यांचे शब्द लिलया खेळवणारे चित्तरंजन कोल्हटकर, चित्र चितारणारा – कविता करणारा नाना पाटेकर,’ इंदिरा गांधी बरोबर फुगडी खेळलेल्या मधु कांबीकर, आईची भूमिका करणाऱ्या ग्लॅमरस माॅं रीमा लागू, महाराष्ट्राची मत्स्यगंधा आशालता, चिकलेटवाला अतुल परचुरे, कस्तुरबा बनलेली रोहिणी हट्टंगडी, बेधडक मोहन जोशी, मनाचा डॉक्टर आणि अॅक्टर मोहन आगाशे, ‘नॉन स्टॉप’ प्रशांत दामले, सुंदर समंजस मृणाल देव कुलकर्णी, दमदार विनय आपटे , सतत स्वरात दंग असलेला आनंद मोडक, कुटुंब वत्सल खलनायक अमरीश पुरी, हवे हवेसे आजोबा सुधीर जोशी, मुक्त छांदिस्ट-गिरीश ओक, चकाचक वंदना गुप्ते, सोनाली कुलकर्णी ‘एक होती राजकन्या’- बेबी शकुंतला, स्वरुपानंद अनंत मेहेंदळे, ज्योती चांदेकर, आणि मनमोकळी स्मिता तळवलकर यांच्या फार सुरेख मुलाखती या पुस्तकात आहेत. त्या विस्तारभयापोटी पुस्तकातच वाचलेल्या बऱ्या !
तथापि अर्चना जोगळेकर यांच्या मुलाखतीत एक वाक्य असे आहे. “शिवशाहीच्या काळात” (म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सरकार असताना) “शिवशाही आपल्या दारी” या मालिकेत सामान्य माणूस आणि मंत्री महोदय यांच्यातला दुवा म्हणून सूत्रसंचालकांचे काम एका कार्यक्रमात अर्चना जोगळेकर यांनी केले आहे त्याचा उल्लेख पुस्तकात आहे. त्यावर सुधीर गाडगीळ यांनी अर्चनाला विचारले की तू अशा वेळी मुलाखतकार असतेस की ‘मॉडेल’ ? तेव्हा ती ताडकन म्हणाली अर्थातच मुलाखतकार ! मुलाखत करायला लागणारे राजकीय, सामाजिक भान आपल्याकडे आहे रोजच्या वृत्तपत्र वाचनाखेरीज आपलं अवांतर वाचनही आहे असं तिने ठामपणे सांगितलं. हा उल्लेख देण्याचं कारण म्हणजे या २५ भागांच्या मालिकेची निर्मिती त्याकाळी संचालक म्हणून मी व वरिष्ठ सहायक संचालक म्हणून देवेंद्र भुजबळ यांनी शासनाच्या वतीने केली होती. सहज ओघात लक्षात आलं म्हणून ही अवांतर बाब इथे सांगत आहे, इतकेच !
या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीत रामगोपाल वर्मा यांच्या कडे उमेदवारी करणारा मधुर भांडारकर ज्याने स्वतः ‘त्रिशक्ती’, ‘चांदनी बार’, पेज थ्री’, ‘कार्पोरेट’हे गाजलेले चित्रपट निर्मिती व दिग्दर्शित केले आहेत, त्यांची छान मुलाखत घेतली आहे. अहमदाबादच्या प्रख्यात मॅनेजमेंट शिक्षण संस्थेनं ‘कार्पोरेट’ सिनेमा स्टडी केस म्हणून स्वीकारला आहे हे त्यांच्या मान्यतेचे व लोकप्रियतेचे द्योतकच आहे.विशेष म्हणजे अनेक चित्रपट कलाकारांच्या आवाजाच्या नकला ‘मधूर’ बोलता बोलता अगदी नेमकेपणाने करतो. एवढं यश मिळवूनही जुन्या दाद देणा-या मित्रांसोबत वडापावच्या गाडीवर सहजतेने ‘वडा’ खायला जाऊ शकतो. ही माहिती रसिक वाचकांना काहीशी नवीनच आहे.
याच बरोबर लोकमान्य टिळक, बालगंधर्व अशा आव्हानात्मक भूमिका उत्तम प्रकारे साकार करत अभिनय क्षेत्रात स्वतःचा उत्तम ठसा उमटविलेला सुबोध भावे या बहुआयामी कलाकाराची छान मुलाखत सुधीरजींनी घेतली आहे. ‘कट्यार’च्या निमित्ताने अगदी नव्या पिढीच्या ओठावर ‘क्लासिकल’ गाण्याचं वेड निर्माण करण्यात यशस्वी ठरलेला दिग्दर्शक तसेच ‘सह्याद्री’ वाहिनीवर ‘महाराष्ट्र संगीत रत्न’ हा ‘म्युझिकल शो’ रंगवणारा सूत्रसंचालक, गीत रामायणातला ‘श्रीराम’ ‘अवंतिका’मालिकेतील सलील, ‘वादळवाट’ मध्ये जयसिंग अशा मालिकातून वैविध्यपूर्ण भूमिका रंगवणारा नायक, ‘ध्यासपर्व ‘वीर बाजीराव’ ‘कवडसे’ सनई चौघडा’ अशा चित्रपटातून तसेच ‘अय्या’ सारख्या हिंदी चित्रपटापर्यंत पोहोचलेला सुबोध भावे यांनी कलेच्या सर्व क्षेत्रात स्वतःच स्वतंत्र स्थान निर्माण केलेलं आहे आणि तो लोकप्रियतेचा शिखरावर गेलेला असल्याचेही गाडगीळ यांनी विस्ताराने घेतलेल्या मुलाखतीत नमूद केले आहे.हे या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे एक पुरक वैशिष्ट्यच म्हटले पाहिजे.
शेवटी सुधीर गाडगीळ यांनी नोकरी सोडून पुर्णवेळ या क्षेत्रात काम करण्याचा निर्धार केला. बी.एम.सी काॅलेजात शिकत असतानाच पत्रकारिता केली असल्याचे सांगून गाडगीळ यांनी विविध क्षेत्रांच्या थोरामोठ्यांकडे सहज जाता आलं आणि त्यातून नव्याने सुरू झालेल्या ‘दूरदर्शन’ साठी नवे नवे विषय सुचवू शकलो. जवळजवळ वर्षभर सुधीरजींनी नानासाहेब गोरे,लालचंद हिराचंद, बाळासाहेब ठाकरे, आबासाहेब गरवारे, शकुंतला परांजपे, व्यंकटेश माडगूळकर अशा ५० नामवंतांच्या तरुणपणीचे अनुभव, त्यांचे करिअर घडणं अशी दूरदर्शन साठी ‘आमची पंचविशी’ ही मुलाखत माला त्या काळात गाजवली. तर नामवंताच्या घरातील मुलांच्या बोलण्यातून जान्हवी प्रभाकर पणशीकर, कीर्ती जयराम शिलेदार, जयंत भीमसेन जोशी, रमेश स्नेहल भाटकर, श्रीधर सुधीर फडके अशा कित्येक मुलांची ‘मानसिकता’ समजून घेणारा ‘वलयांकित’ हा कार्यक्रम दूरदर्शनवर ते करू शकले. वर्षभरात वेगळी वाटणारी पन्नास वेगळी माणसे ‘दूरदर्शन’मध्ये ते आणू शकले. आणि हे सर्व रसिकांनी आवडीने पाहिलेलं, ऐकलेलं आहे. याशिवाय ज्योत्स्ना भोळे, मालती पांडे, गजानन वाटवे, पंडित हृदयनाथ मंगेशकर, अरुण दाते, श्रीधर फडके अशा भावगीतकारांच्या तीन पिढ्या ते सादर करू शकले.जितेंद्र अभिषेकी बुवांशी गप्पा मारत गाणं समजून घेत ‘मत्स्यगंधा ते महानंदा’ हा ‘अभिषेकी’ संगीताचा कार्यक्रम, जयराम, जयमाला कीर्ती, लता, किरण भोगलेंशी बोलत ‘गंधर्वसुरांची शिलेदारी’ हा ‘कांचन संध्या’ हा कार्यक्रम गोव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बाकी बोरकरांनी संवाद साधत सादर केला. ‘मंतरलेल्या चैत्र बनात’ ‘स्मरण यात्रा’ हे त्यांनी सादर केलेले कार्यक्रम देखील गाजले. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, उषाताई, मीनाताई, हृदयनाथ अशा पाचही मंगेशकर भावंडांच्या मुलाखती आणि गाणी ‘दूरदर्शन’ वर प्रथम सादर करण्याची संधी त्यांना मिळाली. आशा भोसले यांच्या मुलाखती आणि गाण्याचे कार्यक्रम तर गेली सत्तावीस वर्ष ते करत आलेले आहेत. जॉर्ज फर्नांडिस ते बाबा महाराज सातारकर, सिंधुताई सपकाळ ते निर्मलाताई पुरंदरे, पु.भा.भावे ते अनिल अवचट अशा परस्पर टोकांच्या मतप्रणालीशी आलेला संवाद सांगणे म्हणजे स्वतंत्र ग्रंथ होणार असल्याने त्यांनी एकच सांगितले आहे की या साऱ्या माणसांची बोलताना जमा झालेले संदर्भ मुलाखतीच्या क्षेत्रात उपयोगी पडलेत. आणि संदर्भाची सतर्कता, बोलण्यातील अनौपचारिकता, मांडणीतील उत्स्फूर्तता यामुळे ‘माणसं’ मात्र जगभर जोडली गेली आहेत. ‘बोलणं आणि माणसं जोडणं’ हा अदृश्य पाया हीच ‘माझी सृष्टी आडची दृष्टी’ आहे असेही त्यांनी बोलता बोलता सांगितले आहे. अर्थातच हे सारं सविस्तरपणे या पुस्तकातच वाचले पाहिजे. झगमगत्या दुनियेतील मोजक्या तारे तारकांचे दर्शन घडवित शेवटी नाना पाटेकर यांची एक कविता त्यांनी ऐकवली आहे……. “मावळतीला सूर्य सुद्धा आपला रंग बदलतो आपण तर माणसं !”... …… …….
नव्या पिढीतील साहित्यप्रेमी रसिक तरुणांना मूलाखतकार अथवा सूत्रसंचालक व्हावयाचे असले तर हे ‘झगमगत्या दुनियेत’ पुस्तक आवर्जून जरूर वाचावे, अभ्यासावे. !
— परीक्षण: सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक, नासिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
श्री सुधाकर तोरणे यांचे
परीक्षणाने झगमगत्या दुनिया ची सर्व कलाकारां सोबत
रमणीय सहल घडवून आणली.खूप आनंद मिळाला.आभारी आहे.