Thursday, May 30, 2024
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक : ४७

मी वाचलेलं पुस्तक : ४७

‘जीवश्च कंठश्च ! !

अनेक पुस्तकांमधून नव्या बांधणीचे आकर्षक पुस्तक वाचावयास घेण्याची मला मधून मधून इच्छा होते. यावेळी मी प्रा. प्रवीण दवणे यांचे “जीवश्च कंठश्च” हे २०१९ मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक निवडले.

कवीवर्य प्रवीण दवणे यांची प्रकाशित पुस्तकांची संख्या बरीच मोठी म्हणजे लवकरच शंभरी गाठणारी आहे. ठाणे येथे ३५ वर्षे मराठीचे प्राध्यापक असलेले प्रा.दवणे यांनी कादंबरी,कथासंग्रह, कविता,नाटक, एकांकिका, ललित -वैचारिक आणि बालवाड्मय या प्रकारात भरभरून लिहिले आहे. त्यांना वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळत आला आहे. आतापर्यंत मी मात्र त्यांचे ‘सूर्यपूजक कुसुमाग्रज’, ‘जेथे जातो तेथे’, ‘रूप-अरूप’ ही ललित तसेच ‘स्पर्शगंध’, ‘मनाच्या मध्यरात्री’ हे दोन कथासंग्रह ‘रंगमेघ’, ‘गंधखुणा’ हे १३ -१४कवितांच्या पुस्तकापैकी दोनच कविता संग्रह वाचून पाहिले आहेत आणि आताचं ‘जीवश्च कंठश्च ‘!

आपलं आयुष्य समृद्ध आणि सुरेल करणारे पु.ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, आणि सुधीर फडके या कला गंधर्वांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या श्रेष्ठतेचा आस्वादक वेध घ्यावा म्हणून हा शब्द प्रपंच ‘जीवश्चकंठश्च’ रूपाने प्रा. दवणे यांनी घेतला आहे. आपल्या क्षेत्रातील हे तिघेही ध्रुव तारे स्वयंभू प्रतिभेने अभंग तळपत राहतील. गेल्या आठ दशकांना या तिघांनी संमोहित केलेच आहे पण पुढील अनेक पिढ्यांनाही ते आदर्शवत, प्रेरणादेणारे राहतील.यात तीळमात्र शंका नाही.

‘पु.ल.’ देशपांडे बाबत ‘पुलरंग’ या विभागात पुलंचे लोभस मानसपुत्र, व्यक्ती चित्रांची दिवेलागण, बटाट्याच्या चाळीतील: भाई, पुलं मधला जिव्हाळ्याचा शिक्षक, वक्तृत्वातील जीवनरंग, प्रवासी पुल, पुल-एक बोलणारे विद्यापीठ, पुल नावाचं ‘मन’, पुलंच्या कवितांची मिश्कीली, रवींद्रनाथमय पुल,काव्यात्मक दृष्टीचे पुल, पुलंच्या कविता मिश्कील तरीही चिंतनशील आणि रसिकराज पुल या शीर्षकाखाली पु लं चं सारं साहित्य जीवन रसाळपणे चित्रीत केलं आहे.त्यांच्या मते पु.ल.देशपांडे हे केवळ एक व्यक्तिमत्व नाही तर ते एक संस्था रूप जगणं आहे ज्या व्यक्तीमत्वाने महाराष्ट्राला निरामय आनंद दिला ‘हे जग मी सुंदर करून जाईन’ हे त्यांचे शब्द ते जगले ! आनंद देण्यासाठी या जन्मात जे जे शक्य आहे ते ते या भल्या माणसाने केले. चित्रपट नाटक, लेखन संगीत, वक्तृत्व, दान-औदार्य, अशा अनेक माध्यमांतून पुल नावाचं मन भरभरून व्यक्त झालं, इतका आनंद त्यांनी दिला व महाराष्ट्राची सहा सात दशक त्यांनी मंतरून टाकली अशा ‘शब्दगंधर्वा’बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी या पुस्तकात प्रा. दवणे यांनी साधली आहे. पुलंच्या त्यांना भावलेल्या काही पैलूंचे दर्शन त्यांना जाणवले तसे ते व्यक्त करण्याचा त्यांनी या पुस्तकात प्रमाणिक प्रयत्न केला आहे.मनमोकळी दाद देणारे जिंदादिल रसिक पुल महाराष्ट्राने ‘दाद’ देऊन अमर केले असेही त्यांनी म्हटले आहे.

स्वरतीर्थ सुधीर फडके यांच्या विषयी ‘सुधीररंगात’ ‘ज्योतीने तेजाची आरती’ व ‘स्मरणातले स्वरतीर्थ’ अशा दोन भागात फारच सुंदर भाष्य केले आहे. जडणघडणीच्या काळातील बाबूजींचा संघर्ष एखाद्या अविश्वसनीय वर्णनाच्या कादंबरीतील वाटावा इतका अद्भुत आहे. पैशाची चंचल, संधीसाठी वन वन, आणि अगदी जवळच्या वाटणाऱ्या माणसांनी ऐनवेळी दिलेल्या आयुष्याचं ‘माणूसपण’ आकाराला आले. आपल्या या प्रयासात उत्सुकता असते ती ज्या आश्चर्यकारक प्रतिभेने महाराष्ट्राच्या कलाविश्वास शब्दांचे ‘अजंठा वेरूळ’ निर्माण केले.त्यात समाविष्ट आहे.गदिमा आणि त्यांची पहिली भेट कशी झाली .अर्थात गदिमांच्या पहिल्या भेटीबद्दल खुप छान असं प्रेरक मनोरंजनात्मक लिहिलं आहे. ‘सुधीर फडके’ या नावाला पुढे जे राष्ट्रभक्तीचे वलय लाभलं, त्याचा आरंभ ही प्रा. दवणे यांनी विशद केला आहे. स्वर तीर्थ बाबूजींचे प्रचंड यश सातासमुद्र पार पोहोचलं पण त्यासाठी त्यांनी साधनेचे सात सागर ज्या धाडसाने पार केले ते पाहिले की या स्वरतीर्थाचे ‘तीर्थपण’ जाणवते. रामायणातील रामा प्रमाणेच या रामालाही पूर्वार्धात वनवासातून जावे लागले,त्या जीवन संघर्षाला तोड नाही. निष्कलंक चारित्र्य आयुष्याचे समर्थन, समर्पण आणि साधनेतील सातत्य यातूनच स्वरतीर्थ घडले असेही म्हटले आहे.

बाबूजींची राष्ट्रभक्ती गोवा मुक्ती संग्रामातील त्यांचा सहभाग या गोष्टी तर जगाला परिचित आहेत परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाच्या निर्मितीचा त्यांनी घेतलेला ध्यास लेखकांनी जवळून अनुभवला आहे. “अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती- दोन दिवसांची रंगत संगत दोन दिवसांची नाती” या त्यांनीच गायलेल्या मंगेश पाडगावकरांच्या ओळी आसपास लहरत राहिल्या. बाबूजींच्या स्वरांचा साक्षात्कार होतच राहणार आहे जीवनातील संघर्षाचे मूल्य देऊन अमृतात रूपांतरित झालेले हे स्वरांचे नक्षत्रांचे देणे आकाशात तेवत राहणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे. “तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे “अशा व्रतस्थ भावनेने निराकारणारे अन् गाण्याच्या नव्या ओळीला केवळ डोळ्यांनी हसून दाद देत आशीर्वादाचे संकेत देणारे स्वरतीर्थ बाबूजी आता छायाचित्रात विराजमान झाल्याचे सांगितले आहे

बाबूजींबद्दल विस्तृत लेखन करणे लेखकाला अवघड होते. कारण त्यांच्या संगीत ज्ञानाच्या मर्यादा !परंतु जन्मशताब्दीच्या या प्रयागतीर्थ वर्षात गदिमा यांच्याबरोबर बाबूजींच्या बऱ्याच आठवणी जागवल्या आहेत.. या दोघांच्या प्रतिभा संगमाने असंख्य अप्रतिम चित्रपट गीतं महाराष्ट्राला दिली.अगदी भूपाळी,अंगाई, लावणी, देशभक्ती गीत;-गीत प्रकार कुठलाही असो जणू मातीतून उगवलेल्या रोपाला सूर्यप्रकाशापासून पर्याय नसावा तसा गदिमांच्या शब्दांना बाबूजींच्या स्वर व संगीताला पर्याय नव्हता हे सूर्यप्रकाशाइतकेच स्वच्छ होते आणि या प्रतिभा संगमाच्या कळसाध्याय म्हणजे अर्थात गीत रामायण! गजाननान लिहावं आणि रामाने गाव अशी नियतीची योजना असावी . बाबूजींच्या अनेक आठवणी लेखकाने सांगितल्या आहेत पण त्या पुस्तकातच वाचलेल्या ब-या !

‘गदिमारंगा’त फार विस्तृतपणे प्रा.दवणे यांनी फारच छान कथन केलं आहे.ते त्यांच्याच शब्दांत वाचलेलं अधिक चांगलं. “गदिमांत ‘चैत्रबन’ आणि ‘गीत रामायण’ हे म्हणजे जणू लेखकाचं गीता भागवत होऊन बसलं. पुन्हा पुन्हा त्यातील रचना वाचताना काव्य-गीत आकलनाचा रियाज होत गेला. रोज नव काही त्यात ‘सापडत’ असे. ‘एकटी’ मधील “नाविका, चल तेथे दरवळते जेथे चांदणे” या गीतातील ‘दूरदेशीचे बुलबुल यावे कधीमधी पाहूणे’ किंवा “दिवसा मागून दिवस चालले ऋतुमागुली ऋतु जिवलगा कधी येशील तू ?”अशा ओळीतील संगीत लेखकाला ऐकू येत असे. गदिमांच्या लेखणीचे असंख्य रंग कवीला व रसिकाला उत्कट करणारे होते. गदिमांच्या एकच लेखणीचे असंख्य रंग लेखक कवीला व रसिकाला उत्कट करणारे होते.एकच लेखणी किती प्रकारे तिन्ही सप्तकाच लीलया फिरू शकते याचा आस्वाद घेणे हा संवेदनांचा रियाज होता. गदिमा ‘कवी की गीतकार’ ? या वादाची लेखकाला दखल घ्यावीशी वाटली नाही; कारण ते सामर्थ्यशाली कवी होते हे सिद्धच होते.

गीत रचना हा त्यांचा अभिजात कवितेला आलेला सुरंगी मोहर होता. चित्रपटासाठी गीत रचना करतानाही त्या प्रसंगाला काव्यात्मक व आशयघन करण्यासाठी मुळातली त्यांची कविता अमृतकणा सारखी चरणाशी होती. कविता घुमत घुमत- हळुवारपणे त्याचे गीत होतांना पाहणे हा एक सुखद अनुभव होता. बाबूजींसारखे स्वरतीर्थ प्रतिभावंत संगीतकार गदिमांच्या गीतांना लाभले .एकमेकांसाठी शब्दस्वरांनी सप्तपदी घालावी तसा हा प्रतिभा संगम!…पुस्तकाच्या अनुक्रमणिकेवरून एक दृष्टिक्षेप टाकला तरी कळेल की किती छटांची विविध गीत गदिमांनी लिहिली आहेत. प्रेम गीते ,वत्सल गीते, देशभक्ती गीते, लोकगीते, बालगीते, लावण्या इत्यादी अनेक छटा आणि गीत रामायण हा तर त्यावरील कळसच! आभाळात मेघ जमा झाल्यावर नेमक्या कुठल्या मेघाने आपण भिजलो ते कळू नये तसे गदिमांच्या कुठल्या शब्द रंगाने आपण चिंब झालो ते कळत नाही. भूपाळी असे अनेक रसरंग गदिमांनी चित्रपट गीतातून व्यक्त केले त्याचबरोबर त्यांच्या ‘जोगिया’ व ‘पुरिया’ या दोन महत्त्वाच्या कवितासंग्रहाचा प्रदीर्घ आढावा लेखकाने घेतला आहे.

गदिमांच्या काव्य अभ्यासकांना तो निश्चितच उपयोगी पडेल. पुलप्रमाणे गदिमांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेकविध पैलू आहेत. क्वचितच पण अभिनित केलेल्या भूमिका,पटकथा संवाद, गीत गोपाल सारखी कृष्णचरित्र- गीते, ललित लेख, कथा, व्यक्तिचित्रणे हा एक स्वतंत्र पुस्तकाचा आवाका आहे. लेखणीचीच वीणा करून श्री सरस्वतीने गीत गुंजन करावे त्या मोलाची गदिमांची गीते व कविता आहे त्याचं अतिशय श्रद्धेने रसनिरूपण प्रा. दवणे यांनी या पुस्तकात केलं आहे ते आपण विस्तृतपणाने वाचलंच पाहिजे.

प्रा. दवणे

पुल, सुधीर फडके, गदिमा यांच्या विविध पैलूंचे दर्शन, प्रा. दवणे यांनी फार ओघवत्या काव्यात्मक भाषेत सुरेखपणे घडविले आहे. आजही अनेकांचे ते सर्वात आवडते लेखक संगीतकार आहेत. पण ही पिढी आसपासची आहे.लेखकाला काळजी वाटते की आज विशी-पंचविशीची जी मुलं आहेत, त्या मुलांना या महनीय व्यक्तींचे शब्द वैभव, विचार, श्रीमंती, कुठलीच बाब कळलीच नाही तर ? विशेष म्हणजे ही सर्वच नवी पिढी इंग्रजी माध्यमाच्या वर्चस्वाने मातृभाषेची फारकत झाल्यामुळे हे साहित्यिक, गीत- संगीतधन माहिती न होताच ही पिढी मोठी झाली तर केवढे मोठे आंतरिक नुकसान होणार आहे अशीही साधार भीती शेवटी त्यांनी व्यक्त केली आहे व ती अगदी रास्त अशीच आहे.. निदान या मुलांना अशी पुस्तके सुट्टीच्या काळात वाचायला पालकांनी आग्रहपूर्वक दिली पाहिजेत. असे माझे व्यक्तिशः मत या निमित्ताने मी नमूद केल्यास अनाठायी होणार नाही.

सुधाकर तोरणे

— परीक्षण : सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक, नासिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments