Wednesday, September 11, 2024
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक : ४८

मी वाचलेलं पुस्तक : ४८

“महत्तम साधारण विभाजक

अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष प्रा.रवींद्र शोभणे यांनी लिहिलेल्या एका वैचारिक ग्रंथाचा, ‘महाभारताचा मूल्यवेध’चा वाचनालयात शोध घेता घेता मला ‘निवडक रवींद्र शोभणे’ यांचे ‘महत्तम साधारण विभाजक’ हे डाॅ.अनिल बोपचे यांचे लघुकथांवरचे पुस्तक हाती आले.

प्रा रवींद्र शोभणे हे प्रतिथयश कथाकार व कादंबरीकार म्हणून मराठी साहित्य विश्वात प्रसिद्ध आहेत. आजवर त्यांची तीस पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात दहा कादंबऱ्या, सात लघुकथा संग्रह, पाच समीक्षा, आणि बरेचशी ललित लेख संग्रहाची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यातील ‘पडघम’ ‘अश्वमेध’ व ‘पांढरं’ या कादंबऱ्या तसेच ‘चंद्रोत्सव’, ‘वर्तमान’ हे कथासंग्रह यापूर्वी वाचलेले आहेत. त्यांच्या सात कथासंग्रहांपैकी ‘निवडक’ दहा लघुकथांचे हे पुस्तक आहे. त्यातील दोनतीन वृत्तपत्र व्यवसायातील संदर्भाच्या लघूकथा मला आजही निश्चितच आठवतात.

प्रा शोभणे यांच्या लेखनातून आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक जीवनातील विविधांगी ताण तणाव मोठ्या प्रखरपणाने व्यक्त होतो. मानवी जीवनातील विवंचना, माणसामाणसातील बदलणाऱ्या नातेसंबंधातील विपर्यासाचा शोध, मानवी नात्यातील गुंतागुंतींचे विविधांगी चित्रण, माणसांच्या भावविश्वाची होणारी पडझड, परिस्थिती व विकलता ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये त्यांच्या अनेक कादंबरी, लघु कथा, व समीक्षेतील विविध विषय लक्षात घेता रुढार्थाने सांगता येईल.

आपल्या प्रस्तावनेत डॉ.अनिल बोपचे यांनी कादंबऱ्या बाबत कथाभाग विस्ताराने सांगून चांगल्या प्रकारे समीक्षा केली आहे. ‘कोंडी’ या ग्रामीण कादंबरीने शोभणेंना कादंबरीकार म्हणून खरा नावलौकिक मिळवून दिला. ‘महाराष्ट्र शासनाचा वांड्:मय निर्मिती पुरस्कार’ या कादंबरीला मिळाला. या कादंबरीची समीक्षकांनी देखील भलावण केली आहे. प्रस्तुत कादंबरीतून कादंबरी काराने वसंता नावाच्या तरुणाचा शोकात्मक जीवन प्रवास चित्रित केला आहे. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या जीवनातील दैन्य, दारिद्र्य आणि हतबलता यांचे चित्रण ही या कादंबरीमध्ये मोठ्या प्रभावीपणे येते. शेतमजूर आणि सरंजाम वर्ग असा संघर्ष या कादंबरीमध्ये दिसतो. ग्राम- वास्तवाच्या विविध पातळ्या साकार करणे हे या कादंबरीचे एक प्रमुख वैशिष्ट्य असल्यामुळे ही कादंबरी अधिक सक्षम झाली आहे असे त्यांनी म्हटलेले आहे. तसेच इतर सर्व कादंबऱ्यांची वस्तूनिष्ठ दखल मोठ्या प्रमाणात घेतली आहे. तथापि या पुस्तकातील ‘निवडक’ लघुकथांचाच आपण विचार करु या.

या संग्रहातील पहिली कथा ‘सत्य’ ही राजकारणी समाज व्यवस्थेसमोर हतबल असलेल्या एका पत्रकाराची आहे. किडलेल्या समाज व्यवस्थेचे चित्रण ही कथा करते.रामदास भगत या डाव्या विचारसरणीच्या कामगार पुढार्‍याची हत्या होते, मात्र त्या हत्त्येला येथील समाजकंटक अपघाताचे स्वरूप देतात वृत्तपत्रात रामदास भगत यांचे अपघाती मृत्यू म्हणून बातमी येते पण रामदास भगत च्या पत्नीला आपल्या नवऱ्याची हत्या करण्यात आली आहे याची खात्री असते. शेवटी ती कामगार पुढाऱ्याची पत्नी आहे.आपल्या नवऱ्याची होणारी अस्वस्थ अवस्था ती ओळखते. त्यानंतर तिच्या नवऱ्याचे अपघाती मृत्यू ही बाब निश्चित खटकणारी असते दुःखाच्या डोंगरातून सावरून पोलीस यंत्रणा कुचकामी ठरल्यामुळे वर्तमानपत्राच्या मदतीच्या अपेक्षेने ती निरंजन काकडे या पत्रकाराला भेटते व या प्रकरणाची वस्तूस्थिती कथन करते.पुरावे सादर करते यावरून रामदास भगतचा निश्चितच खून झाला असावा हे पत्रकार निरंजन काकडे च्या लक्षात येते आणि तो देखील या प्रकरणाचा पाठपुरावा करतो.त्यानुसार ही बातमी वृत्तपत्रात लावून समाज व्यवस्थेला धक्का द्यायचं व सत्य समोर आणायचं असा भाव तो रामदास भगत च्या पत्नीच्या समोर प्रगट करतो. आपल्याला यामुळे खरं न्याय मिळेल म्हणून मिसेस भगत च्या आशा पल्लवीत होतात परंतु ही बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध होत नाही. कारण मुख्य संपादक या बातमीला विरोध करतात, त्यांच्यावर याबाबतीत वृत्तपत्राच्या मालकांचे बंधन आलेले असते ,म्हणजे वाईट अशा समाज व्यवस्थेसमोर कार्यक्षम माणसे हतबल होतात, नांगी टाकतात याचे मोठे विदारक चित्रण कथाकाराने या कथेत केले आहे.

‘आपुले मरण’या कथेतून मानवी नातेसंबंधातील ताणतणावाचे चित्रण शोभणेंनी मोठ्या समर्थपणे, सक्षमपणे केले आहे .’सत्य’ या कथेप्रमाणे याही कथेचा विषय वृत्तपत्र जगत आहे. मात्र ही कथा वेगळ्या विषयावरची आहे. इथे पती- पत्नीतील वैमनस्य चित्रित केलेले आहे.एका वृत्तपत्राचे संपादक व कथाकार असणारे वसंतराव आणि त्यांची पत्नी भावना यांच्यातील जे वैमनस्य असते याचे चित्रण ही कथा करते. मुळात वसंतराव व भावनांचा प्रेम विवाह झालेला असतो. त्यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम असते. परंतु नंतरच्या काळात त्यांच्या या प्रेमाला दृष्ट लागते व त्यांच्या जीवनाचा बट्ट्याबोळ होतो. आपल्या मुलासही ते आई-वडिलांचे प्रेम देऊ शकत नाही. मिसेस जाधव सोबत वसंतरावांच्या असलेल्या मैत्रीमुळे त्यांच्या संसारात वितुष्ट येते. दोघेही पती-पत्नी एकमेकांना समजून घेत नाही. इथे वसंतराव चुकतात व त्यांची पत्नी भावनाही चुकते. ते एकमेकांना समजून घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचे संसारी जीवन विस्कळीत होते. याचे पडसाद वसंतरावांच्या वृत्तपत्राच्या कार्यालयातही पडतात. सेवा जेष्ठतेनुसार मुख्य संपादकाचे मिळणारे पद डावलेल जातं, येथेही वसंतराव यांची गळचेपी होते.संकटेच ‘आ’ वासून येतात याचे प्रत्यय वसंतरावांना येते.. अशा अवस्थेत त्यांची मैत्रिण मिसेस जाधवचा आधार घेत दहा वर्षापासून पवित्र झऱ्याप्रमाणे टिकलेली मैत्री डागाळली जाते. या मैत्रीचा करूण अंत होतो म्हणजेच येथेही वसंतराव एकाकी पडतात . पवित्र अशा मैत्रीचा अंत आणि वृत्तपत्रीय कार्यालयातील झालेला अन्याय यामुळे त्यांचा जीव कासावीस होतो. आपल्या मुलाची व कुणाचीही तमा न बाळगता ते आत्महत्येस सिद्ध होतात. परंतु मृत्यू हा देखील त्यांना हुलकावणी देतो.एक बुद्धिवंत हुशार माणूस असून सुद्धा अशी परिस्थिती वसंतराव समोर का उद्भवते हा निरुत्तर करणारा प्रश्न आहे. मुळात मानवी जीवनच मोठे विचित्र आहे.हा प्रवास कसा आणि कोणत्या दिशेने जाईल हे सांगता येत नाही. वसंतरावाना जीवनातील भोग भोगावेच लागतात, यात त्यांची पत्नी भावनांचाही समावेश आहे.कथाकार या नात्याने शोभणे यांनी मानवी जीवनातील विसंगती अलगदपणे टिपलेली आहे. संसार चक्र सुरू ठेवताना पती-पत्नींनी एकमेकांना समजून घ्यावे असा भावही त्यांच्या या कथेतून गोचर होतो. त्याचप्रमाणे समाजात स्त्री पुरुषांच्या मैत्रीला भावनिक स्थान नाही ही बाबही ते या कथेतून निदर्शनास आणतात. एकूणच ही कथा मानवी जीवनातील असमंजसपणाचे विविध अंगी दर्शन घडविते.

‘शहामृग’ ही शोभणे यांची दीर्घकथा मुळातच प्रतीकात्मक कथा आहे. एका वृत्तपत्रात उपसंपादक असलेले व समाजकार्याची आंतरिक ऊर्मी असलेले आनंदराव या कथेतील मुख्य पात्र आहे. खरे तर ही कथा पुरोगामी विचारसरणी अंगीकारलेल्या कुटुंबाची आहे. परंतु या विचारसरणीमुळेच आनंदरावांच्या जीवनाची दिशाच बदलते. या कथेत आनंदराव व सुमती यांचा कुटुंबवत्सल असा संसार आहे .त्यांना एकुलती एक मुलगी नीलम आहे. एका वर्तमानपत्रात उपसंपादकाची नोकरी सांभाळून निष्ठेने समाजसेवा करणे हे आनंदरावांचे नित्याचे कार्य झालेले असते, यातूनच ते कृतिशील समाजसेवा करण्याच्या हेतूतून वेश्यांचे पुनर्वसन करण्याचं ठरवतात. मुळात या कार्यात आनंदरावांच्या कुटुंबांचा संपूर्ण पाठिंबा असतो, त्यामुळे त्यांचा समाजसेवेचा उत्साह द्विगुणीत होतो. वेश्यांचे पुनर्वसन करण्याच्या हेतूतून समाजसेविका कमलाताई पोलिसांची मदत घेऊन वेश्यावस्तीत जातात. वेश्यांची जीवघेणे जीवन जवळून पाहतात. या जीवनाची त्यांना किळस येते. किरण नावाच्या वेश्येची हकीगत ऐकून ते हादरतात आणि तिला या नरकयातनेतून मुक्त करण्यासाठी आपल्या घरी घेऊन येतात. वात्सल्य भावातून तिला आश्रय देतात परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच असते .एका गाफील क्षणी आनंदरावांची वासना त्यांच्यावर मात करते व ते किरणच्या असाह्यतेचा फायदा घेत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. यामुळे किरणही आपल्या आयुष्याचा आधारस्तंभ म्हणून आनंदरावांकडे पाहते. मुलगी नीलम च्या विवाहात किरण अडचणीची भासू लागल्यानंतर ते तिची राहण्याची वेगळी व्यवस्था करतात. म्हणजेच कथेला कशी कलाटणी मिळते, आनंदरावांच्या समाजसेवेचा आस्थापूर्ण भाव कुठे लोप होतो? असे अनेक प्रश्न या कथेच्या अनुषंगाने उपस्थित होतात . या कथेच्या अनुषंगाने स्वतःचे स्वप्न, विचार, दृष्टिकोन, भूमिका उध्वस्त करणे अशी प्रतिमा आनंदरावांच्या रुपाने उभे राहते.वेश्या वस्तीतील मुलीला किरणला ते आपल्या घरी आणून ठेवतात यातच त्यांचे चुकते. तसं पाहिलं तर ही किरण देखील त्यांची मुलगी नीलमच्या वयाची आहे. वेश्यावस्तीतील एखाद्या मुलीला घरी आणून ठेवणे व तिचा उद्धार करणे या समाजसेवेचा उत्कट भाव असला तरी लोक त्याकडे कोणत्या नजरेने पाहतील हाही प्रश्न उपस्थित होतो. समाजसेवेच्या क्षेत्रात ही बाब मारक ठरते ही वस्तुस्थिती या कथेत मांडण्यात कथाकार यशस्वी झालेले आहेत.

“भग्न गोकुळाच्या वाटा'” ही कथा आहे जीवनभर आस्था जोपासणाऱ्या साहेबरावाची !परंतु ही त्यांची आस्था कशी भग्न होते, भंग पावते याचे चित्रण ही कथा करते . जीवनभर जोपासलेल्या भावनेचा कसा उद्रेक होतो असेही चित्रण या कथेत येते. तशी ही कथा अतृप्त प्रेम भावना यांची सांगड घालणारी कथा नव्हे तर ती मानवी जीवनातील अनेक पापुद्रे उलगडत जाणारी कथा आहे.ती समग्र वाचलीच पाहिजे.

“उदाहरणार्थ: एक सत्व परीक्षा”ही एक वेगळ्या स्वरूपाची कथा आहे. या कथेत कथाकाराने समाज सुधारकांच्या कार्यातील फोलपणा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. समाज सुधारणा करीत असताना एखाद्या कार्याची उर्मी असते परंतु प्रत्यक्षात ती जबाबदारी आल्यावर त्या कार्यातून पळ काढणे असे वास्तव या कथेत कथाकाराने चितारले आहे. समाजसुधारकांच्या कार्याची विसंगती मांडणे हा हेतू कथा काराला असावा असे वाटते. ही कथा स्त्रीची बंडखोरी ही दाखविते. अतार्कीकता, असमंजसपणा यामुळे बंडखोर उच्च विभुषित चेतनाची या समाज व्यवस्थेत कशी गोची होते याचेही चित्रण ही कथा करते. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणे म्हणजे किती दमछाक करणारे असते हे या कथेतून निदर्शनास येते.

पुस्तकाचे शीर्षक असणारे “महत्तम साधारण विभाजक'” ही शोभणेंची एक अप्रतिम कथा आहे. मानवी जीवनात अवाजवी हेतूंची अगतिकता दाखविणारी कथा आजचे वास्तव चित्र मांडते.या कथेतील पात्रांच्या वाट्याला येणारी आर्तता, विफलता, तेवढ्यात उत्कटतेने तीव्रतेने व्यक्त होते. या कथेतून कथाकारांनी समकालीन समस्यांकडे अंगुली निर्देश केलेला आहे ती समस्या म्हणजे वंशाच्या दिव्यासाठी “मुलगाच पाहिजे” हा लोकांचा अट्टाहास ही असून ती समस्या आज सर्वत्र दिसत आहे. सुखाच्या शोधात सातत्याने धावत राहणं ही मूळ मानवी प्रवृत्ती आहे किंबहुना तो प्रत्येक सजीवाचा सहज धर्म आहे. सुखाची संकल्पना ज्याच्या त्याच्या कृतीनुसार ठरत जाते, मानवी जीवनातील काही सुख नकळतपणे हातातून निघून गेलेली असतात याचा प्रत्यय या कथेत येतो वाचकांना सुन्न करणारी,विचार प्रवण करणारी ही कथा मुळातूनच वाचली पाहिजे.

“मळून वाहणारी गोष्ट”या कथेचा नायक दिगंबर अवधूत गोसावी एका चिरंतन सत्याच्या शोधात हतबल झालेला आहे. ते सत्य त्याला कासावीस करीत असते. आपल्या आईच्या अनैतिक संबंधातून आपली उत्पत्ती झाली असावी या शंकेने तो ग्रस्त असतो, त्यामुळे तो उद्विग्न असतो. परंतु त्याची आई लग्नापूर्वीच गरोदर होती हे सत्य जेव्हा नायकाला कळते तेव्हा तो विचलित होतो. अनेक प्रश्न त्याच्यासमोर आ वासून उभे राहतात. आपल्यासमोर नियतीने काय पेरलेलं आहे हे तो समजू शकत नाही. माणसे एकमेकांना विनाकारण दोष देत असतात.मात्र ते हे विसरतात की नियतीसमोर सर्व हतबल असतात . तशी ही कथा प्रयोगशील आहे या कथेला मानाचा ‘शांताराम कथा पुरस्कार’ मिळाला. ही कथा शोभणेंनी प्रथम पुरुषी निवेदनातून साकार करून यातील नायकाचे नाते पुराणातील थेट सत्यकामाशी जोडलेलं आहे.हा शोभणेंजींचा अभिनव प्रयोग आहे. कथेत असा प्रयोग फारसा बघायला मिळत नाही. या कथेतून पुराणातल्या कथांचे नवे अन्वयार्थ लावून समकालीन परिस्थितीशी संबंध जोडून जगण्याचे पैलू उलगडले आहेत असा थोडक्यात या कथेचा मथितार्थ आहे.

“द्वंद्व”ही दीर्घकथा आजच्या शिक्षण क्षेत्रातील किडलेल्या व्यवस्थेचे दर्शन घडविते. या कथेत एका महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ . काटकर व त्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दयानंद पाटील यांच्यातील ‘द्वंद्व’ कथाकाराने रेखाटलेले आहे. शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रात सुद्धा आजच्या घडीला कशी कीड लागली आहे याचा तसेच शिक्षण क्षेत्रातली नैतिकता, मूल्यात्मकता कशी ढासळलेली आहे याचा प्रत्यय या कथेतून येतो. भ्रष्ट शिक्षण व्यवस्था आणि तिचे मानवी जगण्यावर होणारे विद्रूप, अनिष्ट परिणाम यांचे चित्रणही कथा करते.ही कथा देखील मुळातच वाचली पाहिजे.

शेवटच्या “धर्म”या कथेतून रवींद्र शोभणे यांनी गावातील माणसांच्या कोत्या प्रवृत्तीचे चित्रण केले आहे. गावातल्या दोन गटातील संघर्ष यात आलेला असून एका निष्पाप मुलीचा या संघर्षात करूण अंत होतो, म्हणजेच गावातील राजकारणाचे सर्वसाधारण गरीब लोकांवर कसा परिणाम होतो त्याचेही चित्रण ही कथा करते.

डाॅ.अनिल बोपचे यांनी डॉ.रवींद्र शोभणेंच्या विविध कथासंग्रहातून ज्या दहा कथा खास करून निवडलेल्या आहेत आणि त्यांचा यथायोग्य कथासारासह उत्तमरीतीने मागोवा घेतला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन केले पाहिजे.

एकूणच रवींद्र शोभणेंच्या या निवडक कथा मानवी जीवनाचे विविध पदर उलगडतात. मानवी जीवनातील विविध टप्प्यांचे चित्रण त्यांच्या कथेतून सखोल पणे येत असते. त्यांची कथा ८० नंतरच्या कथा परंपरेतील वास्तव चित्रण करणारी महत्त्वाची कथा आहे. त्यांच्या कथेतून समकालीन समाजाचे निर्भय आणि सर्जनशील चित्र प्रकर्षाने उजागर होते. किंबहुना अस्वस्थ करणारे वर्तमान हेही त्यांच्या कथेचे विशेषत्व सांगता येईल. त्यांच्या कथेची प्रभावी आणि प्रवाही कथन शैली अमिट छाप सोडून जाते किंबहुना वाचकांना अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य देखील त्यांच्या कथेत आहे,असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

सुधाकर तोरणे

— परीक्षण : सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक, नासिक ‌

— संपादन : देवेंद्र भुजबळ, ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. सुधाकर तोरणे सर म्हणजे चालतं बोलतं व्यासपीठ आहे.म्हणजे आज नव्हे तर मी सराना १९७२-७३ पासून ओळखतो.त्यांचा अभ्यास आणि विश्लेषण करून सांगण्याची पद्धती म्हणजे माझ्या सारख्या नवागतासाठी मार्गदर्शन आणि धडे गिरविण्याची सवय जडली.त्याचाच परिपाक म्हणून मी वाणिज्य शाखेचा पदवीधर झाल्यानंतर नोकरीच्या नादी न लागता सरांच्या मार्गदर्शनाने वृत्तपत्राच्या क्षेत्रात छायाचित्रकार ह्या नात्याने जिल्हा प्रसिद्धी कार्यालयाचा एक अविभाज्य घटक झालो.आणि आजतागायत सरांच्या आणि तत्कालीन विभागीय प्रसिद्धी अधिकारी खेर साहेब यांनी दिलेले धडे गिरवत माहिती खात्याची सेवा बजावली आणि आजही ज्येष्ठ छायाचित्रकार ह्या नात्याने माहिती खात्याशी जुललेलो आहे.तोरणे साहेबांच्या शिकवण्या मुळे माझ्या आयुष्यात लाभलेल्या सर्वच मान्यवर माहिती अधिकारी तथा विभागीय माहिती उपसंचालक, संचालक साहेबांचे मार्गदर्शन लाभत गेले आणि आजही लाभत आहे.त्यामुळे फोटोचा अँगल आणि बोलकी छायाचित्रे कशी असावीत ह्याची दृष्टी मिळाली आणि राज्य शासनाचा ऑगस्ट २०१६ चा छायाचित्र पुरस्कार देखील प्राप्त झाला.ह्या सर्व घटनांच्या प्रगतीच्या पाठीमागे भुजबळ सरांसह तोरणे सर आणि माहिती व जनसंपर्क खात्याचा मोलाचा वाटा आहे हे आज मांडण्याची संधी मला मिळाली.धन्यवाद तोरणे सर आणि भुजबळ सर.

  2. खूप सखोल आणि प्रत्येक कथेचा छान परिचय समिक्षक सुधाकर तोरणे यांनी त्याच्या वाचनीय शैलीत मांडला आहे. प्रत्येक कथेचे मर्म उलगडून दाखवले आहे. यामुळे ग्रंथकार श्री रवींद्र शोभणे यांचे सामर्थ्य लक्षात येते. धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments