Thursday, May 30, 2024
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक : ५०

मी वाचलेलं पुस्तक : ५०

“पाचामुखी”

महाराष्ट्र भुषण, पद्मश्री पु ल देशपांडे यांची साहित्य संपदा प्रत्येक मराठी माणसाने वाचलीच असेल. अगदी ‘अघळपघळ’ पासून ‘उरलंसुरलं’ पर्यंत ! याशिवाय बटाट्याची चाळ, असा मी असामी, खिल्ली, खोगीर भरती, नस्ती उठा ठेव, गोळा बेरीज, हसवणूक कोट्याधीश, पुरचुंडी, गाठोड, भावगंध, ते मराठी वाड्:मयाचा (गाळीव) इतिहास, इत्यादी विनोदी संग्रह वाचलेच असतील. याशिवाय तुझे आहे तुज पाशी, सुंदर मी होणार, अंमलदार, भाग्यवान, तुका म्हणे आता, तीन पैशाचा तमाशा, एक झुंज वाऱ्याशी, ती फुलराणी, वटवट वटवट, पुढारी पाहिजे, नवे गोकुळ, वयं मोठं खोटंम’, आम्ही लटके ना बोलू, विठ्ठल तो आला आला, मोठे मासे छोटे मासे, द्विद्वल ही नाटके बटाट्याच्या चाळी आणि असा मी असा मी सहित पाहिली देखील असतील. अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा, वंग चित्रे अशा प्रवास सफरींचा आनंदही लुटला असेल.

रसिकहो ! मित्रहो ! श्रोतेहो! सुजन हो ! हे भाषण पुस्तक वाचले असेलच आणि रेडिओवरील भाषणे आणि त्यांनी लिहिलेल्या श्रुतीका ऐकल्या असतील. याशिवाय व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, गुण गाईन आवडी, मैत्र, आपुलकी,
एका कोळियाने, गांधीजी, स्वगत, पोरवय, कान्होजी आंग्रे, रवींद्रनाथ, पु.ल.:एक साठवण ही पुस्तके देखील वाचलेली असतील.

‘वंदे मातरम्’ सारख्या चित्रपटातील नायकाची भूमिका ‘मानाचं पान’, ‘देवबाप्पा’, यासारख्या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन, “माझिया माहेराला, बाई या पावसानं”, अशा भावगीतांच्या गोड चाली, ‘गुळाचा गणपती’ सारखी सबकुछ ‘पुल’ चित्रपटाची निर्मिती, वाऱ्याची वरात, असा मी असा मी, लटके ना बोलूया सारखे बहुरंगी खेळ आपण प्रत्यक्ष पाहिले देखील असतील. आकाशवाणी दूरदर्शन दणकवणारे ‘बिगरी ते मॅट्रिक’ सारखे कार्यक्रम मर्ढेकर, बोरकर, आरती प्रभू यांच्यासारख्यांच्या कवितांचं वाचन, ‘राज संन्यास’ सारख्या साहित्यकृतींचं वाचन कविवर्य बोरकर श्री पु भागवत यांच्यासारख्या काळजाला हात घालणाऱ्या आणि मर्म भेदक मुलाखती, अध्यक्षीय भाषणं, उद्घाटनं, प्रस्तावना लेखन, वृत्तपत्र लेखन आणि कॅसेट सुद्धा! ‘तुझे आहे तुझे पाशी’ नाटका मधे म्हटल्या प्रमाणे “आपला तर दम निघून गेला भाई-तुमच्या कर्तृत्वाची याद करताना” शिवाय त्यात तुमचे राजेशाही, लोकशाही, विद्यापीठे सन्मान, सेवादल आणि ४२ ची चळवळ, तुमच्या उदार आणि अनामिक देणग्या यांची लाखाची गोष्ट यांचा उल्लेख या यादीतून राहिलेलाच आहे. लेखन, अभिनय, दिग्दर्शन, संगीत, प्रयोग निर्मिती अशा पंच सरांनी आणि गंभीर आणि विनोदी अशा दोन्ही अंगाने मराठी मनाला विंधणारा असा हा पी. एल उर्फ पुल उर्फ भाई यांचा कलाविष्कार आणि आत्मविष्कार लोकांना इतका माहित आहे की त्यावर भाष्य करणे मुळीच शक्य होणार नाही.

असं सर्व असतांनाच माझ्या हातात आता ‘पुल’ यांचं ‘पाचामुखी’ हे बरोबर बारा वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेलं पुस्तक आलं आहे.नवं काय आहे त्यात यांचा मागोवा मी घेतला .जे कुठे आलेलं नाही अशी भाषणे,पुलंच्या गप्पाटप्पा,मुलाखती यांची फार मस्तपैकी सांगड नामवंत सुत्र संचालक भाऊ मराठे यांनी संकलित केलेली आहे.

मॅजेस्टिक बुक स्टॉल तर्फे प्रकाशित झालेल्या ‘पुल: एक साठवण’ या पुस्तकाचं प्रकाशन प्रसंगी १९७९ मध्ये पुलंनी केलेलं भाषण, १९८९ मध्ये मुंबईत भरलेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषदेत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्या मान्यवरांच्या वतीने पुलंनी केलेलं आभाराचे भाषण, (प्रत्यक्ष भाषणाचा सव्वापाच मिनिटांचा व्हिडिओ हे सर्व वाचल्यावर शेवटी अवश्य पहावा) सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक म्हणून गोविंदराव पटवर्धन यांच्या सत्काराच्या वेळी केलेले तसेच देवधर संगीत विद्यालयातील एका समारंभात केलेलं भाषण, ‘वस्त्रहरण’ या नाटकाच्या १७५व्या प्रयोगाच्या समारंभात पुलंनी केलेलं भाषण, मिरज येथे बालगंधर्वांच्या पंचाहत्तरी निमित्त मध्ये पुलंनी १९८८मध्ये केलेले भाषण, आशय फिल्म क्लब आयोजित समारंभात ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुलंचं भाषण, कानडी मराठी भाषिक संमेलनात पुलनी केलेलं भाषण, गोडबोले सरांचे काही विद्यार्थी एसएससी परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकले त्यांच्या सत्कार प्रसंगी पुलंनी केलेले भाषण, आणीबाणी नंतर१९७७ मध्ये शनिवार वाड्यासमोर विराट सभेत केलंंलं पुलंचं भाषण, पुण्यात १९७८ मध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मध्ये चार्ली चॅप्लीन च्या स्मृती प्रित्यर्थ काढण्यात आलेलं टपाल तिकीट पुलंच्या हस्ते प्रसारित करण्यात आलं. त्याप्रसंगी केलेलं इंग्रजीतील भाषण, तसेच पुण्यातील मॅजिस्टिक भवनमध्ये गप्पाटप्पा मध्ये भारतीय रंगभूमीविषयी व्यक्त केलेले विचार इत्यादी पुलंच्या विचारांचा समावेश या पुस्तकात केलेला आहे.

त्याचबरोबर दुसऱ्या भागात अनेक नामवंत मंडळींनी पुलंच्या घेतलेल्या काही प्रदीर्घ मुलाखतींचाही समावेश केलेला आहे. त्यामुळे संपूर्ण पुस्तक अतिशय वाचनीय झाले आहे आणि ते नव्या पिढीतील मंडळींनी मुळातच ‘पु.लं’ना समजावून घेण्यासाठी वाचले पाहिजे.

या मुलाखतीत विशेष असे काय आहे ? साहित्य, संगीत, नाट्य आदि विविध कलांचा वारसा पु.लंना कसा मिळाला आणि त्यांनी कसा जोपासला हे सांगणारी प्रभाकर अत्रे यांनी घेतलेली मुलाखत, तर प्रा.स.शि.भावे यांनी घेतलेल्या मुलाखतीत लेखन, अभिनय, दिग्दर्शन आणि प्रयोग निर्मिती ह्यामध्ये पुलंनी संगीताला दुय्यम स्थान दिले कां ? या उत्कंठावर्धक प्रश्नांची उकल केली आहे. पुल देशपांडे जर्मनीला गेले असता त्यांना जर्मन थिएटर कसे वाटले, जर्मन विनोदाबद्दल त्यांचे मत काय,तिथला एकपात्री प्रयोग कसा असतो इत्यादी सांगणारी मुलाखत नाट्य समीक्षक वा.य.गाडगीळ यांनी घेतली आहे. पुलंच्या प्रातिनिधिक साहित्याचा कन्नड अनुवाद मुंबई विद्यापीठाने प्रकाशित केला. डाॅ.अनंत तोरो व विरूपाक्ष कुलकर्णी यांनी हा ग्रंथ संपादित केला होता डॉ.अनंत तोरो यांनी पुलंची घेतलेल्या मुलाखतीचा या पुस्तकात समावेश आहे. तर जयवंत दळवी यांनी हरदासी आणि बहूरूपी खेळासंबंधीच्या एक अनौपचारिक मुलाखतीत पुलंच्या प्रकृतीत हरिदास आणि बहुरूपी या दोन भूमिका एकवटल्या आहेत असा निष्कर्ष काढला आहे. स्वत. पुलंनी आकाशवाणी साठी भारतीय अभिजात संगीतात आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या मोजक्या कलावंतामधील एक डाॅ.वसंतराव देशपांडे यांची मुलाखत घेतली आहे. संगीतातल्या सर्वच गायन प्रकारांवर वसंतरावांची अद्भुत पकड या मुलाखतीतून पुलं यांनी प्रकट केली. तर रंगभूमीशी आपुलकीचे नाते सांगणारे एक अफाट व्यक्तीमत्व म्हणून पु.ल. कसे घडले आणि नंतर त्यांनी हे क्षेत्र कसे घडविले ह्यातील काही पैलू उलगडणारी इंग्रजीतील मुलाखत या पुस्तकात आहे. पुलंच्या पंचाहत्तरी निमित्त पुणे महापालिकेतर् पुणेकरांनी पुलंना मानपत्र अर्पण केले. सत्कार समारंभानंतर पुणेकरांकडून आलेले प्रश्न नाट्य समीक्षक डॉ वि.भा.देशपांडे यांनी पुलंना विचारले.त्या प्रश्नांना मोकळेपणाने उत्तर देताना आपले मनोगत व्यक्त करत “तृप्त मनाने आता मी परतीच्या वाटेवर” असे सांगितले. या संपूर्ण मुलाखती ‘पाचामुखी’ या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकाचे सर्वात मोठे यश आहे असे म्हणावयास हरकत नाही.

संकलक भाऊ मराठे यांनी पुस्तकाचे शीर्षक ‘पाचामुखी’ हे अगदी उचित ठेवले असून मलपृष्ठावर पाच प्रसिद्ध कवी, नाटककार, कादंबरीकार यांची पुलं विषयींची मनोगते घेतली आहेत. यात आचार्य अत्रे म्हणाले की मराठी भाषेतील हा विद्वान पंडित मराठीचा झेंडा आपल्या असामान्य, कोटीबाज विनोदाने नि खुसखुशीत शैलीने फडकवत ठेवील यात मुळीच शंका नाही” तर कवी कुसुमाग्रज म्हणतात की, “मूलभूत जीवन मूल्यांवर पुलंची निष्ठा अविचल आणि अभेद्य आहे. त्यांच्या लेखनातून, भाषणातून, आणि कलाकृतीतून या श्रध्दांचा प्रकाश समाजाला सतत लाभला आहे. म्हणून पु.ल. केवळ थोर वाङ्मयकार नाहीत, तर समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचे नेतेही आहेत. कवी विंदा करंदीकर यांनी म्हटले आहे की, “समकालीन सामाजिक अभिरुचीशी सहज संवाद साधणारी पुलंची प्रतिभा व भाषा; त्यांचे आनंदधर्मी व बहुढंगी लिखाण; त्यांचा सर्वसंचारक व विविधांगी विनोद; अनेक माध्यमांचा प्रभावी वापर करणारी त्यांची असामान्य’; शोमनशिप;’ त्यांची लोकसंग्राहक व उत्तेजनप्रवण रसिकवृत्ती; त्यांचे निष्कलंक चारित्र्य व नि:शब्द दातृत्व-या गोष्टी निश्चितच त्यांच्या अथांग लोकप्रियतेला कारणीभूत ठरलेल्या आहेत”. कादंबरीकार श्री. ना.पेंडसे यांनी म्हटले आहे की, “पु.लं नी पन्नास वर्षे सामान्य माणसाला जो शुद्ध आनंद दिला, त्याला तुलना नाही. साहित्य, संगीत , नाट्य, सिनेमा अशा विविध क्षेत्रांत पु.ल. आनंदाचा गुलाल उधळीत राहिले. आधुनिक विज्ञानामुळे त्या विविध क्षेत्रांतील त्यांचा संचार सुदैवाने पुढील पिढ्यांनाही मिळत राहणार आहे. ‘शुद्ध आनंदा’सारखे दुर्लभ जगात काही नाही” तर नाटककार प्रा. वसंत कानेटकर म्हणतात की, “पु.ल.देशपांडे यांची सगळी जडणघडण आमच्या पिढीसमोर घडली आहे. आमच्या पिढीने त्यांचे सगळे पराक्रम आणि सगळे मानसन्मान डोळे भरून पाहिले आहेत . ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व’ हे बिरूद केवळ पु. ल. देशपांडे यांनाच शोभून दिसते, म्हणूनच गेल्या शंभर वर्षात दुसऱ्या कोणाला ते कधी लावलेही गेले नाही”.

पुस्तकाच्या पहिल्या पानावर कवी मंगेश पाडगावकर यांची छान चारोळी आहे. “पुल स्पर्श होतात दुःखे पळाली नवा सूर,असे सांगत, आनंदयात्रा मिळाली. नैराश्येतुनी माणसे मुक्त झाली. जगू लागली, हास्य गंगेत न्हाली” .

“‘पाचामुखी’ हे पुस्तक समग्र वाचण्यात जी मजा व जो आनंद आहे तो आता नव्या पिढीतील इंग्रजी माध्यमातील मुलांसाठी पालकांनीच करून देण्याची नितांत गरज आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

सुधाकर तोरणे

— परीक्षण : सुधाकर तोरणे. ‌निवृत्त माहिती संचालक नासिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments