Saturday, October 5, 2024
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक : ५२

मी वाचलेलं पुस्तक : ५२

मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा

इतिहास हा माझा आवडीचा विषय ! एका पुस्तकाच्या दुकानात मला ‘मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा‘ हे नवे कोरे नोव्हेंबर २०२३ महिन्यात, म्हणजे फक्त ५-६ महिन्यांपूर्वी, प्रकाशित झालेले पुस्तक माझ्या संग्रहासाठी विकत घेतले आणि आठवडाभरात वाचून काढले.

पुस्तकाचे लेखक आहेत श्री.अमर श्रीरंग साळुंखे. त्यांनी दीर्घकाळ दक्षिणेत भटकंती करून हे पुस्तक लिहिले आहे.
श्री शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळात दक्षिण भारतात मराठ्यांच्या घडलेल्या घडामोडी व त्यांचे आजचे अस्तित्व यांचा संशोधनात्मक आढावा या पुस्तकात घेतलेला आहे.

दक्षिण भारतात राहिल्यामुळे श्री साळुंखे यांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी सोबत तामिळ, कन्नड, तेलगू, मल्याळम या दक्षिणात्य भाषा देखील अवगत करता आल्या. दक्षिण भारतातील संस्कृती आणि त्यांची रीती रिवाज अगदी जवळून पाहता आले. किल्ले आणि गावाच्या नावांचा इतिहास जाणता आला. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, आणि कर्नाटक ह्या चार राज्यात दुचाकीवर फिरताना कधी भाषेची अडचण त्यांना जाणवली नाही. बिकट वाट एका दमात पूर्ण होत नाही, त्यासाठी वेळ लागतो. त्यांच्या या बिकट वाटेत फार कमी लोकांची सोबत लाभली. बोडके आणि उजाड किल्ले किंवा समाधी स्थळे पाहण्यासाठी शक्यतो कोणी उत्सुक नसतो. परंतु तरीही भेटेल त्या वाटसरूंची आणि भेटेल त्या ब-या- वाईट लोकांशी आपलेपणाने हसत बोलत त्यांनी ही मुशाफिरी केली आणि ती या पुस्तकात नमूद केली, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य मला तरी वाचतांना अपूर्व वाटले.

दक्षिण भारतात मराठ्यांनी बांधलेले किल्ले, निर्माण केलेल्या राजधान्या, वसवलेली गावे, त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी शहरे, मराठ्यांच्या दक्षिणेत झालेल्या लढाया, त्यांच्यावर आधारित शिलालेख, मराठ्यांची समाधी स्थळे, अशी अनेक प्रकारची संशोधनात्मक माहिती या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते.

मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध हा केवळ मराठ्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तानासाठी चर्चा आणि अभ्यासाचा विषय आहे. युद्धाच्या ऐन रणधुमाळीत मराठ्यांच्या तलवारी बेभान झाल्या असतील, परंतु अगदी शत्रूच्या रयतेवरही त्या कधी उगारल्या गेल्याची उदाहरणे सापडत नाही‌. मराठे म्हणजे एक राष्ट्रविचार होता. एखादी संस्कृती उजाडण्यापेक्षा ती बसवण्यात मराठ्यांना अधिक रस होता.

मराठ्यांना अतिशय जाज्वल असा शौर्य, पराक्रम, मुत्सद्देगिरी, न्याय, नीती, कुटिलता, औदार्य, देशाभिमान, धर्माभिमान आणि मानवी जीवनाला समृद्ध करणाऱ्या गुणांनी परिपूर्ण असा इतिहास लाभलेला आहे. जाती धर्माच्या सीमा ओलांडून देशाला बारा बलुतेदार आणि अठरापगड जाती यांच्या आगळ्यावेगळ्या मिश्रणात एकत्र गोवणारा आणि विखुरलेल्या समाजाला एकत्र करून, स्वराज्याच्या प्रवाहात सामील करून घेणारा म्हणून, या मराठ्यांनी स्वतःला आपल्या कर्माने आदरार्थी जमात म्हणून, सिद्ध केलेले दिसते. मराठ्यांच्या घरातील वीर पुरुषच नव्हे, तर त्यांच्या घरातील स्त्रिया देखील वेळप्रसंगी डोईवरचा पदर कंबरेला खोचून ,रणचंडीचा अवतार धारण करून, राष्ट्राकडे चालून येणाऱ्या गनिमांचे शीर धडा वेगळे करताना दिसतात. मराठ्यांच्या स्त्रिया सोज्वळ, शालीन आणि परंपरा प्रिय असल्या तरी, त्या नेभळट किंवा लाचार मुळीच नव्हत्या. राजमाता जिजाऊसाहेब,राजमाता अहिल्यादेवी होळकर, सेनापती उमाबाई दाभाडे ,महाराणी ताराबाई, त्यागमूर्ती येसूबाई राणी सरकार, लक्ष्मीबाई नेवाळकर अशी किती नावे घ्यावीत. मराठ्यांच्या स्त्रियांनी फक्त मराठ्यांचे अंकुर उदरी वाढवले नाहीत, तर त्यांना न्याय, नीती, सुसंस्कृतपणा, देशाभिमान व मातृभूमीच्या प्रेमाचे धडे देखील दिले. त्यामुळे मराठ्यांच्या कणखर आणि आदर्शवत साम्राज्याचा पाया रचण्यात मराठ्यांच्या स्त्रियांचे मोलाचे योगदान लाभले आहे. असेही या पुस्तकात नमूद केले आहे.

दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर कधीही घाला न घालणारी ही मराठ्यांची जमात, स्वतःचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी, अग्निदिव्य करून इतिहासात अजरामर झाली पण ती इतिहासाच्या पानातून हळूहळू लुप्त देखील झाली आहे. ठराविक नावे सोडली तर बाकीचे कोणालाही माहित देखील नाहीत. बापा पेक्षा दोन काकनपेक्षा पराक्रमी संताजी घोरपडे यांचा मुलगा राणोजी घोरपडे, स्वराज्याचा अंश वाचवण्यासाठी वयाच्या १९ व्या वर्षी मृत्यूला मिठी मारणारा म्हाळोजी घोरपडे यांचा मुलगा मालोजी, मृत्यू समोर दिसत असताना देखील हजारोंच्या फौजेसमोर मिशीला ताव देऊन केवळ चार हजार लोकांसमवेत हैदर सारख्या सैतानाच्या डोळ्यात डोळे घालून, मानाने मृत्यूला सामोरे जाणारा मराठ्यांचा शेवटचा सेनापती मुरारराव घोरपडे ! आज या इतिहास पुरुषांची नावे देखील आपणास माहित नसावी ही मोठी दुर्दैवाची गोष्ट असल्याचंही पुस्तकात लेखकाने स्पष्टपणे सांगितल आहे.

दक्षिणेत मराठ्यांनी काय काय केले त्याचा विस्तृत आढावा पुस्तकात लिहिला आहे. त्यांत, मराठ्यांनी बांधलेली मंदिरे, छत्रपती शिवाजी महाराजांची शिल्पे, मराठ्यांनी बांधलेले किल्ले,तसेच इमारती, मराठ्यांनी नष्ट केलेली ठाणी, वसलेली गावे, मराठ्यांच्या लढाया, अपरिचित समाध्या, मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी शहरे, मराठ्यांचे शिलालेख, मराठ्यांच्या राजधान्या, यांची सविस्तर माहिती लेखकाने विस्ताराने नमूद केली असून ती समग्रच वाचली पाहिजे.

मराठ्यांनी सात ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची शिल्पे, तीन ठिकाणी बांधलेल्या इमारती, सात ठिकाणी अपरिचित समाध्या, सतरा ठिकाणी शिलालेख, दहा ठिकाणी झालेल्या लढाया, मराठ्यांनी वसलेली गावे अनुक्रमे मराठीपाळ्या, चिंतामणी, मालुर, अनंतपुर, अर्जुनवाडा आणि निपाणी अशा आहेत.

मराठ्यांनी १८ ठिकाणी मंदिरे बांधली ती अशी : गोव्यातील श्रीसप्तकोटीश्वर मंदिर, घाटी येथील सुब्रमण्यम, बेवूरचे तिमाप्पा मंदिर, देवनहळ्ळीचे वेणू गोपाल स्वामी मंदिर, होसकोटे येथील श्री विठ्ठल मंदिर, तिरुपती बालाजी, वसंतपूर चे भवानी शंकर, चिंबक्कम येथील चेल्वविनायकगर मंदिर, तिरुवअन्नामलाई येथील अरुणाचलेश्वर मंदिर, सदलगाचे शिव मंदिर, येडूर येथील हनुमान व वीरभद्र मंदिर, अथणीचे राम मंदिर, धारवाड येथील दत्तात्रेय आणि मैलारलिंग मंदिर, महाबळेश्वरचे गोकर्ण मंदिर, फोंडा येथील गोपाळ गणपती व रामनाथ मंदिर, कवळे येथील शांतादुर्गा मंदिर आणि सांकेलीम- गोवा येथील विठ्ठल मंदिर एवढी मंदिर बांधली आहेत. या मंदिरांना भाविकांना भेटी देता येतील म्हणून ती स्वतंत्रपणे दिली आहेत आणि त्यांचा संपूर्ण तपशील व भेटीसाठी मार्गदर्शन पुस्तकात केले आहे.

एकेकाळी आमच्या लोकांनी फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित करून ठेवलेल्या शिवाजी महाराजांपासून छत्रपती शाहू महाराजांपर्यंतचे इतिहासकर्ते यांना त्यांच्या पाऊलखूणा धुंडाळून, महाराष्ट्र बाहेर त्यांचं अस्तित्व दाखवणं ही काळाची अत्यंत गरज आहे. नुसतेच मराठा म्हणून मिरविण्यापेक्षा ज्यांनी आपले अस्तित्व राखले त्या मराठ्यांच्या पाऊलखूणा इतिहासातून मिटत चाललेल्या आहेत अशी धारणा लेखकाने व्यक्त केली आहे.त्या पाऊलखुणा धुंडाळून, शाबूत ठेवून, त्या महापुरुषांचे अस्तित्व राखणे गरजेचे आहे असेही लेखकाने म्हटले आहे.

दक्षिण भारताकडे गेल्या काही वर्षात पर्यटक व इतिहास प्रेमींचा ओढा वाढलेला आहे असे चित्र विविध माध्यमातून दिसून यायला लागले आहे. तथापि सर्वात मोठा प्रश्न असतो तो तिथे जाऊन नक्की काय पहावे ? भाषा आणि भूगोल या अडचणींवर मात करून जास्तीत जास्त किल्ले, मंदिरे, समाध्या, शिल्पे, राजवाडे, राजधान्या इत्यादीं अभ्यास्यता यावीत म्हणून इतिहास आणि भूगोलाची सांगड घालून दक्षिण भारतात विखुरलेली मराठ्यांच्या पराक्रमांची यशोगाथा विविध फोटोसह या नव्या पुस्तकातून पाहून सर्वांनी ती समग्रपणे वाचली पाहिजे असे माझे मत आहे आणि केवळ वाचूनच न जाता त्या गौरवशाली इतिहासाचा वारसा असणाऱ्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी दिल्या पाहिजेत असेही स्पष्टपणे म्हटले तर वावगे होणार नाही !

सुधाकर तोरणे

— परीक्षण : सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक, नासिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. मनापासून धन्यवाद 🙏
    अतिशय चांगलं पुस्तक आणि त्याची उत्तमरित्या करून दिलेली ओळख…!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

वैशाली कोंडाजी on “माध्यम पन्नाशी” : ९
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” : ९