Saturday, January 18, 2025
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक : ५४

मी वाचलेलं पुस्तक : ५४

वारसायण

महाराष्ट्र टाइम्सचे प्रिन्सिपल कंटेंट एडिटर तसेच ब्युरो चीफ श्री रमेश पडवळ यांचे ‘वारसायण’ पुस्तक त्यांच्या वसंत व्याख्यानमालेच्या भाषणानंतर मी हाती घेऊन लगेचच वाचून काढले. मला ते मनस्वी आवडले.

काळाच्या पडद्याआड जाऊ पाहणारी स्मारके, प्राचीन मंदिरे, लेणी, स्तूप, किल्ले, शिलालेख, मूर्ती, नाणी, वाडे, चर्च, मशिदी या साऱ्यांचा अभ्यास करून श्री रमेश पडवळ यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

नासिक जिल्ह्यातील ३६ वारसा स्थळांचा महत्त्वपूर्ण अभ्यास लेखकाने अगदी कोपरा नि कोपरा हिंडून अमाप धडपडीतून केला असल्याने त्याला या पुस्तकात लेखणी द्वारे चिरंतन केले आहे. या वारसा स्थळांचे सांस्कृतिक महत्त्व नव्या पिढयांपर्यंत पोचविण्याचे हे अतिशय मोलाचे कार्य केले आहे.

‘वारसायण’ पुस्तकात नासिक शहर व जिल्ह्यातील वारसा स्थळे असलेली दोन हजार वर्षांची साक्षीदार- पांडव लेणी, मातीची प्राचीन जुनी गढी, अंजनेरी मंदिर सोहळा, सिन्नरचे पंचायतन गोंदेश्वर देवालय, मंदिराचा आत्मा असलेले देवठाणचे मंदिर धोडांब्यातील महादेव-विष्णू मंदिर, शिल्प सौंदर्याने नटलेली चिचोंडी, अनकाई- टनकाई किल्ला, अज्ञात अंबेगण, शिल्प रत्नजडित झोडगे, सिन्नरचं ऐश्वर्येश्वर, अनकाईची जैन लेणी, जोगेश्वरीचे देवळाणे, मठ परंपरेतील तातोबा मंदिर, प्राचीन मंदिरांचा देवळी कराड, ज्योतिर्लिंग- मुक्तेश्वर मंदिर, वावीचं वैजेश्वर मंदिर, नाशिकचे सूर्य सुंदर ते सुंदर नारायण मंदिर, इतिहासात हरवलेले हातगड, तीर्थराज कुशावर्त तीर्थ, अंजनेरीची पार्श्वनाथ जैन लेणी, चांदवडची जैन लेणी, कातळकड्यांचा राजा- साल्हेर किल्ला, मयूर ध्वज मुल्हेर किल्ला, ऐश्वर्यसंपन्न किल्ला गाळणा, बल्लाळेश्वर मंदिर, मालेगावचा २८ बरूजांचा ऐतिहासिक भुईकोट किल्ला, चांदवडचा रंग महाल, चांदवडचे रेणुका माता मंदिर इंद्राळेश्वर मंदिर, त्रिभुवनेश्वर मंदिर, अद्भुत ज्योतीर्लिंग- त्र्यंबकेश्वर मंदिर, नीलकंठेश्वर मंदिर, नाशिकचा मानबिंदू -सरकारवाडा, भगूरचे सावरकर स्मारक या वारसा स्थळांचा ‘वारसायणा’त समावेश आहे.

वारसायणचे लेखक रमेश पडवळ हे स्वतः पुरातत्व (अर्क्यालाॅजी) विषयात एम् ए असून पत्रकारितेत देखील एम.ए. आहेत. इतिहासाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. कोणी इतिहासाकडे धर्म, जात या भावनेतून पाहतो तर कोणी निरपेक्षपणे पाहतो.

लेखकाचा वारसा स्थळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यापेक्षा थोडा वेगळा आहे. ही वारसा स्थळे नाशिक शहराची, जिल्हयाची शक्ती स्थळे आहेत. या शहराचा खरा इतिहास आहेत. या शक्ती स्थळांचा इतिहास सोप्या शब्दात सर्वांसमोर यावा हा हेतू लक्षात घेऊन पुस्तक लिहिले आहे हे सहजपणे लक्षात येते.

वारसायण पुस्तकातून लेखकाचे नाशिक वर उत्कट प्रेम दिसून आले असून त्याच्या पानापानांवर प्रत्यय येतो नाशिकच्या ताम्र पाषाण युगाचा तसेच अश्मयुगीन हत्यारांचा लेखकाने शोध घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. लेखकाच्या या प्रवासात मौर्यकाळ, सातवाहनकाळ, तेव्हाची पांडवलेणी, ब्राम्ही शिलालेख याचा अभ्यास पूर्ण उल्लेख त्यांनी केला आहे. अंजनेरीचा इतिहास विशद करत तेथील मंदिराचे पुरातत्वीय महत्व उध्वृत केले आहे. नाशिकची पांडवलेणी महाराष्ट्रातील प्राचीन लेण्यांपैकी एक आहे या पांडवलेल्यांचा धावता आढावा लेखकाने घेतला आहे.

वारसायण पुस्तकाच्या प्रत्येक लेखांमध्ये पुरातत्वीय, ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भाचा वापर केलेला दिसतो. सोपी भाषा या लेखांचे वैशिष्ट्य आहे. मंदिर स्थापत्याचे आणि मूर्तीचे वर्णन करताना त्यांच्या संदर्भातील स्थानिक कथांचाही वापर मांडणी त्यांनी सुरेखपणे केली आहे. देवठाण ला त्यांनी मंदिराचा आत्माच म्हटले आहे तर सिन्नरचे शिल्पांकित गोंदेश्वराची वास्तू रचना लेखकाने समृद्ध भाषेत उलगडली आहे काही लेखांची शीर्षके गमतीदार पद्धतीने दिली आहेत. नाशिक जिल्ह्यातील केंद्र व राज्य पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या प्रत्येक वारसा स्थळांच्या इतिहासाचा शोध घेण्याचा प्रयत्न लेखकाने केला असून अनेक वस्तूंचे बारकावे उजेडात आणले आहेत. या सर्वात लेखकाची आपला वारसा वाचविण्याची तळमळ पानोपानी प्रगट होते तर शांत आणि गूढ अंबेगण आपल्या कोणत्या प्रवासावर घेऊन जाणार आहे या विचाराने मन अस्वस्थ व्हायला होते, कारण गावातील घराघरात समोर विखुरलेल्या दगडांचे मोडके तोडके प्राचीन मंदिराचे अवशेष या गावाचे अज्ञात पैलू उलगडणार असल्याचा संकेत देऊ लागतात. हाच अनुभव प्रत्येक लेखातून येतो.

नासिक जिल्ह्यातील सुरेख कोरलेल्या मूर्ती आणि मूर्ती शिल्पांनी सजलेली मंदिरे या सर्वांचा बारकाईने अभ्यास करण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. या पुस्तकात छायाचित्रांचा योग्य वापर व पुस्तकाच्या मांडणीने ग्रंथाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील वारसा स्थळांच्या माहितीचे अभ्यासपूर्ण संकलन झाले आहे हे अतिशय महत्त्वाचे आहे.

पांडव लेणीच्या लेखात भारतातील एकूण १२००हून लेण्यांपैकी एक हजार लेणी एकट्या महाराष्ट्रात आहेत. याला कारण आहे महाराष्ट्राचा बेसाल्ट खडक ! हा खडक लेणीच्या निर्मितीसाठी उपयुक्त असल्याने शिल्पांनी सजलेल्या लेणी महाराष्ट्रात अधिक प्रमाणात पाहायला मिळतात इतक्या लेणी कोणी का कोरल्या आणि कशासाठी असा प्रश्न पडणे सहाजिकच आहे. पण या लेणी कोरल्या गेल्या नसत्या तर आपण एका विशिष्ट काळातील समाज जीवन समजून घेऊ शकलो नसतो. म्हणजेच आपल्याला त्या काळात घेऊन जाणाऱ्या या लेणी आपल्या इतिहासाचा महत्त्वाचा टप्पा आहेत. आपल्याकडे साधारण बौद्ध, जैन, आणि हिंदू अशा विविध धर्मपंथीयांनी या लेणी कोरलेल्या आहेत. धार्मिक प्रसार -प्रचार हाच प्रमुख हेतू सामान्यतः बहुतेक लेण्यातून दिसून येतो. पांडवलेणी ही त्यापैकीच एक अनोखी लेणी असून पहिल्या शतकापासून ती साकारली जाऊ लागल्याचे ‘वारसायणा’त म्हटले आहे.

गडकोटांची राजधानी अशीही नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. येथील सात पर्वत- रांगांवर ६२ गडकिल्ले आनंदाने विसावलेले पाहायला मिळतात. अवघडात अवघड, मध्यम आणि सोप्यात सोपा अशा तिन्ही प्रकारातील किल्ले नाशिक जिल्ह्यात अनुभवायला मिळतात. आजही या किल्ल्यांची सफर करणाऱ्यांना खेळवून ठेवतात. या सगळ्यात मराठा कालखंडातील मराठी शाहीचा पहारेकरी या भूमिकेत उभा असलेल्या मालेगावच्या भुईकोट किल्ल्याचा आवर्जून उल्लेख लेखकाने केला असून त्याची समग्र सचित्र माहिती या पुस्तकात दिली आहे.ती सविस्तरपणे पुस्तकातूनच वाचलेली बरी!

वारसा स्थळ आपल्याला स्वतःच्या लोकसंस्कृतीची ओळख करून देत असल्याने त्याबद्दल अभिमान वाटणं साहजिकच आहे. मात्र वारसा स्थळांचा अभिमान बाळगणं आणि त्यांचं महत्त्व जाणून, त्यांच्यासाठी काही करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या दोन्ही गोष्टी जेव्हा एक होतील, तेव्हा वारसा जतन आणि संवर्धन मोहीम यशस्वी होईल. मात्र त्यासाठी सर्वसामान्यांना आपल्या शहरातील वारसा नेमका काय आहे, त्याचा इतिहास किती समृद्ध आहे आणि हा वारसा टिकवणे किती महत्त्वाचं आहे हे समजायला हवं !ते समजण्यासाठी त्यांच्यापर्यंत शहरातील, जिल्ह्यातील वारसा स्थळांचा इतिहास पोचला पाहिजे, कारण वारसा जतन आणि संवर्धन संकल्पना मनात रुजवण्याची ही पहिली पायरी ठरते.वारसायण या पुस्तकातून हीच पहिली पायरी ओलांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्याच्या वारसा स्थळांचा इतिहास वारसायणात उलगडून सांगितल्याने आपल्या शहराची, जिल्ह्याची श्रीमंती आपल्या पुढील पिढ्यांना निश्चितपणे लक्षात येण्यासाठी त्यांना या वारसा स्थळांना भेटी देण्याची व्यवस्था पालकांनी केली पाहिजे. सुदैवाने महाराष्ट्र टाइम्स या दैनिकाने सुट्टीच्या दिवसात वारसा स्थळांची माहिती देण्याचा उपक्रम वाचकांसाठी ब-याच दिवसांपासून सुरू केला असून ‘मटा’चेच हेरिटेज वाॅकचे हेड आणि ‘वासरायण’ पुस्तकाचे लेखक श्री रमेश पडवळच ही माहिती देतात.

चौफेर पसरलेल्या नासिक परिसरातील नव्याने रहावयास आलेल्या हजारो जिज्ञासूंना त्यांच्या कुटुंबीयांसह ही माहिती बोलक्या छायाचित्रांसहित नेहमी प्रस्तूत करतात ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. श्री पडवळ यांची ‘वारसायण’ शिवाय ‘नासिक डायरी’, ‘तपोभूमी नासिक,’ ‘तपोवन लेणी’ व ‘नासिक हिरा’ ही पाच पुस्तके अलिकडेच प्रकाशित झाली आहे.
या वारसा स्थळांचे सांस्कृतिक महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोचविण्याचे अतिशय मोलाचे कार्य श्री पडवळ यांनी केल्याचे मी प्रारंभीच म्हटले आहे त्याची खात्री ‘वासरायण’ पुस्तक वाचून निश्चितच सुयोग्य व उचित आणि समाजाला प्रेरक ठरणारी आहे. असे विधान केल्यास वावगे होणार नाही.

सुधाकर तोरणे

— परीक्षण : सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक, नासिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. खूपच छान परीक्षण आहे, वाचण्याची व तो इतिहास जाणून घेण्याची ओढ निर्माण होते. श्रीयुत रमेश पडवळ यांच्या व्यासंगाची व परिश्रमाची चांगली ओळख श्रीयुत सुधाकर तोरणे यांनी करून दिली आहे त्याबद्दल सुधाकर तोरणे सुद्धा यांचेअभिनंदन !!!

  2. परीक्षण खूपच छान माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण आढावा घेऊन केलय असे दिसते आहे त्याबद्दल परिक्षकांचे अभिनंदन! पण चांगल्या बाबीबरोबर जर काही उणीवा असल्यास त्याची दखल घेतली गेली असती तर वाचकांची उत्सुकता अधिकच वाढली असती.

  3. माहिती पुर्ण पुस्तकं, नक्कीच वाचायला हवे.

  4. अत्यंत नेमके आणि मुद्देसूद परीक्षण.. पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाढविणारे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on एक घास त्यांच्यासाठी..
Sneha Shrikant Indapurkar on “जर्मन विश्व” : १
Prashant Thorat GURUKRUPA on जर्मन विश्व : २
Prashant Thorat GURUKRUPA on पुस्तक परिचय