“द आर्ट ऑफ लेटिंग गो”
नमस्कार मंडळी.
आजच्या पुस्तकाचे परीक्षण वाचण्यापूर्वी कालचा घडलेला प्रसंग इथे सांगणे मला आवश्यक वाटते, ते अशासाठी की, पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणे च काल आपले ज्येष्ठ परीक्षक श्री सुधाकर तोरणे यांच्या वर वेळ आली. झालं असं की, त्यांनी टाईप केलेलं आजचं परीक्षण सेव्ह करण्यापूर्वीच डिलीट झालं. तसं त्यांनी मला कळवल. तोरणे साहेबांचे वय ८० वर्षांच्या वर नक्कीच आहे. ते लक्षात घेऊन मी त्यांना म्हणालो, सर इतक्या थोड्या वेळात परत परीक्षण टाईप करण्याचे परिश्रम घेऊ नका. मी दुसरा काही तरी मजकूर बघतो आणि तसा पर्यायी मजकूर तयार ही ठेवला. पण आश्चर्य म्हणजे काल रात्री ८ वाजता त्यांनी पुन्हा सर्व मजकूर टाईप करून पाठविला आणि त्यामुळे आपल्याला आजचं हे परीक्षण वाचायला मिळते आहे. तोरणे साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.
– संपादक
व्यक्तिमत्त्व विकासासंबंधीची पुस्तके वाचण्याचा मला छंद आहे. यापूर्वी देखील मी काही वाचलेल्या अशा काही पुस्तकांचा ओघवता परिचय करून दिला आहे.
आज चांगल्या पुस्तकाचा शोध घेताना मला “द आर्ट ऑफ लेटिंग गो’ हे डेमन झहारियाज या लेखकाचे एक आगळेवेगळे पुस्तक हाती आले. या पुस्तकाचा मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच “स्वतःला मागे खेचणाऱ्या भूतकाळापासून सुटका मिळवा, भावनिक मुक्ततेचा आनंद अनुभवा आणि पुढे जा !” असे विधान केल्यामुळे पुस्तकात नेमके काय असावे ते लक्षात आले.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240709-WA0004-768x1024.jpg)
‘लेटिंग गो ‘ म्हणजे ‘सोडून देणे’ हा अर्थ लक्षात घेऊन स्टीव्ह मॅरॅबोली यांचे एक वचन असे दिले आहे की, ‘आपण सोडून दिल्याखेरीज, स्वतःला आणि परिस्थितीला माफ केल्याखेरीज, विशिष्ट पूर्वस्थिती आता सरली आहे हे लक्षात घेतल्याखेरीज, तुम्ही पुढे जाऊ शकत नाही हेच सत्य आहे.” या विधानाचा उल्लेख पुस्तकाचे लेखक डेमन झहारियाज यांनी प्रारंभीच केला आहे. त्यामुळे पुस्तक समग्र वाचण्याचे औचित्य साधता आले.
आपल्यापैकी बहुतेक जण नकारात्मक विचार व भावनांच्या आवर्तात असतात. यापैकी काही विचार व भावना वेदनादायी स्मृतीतून उद्भवलेल्या असतात. यामागे, खोलवर जाणवणारी व्यक्तिगत हानीची जाणीव असते. तर काही विचार व भावना म्हणजे चुकीच्या अपेक्षा व उध्वस्त स्वप्न यांची परिणती असते. दररोज आपल्याला तडाखे देणारे ताणतणाव व समस्या यामुळे निर्माण होणाऱ्या संताप, नाराजी, व नैराश्य यातून काही विचार व भावना जन्म घेतात.
हे नकारात्मक विचार व भावना आपण आपल्या सोबत वागवत असतो. आपली वृत्ती, आरोग्य, व नातेसंबंधांवर हे अनुभव, विचार परिणाम करत असतात. त्यामुळे आपण सर्वोत्तम कामगिरी घडवू शकत नाही. ते आपल्याला हाती असलेल्या वेळेचा व महत्त्वपूर्ण साधन स्तोत्रांचा पुरेपूर उपयोग करून घेण्यापासून रोखतात. नकारात्मक विचार व भावना आपल्यासाठी मानसिक अडथळे बनतात, ते आपला दृष्टिकोन बिघडवतात, निर्मिती क्षमतेसाठी बाधक ठरतात आणि अंतिमतः आपल्या आयुष्याची गुणवत्ता ढासळवतात.
एकदा का आपण निराशा, खेद आणि आपल्या मनावरील ओझे ठरणाऱ्या वेदनादायी स्मृतींपासून सुटका करून घेतली की, आपल्याला भावनिक स्वातंत्र्य लाभते. मग हे स्वातंत्र्य आपल्या वर्तनात, निर्णयात, आणि आत्म- जागरुकतेच्या पातळीत दिसते. ही भावनिक मुक्तता आपल्या प्रियजनांशी, मित्रमैत्रिणी, शेजारी व सहकाऱ्यांशी असलेल्या आपल्या संबंधात दिसते; त्याबरोबरच आपल्या कामाच्या गुणवत्तेत आणि एखादे काम पूर्ण केल्यानंतर आपल्याला लाभणाऱ्या समाधानातही दिसते असे लेखकाचे म्हणणे आहे.
या पुस्तकात ‘सोडून कसे द्यायचे’ याचे समग्र विवेचन करण्यात आले आहे. या विषयाचा आवाका मोठा असल्यामुळे, ‘सोडून देणे’ न जमण्याची सर्वसाधारण कारणे दिली असून विस्तारभयापोटी मी फक्त ‘सोडून देणे’ व ‘आयुष्यात पुढे जाणे’ यासाठीची जी २१ तंत्रे लेखकाने सादर केली आहेत तिचाच फक्त उल्लेख करतो.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240709-WA00032-1024x228.jpg)
ही तंत्रे अशी आहेत.-
सोडून द्यायचे प्रथम ठरवा, आपली भावनिक अवस्था ओळखा, नकारात्मक भावनांना बाहेर काढण्यासाठीची वहिवाट, आपल्या गरजा पूर्ण होतात की नाही ते बघा, आपणाला कशामुळे जीवनोद्देश मिळेल ते ओळखा, भावनिक दुःख स्वीकारा, तुमचा आदर्श ‘स्व’ हे मृगजळ आहे ही गोष्ट ओळखा, अहंकार सोडा, इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात याकडे दुर्लक्ष करा, स्वतःला वगळून इतर सर्वांना खूश करणे बंद करा, स्वतःला आनंदी बनवण्याचा प्रयत्न करणे थांबवा, आपण निर्णय कसे घेता ते तपासा, आळसावल्यासारखे का वाटते याचे कारण शोधा, कृतज्ञता ठेवा, आपणाला घेरणाऱ्या समस्यांची जबाबदारी घ्या, सगळ्या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते हे स्वीकारा, नात्यांमध्ये हिशोब ठेवणे बंद करा, अनावश्यक वचने देणे बंद करा, स्वतःला व इतरांना माफ करायला शिका, भावनिक वैविध्य विकसित करा,आपले जे वैयक्तिक समज असतात त्यांच्या अचूकतेबद्दल स्वतःच प्रश्न उपस्थित करा. इत्यादी तंत्राचा अवलंब करण्याचे मार्गदर्शन केले असून ते पुस्तकातच वाचलेले बरे !
नको असलेल्या आठवणी सोडून देण्याचे लाभ म्हणजे वैयक्तिक प्रगती, मानसिक व शारीरिक आरोग्यात सुधारणा, नातेसंबंध सुधारतात, धाडस वाढते, नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता वाढते, दैनंदिन आयुष्यातील आनंदाची लज्जत वाढते, परानुभूतीची जाणीव वाढते आणि भावनिक स्वातंत्र्य लाभते. राग, खेद, व पश्चातापाच्या भावनांशी झगडत राहणाऱ्या व ताणतणावात आणि वेदनादायी स्मृतींनी निराश झालेल्या आणि आपणाला दयनीय बनवणाऱ्या गोष्टींना ‘धरून’ ठेवणा-या मंडळींनी हे आर्ट ऑफ लेटिंग गो’ पुस्तक अवश्य अभ्यासावे. इतकेच !
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2021/10/IMG_20211020_115512-150x150.jpg)
— परीक्षण : सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक, नासिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
‘Art of letting go’ ही नकारात्मक वृत्ती, जुन्या कटू आठवणी यावर मात करणारी रामबाण कला आणि शास्त्रही आहे.यावर इतके सुरेख पुस्तक वाचकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.