Saturday, July 27, 2024
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक : 34

मी वाचलेलं पुस्तक : 34

हिमाक्षरे

‘हिमाक्षरे’ हे आमचे मित्र व सहकारी श्री प्रल्हाद जाधव यांनी लिहिलेलं हिमालय भ्रमंतीचे सर्वांग सुंदर पुस्तक गेल्या मार्च महिन्यातच ‘ग्रंथाली’ या नामांकित प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आणि अवघ्या ७-८महिन्यात माझ्या हाती आले.

‘हिमाक्षरे’ हे सव्वादोनशे पानात अक्षरबध्द झालेलं पुस्तक हिमालयाच्या चार भागातील अपूर्व गिरीभ्रवनातील अपूर्व प्रवासाचे प्रत्येक क्षणी मनोवेधक, काव्यसमृध्द, जीवनाचे यथोचित सार सांगणारे, काहीसे मार्गदर्शन करणारे पुस्तक म्हटले पाहिजे.

ऑफबीट हिमाचल हा पहिल्या भागातील अनुभव प्रल्हाद जाधवांनी बारीक सारीक तपशीलासहित नमुद केला आहे.

त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या भागात हिमाचलच्या पार्श्वभूमीवर काश्मीर प्रवासाचा आणि त्यानंतर ‘बागिनी ग्लेशियर’चा नेमका अनुभव कथित केला आहे.

चौथ्या भागात गेल्या चार-पाच वर्षांत केलेल्या लडाख, स्पिती-व्हॅली, दार्जिलिंग, सिक्कीम-गंगटोक येथील गिरीभ्रमणाच्या
प्रवासाचा आढावा घेतला आहे. या चार भागातील वर्णनाची शिर्षक भाग १ भाग २ अशी रूक्षमय न देता अतिशय काव्यात्मकरीत्या दिली आहेत आणि ती निश्चितच प्रभावी वाटली आहेत. ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले’ असे देऊन रौद्रभीषण पण तितक्याच नितांत सुंदर रुपाचे दर्शन घडविणारा अद्भुत हिमाचलाला हाक दिली आहे.

तर दुसऱ्या भागात ‘दुनिया रैना बसेरा’त पावलो पावली आत्मप्रत्ययाचे धडे देत, सप्तरंगी अनुभवांचे मोरपीस फिरवत, जगण्याच्या लालन पाशात लपेटून घेणारे रेशमीजाल असे सिक्कीम-गंगटोक, दार्जिलिंग, लडाख व स्पिती व्हॅलीचे अनुभव रेखाटले आहेत.

तिस-या भागात ‘या गंगेमधी गगन वितळले’ या नेटक्या शीर्षकाखाली भावनांची गुंतागुंत, संवेदना, झाकोळ, आणि यंत्रवत जागवणारे काश्मीरचे आणि त्यातील सर्वच नद्यांचे उत्तमपैकी चित्र रंगविले आहे.

तर चौथ्या भागात ‘गगनघटा गहरानी’ या शीर्षकाखाली शरीर- मनाची परीक्षा घेत, निसर्गाचं बोट धरून जगायला शिकवणारा आणि चालतां चालतां आपल्यातील सुप्त सामर्थ्याचे सोने उजळून काढणारा उत्तराखंडचे सुरेख चित्रण केले आहे. लेखणीची किती जबरदस्त ताकद आहे हे प्रत्येक पानापानातून दिसून येते.

या प्रवासाने आपणास खुप काही शिकवले आहे असे सांगून श्री जाधव यांनी जो माणूस पट्टीचा फिरणारा असतो त्याचे फिरण्याचे नियोजन कधीच अचूक असू शकत नाही. आपला आजचा पाडाव कुठे आहे हे तो सांगू शकत नाही. ही अनिश्चितता तशी दैनंदिन जीवनातही आपणास अनेकदा अनुभवास येत असते. तिचा आपण मनापासून स्वीकार केला तर जगणं अधिक सुंदर होऊ शकतं. हे या भ्रमंतीत समज मिळाल्याची अनेक तपशीलवार उदारणे प्रल्हादजींनी दिली आहेत. ती जगण्याची गंमत म्हणून वाचलीच पाहिजेत. धोका पत्करायला शिकणे, अज्ञात प्रदेशांची, ठिकाणांची भीती न बाळगता हे भान या प्रवासातून कळत नकळत येत गेल्याची कबुली त्यांनी प्रामाणिकपणे दिली आहे. ‘डर के आगे जीत है’ हे अनेक प्रसंगांतून ते शिकले आहेत.

प्रवासात उन, वारा, पाऊस असतो, वादळे, कधी भुस्खलन, कधी अपघात तर अनेक वाटा, वळणे, चढ उतार, खाच खळगे असतात या सगळ्यांना समर्थपणे आणि समतोलपणे सामोरे जाता आले पाहिजे हा धडा या प्रवासानेच आपणास शिकविल्याची स्पष्ट कबुली त्यांनी दिली आहे.

निसर्गापुढे आपण किती क्षुद्र आहोत याचे जे भान येते ते प्रत्यक्षात प्रवास केल्यावरच लक्षात येते. निसर्गाच्या सान्निध्यात माणसाचे मन विशाल होते आणि त्यांच्यातील सद्सद्विवेकबुध्दी जागी होते या इमर्सन च्या मताला लेखकाने पुष्टी दिली आहे. अशा ब-याच इंग्रजी साहित्यिकांची योग्य ठिकाणी चांगल्यापैकी चांगल्या विचारांची अनावरणे प्रल्हादजींनी दिली आहेत व त्यावर सुंदरसे भाष्य देखील केले आहे. विकासाच्या नावाखाली होणारा निसर्गाचा विध्वंस या मुद्यालाही त्यांनी आवश्यक त्या ठिकाणी स्पर्ष केला आहे. हे आपण प्रत्यक्षात पाहिले नसते तर त्याचे गांभीर्य त्यांच्याही लक्षात आले नसते. त्या अनुषंगाने वाचकांना, पर्यटकांना सावध करण्याची भुमिका नकळत आपणाकडून घडल्याचे कथन केले आहे. माणसाने निसर्गाप्रती कृतज्ञ राहायला पाहिजे त्यांच्याशी स्पर्धा न करता उलट जुळवून घेत जगत राहिले पाहिजे अर्थात हे ज्ञान सर्वांनाच आहे पण ब-याचदा ते सुभाषितांच्या पातळीवरच राहते अशी भुमिकाही लेखकांने स्पष्टपणे मांडली आहे.

संपूर्ण प्रवासात जे काही जवळचे मित्र झाले त्यांच्यापैकी ‘द हिमालयीन जर्नल’चे माजी संपादक व सुप्रसिद्ध गिर्यारोहक श्री राजेश गाडगीळ, टीममध्ये सर्वात जेष्ठ असलेले सुधीर धर्माधिकारी, ट्रीप संयोजक आत्माराम परब व अनेक मित्र मंडळींशी छानपैकी वार्तालाप झाला. नवे काही शिकायला मिळालं. सतत फोटोग्राफ काढण्यात मग्न असलेल्या, आणि मोठमोठ्या लेन्स घेऊन आलेल्या धर्माधिकारी यांना फुले, पक्षी, प्राणी, दगड माती जे दिसेल त्यात त्यांना सौंदर्याचा साक्षात्कार होत असे. त्यांच्याशी गप्पागोष्टी, नवनवीन माहिती मुळे प्रवास सुकर होतं होता.vप्रवासात तशा अनेक अडचणी, सोयी,
गैरसोयी, विमानतळ ते अधूनमधून चे तपासणी नाके, फिटनेस व इतर बाबींसंबंधीचा, खराखुरा अनुभव, प्रल्हादजींनी दिलखुलासपणे प्रतिपादन केला आहे आणि सर्वात शेवटी प्रवासाला जातांना घ्यावयाची काळजी यांचे समग्र विवेचन आपल्याला अनेक अनुभवातून केले आहे. ही या पुस्तकाची अपूर्व उपलब्धी आहे.

पुस्तकाच्या प्रस्तावनेत गिर्यारोहक राजेश गाडगीळ यांनी म्हटल्याप्रमाणे “एखाद्या कसलेल्या गायकाने एका संथ अशा लयीत बंदिशीची सुरूवात करावी आणि हळूहळू त्या मैफलीचे आपल्याला बेहोश करत न्यावे अगदी तसा अनुभव या वाचनाने दिला “असे जे म्हटले आहे ते अतिशय सुयोग्यच आहे.
मला एक गोष्ट प्रकर्षाने आवडली ती ही की यात एकही फोटो नाही. मात्र शब्दांच्या आणि रेषांच्या मदतीने सौंदर्य स्थळांच्या सर्वांगसुंदर चित्राकृती एक आव्हान स्वरुपात काढल्या आहेत हे या हिमाक्षराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे असे मानले तर ते चुकीचे होणार नाही.

लेखकाच्या या पुस्तकाच्या प्रत्येक अक्षरातील प्रवासाबरोबर अप्रत्यक्ष वावरणारा एक छुपा रूस्तूम प्रवासी म्हणून या पुस्तकाचा सुंदर अनुभव केवळ कल्पनेचे चित्र रंगवित मला काही झळ न लागता घेता आला याचा आनंद मात्र शब्दांच्या पलीकडे आहे.

सुधाकर तोरणे

— परीक्षण : सुधाकर तोरणे
निवृत्त माहिती संचालक, नासिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८