“डॅमइट आणि बरंच काही”
आजच्या तरुणांना प्रेरणा देणा-या पुस्तकांचा शोध घेतांना मला अचानक एक यशस्वी निर्माता, दिग्दर्शक व अभिनेता महेश कोठारे यांचे “डॅम इट आणि बरेच कांहीं” या शिर्षकाचं सुमारे तीनशे पानांचं छान पुस्तक हाती आले.त्यांचे अनेक चित्रपट पाहिले असल्याने कुतहूलापोटी पुस्तक संपूर्ण वाचून काढले.
महेशजींनी स्वतः कथन केलेल्या आत्मचरित्राचे ‘तारांगण’ नियतकालिकेचे संपादक श्री.मंदार जोशी यांनी शब्दांकन व संपादन केले असून ते अलिकडेच जानेवारी २०२३ मध्ये अतिशय सुंदर आकारात सुबक मुद्रणात अनेकविध छाया चित्रांसहित प्रकाशित झाले आहे. म्हणून या ताजेपणाचा आणि ‘बरंच काही’चा वेध घेत आहे.
एक लोकप्रिय बालकलाकार ते यशस्वी अभिनेता, दिग्दर्शक, संकलक,पटकथाकार आणि निर्माता ही प्रत्येक भूमिका साकारतांना सर्व आयुष्य पेलणारे महेश कोठारे यांचे आत्मकथनाचे पुस्तक “डॅमइट आणि बरंच काही ” म्हणजे झपाटलेल्या व्यक्तिचा धडाकेबाज प्रवास आहे. त्यांची जिद्द, तगमग, शून्यातून पुन्हा गरुडझेप घेण्याचा त्यांचा ध्यास हा केवळ रंजकच नाही तर अंतर्मुख करणाराही आहे. संपूर्ण निराशेच्या काठावरती ज्या उमेदीने किरणे पेरली व त्यातून पुन्हा स्वतःला, कुटुंबाला, आणि निर्मितीच्या महाकुटुंबाला सावरले, पुन्हा उभे केले, त्या चित्रमय घटनांच्या उन सावल्यांची ही २९० प्रुष्ठांची कहाणी आहे व ती समग्र वाचतांना मी अतिशय भारावून गेलो. चित्रपट, टीव्ही, माध्यमात प्रवेश करणाऱ्या तरूणांना एक गाईड या रुपाने निश्चितच मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारा ठरेल असा विश्वास वाटत असल्याने या पुस्तकाचा परिचय करून देण्याची माझी या मागील प्रामणिक भूमिका आहे.
महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत देखणा अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक म्हणून स्वतःचे उत्तम स्थान निर्माण केलं आहे. एखाद्या गतिमान चित्रपटाप्रमाणे आपले आयुष्य ते अत्यंत प्रामाणिकपणे उलगडू लागतात तेंव्हा ते एका व्यक्तिमत्वाचे चरित्र राहत नाही तर सुमारे साठ वर्षांच्या चित्रपट व्यवसायाच्या चढ-उतारांची,असंख्य व्यक्तिचित्रणांची, गती-प्रगतीची, वृत्ती -प्रवृत्ती ची,स्थित्यंतरांची वेधक चित्रकथा कुशलतेने अधोरेखित करीत जातात. एखाद्या सर्वोत्कृष्ट, रोमहर्षक चित्रपटात आपण ज्याप्रमाणे गुंतत जातो त्याप्रमाणेच या पुस्तकाचा एक वाचक म्हणून मला महेशजींच्या चैतन्यमय, उत्स्फूर्त कथनशैलीचा, शब्दांचा, वाणीचा, जिवंत प्रत्यय वाचतांना आला आहे आणि तो इतर वाचकांना देखील येईल याची निश्चित पणे खात्री देण्याचं धाडस करीत आहे.
महेश कोठारे यांच्या सुमारे २५ चित्रपटांचा बालकलाकार ते मुख्य अभिनेता म्हणून १९६२ ते १९८४ पर्यंतचा प्रवास चित्रपटसृष्टीतील नामवंत दिग्दर्शकांचा असून १९८५च्या धुमधडाक्यापासून ते २०१३ पर्यंत अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक म्हणून सुमारे २५ वर्षाचा झाला आहे. नंतर त्यांनी निर्माण केलेल्या कोठारे व्हिजन प्रा.लि.या कंपनीच्या माध्यमातून २००९ ते २०२२ पर्यंत १८ टीव्ही मालिकांची निर्मिती केली आहे. बी.एस्सी, एल एल बी झालेल्या महेश कोठारे यांनी मध्यंतरात ९-१० वर्षे न्यायालयात वकिली देखील चांगल्या प्रकारे केली आहे. एका खटल्यात न्यायाधीशांनी ते अभिनेता व वकील या दोन्ही स्तरांवर काम नियमानुसार करता येत नसल्याने वकिली सोडून अभिनेत्याला पसंती दिली यांची कथा त्यांनी या पुस्तकात निवेदली आहे.ती देखील रंजकच आहे.
एक बालकलाकार म्हणून महेश कोठारे यांचा ‘संत निवृत्ती ज्ञानदेव’,’छोटा जवान’, ‘प्रेम आंधळं असतं ‘,’मेरे लाल’, ‘छोटाभाई’, राजा और रंक,’घरघरकी कहाणी’ हे चित्रपट चांगले गाजले आहेत. मराठीसह हिंदी, गुजराती, राजस्थानी चित्रपटातही त्यांनी भुमिका केल्या आहेत. तर १९८५ नंतर, अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक म्हणून ‘धुमधडाका, ‘दे दणादण’,’थरथराट’ ‘धडाकेबाज’,’जिवलगा’ ‘,झपाटलेला’, ‘धांगडधिंगा’ ‘खतरनाक’, ‘जबरदस्त’, ‘झपाटलेला२’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. काही गाजलेले तर मोजकेच अपयशी ठरलेले चित्रपट लेखन, दिग्दर्शक व निर्माता म्हणून त्यांनी आपले कुठे चुकले यांची प्रामाणिकपणे कबुली देखील दिली आहे.
सुमारे १८ टीव्ही मालिकांतील ‘जय मल्हार’ ‘गणपती बाप्पा मोरया’,’विठू माऊली’, ‘दख्खनचा राजा’ ‘ज्योतिबा’,आदि धार्मिक मालिका तसेच ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’,’अकबर बिरबल’ अशा मालिकांसह ब-याच प्रचलित सामाजिक, कौटुंबिक मालिका निर्माण केल्या आहेत. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचे तर ५००भाग ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रसारित झाले आहेत. गेली सहा दशकं ते अविरत काम करीत आहेत.त्यांना फिरण्याची आणि वाचनाची प्रचंड आवड आहे. महाविद्यालयीन जीवनात ते उत्तम पत्रलेखकही होते. Times of India दैनिकात महेशजींचे इंग्रजीत प्रासंगिक व सामाजिक घडामोडीवर नियमित पणे वाचकांच्या पत्रव्यवहार सदरात पत्र प्रसिद्ध होत होते.
आई वडिलांचा नाटकातील अभिनय बघून तीच नाटके त्यांनी नंतरही केली.नंतरचे चित्रपट लेखन व दिग्दर्शनाकडे लक्ष घातले. बालपणातील कृष्णधवल चित्रपट ते सध्याचे डिजिटल सिनेमापर्यंतचा प्रवासात महेश कोठारे यांनी सर्व अद्यावत तंत्रज्ञान शिकून नवी उभारी घेतली आहे त्यांत त्यांनी यश व अपयशाचा अनुभव घेतला आहे.पायथा ते शिखर,शिखर ते पायथा, आणि पुन्हा पायथ्यापासून शिखराला घातलेली गवसणी, चांगले नि वाईट, चढ उतार देखील अनुभवले. ‘खबरदार’ चित्रपटाच्या वेळी त्यांनी सर्व घरदार विकले आणि कोणी ‘घर देता का घर’ अशा प्रतिकूल परिस्थितीतही स्वतः ला , कुटुंबाला कसे सावरले यांचे कथन विस्तृतपणे केलें आहे.
सत्तरीत असलेले महेश कोठारे आपल्या कुटुंबात खूप सुदैवी आहेत. त्यांच्या आई वडिलांचं छत्र त्यांच्या डोक्यावर आहे. पत्नी निलिमा, बीएससी, एमबीए झालेला पुत्र आदिनाथ, सून, छोटी नात जिजा असं हे एकत्रित कुटुंब आहे.
आदिनाथने आता कोठारे व्हिजनची धुरा सांभाळली आहे.त्याचं दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण असलेल्या ‘पाणी’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असल्याने महेशजी खुष आहेत.
चित्रपट-नाट्य क्षेत्रातील ब-याच नामवंतांच्या आत्मचरित्राचे वाचन मी यापूर्वी केले आहे. स्वसमर्थता आणि पर टिका यात बरेच गुंतलेले दिसतात. परंतु या पुस्तकात यश अपयश, झालेल्या चुका,त्यावर जिद्दीने केलेली मात, आलेले दुदैवी कठीण प्रसंग इत्यादीचे जिव्हाळ्याने केलेलं कथन हे काही स्वतः पुरते नाही तर आपली मनोरंजन सृष्टी आता अधिक विस्तारलेली आहे. त्यामुळे महेशजींचे अनुभवांचे हे पुस्तक या क्षेत्रात येणाऱ्या नवोदित तरुणांना एक मार्गदर्शक गाईड स्वरूपात निश्चितच प्रेरणादायी ठरेल याची तीळमात्र शंका नाही.
— परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, नासिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
हे पुस्तक वाचताना महेश कोठारे यांच्या जीवनाचा ट्रेलर पाहात आहेत असंच वाटतं अशी चित्रमय शैलीत सुधाकर तोरणे यांनी स्वीकारली आहे .ते स्उवत त्सुकता वाढते सुधाकर तोरणे स्वत चित्रपट निर्मितीचा अनुभव घेतला आहे त्यामुळे सहाजिकच त्यांना