21 ग्रेट लीडर्स – भाग 2 (अंतिम)
जगावर ठसा उमटविणाऱ्या नेतृत्वांची कार्य शैली सांगणारे ’21 ग्रेट लीडर्स,’ हे लेखक पॅट विल्यम्स यांच्या नवीन पुस्तकातील पहिला भागाचे परिक्षण आपण वाचलेच असेल. एखाद्याला कोणतीही गोष्ट शिकवायची असेल तर कथांचा किंवा गोष्टींचा वापर करणं हा एक उत्तम मार्ग आहे आणि या गोष्टी सांगण्याच्या बाबतीत पॅट विल्यम्स यांचा इंग्रजी साहित्यात तरी हात धरणारा कुणीच नाही हे या पुस्तकातून लक्षात आलेच आहे.
सप्टेंबर २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या या इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद लेखिका नीलिमा करमरकर यांनी सुरेखपणे केला आहे. याची आपणास कल्पना आहेच.
जाॅर्ज वाॅशिंग्टन, वाॅल्ट डिस्ने, बिल गेट्स, अब्राहम लिंकन, स्टीव्ह जाॅब्ज, मदर तेरेसा, महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, विन्स्टन चर्चिल, फ्रॅंकलीन रुझवेल्ट, मार्टिन ल्युथर किंग, मार्गारेट थॅचर असे ’21ग्रेट लीडर्स’ यामध्ये नेतृत्व आणि नेतृत्वाचे धडे यांचे अतिशय सुंदर एकत्रीकरण केले आहे ते आपल्याला दैनंदिन जीवनात, व्यवहारात निश्चितच वापरता येण्यासारखे आहे.
आजच्या दुस-या भागात मी उर्वरित ग्रेट लीडर्स यांच्या विविध पैलूतील उपयुक्त संंदेशांचा परामर्ष घेत आहे.
नेतृत्त्वाचा तिसरा पैलू आहे ‘लोककौशल्य ‘! यातील ग्रेट लीडर वाॅलटन हे वाॅल-मार्टचे संस्थापक. १९९२ मध्ये अमेरिकेचे प्रेसिडेंट बुश यांच्या हस्ते अमेरिकेचा प्रेसिडेंट मेड्ल ऑफ फ्रीडम हा किताब त्यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या कंपनीच्या दुकानात आज ३ लाख ८० हजार कर्मचारी काम करतात. तारुण्यात मोठमोठ्या महत्वाकांक्षा डोळ्यासमोर ठेवून वर्तमान पत्र टाकणे, घरच्या गाईचे दूध घरोघरी पोहचवणे, रेस्टॉरंट मध्ये काम करून मालकाकडून जेवण आणि ग्राहकांनी दिलेली टीप अशी कामे करणाऱ्या सॅम यांनी १९४० मध्ये अर्थशास्त्रातील पदवी संपादन केली. दुकानात किरकोळ विक्रेता म्हणून उत्तम काम करणाऱ्या या व्यापक लोकसंग्रहाच्या बळावर त्यांच्या वाॅलमार्ट स्टोअर इनकाॅर्पोरेशनमध्ये अमेरिका, मेक्सिको सह जगभरात अनेक रिटेलिंग स्टोअर्स आहेत. त्यांचा संदेश असा आहे की ग्राहकांचे हित अधिकाधिक कसे जपायचे, ग्राहक सेवा आणि आपले उत्पादन यात प्रगती कशी होईल यावर सहजपणे बोला, चांगले श्रोते व्हा, निष्ठावंत व्हा, संघर्षाचे व्यवस्थापन करा, समान पातळीवर या, ग्राहक भेटीच्या वेळी मित्रत्वाचे वातावरण ठेवा. कधीकधी त्यांच्या परिवाराची चौकशी करा, खेळ, पुस्तकावर गप्पा मारा, लोकांशी जवळीक साधून माणूसकीच्या नात्याने वागा अशी सॅम यांची शिकवण आहे.
अमेरिकेचे प्रेसिडेंट फ्रॅंकलीन रुझवेल्ट यांनी याच पैलूत तुम्ही लोकांशी नीट वागलात तर ते तुम्हाला चांगले वागवतील असा महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. याच लोककौशल्य पैलूत क्षमाशीलतेचा स्त्रोत असलेले पोप जॉन पॉल यांनी आपल्या संदेशात नेता म्हणून क्षमाशीलतेचा उदाहरण बना, कटुता आणि चीड यामुळे संघटनेची शकले उडतात तर क्षमाशीलतेने संघभावना मजबूत होते आणि देशाचा गाडा सक्षमतेने पुढे जातो असे सांगून इतरांच्या प्रेमास पात्र ठरणे हा प्रत्येक मानवाचा हक्क असल्याचे सांगितले आहे.
नेतृत्त्वाचा चौथ्या पैलूत चारित्र्याचे महत्वाचे स्थान आहे.आनंद, समाधान, आणि नैतिक कर्तव्य या गोष्टी एकमेकांशी निगडित असतात असे सांगणारे अमेरिकेचे प्रथम प्रेसिडेंट जाॅर्ज वाॅशिंग्टन,ज्यांना अमेरिकेचे पिता म्हणतात त्यांनी नेत्तृत्वाचे धडे देताना स्वतः चे चारित्र्य घडवा, प्रभावी नेतृत्वाचे गुण जोपासा, चारित्र्याचे स्वतः उदाहरण व्हा, नेहमी विनम्रता ठेवा, सद्सद्विवेकबुध्दीचे अनुसरण करा,तुमच्या कृतीतून तुमचे चारित्र्य उलगडा असे आवर्जून सांगितले आहे.
आध्यात्मिक क्षेत्रातील धर्मोपदेशक बिली ग्रॅहॅम यांनी उच्च चारित्र्यासाठी आपल्या मुलाबाळांना वारसा हक्काने पैसा अडका, भौतिक वस्तू देण्यापेक्षा, त्यांना चारित्र्य, शील, श्रध्दा यांचा वारसा सुपूर्त करा असे सांगितले आहे. नैतिकता आणि नीतिमत्तेचे पावित्र्य जपा, मोहाला बळी पडू नका, स्वत:ला प्रलोभनाचे भक्ष्य बनवू नका, परमेश्वराची मदत घ्या असा उपदेश केला आहे.
अमेरिकेचे प्रेसिडेंट थिओडोर रूझवेल्ट यांनी चारित्र्याचा पैलूत सांगितले आहे की प्रत्येक माणूस हा त्यांच्या चारित्र्याने घडतो. चांगले वडील, चांगला नवरा, चांगला कुटुंबप्रमुख हा चांगला शेजारी सुध्दा असतो. उत्तम शरीर संपादन, निरोगी मन आणि स्वच्छ चारित्र्य हे सर्वोत्तम असते. चांगले नागरिक व नेते बनण्यासाठी तुमचे आचारविचार स्वच्छ, सभ्य,मर्यादाशिल, प्रामाणिकपणा आणि सचोटीच्या कसोटीवर मजबूत करा. क्रृतीशील नेता बना. व्यक्तीचे चारित्र्यगुण हे देशाचे गुण असतात असे धडे त्यांनी दिले आहेत.
क्षमता या पाचव्या पैलूत सक्षम व व्यासंगी असे अमेरिकेचे तिसरे प्रेसिडेंट थाॅमस जेफरसन यांनी गुरूंचा शोध घ्या, तुमची तत्वं, जीवनमूल्ये, ध्येय यांचा नेहेमीच पाठपुरावा करा, विविध विषयांचे ज्ञान मिळवा, अनेक भाषा शिका, व्यासंगी, विद्वान व्हा, चांगली पुस्तके वाचा, असे आवर्जून सांगितले आहे.
पर्सनल कॉम्प्युटरच्या क्षेत्रात क्रांती करून जगातील सर्वात मोठी साॅफ्टवेअर- ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीचे संस्थापक आणि त्याद्वारे अमाप धन मिळवणारे बिल गेट्स यांच्या सारख्या स्पर्धा श्रेष्ठ सक्षम नेत्याकडून क्षमता पैलूंवर केलेले भाष्य महत्वाचे आहे. ते म्हणतात, क्षमता, लायकी ही ज्ञान, कौशल्य, अनुभव यापेक्षा महत्वाची असते. पुढील पिढीला उद्याची कौशल्य शिकण्यास प्रवृत्त करा. कालची नाही. धीरोदात्त जगाचा शोध घ्या, आव्हाने स्वीकारा, परस्परपूरक भागिदारीने तुमच्यातील उणीव भरून निघते यांचा विचार करा असे सुचित केले आहे.
अमेरिकन मिलिटरीतील राजकारणी असा लौकिक असलेले १९५० मध्ये NATO संघटनेचे सुप्रीम कमांडंट झालेले आणि १९५३ ते १९६१ मध्ये अमेरिकेचे प्रेसिडेंट असलेले डी.डी.आयसेनहाॅवर यांनी क्षमता पैलूत समर्थ नेतृत्वाचे धडे दिले आहेत. ते असे- सक्षम आणि समर्थ होण्यासाठी निर्णय घेण्यास शिका, कठीण आव्हानांचा स्वीकार करा, नेतृत्वावर विश्वास ठेऊन काळजी घेणारे व्हा, आपण कशासाठी लढतो हे सैनिकांना सांगा, दृढनिश्चय करा, मागे वळून बघू नका. ते संदेश देताना म्हणतात की “विचारपूर्वक प्रयत्न केल्यामुळे, काळजीपूर्वक ते प्रत्यक्षात उतरल्यामुळे तुमच्यातील नेतृत्व गुण विकसित होऊ शकतात. तुम्हाला जे हवे आहे ते अनुनयाकडून साध्य करुन घेणं ही नेतृत्त्वाची कला आहे. अर्थात अनुयायांचे विचार त्याप्रमाणे तयार करणे हे नेतृत्वाचे कौशल्य आहे.
नेतृत्वाचा सहावा पैलू आहे ‘धैर्य ‘. याबाबतीत काळे-गोरे यांच्यामधील दूजाभाव असीम धैर्याने आणि साहसाने नागरी हक्कासाठी लढणारी रोझा पार्क या महिलेची कथा लेखकाने अनेक प्रसंगांतून सांगितली आहे. रोझा पार्क कडून घेण्याचे धैर्याचे धडे म्हणजे श्रध्दा, आणि निष्ठा यातून प्रेरणा घ्या, धैर्यवान रोल मॉडेल निवडा, द्वेष मनात ठेऊ नका, संकटकाळी मदत करणारे मित्र, हितचिंतक यामुळे व्यक्तीमत्वात ठामपणा येत असतो, त्यांचा अंगिकार करा, राग किंवा चीड यांच्या आहारी न जाता त्याला योग्य ते वळण द्या, साहसी नेतृत्वाच्या परिणामांना सिध्द व्हा. रोझाने शेवटी संदेश दिला आहे की “प्रत्येक व्यक्तीने आपले जीवन इतरांना आदर्श वाटेल असे जगावे.”
हॅरी ट्रुमन यांची कथा प्रेरणादायी आहे. एक सामान्य पण दूरदृष्टीचा पियानो वाजविणारा किरकोळ विक्रेता भविष्यकाळात अमेरिकेचा प्रेसिडेंट बनतो हे आपणा सर्वांना एक आशावादी चित्र आहे. धैर्य या पैलूत त्यांचे त्वरित आणि निश्चित निर्णय घेणारे म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांचे निर्णय परिपूर्ण व मर्मभेदी असतं. पॅसिफिकमधील युध्द संपवण्यासाठी हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर अटमबाॅम्ब टाकण्याचा निर्णय त्यांनीच घेतला. त्यानंतरच्या काळात चलन फुगवटा, रेल्वे संप, युरोपच्या बांधणीसाठी मार्शल लॉ, बर्लिन एअरलिफ्ट, इस्त्रायल देशाची मान्यता, कोरियन वाॅर अशा अनेक उद्भवलेल्या प्रसंगांना त्यांना तोंड द्यावे लागले. आज नेतृत्वाच्या सातही वैशिष्ट्यांनी परिपूर्ण नेतृत्वाची देशाला गरज आहे परंतु सहावी बाजू बळकट असलेले धैर्यवान, साहसी, निर्णायक असे हॅरी ट्रुमन सारखे नेते तयार व्हायला हवे तुम्ही त्यासाठी प्रयत्न कराल कां ? असा प्रश्न लेखकाने विचारला आहे. शेवटी ट्रुमन यांनी दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, “अनेक व्यक्ती इतिहास घडवितात.समर्थ नेतृत्व नसलेल्या काळातील समाज गतीशून्य होतो. जेंव्हा एखादा धाडसी निर्णय चतुराईने घेणारा नेता अस्तित्वात येतो, तेंव्हा देश प्रगतीपथावर जातो.”! त्यांच्या कडून मिळालेले नेतृत्वाचे धडे असे आहेत-मर्यादांना बंधन घालून नका. लोकप्रियता मिळाली नाही तरी आदर प्राप्त करा, मोठमोठ्या आव्हांनाना स्वीकारा, न डगमगता, ठाम निर्णय घ्या…!
अकरा वर्षे युनायटेड किंग्डम च्या पंतप्रधान असलेल्या ‘आर्यन लेडी’ मार्गारेट थॅचर यांच्या धाडसी नेतृत्वाचे धडे असे आहेत – शारीरिक धैर्य ही नेतृत्वांची जमेची बाजू आहे , सत्य बोलण्याचे धैर्य दाखवा, धाडसी धैर्याची आत्मविश्वासाने हाताळणी करा, धैर्याला बाधा येणाऱ्या सवयी दूर करा, संकटकाळात डगमगू नका…धैर्याचा घटकांचा विचार करतांना थॅचर यांनी शेवटी जे सांगितले ते महत्त्वाचे आहे. नेता हा कधी अडखळत, डगमगत जाणारा आणि उलटा मागे फिरणारा नसावा तो नेहमीच धीट असला पाहिजे. किराणा मालाचे दुकान चालविणाऱ्या आई वडिलांची मुलगी असलेली थॅचर,-‘आर्यन लेडी’ हिने आपल्या धाडसी नेतृत्व आणि ‘नमते न घेण्याची वृत्ती’ तसेच ‘मोडेन पण वाकणार नाही’ याचे दर्शन निश्चितच घडविले आहे.
‘सेवाभाव’ हा नेतृत्वाचा सातवा व शेवटचा पैलू आहे. ब्रिटिश साम्राज्यवादाच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी अहिंसा आणि असहकाराचे तत्व यशस्वी करणाऱ्या महात्मा गांधी यांचे जीवन कार्य आबालवृद्धांना ज्ञात आहेच. गांधीजींच्या जीवनातून नेतृत्वाचे धडे असे आहेत – दुस-याची सेवा करण्यास प्राधान्य द्या, महाकाव्य, ग्रंथातील सेवकांच्या गोष्टी सांगा, सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब करा, जनतेचा ‘सेवक’. हा स्वतःचा ट्रेडमार्क बनवा, लोकांचे हृदय जिंकण्यासाठी खादी, चरखा, टोपी इत्यादि प्रभावकारी वस्तूंचा वापर करा, भाव-भावनांवर विसंबून राहू नका. नेतृत्वासंबंधी तुमचा दृष्टिकोन सरळ आणि शुद्ध ठेवा, सेवक व्हा, नेतृत्व करा. “अहिंसा या एकाच जातीच्या माध्यमातून मी माझे आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण करीत आहे” या शब्दात गांधीजींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. नेता होण्याची वाट पाहू नका, प्रत्येक गोष्ट स्वतः करा, एक एक व्यक्तीच्या संपर्कात येऊन काम करा असा ईश्वराच्या लेकरांना समर्पित हितोपदेश मदर टेरेसा यांनी सेवाभाव पैलूत केला आहे सेवक हा परताव्याची इच्छा ठेवत नाही असे सांगणा-या मदर टेरेसा यांनी नेत्तृत्वाचे जे धडे दिले ते असे आहेत..सच्चा सेवक हा हुषार आणि धोरणी असतो, प्रसिध्दी, प्रचार हा अस्पष्टतेपेक्षा चांगला आहे, प्रसिध्दी म्हणजे परमेश्वराची आणि गरजूंची सेवा करण्यासाठी उपयुक्त साधन आहे, ध्येयप्रवण सेवक इतरांचा विचार करतात, स्वतःचा नाही. अस्सल सेवक श्रध्दा, विश्वास यानुसार वागतात. .
युगपुरुष, थोर उध्दारकर्ता अब्राहम लिंकन १८६० मध्ये अमेरिकेचे प्रेसिडेंट झाले. त्यांच्याकडून घेण्याचे नेतृत्वाचे धडे असे आहेत –उत्तम नेता सदैव विद्यार्थी असतो, थोर नेता प्रत्येकाची काळजी घेतो, जनतेचे सेवक मदतीच्या हाकेला प्रतिसाद देतात, सच्चा सेवक ‘बिरुदे’ मिरवत नाही तर जनसेवा करतो, खरा नेता बदल्यांची भावना मनात ठेवत नाही, खरे सेवक शत्रूलासुध्दा मित्र बनवतात. अब्राहम लिंकन यांच्या शपथविधी नंतर पाच आठवड्यात अमेरिकन यादवी युध्द सुरू झाले. युध्दाच्या काळातील प्रेसिडेंट म्हणून लिंकनवर अनेक जबाबदाऱ्या, अनेक मतमतांतराचे दबाव होते पण याच काळातील त्यांच्यातील सचोटी, विनम्रता, करुणा, प्रामाणिकपणा या गुणांचे दर्शन झाले.
विश्वावर ठसा उमटवणा-या नेतृत्वांच्या ‘२१ ग्रेट लीडर्सां’च्या कार्यशैलीचे सात पैलूंचे -दूरदृष्टी, संभाषण कौशल्य, लोककौशल्य, चारित्र्य, क्षमता, धैर्य आणि सेवाभाव यांची विस्तृत माहितीचे, त्यामागील धोरणांचे, समग्र इतिहासाचे, व्यक्तीगत जीवन चरित्राचे दर्शन आपणास या पुस्तकातून पहाण्यास मिळते. या सात पैलू पैकी कुठल्याही कौशल्याची कमतरता असल्यास ती वाचक प्रयत्नपूर्वक मिळवू शकतो. आणि या सात कौशल्यात परिपूर्ण झालात तर नक्की उत्तम नेता व्हाल अशी मनिषा व्यक्त करून लेखकाने शेवटी म्हटले आहे की या २१ ग्रेट लीडर्स नी आपल्याला उदाहरण घालून दिले आहे, आता आपल्याला नेतृत्वाची आव्हाने स्वीकारून इतिहास घडवायचा आहे.
तसे हे पुस्तक मनन करण्यास भाग पाडणारे आणि प्रॅक्टिकल मार्गदर्शन करणारे आहे. त्यांना एक उत्तम नेता बनण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल. आताच्या काळात नेतृत्व करणं ही अतिशय गुंतागुंतीची गोष्ट झाली आहे. आजच्या युगातील आव्हानांना तोंड द्यायचे असेल तर या भूतकाळातील महान नेत्यांकडून प्रेरणा आणि धडे घेऊन ज्यांना व्यवस्थापन करण्याची आणि इतरांना प्रभावित करण्याची इच्छाशक्ती असेल त्यांनी हे पुस्तक वाचायलाच हवे असे माझे स्पष्ट मत आहे ‘Learn Their Lessons and Improve Your Influence’ हेच महत्वाचे आहे.
समाप्त.
— परीक्षण : सुधाकर तोरणे, निवृत्त माहिती संचालक, नाशिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.