शिल्पा तगलपल्लेवार गंपावार लिखित, देवेंद्र भुजबळ संपादित, न्युज स्टोरी टुडे प्रकाशित “मी शिल्पा…. चंद्रपूर ते केमॅन आयलंड्स” या पुस्तकाचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी थाटात पार पडले. यावेळी पुस्तकाच्या लेखिका शिल्पा तगलपल्लेवार गंपावार, प्रकाशिका सौ अलका भुजबळ, संपादक श्री देवेंद्र भुजबळ, लेखक – चित्रपट दिग्दर्शक श्री प्रदीप दीक्षित, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी श्री अनिल गडेकर आणि विविध मान्यवर, व्यक्ती उपस्थित होत्या.
सकाळच्या लोकार्पण समारंभानंतर आर्य वैश्य समाज भवनात झालेल्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना ९७ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा डॉ रवींद्र शोभणे म्हणाले की, दूर परदेशात राहणा-या शिल्पा तगलपल्लेवार यांनी वयाच्या ५० व्या वर्षी पुस्तक लिहिणे हे अभिनंदनीय आहे.
परदेशात राहून मातृभाषेबद्दल असलेले त्यांचे प्रेम, आत्मियता यातून जाणवते. लेखनात व्यक्त होण्याकरिता आपली भाषा, संस्कृती याचा परिपाक असतो. शिल्पाताईंनी तो पुस्तकातून चांगल्या पद्धतीने व्यक्त केला आहे.
प्रमुख पाहुणे लेखक – दिग्दर्शक श्री प्रदीप दीक्षित यांनी नागपूर म्हणजे कलागुणांची नर्सरी असल्याचे मत व्यक्त केले. काही लोक स्वकर्तृत्वाने जग जिंकण्याची जिद्द बाळगतात. शिल्पाने तिच्या जीवनात घेतलेली गरुडझेप म्हणजे हे पुस्तक आहे. त्यांच्यावर एक बायोपिक तयार करण्याची इच्छा आहे, असे ते म्हणाले.
न्यूज स्टोरी टुडे चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांनी अनेक अडचणींमधून या पुस्तकाची निर्मिती झाली असल्याचे सांगितले. शिल्पाचे हे पुस्तक अतिशय वाचनीय, प्रेरक आहे, असे ते म्हणाले.
आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष श्री गणेश चक्करवार यांनी प्रत्येकाने पन्नाशीनंतर आपल्या अनुभवांचे पुस्तक लिहावे, हे शिल्पाताईंचे पुस्तक वाचल्यानंतर जाणवल्याचे सांगितले.
प्रास्ताविकातून सौ अलका भुजबळ म्हणाल्या, जीवनात आत्मविश्वासाने कसे समोर जायचे याचा प्रत्यय म्हणजे “मी शिल्पा.. चंद्रपूर ते केमॅन आयलँड्स” हे पुस्तक होय. यातील त्यांचे अनुभव सर्वांनाचा प्रेरक असल्याचे त्या म्हणाल्या.
लेखिका शिल्पा मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, सातासमुद्रापार राहून आमच्या संपूर्ण कुटुंबाने शून्यातून विश्व निर्माण केले. हे पुस्तक म्हणजे माझ्या आयुष्याची वाटचाल आहे. आपल्यातील कला फुलवून आयुष्य आनंदात जगा असा संदेश त्यांनी दिला.
यावेळी शिल्पा यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाची चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रज्ञा जीवनकर यांनी केले.
कार्यक्रमास साहित्य, शिक्षण, पत्रकारिता आणि इतर विविध क्षेत्रातील मान्यवर आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800