बुलेट ट्रेनमध्ये प्रकाशन !
खरं म्हणजे, मुंबईहून जपान साठी निघण्यापूर्वी असे ठरले होते की, माझ्या “आम्ही अधिकारी झालो” या पुस्तकाचे प्रकाशन जपान मध्ये ६ जुन या शिवराज्याभिषेक दिनी करायचे.पण सकाळी उठल्यापासून ते रात्री पर्यंत फार वेळ गेला आणि हॉल घेऊन नेहमी प्रमाणे पुस्तक प्रदर्शन करायचे त्या हॉल चे भाडेच दोन लाख रुपये पडेल, म्हणून सांगण्यात आले ! ही तर आमच्या आवाक्या पलीकडची गोष्ट होती. त्यामुळे त्या दिवशी काही पुस्तक प्रकाशन होऊ शकले नाही. आता आपल्या पुस्तकाचे प्रकाशन जपान मध्ये काही होऊ शकत नाही, अशी खूणगाठ अत्यंत नाराजीने मी मनात बांधली.
खरं म्हणजे “गगनभरारी” या माझ्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन २८ मे २०१७ रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे भरलेल्या चौथ्या सावरकर विश्व साहित्य संमेलनात झाले होते.दुसऱ्या एका “प्रेरणेचे प्रवासी” या पुस्तकाचे प्रकाशन मलेशियात जानेवारी २०१९ मध्ये भरलेल्या विश्व शब्द साहित्य संमेलनात झाले होते. तर तिसऱ्यांदा परदेशात पुस्तक प्रकाशन करून हॅटट्रिक करण्याची माझी फार इच्छा होती. पण इथे लागणारा खर्च आणि वेळ याचे गणित काही जमेना. यावर तोडगा म्हणून आमचा युवा टीम लीडर शिवम खन्ना याने अशी कल्पना मांडली की, आपण ओसाका हून हिरोशिमा येथे बुलेट ट्रेन ने जात आहोत, हा जवळपास एक तासाचा प्रवास आहे. या प्रवासा दरम्यान तसेही आपण काहीच करू शकणार नाही. वेळ ही पुरेसा आहे तर आपण बुलेट ट्रेनमध्ये पुस्तक प्रकाशन करू या !
प्रथम दर्शनी मला ही कल्पना काही पटली नाही. कारण पुस्तक प्रकाशन करायचे म्हणजे हॉल हवा, व्यासपीठ हवे, समोर व्यवस्थीत प्रेक्षक बसले पाहिजे, असे पारंपरिक चित्र माझ्या मनात होते. पण एका युवकाने मांडलेली ही अभिनव कल्पना आहे, तर प्रयोग करून बघू या, असे म्हणून मी (नाईलाजानेच) सहमती दर्शविली.
दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी आठ वाजता ओसाका हून हिरोशिमा येथे जाण्यासाठी बुलेट ट्रेनमध्ये बसलो. दहा मिनिटात सर्व स्थिर सावर झाल्यावर, आदल्या दिवशी रात्री मी आणि अलका ने कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली होती ती संबंधितांना सांगितली. त्यांच्याही काही सूचना लक्षात घेतल्या. त्या प्रमाणे खरोखरच पुस्तक प्रकाशनाचा हा अनोखा कार्यक्रम एकदम छान झाला.
लेखक म्हणून मी, नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून श्री गुर्विंदरसिंग, युवा प्रतिनिधी म्हणून श्री शिवम खन्ना, एम टी एन एल च्या निवृत्त अधिकारी तथा कवयित्री सौ पौर्णिमा शेंडे, आमची गाईड लू विन यांच्या हस्ते पुस्तकाचे छान प्रकाशन झाले. लू विन सोडली तर बाकी सर्वांची थोडक्यात पण समयोचित भाषणं झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन अलकानेच केले. तर कार्यक्रमाच्या चित्रणाची बाजू सौ राधा देढीया यांनी सांभाळली. ताशी ४५० किलोमिटर इतक्या वेगाने धावणारी ही ट्रेन आमच्या पोटातलं पाणीही हलू देत नव्हती. तसेच आपल्याकडे गाडीत जशी गर्दी असते, तसा काही प्रकार नव्हता. गाडीत जितक्या सीट्स असतील तितक्याच लोकांना तिकीट मिळते. त्यामुळे गर्दी, खेटाखेटी, धड उभेही राहता येत नाही, अशी काही परिस्थिती नव्हती. त्यामुळे कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडला.
एकंदरीतच या अभिनव पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास उपस्थित सह प्रवासी यांनी भरभरुन दाद दिली. सौ पद्माताई दिवाणे,
सौ शोभा शिरधनकर या सह प्रवाश्यांनी उस्फूर्तपणे पुस्तकं खरेदी केली. तर पुस्तकं मर्यादित नेल्यामुळे दुसऱ्या सह प्रवासी श्रीमती माधवी ढमाले यांनी मागणी करूनही त्यांना पुस्तक देता आले नाही. त्यामुळे त्यांची ऑर्डर नोंदवून घेऊन त्यांना मुंबईत गेल्यावर पुस्तक पाठविण्याचे ठरविले. (पुढे मुंबईत आल्यावर त्यांना सत्वर पुस्तक पाठविले !)
पुस्तक प्रकाशनानंतर मला वाटले की, आमचे पापाजी (गुर्विंदरसिंग) हे मराठी पुस्तक कशाला वाचत असतील ? म्हणून त्यांना तसे सांगून मी त्यांच्या कडील प्रत परत मागितली, तर ते म्हणाले मला मराठी बोलता, वाचता येते. वाचेल मी हे पुस्तक. निदान आमची गाईड लु विन तर मराठी पुस्तक नक्कीच कधी वाचणार नाही, कदाचित टाकूनही देईल म्हणून, तिला पुस्तक परत मागितले तर ती म्हणाली, हे पुस्तक माझ्या हस्ते प्रकाशित झाले आहे म्हणून मी ते आयुष्यभर आठवण म्हणून जपून ठेवणार आहे. अशा या दोन अनुभवांनी मलाच माझ्या कद्रूपणाची लाज वाटली.
या पुस्तक प्रकाशनाचा त्वरित स्वतंत्र वृत्तांत तयार करून तो लागलीच, त्या दिवशी आपल्या या पोर्टल वर प्रसिध्द करण्यात आला. तसेच अनेक वृत्तपत्रांकडे प्रसिध्दीसाठी पाठविण्यात आला. विशेष म्हणजे या अनोख्या पद्धतीने झालेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमास वृत्तपत्रांनीही भरभरून प्रसिध्दी दिली.
या निमित्ताने या सर्व वृत्तपत्रांचे मनःपूर्वक आभार.
क्रमशः
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ +919869484800