अष्टाक्षरी
नातं मैत्रीचं असतं
स्वच्छ, नि:स्वार्थी, निर्मळ
भर स्नेहाने ओंजळ
बंध मैत्रीचा नितळ……..१
मैत्री अनोखा सोहळा
असे नात्यात ओलावा
भार टाक खांद्यावर
जेथं मिळतो विसावा……..२
सुख आणि दु:खातही
मित्र देतसे आधार
नाही कधीच अपेक्षा
नसे नात्यात विकार……..३
बंध अतूट नात्याचा
जोड त्याची ह्रुदयाशी
साथ, सहवास, ओढ
थेट जुळते मनाशी……….४
धागा नाही तुटणारा
मैत्री अनमोल ठेवा
नसे तेथे हेवा दावा
जिव्हाळ्याचा मोठा मेवा…….५
मैत्री हा प्रेमाचा झरा
झिरपतो ह्रुदयात
नाद तयाचा गुंजतो
माझ्या मन गाभाऱ्यात………..६
.
मैत्री असा अलंकार
मिरवावा आयुष्यात
नात सुह्रद मैत्रीचे
जपायच ह्रुदयात…………..७
— रचना : डाँ दक्षा पंडित. सँनडिआगो, अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सुंदर