सिद्धार्थच्या मातेने सुख, समृद्धी, ऐश्वर्य,
राजयोगाचे राजवैभव, आनंद, सुखोपभोगाचे
भरजरी रेशमी, सोनेरी तलम
मौल्यवान धाग्यांचे जीवनवस्र
सिद्धार्थकरिता मायेने विणले
त्यात दुःखाचा एकही धागा नव्हता
सिद्धार्थ ऐहिक सौख्यात लिप्त होता
तो सुखमय संसारात मग्न होता
जीवनात स्वर्गिय आनंद होता
राजकुमार राजवैभवात धुंद होता
एक दिवस अचानक सिद्धार्थ
राजप्रासादातून बाहेर जगात
उत्सुक मनाने फिरायला गेला
आंतरिक संवेदनेने अचंबित झाला
मनातून अंतरातून विव्हळला !
दुःख, वृद्धत्व अंत हेच जीवन !
मनातून अंतरातून विव्हळला
मंथन चिंतन एकांत एकाग्रतते
बाह्य जगात, आंतरिक विश्वात
सत्य, अहिंसा, शांतता, प्रेम करूणा
विविध रंगी सुंदर सुगंधी धागे गवसले
सिद्धार्थने ऐहिक सुखाचे
जुने जीवन वस्र फेकून दिले
एक नवीन मौलिक वस्त्र विणायला घेतले
चिरंतन शांतीचे, अनुपम प्रेमाचे, आत्मशांतीचे
अमूल्य निर्मल शाश्वत वस्र !
ज्ञान, प्रकाशाचे, विश्वशांती, विश्वकल्याणाचे
विशाल विरागी वस्र !
हे अमूल्य धागे विश्वभर
जनमानसात त्यांनी वाटून दिले.
सिद्धार्थ गौतमबुद्ध झाले
— रचना : मीना खोंड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800