यश भेटले अपयशाला
गमतीजमती सांगायला,
यशाचे काही खरे नव्हते
चित्त त्याचे थाऱ्यावर नव्हते
गमतीत होता तो गुंग
ऐकताना अपयश होते दंग
गुंतागुंत त्याची आणि गर्वाची
झाली कोंडी दोघांची
धुंदीत यशाला दिसत नाही
लाज आहे अपयशाची
यात काही वाद नाही
हवाहवासा मी या जगाला
पुरता लावतो कामाला
इच्छा नसेल तर मी जातो
सोबत दोघं बसले होते
गप्पा होत्या सुरू
मैफिल त्यांची रंगली
बोलणे होते चुरुचुरू
माज असलेल्या यशाला
नुसते बोलायचे होते
लाज असलेल्या अपयशाला
शांतच राहायचे होते
सारे बोलून झाले यश आता थकून गेले
वदला नाही म्हणून अपयशाला त्याने पुसले ?
गप्प असा का बोल काही तरी …..
अपयश म्हणाले मित्रा तुझ्याशिवाय तर
आपल्यात दुसरे कोणी बोलतच नाही
स्मित केले त्याने कंठ त्यास फुटला
आरसा दाखवू याला निर्णय त्याने घेतला
तू आहेस म्हणून सारे जग आहे
उदयाला येणाऱ्या सूर्यासारखे,
तुझे अस्तित्व आहे
माझे असणे सुद्धा नको असते
पण नियतीचा नियम आहे,
उदयाला आलेल्याला अस्ताला जावेच लागते
आधार माझाच लागतो तुझ्यापर्यंत पोहोचायला
कारण रात्रच पूर्ण करते उजेडाला
लख्ख डोळे उघडले यशाचे
घर खाली आले गर्वाचे
अभिमान कसला बाळगु मी
तुझ्या येण्यानेच पूर्ण होतो मी

— रचना : सायली शेंडे.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
Thank you
सुरेख रचना 👌👌💐👍
सायली यश आणि अपयश या बद्दल लिहिलेली काविता फारच सुंदर आहे. अपयश अनुभवल्यांतरच यशाची खरी किंमत कळते. मला खूपच आवडली तुझी कविता.