Monday, February 17, 2025
Homeबातम्या"यांत्रिकाच्या सावल्या" प्रकाशित

“यांत्रिकाच्या सावल्या” प्रकाशित

किर्लोस्कर उद्योग समूहाचे माजी महाव्यवस्थापक तथा पहिले इंजिनिअर शंभोराव जांभेकर, त्यांच्या पत्नी गंगाबाई, या दोघांचे पुत्र तथा कम्युनिस्ट नेते आणि संपादक रामकृष्ण जांभेकर तसंच त्यांच्या पत्नी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पहिल्या महिला सदस्य सुहासिनी जांभेकर (काँग्रेस च्या जेष्ठ नेत्या सरोजिनी नायडू यांच्या भगिनी) यांच्या कार्य कर्तृत्वाचे सखोल संशोधन करून, अतिशय परिश्रमपूर्वक लेखिका – पत्रकार प्रज्ञा जांभेकर यांनी लिहिलेल्या “यांत्रिकाच्या सावल्या” हे पुस्तक नुकतेच जेष्ठ पत्रकार तथा माजी खासदार कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक विनय हर्डीकर तसंच सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, लेखिका प्रज्ञा जांभेकर आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा लेखिकेचे पती संदीप चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच मुंबईत झाले.

प्रारंभी लेखिका प्रज्ञा जांभेकर यांनी हे पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा, त्यासाठी घेतलेले परिश्रम, या कामी सहकार्य केलेल्या व्यक्तींचे योगदान या विषयी सहज संवाद साधत, वारसा हा फक्त वस्तू, वास्तू, रक्ताच्या वा सख्ख्या नात्यांचाही नसतो तर तो असतो विचारांचा आणि कार्य कर्तृत्वाचा असं सांगितलं. कुमार केतकर यांनी ऐनवेळी केलेल्या सूचनेनुसार प्रज्ञा जांभेकर यांनी पुस्तकातील काही महत्वाचे उतारे छान वाचल्याने सभागृहातील वातावरण भारावून गेले.

“आर्थिक विकासातून सामाजिक योगदान देणं हे दुर्मीळ असून महिंद्रा आणि किर्लोस्कर समूहानं ज्ञानाधिष्ठित सुशिक्षित भांडवलशाहीच्या मॉडेलप्रमाणे उद्योगांचं जाळं देशात तयार केलं”, असं विनय हर्डीकर यावेळी म्हणाले. हे पुस्तक
वाचून आपण इतके भारावून गेलो की, पुस्तकाचे नाव, “यांत्रिकाच्या सावल्या” या ऐवजी “यांत्रिकाचा प्रकाश” असे असायला हवे होते, सांगितले.

“भारतीय उद्योजकतेचा सगळा दीडशे- दोनशे वर्षांचा इतिहास या पुस्तकातून आपल्यासमोर उभा राहतो” असं मत गौतम ठाकूर यांनी व्यक्त केलं. हे पुस्तक नव्या उद्योजकांनी अवश्य वाचले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी शेवटी व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषण करताना कुमार केतकर यांनी प्रगत विचारसरणीच्या, सामाजिक भान असलेल्या उद्योगपतींनी आपल्या विचारसरणीवर ठाम राहात भारतीय उद्योजकतेचा पाया रचला, असं प्रतिपादन करून घेतला आजच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक परिस्थितीचा आढावा विस्ताराने सादर केला.

या कार्यक्रमात सदामंगल पब्लिकेशन ने प्रकाशित केलेल्या, या पुस्तकाच्या निर्मितीत मोलाचं योगदान दिलेल्यांचा सत्कारही करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा लेखिका प्रज्ञा जांभेकर यांचे पती संदीप चव्हाण यांनी
अतिशय हसत मुखाने केले.

ऑपरेशन एक्स

याच कार्यक्रमात लेखिका प्रज्ञा जांभेकर यांनी कुप्रसिद्ध अतिरेकी अजमल कसाब याच्या वर लिहिलेल्या आणि गाजलेल्या
“ऑपरेशन एक्स” या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, लेखक, प्रसार माध्यम प्रतिनिधी, संदीप चव्हाण व प्रज्ञा जांभेकर यांचे आप्त, मित्र, चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments