Monday, September 9, 2024
Homeलेखयाकुबजी, आप जियो हजारो साल…

याकुबजी, आप जियो हजारो साल…

१९९२ पर्यंत दूरदर्शन ही एकमेव वाहिनी होती. त्यामुळे दूरदर्शन ची प्रचंड क्रेझ होती. घरोघरी सर्वांचे डोळे दूरदर्शन वर खिळलेले असायचे. थोडी जरी काही चूक झाली तरी दूरदर्शन च्या ड्युटी रूम चा फोन खणखणायचा. त्याची चर्चा दुसऱ्या दिवशीच्या सकाळी साडे दहा वाजता होणाऱ्या प्रोग्राम मीटिंग मध्ये व्ह्यायची. त्यामुळे आपला “पंचनामा” होऊ नये म्हणून सर्व निर्माते, सहायक निर्माते फार दक्षतेने कार्यक्रम निर्मिती करीत असत.

अशा या ताणतणावाच्या परिस्थितीत एक व्यक्ती कधी विचलित होत नसे. ती व्यक्ती म्हणजे त्यावेळी डेप्युटी डायरेक्टर असलेले श्री याकूब सईद साहेब. ते वरिष्ठ अधिकारी असून ही टिपिकल “बॉस” म्हणून न वागता सर्वांशी मित्त्रत्वाने, आपुलकीने वागायचे, बोलायचे. अडी अडचणी समजून घ्यायचे. त्यामुळे सर्व स्टाफ त्यांना साहेब, सर म्हणायच्या ऐवजी “याकुबजी” असेच प्रेमाने म्हणत असे. पुढे ते कलकत्ता दूरदर्शन केंद्राचे संचालक म्हणून पदोन्नत झाले आणि तीस वर्षांपूर्वी निवृत्त झाले. ते नोकरीतून निवृत्त झाले पण त्यांनी नवे करिअर सुरू केले ते म्हणजे हिंदी चित्रपटात विविध भूमिका करणे त्यांनी सुरू केले आणि आज ही करीत आहेत.

श्री याकूब सईद

अशा या याकूबजींचा वाढदिवस काल पुणे येथील पूना क्लब मध्ये कुटुंबीय, आप्त आणि दूरदर्शन ची मित्रमंडळी यांच्या समवेत अतिशय अनौपचारिक, उल्हासाच्या वातावरणात साजरा. कुठलीही भाषणबाजी नाही, काही आखीव रेखीव कार्यक्रम नाही तर एकमेकांना भेटणे, बोलणे, गप्पागोष्टी असं सर्व छान स्वरूप होतं. नव्वदीतही माणूस क्रियाशील राहू शकतो हे याकूबजीनी दाखवून दिलं. त्यांच्या कडून हीच प्रेरणा घेऊन आम्ही तिथून निघालो.

अल्प परिचय : ‘नटरंग’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस,’ याकूबजींचा जन्म १४ जुलै १९३४ रोजी पुणे येथे झाला. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मात्र सहजासहजी झाले नाही. त्यांच्या शाळेसमोर असलेल्या ‘शालिमार फिल्म स्टुडिओ’ मध्ये शाळा शिकून ते काम करत. डब्ल्यू. झेड. अहमद हे त्या स्टुडीओ चे मालक होते. त्या मुळे मोतीलाल, श्यामा, पृथ्वीराज कपूर हे सगळे थोर कलाकार, कृष्णा चन्दर, अली सरदार जाफरी, जोश मलिहाबादी, अख्तुरल इमाम, असे लेखक-कवी तिथे नियमितपणे येत असत. शाळा शिकून काम करतो म्हणून याकुब हा अहमद यांचा आवडता नोकर होता. संध्याकाळी काम करायचे आठ आणे किंवा रुपया मिळत असे. हे झाल्यावर रात्री ‘शिरीन’, ‘अपोलो’, ‘ऑडियन’, ‘कॅपिटल’ या थिएटर्सवर चित्रपटांच्या गाण्यांची पुस्तकं ते विकत असत. ‘बरसात एक आणा, बरसात एक आणा’ असं करता करता ते एम.ए. झाले.

पुढे याकूब सईद १३ डिसेंबर १९५८ रोजी कार्यक्रम अधिकारी म्हणून पुणे आकाशवाणीत रुजू झाले. पुढे दूरदर्शन सुरू करण्याच्या आधी त्यांची सेवा आकाशवाणी मधून दूरदर्शन कडे वर्ग करण्यात आली. दिल्ली येथे त्यांनी या नव्या माध्यमाचे रितसर प्रशिक्षण घेतले आणि मुंबई दूरदर्शन केंद्रात निर्माते म्हणून रुजू झाले.

२ ऑक्टोबर १९७२ रोजी सुरू झालेल्या दूरदर्शन केंद्राच्या पहिल्या दिवसाची धांदल, गडबड ही त्यांच्या कडून ऐकण्यासारखी असते. त्यांनी सतत बहारदार कार्यक्रमांची निर्मिती केली. बबन प्रभू यांच्या सोबत त्यांनी १९७३ ते ७६ या दरम्यान “हास परिहास” हा अत्यंत विनोदी कार्यक्रम सादर केला. या दोघांच्या भूमिका जुन्या प्रेक्षकांच्या अजून लक्षात आहेत ! पुढे बबन प्रभू यांच्या अकाली निधनाने हा कार्यक्रम बंद झाला.

पुढे याकूब जी सहायक केंद्र संचालक, उपसंचालक म्हणून प्रशासकाच्या भूमिकेत शिरले. कलकत्ता दूरदर्शन केंद्रातून ते संचालक म्हणून १९९४ साली निवृत्त झाले.

निवृत्तीनंतर याकूबजींची दुसरी इनिंग तर आणखीन जोरदार ठरली. ‘लगे रहो मुन्नाभाई’ पासून चित्रपटात अभिनय करायला सुरुवात करून बघता बघता आजवर हिंदी-मराठी मिळून ४० चित्रपटांत त्यांनी विविध रंगी, आशयपूर्ण भूमिका केल्या. ‘नटरंग’, ‘जॉली एल एल बी -२’ ‘हॅटट्रिक’, ‘कॉर्पोरेट’. या हिंदी तर ‘नटरंग’, ‘अडगूळ मडगूळ’, ‘राक्षस’, ‘सेट्रीका’, ‘येरे येरे पैसा’, ‘एकविरा देवी’, ”भानामती” या मराठी चित्रपटातील भूमिका विशेष गाजल्या.

याकूबजींचे ‘मुंगीची सावली’ हे आत्मचरित्र, ‘हास परिहास’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. याकुबजींना एक मुलगी असून त्या डॉक्टर आहेत. तर नात ही माध्यम क्षेत्रात कार्यरत आहे.

अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या याकूबजींना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. नमस्कार, याकूब सर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो🙏असे ऑफिसर लाभणे दुर्मिळ 👏

  2. भुजबळ सर, याकूब सईद यांच्याविषयी छान माहिती मिळाली. पूर्वी “रसरंग” नावाचं सिने साप्ताहिक निघत असे. त्याच्या जोडीला काही वर्ष “चित्रानंद”नावाचं सिने साप्ताहिक निघत असे ज्याचे संपादक याकूब सईद होते. ज्येष्ठ नट आणि श्रेष्ठ दिग्दर्शक राजा परांजपे यांच्या निधनानंतर चित्रानंदने त्यांच्यावर एक विशेषांक छापला होता जो बरीच वर्षे माझ्या संग्रही होता.

  3. एक अधिकारी असूनही सहका-यांशी
    माणुसकीची वागणूक देणारे याकूब साहेब यांचे जीवन सुंदर शब्दबद्ध केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments