Saturday, July 27, 2024
Homeलेखयुवकांनो, अंतर्मुख व्हा !

युवकांनो, अंतर्मुख व्हा !

आज स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे.हा दिवस “राष्ट्रीय युवा दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने युवकांना केलेले हे आवाहन आपल्याला नक्कीच प्रेरणादायी वाटेल…
– संपादक

स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकत्ता येथे झाला. स्वामी विवेकानंद यांचे संपूर्ण जीवन युवकांसाठी प्रेरणादायी आहे.
देशातील सर्व युवकांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन आपल्या देशाच्या उन्नती मध्ये सहभागी व्हावे यासाठी 12 जानेवारी 1985 पासून स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा दिवस राष्ट्रीय युवादिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. तेव्हापासून  प्रत्येक 12 जानेवारीला हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो.

तरुण पिढी ही प्रत्येक देशाची सर्वात मोठी संपत्ती आहे, असे आपण नेहमी म्हणतो.
जर खरोखरच तरुण पिढी ही आपली संपत्ती आहे, तर मग एक प्रश्न नकळतपणे डोळ्यासमोर उभा राहतो की, तारुण्य ही सर्वात मोठी संपत्ती प्रत्येक तरुणाकडे असताना आज आपल्या देशातील हजारो युवक इतके हताश आणि  निराश का…?
     
प्रत्येक तरुण  स्वतःच्या भविष्याबद्दल इतका उदासीन का…?
हजारो तरुणांचे पाय व्यसनाच्या मार्गावर का…?
रोज कोठून तरी तरुणांनी आत्महत्या केलेल्या बातम्या का…?
छोट्या छोट्या कारणावरून एकमेकांच्या जीवावर उदार झालेले तरुण का…?
एखाद्या व्यक्तीला पाठिंबा देणे वाईट गोष्ट नाही मात्र एखाद्या व्यक्तीच्या नावाने आपल्या नावाला प्रसिद्धी मिळावी म्हणून त्या व्यक्तीचा प्रचार करत फिरणाऱ्या तरुणांची संख्या इतकी जास्त प्रमाणात का…?
सर्वधर्मसमभाव हे वाक्य लहानपणापासून जरी कानावर पडत असले तरी झेंड्याच्या नावाखाली एकमेकांचा द्वेष करणारा तरुण वर्ग इतक्या जास्त प्रमाणात आजही प्रत्येक गावात का…?

आणि ह्या सर्वांमध्ये जर  सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न केला तर शंभर पैकी एक दोन तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन काही वेगळे करायचे ठरवले तरी त्यांना देखील भ्रष्टाचाराला बळी पडावेच लागते.
      
या सर्वात मग परत एक प्रश्न उभा राहतो आणि तो म्हणजे याला जबाबदार कोण…?
या प्रश्नाचे उत्तर देताना एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी नक्की सांगावीशी वाटते आणि ती म्हणजे आपण आपल्या डोळ्यासमोर एखाद्या गरीब व्यक्तीला श्रीमंत होत असतांना पाहत असतो तर दुसरीकडे एखाद्या श्रीमंत व्यक्तीला गरीब होताना देखील आपण पाहिलेले असते. त्यांच्याबद्दल थोडासा विचार केला तर एक गोष्ट डोळ्यासमोर येते आणि ती म्हणजे जे श्रीमंत होतात ते आपल्या संपत्तीचा वापर योग्य पद्धतीने करत असतात आणि जे गरीब होतात त्यांना आपल्या संपत्तीचा वापर योग्य पद्धतीने करता येत नाही.

अगदी ह्या उदाहरणाप्रमाणे प्रत्येक देशाची परिस्थिती झाली आहे. जो देश आपल्या देशातील युवाशक्तीचा योग्य वापर करत आहे तोच देश आज आपली वेगळी ओळख निर्माण करु शकत आहे.
समाजातील प्रत्येक घटकाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे की, वाईट मार्गाकडे जाणाऱ्या युवकांना दोष देत बसण्यापेक्षा देशातील युवा शक्तीचा वापर योग्य दिशेने कसा करता येईल ?
संपत्ती जरी किती मोठी असली तरी त्याचा वापर करणारा योग्य नसेल तर ती स्वतः काही करू शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे आपल्या देशातील युवाशक्ती देखील असून नसल्यासारखी झाली आहे.

युवाशक्तीला योग्य दिशा देण्यासाठी  काय करणे आवश्यक आहे ? याचा विचार करणे आजची खरी गरज आहे.
युवा असणे म्हणजे एखाद्या ठराविक वयापर्यंत कधीच मर्यादित नसते. युवा असण्यासाठी आपली विचारशक्ती युवा असावी लागते. युवकांना त्यांचे कर्तव्य जोपर्यंत कळत नाही तो पर्यंत ते स्वतःला इतरांकडून जरी युवा म्हणून घेत असले तरी स्वतःच्या नजरेमध्ये आपण खरेच विचाराने युवक आहोत का..?
ह्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी प्रत्येक युवकाने काही प्रश्न स्वतःलाच विचारले पाहिजे आणि ते म्हणजे एखाद्या डोळ्यादेखत होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आपले रक्त सळसळते का…?

श्रद्धा हा जरी प्रत्येक धर्माचा विषय असला तरी आजही आपल्या समाजातील अशिक्षित वर्ग तसेच सुशिक्षित वर्ग देखील आपल्या डोळ्यादेखत अनेक वेळा अंधश्रद्धेला बळी पडतात. अशावेळी ह्या अंधश्रद्धेला दूर करण्यासाठी आपण काही करत आहोत का…?
आपल्याकडून समाजाला फायदा होईल असे कार्य आपल्या हातून घडत आहे का…?
आपण आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहोत का…? सर्वप्रथम आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या काळजीसाठी तरी आपण स्वतःला अनेक वाईट व्यसनांपासून दूर ठेवले आहे का…..? आपल्या अवतीभवती कितीही नकारात्मक वातावरण असले तरी एक दिवस आपण नक्की जिंकू असा आत्मविश्वास तुमच्यामध्ये अजूनही जिवंत आहे का..?
असे प्रश्न प्रत्येक तरुणाने स्वतःला विचारून स्वतःची ओळख स्वतः बनवून समाजाला तसेच आपल्या देशाला विकासाच्या शिखरावर नेण्याकरिता स्वामी विवेकानंद यांचे जीवन चरित्र डोळ्यासमोर ठेवून आपल्या मधील युवा शक्तीचा योग्य वापर केल्यास संपूर्ण राष्ट्रास राष्ट्रीय युवा दिवस साजरा केल्याचे खरे श्रेय लाभेल.

पूनम सुलाने

— लेखन : पूनम सुलाने- सिंगल
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८