Monday, February 17, 2025
Homeलेखयुवा पिढी : दुसरी बाजू

युवा पिढी : दुसरी बाजू

युवा पिढी म्हणजे देशाची आण, बाण, शान…..अतिशय हुशार, स्मार्ट, मल्टि टास्किंग स्किल धारक, आपल्या देशाचा कणा, आपला स्वाभिमान असलेले असे आहेत.

पण,कोठे काही अपघात घडला, दुर्घटना झाली अथवा वृत्तपत्रात किव्हा सोशल मीडिया वर एखाद्या युवकाविषयी नकारात्मक बातमी आली की सरसकट युवा पिढीला बदनाम केले जाते. असे का ……?

युवा पिढी वाया गेली, त्यांना शिस्त नाही, सहनशक्ती नाही, त्यांना कष्ट नको, त्यांना संस्कार नाही वगैरे वगैरे असे सतत शब्द ऐकायला अथवा वाचायला मिळतात. पण प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात, तशाच दोन बाजू आजच्या युवा पिढीला आहे. युवा पिढीची वाईट बाजू सतत सांगितली जाते, दाखवली जाते पण दुसरी चांगली बाजू का सांगितली जात नाही ? त्यावर कधी फारशी चर्चा का होत नाही ? या प्रश्नांचा आपण विचार केला पाहिजे.

खरे तर नकारात्मक गोष्टी खूप मोठ्या करून दाखवल्या जातात .त्यामुळे अनेकवेळा सकारात्मक गोष्टी नजरेआड होतात. सर्व युवा वर्गाला एकाच तराजूत तोलणे हे कितपत योग्य आहे ?
तुम्हीच सांगा.

आज गावातून अनेक मुलं, मुली शिक्षणासाठी मोठ्या शहरात येतात. गावी शिक्षणाची सोय नसल्याने दुसरा पर्याय नसतो. अगदी लहान वयात ही मुलं अनेक तडजोडी करून शहरात राहतात. लहान वयातील त्यांच्या या समजुतदारपणाचा कधी उल्लेखही होत नाही.
ही मुलं मुली हॉस्टेल वर राहतात अथवा पेईंग गेस्ट म्हणून राहतात अथवा दोन चार मुलं मुली एखादा फ्लॅट भाड्याने घेऊन राहतात. म्हणजे जसे परवडेल तसे. सगळ्या गोष्टी सोयीस्कर असतीलच असे नाही. मग अनेक तडजोडी, अनेक गोष्टीचा त्याग, संघर्ष आदी बाबी अगदी लहान वयापासून करायला शिकतात. म्हणजे परिस्थिती तशी शिकवते त्यांना.

या पिढीला निर्णय घेण्याचे स्वतंत्र आहे. स्वच्छंदी आयुष्य जगण्याचे स्वतंत्र आहे, हे चित्र दुरून खूप छान दिसतं. या मुलांना आई वडिलांचा धाक नाही, कोण येते बघायला, कधीही उठतात, कोठेही फिरतात, नुसती चंगळवादी झाली ही युवा पिढी….. असे अनेक आरोप, अनेक टोमणे हे सहन करतात. पण जरा दृष्टीकोण बदलला तर, थोडा त्यांच्या बाजूने पण विचार करून बघितला तर आपल्याला काय दिसते ?
लहान वयातील त्यांची धडपड, कुटुंबापासून दूर राहणे, एकटेपणा, स्ट्रेस, जीवघेणी स्पर्धा, रोजचा प्रवास, बाहेरचे बेचव जेवण, घर आवर सावर, धुणेभांडी, झाडू फरशी, स्वयंपाक करावा लागणे, अभ्यास करून या सर्व जबाबदाऱ्या पेलणे म्हणजे तारेवरची कसरत असते.

कधी कधी आपापसात कामाची वाटणी केली जाते. गरीब असो अथवा मध्यम वर्गीय, सर्वांना ही सर्व कामे करावीच लागतात. कारण मोठया शहरात तेवढी महागाई देखील असते. आर्थिक गणित बसवणे सोपे नसते.

अनेक मुलं स्वाभिमानी देखील असतात. त्यामुळे सर्व खर्चाचा भार पालकांवर न पडू देता स्वतः पार्ट टाईम नोकरी करतात. कधी शनिवार, रविवारी मॉल मध्ये जाऊन काही तरी काम करून आपल्या गरजा भागवतात. खूप दमतात, थकतात, मात्र हे कोणालाच दिसत नाही. का……?

स्वतःच्या हिमतीवर काही तरी करून दाखवण्याचे स्वप्न मनी घेऊन शहरात आलेली असतात ही मुलं मुली. बसने प्रवास करून त्या गर्दीतुन वाट काढत अगदी रोज चिकाटीने, जिद्दीने शिक्षणाची ही वाटचाल करत असतात.

बर, मुलींचे रोजचे जीवन तर अजूनच भयंकर. त्या सततच्या वाईट नजरा, uसततचे धोके.. अशा त्या मुलींना स्वतःचे रक्षण करणे वाटते तेवढे सोपे नसते.

अनेक मुलं मुली तर सण वार असेल तरच गावी जातात. अशा वेळी गाड्यांना प्रचंड गर्दी असते. म्हणजे हा घरी जाण्याचा प्रवास देखील सुखकर नसतो. प्रचंड मनस्ताप. त्या रांगा ….बर प्रायव्हेट गाडीने प्रवास म्हणजे त्यांचे तिकिट तिप्पट, चौपट असते. नुसता बाजार मांडला या लोकांनी….कसे परवडणार ते विद्यार्थ्यांना ? मन मारून गावी जाण्याचा बेत रद्द करावा लागतो अथवा टेम्पो, ट्रक जे वाहन मिळेल त्यातून जावे लागते. मुलींना तर तेही शक्य नसते. ही बाजू मात्र कोणालाच कधी दिसत नाही ! यावर कधी चर्चा नाही…..!!

आपल्या माणसांपासून दूर राहणे, नवीन शहरात जुळवून घेणे, त्यांची ही खूप घालमेल होते. हे पडद्यामागील सत्य कोणालाच दिसत नाही.
आजारी पडल्यावर आईचा मायेचा हात प्रत्येक वेळी या मुलांच्या नशिबात नसतो. तेव्हा जोडलेल्या नव्या मित्र मैत्रिणीच त्यांचा आधार असतात. लहान वयातील त्यांच्या या समजुतदारपणाचे कधीच कोणी कौतुक करत नाही आणि खरं सांगू का या पिढीला लोक काय म्हणतील ? याचा विचार तेही फारसा करत नाही……..
म्हणजे असा विचार करायला त्यांच्याकडे वेळ ही नसतो म्हणा. कॉलेज, क्लास, प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट्स यातच त्यांचा दिवस, महिने व वर्ष कसे जातात हे त्यांनाच कळत नाही. परीक्षेच्या वेळी ते रात्र रात्र जागून अभ्यास करतात.

ही तरुण पिढी जरी वरकरणी प्रॅक्टिकल वाटत असली तरी खूप प्रेमळ आहे. स्वावलंबी व धाडसी आहे. रोज नवे आव्हान पेलवण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे .ती रडण्यापेक्षा लढण्यावर भर देते. एकमेकांना मदतीचा हात देते.
शिवाय त्याबद्दल कोणतीही अपेक्षा नसते. अगदी निखळ व प्रामाणिक मैत्री असते.

ही पिढी अतिशय हुशार असल्याने हार्ड वर्क बरोबर स्मार्ट वर्क देखील करते. नवीन गोष्टी शिकण्यात व दुसऱ्यांना देखील तितक्याच आनंदाने शिकवण्यात त्यांना रस असतो. निंदा, इर्षा, द्वेष, तुलना या नकारात्मक गोष्टीत या युवकांना रस नसतो.
मतभेद असू शकतात पण मनभेद नसतो. ते प्रत्येकाच्या विचारांचा व निर्णयाचा आदर करतात. त्यामुळे अपेक्षांचे ओझे एकमेकांवर लादत नाही आणि यांचे सगळ्यांशी छान जमते जणू एकटे राहून जगण्याचे सूर गवसले असतात.

ही पिढी अतिशय स्पष्ट, ठाम असली तरी खूप भावनिक देखील आहे. आपल्या मित्र मैत्रिणीच्या वाईट वेळेला धावून जाणारेu हे कायम एकमेकांच्या सोबत असतात. एकमेकांना आधार देतात. हक्काने रागावतात, चिडतात व मदत देखील करतात.

पालकांनी आपला काळजाचा तुकडा लांब शहरात पाठवलेला असतो कारण त्यांनी खूप शिकून उज्वल भविष्य घडावे. अनेक मुलांना याची जाणीव असते. सांगत अथवा दाखवत नसले तरी पालकांच्या, शिक्षकांच्या अपेक्षांचे ओझे घेऊन ही पिढी वावरत असते.उज्वल भविष्यासाठी सतत प्रयत्नशील असते.आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेते. त्यांच्या कष्टाची जाणीव मुलांना देखील असते. त्यामुळे दहा दहा तास अभ्यास करून आपल्या पालकांच्या चेहऱ्यावरील ते समाधान व आनंद पहाण्यासाठी मनापासून धडपडत असतात.

सामाजिक कार्यात देखील ही युवा पिढी नेहमीच पुढे असते. गोरगरिबांना अथवा गरजवंतांना आपल्या परीने मदत करायला ही युवा पिढी तत्पर असते. मग…..श्रीमंत वर्ग असो अथवा गरीब ही युवा मंडळी अगदी सढळ हाताने मदत करतात. आपल्या कमाईतला छोटासा भाग सामाजिक कार्याला देतात. त्यांना हा मोठेपणा मिरवण्याचीही अजिबात इच्छा नसते.

शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीचा शोध ! मग तेथेही पुन्हा स्पर्धा, रोज नवीन आव्हान… हे चक्र चालूच असते. अशी ही आजची युवा पिढी, फार थोड्यांना कळणारी.

रश्मी हेडे

— लेखन : रश्मी हेडे.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments