Wednesday, October 9, 2024
Homeलेखरक्षाबंधन

रक्षाबंधन

भावाबहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव समस्त भारतभरात खास श्रावणमासात पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. याला महाराष्ट्रात नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी नारळापासून बनवलेल्या गोड पदार्थाने बहिण भावाचे तोंड गोड करते. भावाचे औक्षण करून हातावर प्रेमाने राखी बांधते. भावाच्या चेहेऱ्यावर आनंदाचा भाव बघणे बहिणीसाठी सुखा समाधानाचे असते. आणि एकीकडे लाडक्या बहिणीसाठी तिच्या आवडीची भेट वस्तू आणून तिला अनपेक्षितपणे देताना तिला हर्षित होताना पहायची इच्छा भावाची पण तितकीच असते. आईवडिलांची शिकवण, संस्कार या रूपात पुढेही जोपासायची तयारी आजच्या दिवशी घेतली जाते.

नात्याला बंधन घालून एकमेकांना दिली जाणारी वचने रक्षाकवच सारखी शेवटपर्यंत साथ देण्याची असतात. ही आपल्या हिंदू संस्कृतीत चालत आलेली परंपरा आहे आणि जी वर्षानुवर्षे अशीच चालत राहील. पण जिथे पालकांना एकच अपत्य असल्यास, अपत्यात बहिण किंवा भाऊ नसल्यास आईवडील शेजार पाजरांच्या किंवा काका, मामा, मावशी असे नात्यातले बहिण भावांशी नाते जुळवून हा सण साजरा करतात. वयात आलेल्या मुलामुलींनी एकमेकांबरोबर वावरताना आचरणात संयमीपणाचा मूळमंत्र घ्यायचा असतो जो आपल्या हिंदू संस्कृतित दिला आहे.

स्त्री म्हणजे केवळ उपभोग ह्या दृष्टीने न पाहता तिच्याशी बहीणीचे नाते जोडून तिला सुरक्षित ठेवणे माझे कर्तव्य आहे असे प्रत्येक मुलाला घरातूनच शिकवले गेले पाहिजे. अश्याने पवित्र भाव निर्माण होऊन एकमेकास आदर राखण्याने विकसनशील समाज घडतो. नाहीतर घराबाहेर निघाल्यावर कोण कोणाच्या सोबती ? कायदा मात्र हुकमी..!

रक्षाबंधन या सणाची सुरुवात कशी झाली यावर अनेक प्रचलित पौराणिक कथा आहेत. बलीराजाच्या अहंकाराची श्रीविष्णू परिक्षा घेतात. त्याला तारण्यासाठी लक्ष्मीदेवी बलीराजाला राखी बांधून बलीची रक्षा करते.

देव दानवांच्या युद्धात दानवांना घाबरून इंद्र बृहस्पतीं कडे येतात तेव्हा हे आयकून त्यांची पत्नी इंद्रायणी आपल्या पतीला मंत्राच्या शक्तीने रेशमी धागा बांधून रक्षा करते.
महाभारतातल्या शिशुपालवध या प्रसंगात द्रौपदी आपल्या सखा मानत असलेल्या सुदर्शन धारी श्रीकृष्णाच्या करंगळीवर जखम होताच आपल्या साडीच्या पदरेची चिंधीफाडून ताबडतोब कृष्णाला बांधते. त्याची परतफेड द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगात श्रीकृष्ण आपल्या मानलेल्या बहिणीच्या हाकेला धावत येतात. बहिण भावाच्या पवित्र नात्याचा हा प्रसंग आहे.
तसेच महाभारतात कौरव पांडव युद्ध प्रसंगी कुंती माता आपल्या पौत्र अभिमन्युच्या हातावर रक्षाकवच बांधते.
मेवाडची राणी कर्णावती बहादुरशाहच्या आक्रमणापासून मेवाडला वाचविण्यासाठी हुमायुला राखी पाठवून आपल्या राज्याच्या रक्षेचे संकेत करते. पण आजकाल युद्ध काही आधीसारखे राहिले नाहीत. रसत्या रस्यावर, गल्लो गल्लीत तसेच घराघरात जास्त पहायला मिळतात. तेव्हा नेमकी नात्यातली विण घट्ट करणे गरजेचे वाटते. कारण जेव्हा सर्वत्र एकलकोंडी पडलेली माणसे दिसतात. कुटुंब असून कोणाचे कोणाशी पटत नसल्याचे अनेक कारण सापडतात. एका घरात भावंडांनी वेळ प्रसंगी एकमेकांच्या विरोधात उभे न राहता त्यांनी एकत्र यावे या हेतूने रक्षाकवच बांधणे ही काळाची गरज आहे. नाही का? समाज बदलण्यासाठी घरापासून सुरुवात करायला पाहिजे हे तितकेच खरे. कौटुंबिक नात्याची विण घट्ट झाली की विश्व हे माझे घर या प्रमाणे देखील आपोआप समाजात परिवर्तन येणार आहे.

राखी बांधणे ही कौटुंबिक तशीच भावनिक गरज आहे जी एकमेकांच्या हातावर वचने देऊन बांधली तर सैल पडलेली नाती घट्ट होतील. जगास तोंड देण्या खुमारीने चार मदतीचे हात येतील. पाश्चात्य संस्कृतीत फ्रेंडशिप बॅन्डची कल्पना काही अशीच आली असणार. फरक मात्र इतकाच आहे की अनुरूप ग्रहांच्या साक्षीने रक्षाबंधनाच्या उपयुक्त दिवशी पौराणिक कथांना सामावून घेणारे आपल्या संस्कृतीतील विशेष श्लोक, बोधवचने यांचे पठन करून राखी बांधून घेतल्याने या सणाचे पावित्र्य अधिक वाढते. आपण याला कृती करण्या अगोदरची जागृकता म्हणू शकतो. ऐतिहासिक पातळी कळल्यावर ज्ञानात भर तर पडतेच तशीच जाणीवपूर्वक समजून केलेली कृती नक्कीच फलदायी ठरते.

अखेर, परिवर्तन हाच संसाराचा नियम. चला तर मग वेळप्रसंगी समंजसपणे सण साजरा करत जाऊ. आपणहून समाजात थोडे बदल घडवू. रक्षाबंधन या सणाच्या आपल्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

  • — लेखन : दिपाली महेश वझे.
  • — संपादक : देवेंद्र भुजबळ.
  • — निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments