Saturday, April 20, 2024
Homeयशकथाराजाराम गो जाधव : एक विलक्षण व्यक्तिमत्त्व

राजाराम गो जाधव : एक विलक्षण व्यक्तिमत्त्व

गेल्या अनेक दिवसांपासून रा. गो. जाधव हे नाव, प्रा न. मा. जोशी सर व मा.प्रा. बी. टी. देशमुख सर यांच्या कडून ऐकत होते. नुकतेच त्यांच्या चंद्रकला कादंबरीचे प्रकाशन पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर टी सी राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जेष्ठ पत्रकार प्रा न. मा. जोशी, यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळला झाले.

न्युज स्टोरी टुडे ने प्रकाशित केलेली चंद्रकला ही कादंबरी मी जेंव्हा वाचायला घेतली, तेंव्हा श्री श्रावण सोनोनेजी यांनी लिहीलेली संक्षिप्त परंतु सुंदर प्रस्तावना नजरेखालून घातली आणि या छोट्याशा प्रस्तावनेतील विचार आणि सदर कादंबरीचे खुद्द लेखक यांचे मनोगत वाचल्यानंतर माझी उत्सुकता ताणल्या गेली. माझ्या घरची कामे आटोपून मी एकाच फटक्यात ही कादंबरी वाचून काढली. त्यावेळी एक एक प्रकरण वाचता वाचता लेखकाने “चंद्रकले” च्या संघर्षपूर्ण जीवनातील मांडलेले वास्तव वाचून थक्कच झाले. कारण, कादंबरीतील संपूर्ण पात्रे काल्पनिक नसून ती खरीखुरी आहेत हे मात्र वास्तव आहेत.

आपल्या संघर्षमय जीवनातून स्वतःची वाट शोधणाऱ्या, स्वतः शिक्षिका म्हणून काम करताना आपले अस्तित्व टिकविणाऱ्या चंद्रकला भगत सहकुटूंब ह्या कार्यक्रमाला हजर होत्या हे वाचून ह्या नायिकेबद्दल व लेखकाबद्दल अधिक जाणून घेण्याची माझी कमालीची उत्सुकता वाढली. पुढे श्री रा. गो.जाधव ह्यांचा जीवनपट जाणून घेतल्यावर त्यांच्याबद्दल आपण काहीतरी लिहिले पाहिजे नव्हे, इतक्या संवेदनाशील व्यक्तीचा जीवनपट लोकांसमोर आणला पाहिजे असा मनात विचार आला म्हणून हा लेखन प्रपंच !
रा. गो.बद्दल असलेल्या माझ्या भावना प्रगट करण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न वाचकांना आवडेल अशी आशा आहे.

रा. गो चा जन्म दारव्हा तालुक्यातील लाखखिंड ह्या लहानशा गावातला!त्याचे सातवी पर्यंतचे शिक्षण गावातच झाले. आठ ते दहावीपर्यंत दिग्रस तालुक्यात मोख (बोरी) येथे शिक्षण घेऊन पुढे पुसदच्या फुलसिंग नाईक महाविद्यालयात त्यांनी बीए पर्यंत शिक्षण घेतले, पुढे इंग्रजी वाङ्ममय ह्या विषयात एम ए करण्यासाठी नागपूर येथे आले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच स्वतः कष्ट करण्याची आवड व क्षमता ह्यामुळे त्यांची राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अखिल भारतीय स्तरावरील नॅशनल इंटीग्रेशन कमिटीवर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून १९८०-८१ या वर्षी निवड झाली होती. विशेष म्हणजे त्यांना अभ्यासाबरोबरच नागपूर विद्यापीठाचे एन.एस. एस. चे सर्वोत्कृष्ट कॅडेट म्हणून १९८०-८१ यावर्षी सन्मानित करण्यात आले.

लेखकाची शिक्षण घेण्याची आवड आणि जिद्द ह्या सोबतच त्यांच्या पाठीशी होते त्यांच्या प्रेमळ आईवडिलांचे आशीर्वाद ! आपला मुलगा खूप शिकून मोठा अधिकारी व्हावा ही त्यांची आंतरिक इच्छा !,
प्राथमिक शिक्षण जरी सहजरीत्या झाले असले तरी पुढील शिक्षण घेतांना आलेल्या अनेक आर्थिक अडचणी कमी नव्हत्या ! शिवाय बंजारा जातीत जन्माला आलेल्या ह्या गुणवंत लेकराचे जीवन उपेक्षित असू नये ही मायबापांची तळमळ ! रा. गो. नी आई-वडिलांनी केलेल्या कष्टाचे, त्यागाचे सोने केले. आपल्या विद्वत्तेच्या जोरावर राजारामनी शासनाच्या वेगवेगळ्या खात्यात काम करत, त्या त्या विभागात आपल्या प्रशासकीय कामाचा ठसा उमटवून पुढे उच्च शिक्षण विभागात सहसचिव या पदापर्यंत पोहोचले. उच्च शिक्षण विभागातील प्रशासकीय कामे व जबाबदारी सांभाळत असताना अनेक शासन निर्णयावर राज्यपालांच्या वतीने सहसचिव म्हणून सही करणे हे जोखमीचे, जबाबदारीचे काम त्यांनी आपल्या हुशारीने, कर्तव्य दक्षतेने अतिशय उत्कृष्टपणे निभावले. त्यांच्या विनम्र स्वभावाला सामाजिक बांधिलकीची जाण अधिकच शोभून दिसते. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास व जीवनाकडे पाहण्याचा त्याचा सकारात्मक दृष्टिकोण ही त्यांची खास वैशिष्ट्ये आहेत म्हणूनच न.मा.जोशी– एक श्रेष्ठ व जेष्ठ पत्रकार– रा गो . त्यांच्यापेक्षा लहान असूनही त्यांनी आपल्या माझे गुरुवर्य ह्या दैनिक हिंदुस्थान मधील लेखमालिकेत रा गों ना मानाचे स्थान दिले आहे. तो लेख आपण सगळ्यांनी वाचलाच असेल. ह्यात दोघांच्याही मोठेपणाचे निश्चितच दर्शन होते..

रा. गो. ना लहानपणापासूनच वाचन – लेखनाचा जबरदस्त छंद, त्यातच दुसऱ्यासाठी काही तरी करावे ही मनातली प्रबळ इच्छांशक्ती !! यातून त्यांच्या सामाजिक कार्याची सुरवात झाली. आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांनी त्यांचे कवी मन त्यांना स्वस्थ बसू देईना. नोकरीत असतांनाच २००४ मध्ये त्यांचा वादळवारा हा पहिला कवितासंग्रह तत्कालीन मुख्यमंत्री ना सुशीलकुमार शिंदे ह्यांच्या हस्ते प्रकाशित झाला. समाजातील वंचितांच्या समस्या समाजासमोर विशद करणाऱ्या ह्या संग्रहाच्या उज्ज्वल यशानंतर त्यांची लेखणी अधिक धारदार झाली, ह्याच वर्षी त्यांना म.ज्योतिबा फुले फेलोशीप हा पुरस्कार देखील नवी दिल्ली येथे मिळाला. पण त्यांचे मन समाजातील गरीबी, अंधश्रद्धा, अज्ञान, शिक्षण इ. इ. व्यवस्था पाहून अस्वस्थ होतात. याच विचाराच्या मनस्थितीतून त्यांचा २००५ मध्ये वाळवंटातील संधीप्रकाश हा सामाजिक विषयावरील ग्रामीण जीवन स्पष्ट करणारा लघुकथा संग्रह प्रकाशित झाला. डॉ सुभाष भेंडे ह्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ह्या सोहळ्याला डॉ ग. वा. करंदीकर, राष्ट्रीय कीर्तनकार प्रा. न. चि. अपामार्जने, समाजातील मोठे अधिकारी आणि मित्रपरिवार अशी नामांकित मंडळी रा. गो. च्या प्रेमापोटी आवर्जून उपस्थित होती.

आपले कुटुंब व आपली मुले ह्यांना समाजात प्रतिष्ठेचे स्थान मिळावे म्हणून दिवसरात्र स्वप्न पाहणाऱ्या आपल्या पूज्य व प्रिय पित्याच्या ऋणातून थोडे तरी मुक्त व्हावे या उद्देशाने आपल्या वडिलांचे जीवनचरित्र सांगणाऱ्या अंधार यात्रीचे स्वप्न ह्या पुस्तकाचे त्यांनी २०२१ मध्ये प्रकाशन केले .

रा . गो. जाधव हे ऑगस्ट २०१६ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या सहसचिव ह्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही यशदा पुणे या प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये, शासकीय- प्रशासकीय (प्रोबेशनरी) अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी व्हिजिटिंग फॅकल्टी — अतिथी अध्यापक म्हणून त्यांना अतिशय सन्मानाने वेळोवेळी निमंत्रित केले जाते. ही अतिशय गौरवाची बाबा आहे पण रा गो खुप नम्रतेने सांगतात ‘जरा दिल्लीला जाऊन आलो.’

त्याचे नाव राजाराम ! आपल्या कृतीने ते सार्थ करतात.
खरंच रा. गो. ची नम्रता बोलण्यातील विनय पाहून म्हणावेसे वाटते, वृक्ष फार लवती फळभारे शासकीय सेवाकाळात त्यांना आलेले अनुभव व आठवणीं त्यांनी आपल्या अजिंक्य वीर या पुस्तकात सांगीतल्या आहेत. सदर पुस्तक हे अतिशय वाचनीय आहे. ह्या पुस्तकातून आजच्या तरुण पिढीतील युवक – विद्यार्थ्यां व अधिकारी – कर्मचारी वर्गाला बोध घेण्यासारख्या ब-याच काही गोष्टी असून त्यामध्ये सकारात्मक विचार मांडलेले आहे. हे पुस्तक त्यांच्या लेखन कौशल्याची साक्ष देते असे म्हटल्यास चूक होणार नाही. शासकीय सेवेतील त्यांची उच्च पदावरील यशस्वी कारकिर्द पाहिली की, एव्हढी उच्च पदस्थ व्यक्ती माझ्यासारख्या सामान्यांशी देखील किती आपुलकीने नम्रतेने वागते याचे नवल वाटते. पण नम्रता हेच त्यांच्या यशाचे गमक आहे असेही म्हणावेसे वाटते.

त्यांचे निवृत्तीपरांत कौटुंबिक जीवन अतिशय साधे समाधानी, सात्विक व संतुष्ट आहे. अजूनही त्यांची बरीच पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. साहित्य क्षेत्रात बरेच काही सामाजिक विषयांवरील लिखाण करायचे आहे. आणि हो, त्यांच्या या यशस्वी वाटचालीत एका व्यक्तीला विसरून अजिबात चालणार नाही. वडिलांचे आशिर्वाद तर आहेतच पण त्याच्या सहधर्म- चारिणी सौ ज्योतीताई ह्यांची पूर्ण साथ असल्यामुळेच रा. गो. यशाच्या पायऱ्या चढू शकले हे ही नाकारता येणार नाही. एका कर्तबगार पुरुषाच्या यशामागे एक स्त्री असते ह्या विधानाची सत्यता ज्योतिताईच्या जीवनाकडे सखोल दृष्टीने पाहिले तर अनुभवास येते. संसारात येणाऱ्या अनेक अडचणीची झळ त्यांनी पतीला लागू दिली नाही, अतिशय जागरूकतेने प्रेमाने संसाराचा हा डाव त्यांनी नीट तोलून धरला. संयुक्त कुटूंब व्यवस्था हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य! ज्योतिताईंनी आपली सगळी नाती नीट जपली, सगळ्यांना जीव लावला, मुलांवर चांगले संस्कार केले, त्यांना चांगले शिक्षण मिळेल ही काळजी घेतली. त्यामुळे ज्योतिताई व राजाराम गो जाधव हे जोडपे जणू एक दूजेके लिये बनलेले आहेत असेच मला म्हणावेसे वाटते.

या दोघांनाही येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा !
जाधव सरांच्या हातुन साहित्याची सेवा अशीच घडत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना !

— लेखन : प्रतिभा पिटके. अमरावती
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vilas Baburao Sarode,Chh.sambhajinagar, Aurangabad on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ
विजय पवार, नासिक on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ