पूर्वीच्या आंध्र प्रदेशातील (आताच्या तेलंगण राज्यातील) ‘उस्मानिया विद्यापीठात सुमारे तीन दशकांच्यावर राज्यशास्त्राचे अध्यापन केलेल्या, 94 वर्षीय डॉ. प्रा. राजूरकरांची काही दिवसांपूर्वीच मी हैदराबादला जाऊन भेट घेतली.
डॉ. राजूरकर हे माझ्या वहिनींचे माहेरकडून नात्यातील. त्यामुळे 1956 पासून मी वेळोवेळी त्यांच्याबद्दल ऐकत असे. मात्र, प्रत्यक्ष भेट व्हायला बरीच वर्षे जावी लागली. त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांपासून (स्वातंत्र्य मिळाल्याच्या आसपासचा काळ) पं. नेहरूंबद्दल त्यांना आस्था वाटू लागली; आणि ती इतकी वाढत गेली की, त्यांनी पं. नेहरूंच्या राजकीय विषयांवर पी. एचडी. प्राप्त केली. त्यामुळे गेली जवळ जवळ 8 दशके या (आणि तदानुषंगिक) विषयावर ते वाचन, चिंतन, मनन, लेखन करत आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर ‘ विद्यापीठ अनुदान मंडळा ‘ (University Grants Commission – U. G. C.) ने त्यांची ‘ प्रोफेसर एमिरेट्स ‘ म्हणून नियुक्ती केली. त्यांना पंजाबी युनिवर्सिटी पतियाळाने ‘ डी. लिट. ‘ ही मानाची पदवी प्रदान केली. जाकीर हुसेन संस्थापित ‘ जामा मिलिया ‘ या विद्यापीठाशीही त्यांचा घनिष्ट संबंध होता.
गेले चार दशकांच्या वर देश / परदेशातील विविध विद्यापीठे, राष्ट्रीय चर्चा सत्रे, मातब्बर संस्था यांच्या व्यासपीठांवरून अमोघ व्याख्याने देत; आणि वेळेवेळी मराठी आणि इंग्लिश भाषांत सातत्यनं लेखन करत त्यांनी आपली बुद्धिमत्ता आणि विचार प्रकट केले आहेत.
1984 साली इंदिरा गांधींच्या हत्त्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे 414 खासदार निवडून आले. त्यांपैकी 100 पेक्षा जास्त खासदार तर प्रथमच लोकसभेत प्रवेश करत होते. त्यामुळे या सर्वांना लोकशाही, घटना, लोकसभेचे कामकाज अशा विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी लोकसभेचे तत्कालिन सभापती शिवराज पाटील – चाकूरकर यांनी डॉ. राजूरकर यांची तीन व्याख्याने आयोजित केली होती. ही व्याख्याने अत्यंत अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण होती.
पं. नेहरू, म. गांधी, हिंदु – मुस्लीम मानसिकता, स्वातंत्र्य आंदोलन हे त्यांच्या सतत चिंतनाचे विषय राहिले आहेत. या विषयांवर गेल्या वर्षीही ते अमेरिकेत व्याख्याने देण्यासाठी गेले होते. आत्ता दोन महिन्यांपूर्वी त्यांनी संभाजीनगर येथे दोन दिवस पं. नेहरू आणि म. गांधी या विषयांवर व्याख्याने दिली. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. लातूर, पुणे, हैदराबाद अशा ठिकाणी ते अजून व्याख्याने, मुलाखती देत असतात.
आज वयाच्या 94 व्या वर्षीही त्यांची प्रकृती उत्तम आहे. सर्व इंद्रिये लख्ख शाबूत आहेत. ही आमची भेट काही वर्षांनी झाली. माझंही वय आता 80 वर्षे झालं असल्यामुळे परत इतक्या लांब येणं होईल की नाही; यामुळे आमची ही भेट 6 तास इतकी प्रदीर्घ झाली. अर्थात, ती सुदीर्घही झाली !
या सहा तासांत ते अजिबात थकले नाहीत, जाम्भई दिली नाही, कुठल्या मुद्द्यासाठी वा तपशीलासाठी अजिबात अडले नाहीत, अद्यापही त्यांनी वाचलेल्या पुस्तकांतील / ग्रंथांतील वाक्ये, परिच्छेद ते न अडखळता उद्धृत करू शकतात !
पं. नेहरुंवर त्यांनी चीन, काश्मीरच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखवला. काश्मीर प्रश्न ‘ युनो ‘ मध्ये न्यायला नको होता; अशा अनेक बाबींवर टीका केली जाते. त्यांतील फोलपणा ते उलगडून दाखवतात. नेहरू किती द्रष्टे होते हे सांगताना त्यांनी 1927 सालीच भारताचे परराष्ट्र धोरण काय असावं, याचा विचार करून त्यावर टीपण तयार केलं होतं . तसंच, रशियाच्या दहा वर्षीय योजनेसारख्या पंचवार्षिक योजना आखून भारताचा विकास साधायचा; हे ही पक्कं केलं होतं. वैज्ञानिक दृष्टीकोन, लोकशाही, समाजवाद, धर्म निरपेक्षता, संसदीय लोकशाही, घटना यांबद्दलही त्यांचे विचार तेव्हाच पक्के झाले होते. म. गांधींनी सरदार पटेल यांच्या ऐवजी पं. नेहरूंची भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून निवड का केली; हे ही ते समर्पकपणे सांगतात.
राज्यशास्त्राच्या जोडीनं डॉ. राजूरकरांना ज्योतिष, क्रिकेट, चित्रपट अशा अनेक विषयांत उत्तम गती आहे; आणि ते या विषयांवर जाणकारीनं चर्चा करू शकतात. त्यांची स्मरणशक्तीही हेवा करण्याइतकी शाबूत आहे.
1949 साली मुंबईच्या ‘ ब्रेबॉर्न स्टेडियम ‘ वर भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यांत कसोटी क्रिकेट सामना झाला होता. (आपल्या पंचांच्या चुकीमुळे हा सामना वेस्ट इंडीज अनिर्णीत राखू शकली.) त्या सामन्यातील सर्व अकरा खेळाडूंची (बाराव्या खेळाडूसकट) नावे ते ज्या क्रमाने फलंदाजीसाठी उतरले त्या क्रमाने सांगू शकतात !
त्यांचा ज्योतिष शास्त्रावर डोळस विश्वास आहे. त्याच्या समर्थनासाठी त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत. ‘ अंधश्रद्धा निर्मूलन समिती ‘ च्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा फल ज्योतिष शास्त्रावर विश्वास नव्हता. पण डॉ. राजूरकर साताऱ्याला गेले होते, तेव्हा त्यांनी नरेंद्र दाभोलकर यांच्याशी सुमारे तीन तास चर्चा केली आहे.
मला चित्रपटसृष्टी आणि काही विषयांत रुची आहे, याचा फारसा उल्लेख कधी आमच्या गप्पांत झाला नव्हता. त्यांना अलीकडेच या बद्दल कळल्यावर त्यांनी आमची ही भेट महिन्यापूर्वी ठरली असताना या बद्दल मी बोलावे अशी सूचना केली होती. त्यामुळे मी चित्रपट सृष्टी, त्यातल्या भेटलेल्या भालजी पेंढारकर, नी. गो. पंडितराव, नौशाद, गुलजार आणि अन्य गोपाळ गोडसे आणि साहित्य वर्तुळातील भेटलेल्या अनेक नामवंत व्यक्ती यांवर बोललो; त्यांतले मनोरंजक अनुभव सांगितले. ते त्यांनी शांतपणे ऐकून घेतले.
डॉ. राजूरकर हे अत्यंत व्यवस्थित आणि नीट नेटके व्यक्ती आहेत. कोणीही भेटण्यापूर्वी, काय बोलायचं, कसे मुद्दे मांडायचे, याची ते कसून तयारी करतात. रोजच्या रोज ते दैनंदिनी लिहितात. त्यात भेटलेली माणसे, झालेली चर्चा यांचे तपशीलवार उल्लेख असतात. परत भेटण्यापूर्वी ते या वर नजरही टाकतात.
त्यांनी ‘ अंजली ‘, ‘ पं. नेहरू एक मागोवा ‘ ( सहलेखक प्रा. नरहर कुरुंदकर ), ‘ प्रकाशचित्रे ‘, ‘ वेगळी माणसं… वेगळ्या वाटा ‘, ‘ आवडलेलं लिखाण भावलेली माणसं… ‘, ‘ The Spirit Of Indian Freedom Movement ‘, अशी त्यांची, इंग्लिश 8 आणि मराठी 6 पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.
भारतातील आणि परदेशातील विविध व्यक्तींच्या ते नित्य संपर्कात असतात. न्या. मू. नरेंद्र चपळगावकर, प्रा. दिनकर बोरीकर, किशोर बेडकीहाळ, डॉ. जनार्दन वाघमारे अशा अनेक व्यक्ती त्यांच्याबद्दल आदरानं बोलतात, लिहितात. यांपैकी काहींना मी भेटलो असताना मलाही तोच अनुभव आला.
त्यांचा जन्म हैदराबाद संस्थानात झाला. त्यामुळे त्यांचं प्राथमिक शिक्षण उर्दूत झालं आहे. उर्दू ही मुस्लिमांची भाषा नाही, असं ते आवर्जून प्रतिपादन करतात. त्यांना काव्याची उपजत जाण असल्यामुळे ते उर्दू काव्य, आणि शेरोशायरी याचे उत्कृष्ट जाणकार आहेत. वेळ प्रसंगी ते उचित शेर सादर करतात.
‘ इस्लामी धर्मग्रंथाची ओळख ‘, हमीद दलवाई, ‘ उर्दू लेखकांच्या चष्म्यातून नेहरू ‘, जोश मलीहाबादीचे आत्मचरित्र ‘ यादोंकी बारात ‘, मिर्झा गालिब, मखदूम मोहियुद्दिन, नवाब तुराब अली अशा उर्दू पुस्तके आणि मुस्लीम व्यक्ती यांवर त्यांचं जाणकारीनं लेखन झालं आहे. सध्या हैदराबादस्थित नीता पांढरीपांडे यांनी उर्दू शायरांवर एक पुस्तक लिहिले आहे. त्याला डॉ. राजूरकर हे प्रस्तावना लिहित आहेत.
त्यांच्या आयुष्यातील अनाकलनीय हकीकतीही त्यांनी एका लेखाद्वारे नोंदवून ठेवल्या आहेत.
निघताना त्यांनी मला त्यांचं ‘ आवडलेलं लिखाण भावलेली माणसं ‘ हे पुस्तक भेट दिलं; तर मी त्यांना मी लिहिलेली ‘ चंदेरी सृष्टी सोनेरी गोष्टी ’, ‘ अभिनेता विवेक ‘ आणि ‘ आठवणी मोठ्या आईच्या ‘ ही तीन पुस्तकं भेट दिली.
जाता जाता :
१. वरती 1948 साली झालेल्या भारत – वेस्ट इंडीज क्रिकेट सामन्याच्या सर्व खेळाडूंची नावे डॉ. राजूरकरांनी सांगितल्याचा उल्लेख आला आहे. त्यांत एक नाव कृष्णम्माचारी रंगाचारी या खेळाडूचं होतं. या रंगाचारीची आणि माझी भेट 1971 च्या जून महिन्यात पुण्याला एका लग्नसमारंभात पडली. आम्ही सुमारे एक तासभर गप्पा मारल्या होत्या. त्यालाही ज्योतिष शास्त्रात चांगली गती होती.
2. हा सामना पंच जोशी यांच्या चुकीच्या कृतीमुळे कसा वेस्ट इंडिजला वाचवता आला; याबद्दलची हळहळ प्रा. ना. सी. फडके यांनी त्यांच्या ‘ अशा झुंजा, असे झुंजार ‘ या पुस्तकात नोंदवून ठेवली आहे !
3. डॉ. राजूरकर स्वत: तर रोजच्या नोंदी ठेवतातच; पण त्यांच्या संपर्कात आलेल्या विवेक देशपांडे (निवृत्त पोलीस सह आयुक्त), डॉ. प्रा. विजय पांढरीपांडे (भूतपूर्व कुलगुरू ‘ डॉ. आंबेडकर – मराठवाडा विद्यापीठ), विद्या देवधर अशांसारख्या व्यक्तींनाही अशा नोंदी ठेवाव्यात असं आग्रहानं सुचवतात. ‘ याचा मला फायदा झाल्याचं ‘ विवेक देशपांडे यांनी मला आवर्जून सांगितलं.
४. पी. एचडी. चा प्रबंध लिहिताना त्यांच्या पं. नेहरूंशी दोनदा दीर्घ भेटी झाल्या होत्या. तिशीतील राजूरकरांनी त्यांच्या बुद्धिमत्तेची अशी काही छाप पं. नेहरुंवर पाडली होती, की नंतर काही वर्षांनी हैद्राबादमधील एक कॉंग्रेसचे पुढारी आणि माजी मंत्री दिगंबर बिंदू नेहरुंना भेटले तेव्हा त्यांनी ( पक्षी : नेहरूंनी ) तरुण, बुद्धिमान मित्र डॉ. राजूरकरांची आवर्जून चवकशी केली होती !
— लेखन : प्रकाश चान्दे. डोंबिवली
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800