डॉ. उषा रामवाणी गायकवाड यांची मातृभाषा सिंधी असली तरी त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात मार्गदर्शकाच्या मदतीशिवाय,’एकोणिसाव्या शतकातील निबंधवाङ्मयातून व्यक्त होणारे स्त्रीजीवनविषयक चिंतन’ या विषयावर २००६ साली पीएचडी केली. त्यांच्या प्रबंधाला प्रा. अ. का. प्रियोळकर हा उत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार प्राप्त झाला. या यशाची दखल मराठीतील सर्व वर्तमानपत्रांनी तसंच ‘ई’ मराठी (कलर्स) आणि सह्याद्री वाहिनीने घेतली. सोलापूर येथील विठाबाई पसारकर स्मृत्यर्थ दिला जाणारा संशोधनासाठीचा पुरस्कार ऑगस्ट २०१८ मध्ये मिळाला. त्यांनी मृण्मयी हा पारितोषिक प्राप्त दिवाळी अंक १९९३ पासून सहा वर्षं एकहाती संपादित – प्रकाशित केला आहे. त्यांच्या पहिल्याच अंकाला बार्शी येथील सीतादेवी सोमाणी प्रतिष्ठानचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. प्रा. अरुण कांबळे यांच्या चीवर, युगप्रवर्तक डॉ. आंबेडकर आणि चळवळीचे दिवस या वैचारिक पुस्तकांचं १९९६ साली, तसंच सुमती इनामदार यांच्या ‘दिंडी आणि चांदोबाचा अंगरखा’ या काव्यसंग्रहाचं २००८ साली संपादन – प्रकाशन केलं आहे. अनेक प्रतिष्ठित नियतकालिकांत पुस्तक परीक्षणं, लेख, कविता, नामवंतांच्या मुलाखती आणि पत्रं प्रसिद्ध झाली आहेत.

अनेक शाळा – कॉलेजेसमध्ये शुद्धलेखनविषयक कार्यशाळांचं आयोजन केलं आहे. तसंच अनेक प्रतिष्ठित प्रकाशन संस्थांत मुद्रितशोधन आणि संपादन साहाय्य केलं आहे. राज्यस्तरीय अनेक निबंधस्पर्धांत प्रथम, द्वितीय क्रमांकाची पारितोषिकं मिळवली. वरील ‘ओळखी’ला अभूतपूर्व अशा प्रदीर्घ संघर्षाची आणि तपश्चर्येची जोड आहे. वाट्याला अत्यंत रेअर असं दुर्दैवी आयुष्य आलं. त्याबद्दल “निर्वासित” हे आत्मकथन जून २०२३ मध्ये प्रसिद्ध केलं आहे. अशा लेखिका, संपादक डॉ उषा रामवाणी आजही आशा बाळगून जगत आहेत. त्यांचे संघर्षमय जीवन काव्यातून रेखाटले आहे कवयित्री सौ स्वाती तोंडे पाटील यांनी. या दोघींच्याही पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
नावच तिचे रामवाणी उषा
नव्या स्वप्नांची बाळगून आहे आशा..
लहानपणापासूनच तिच्या
जीवनाची सुरू झाली दशा….१
जन्माने आहे सिंधी
पण मराठीवरच प्रेम केले….
निर्वासित म्हणूनच त्यांचे
जीवन महाराष्ट्रत गेले…२
सिंधी लोक महाराष्ट्रात
जमेल तसा व्यापार करायचे..
मिळालेल्या पैशातच
आपले पोट आनंदाने भरायचे…३
घरातून शिक्षणाला
कायमच विरोध असायचा….
पण उषाचा स्वभावच
नव्हता गप्प बसायचा….४
सर्वच रूढी परंपरांना तिने
सहजच झुगारले….
आणि स्वपुढाकाराने उषाने
शिक्षणाचे अस्त्र उगारले….५
बऱ्याच रूढी परंपरांशी
तिने सामना केला..
आणि अलगद शिक्षणाचा
दरवाजा खुला झाला…६
सिंधी समाजामध्ये बहुसंख्य
समाज व्यापारीच असायचा…
चुकूनमाकूनच एखादा
वकील, डॉक्टर दिसायचा…७
दहावी नंतर पुढे उषाला
खूप शिकायचे होते….
पण पुढे शिकू द्यायचे हे
कोणाच्याही मनात नव्हते…८
पण उषाला शिक्षणाचे
माहित होते महत्व….
शिक्षणाशिवाय पर्याय नाही
हे जाणले होते तिने तत्व….९
तिच्या वडिलांची समजूत
तिच्या गुरुंनी काढली….
पुढे तिला शिक्षणासाठी
आजीकडे धाडली…..१०
या उत्साही मुलीचे कॉलेजमध्ये तिच्या
यशाबद्दल खुप खुप कौतुक झाले….
तरीही वडिलांना शिक्षणासाठी खर्च
करणे कधीच योग्य नाही वाटले….११
शेवटी उषाने नोकरी करून
शिक्षण घेण्याचा निर्धार केला…
बापाचा मुलाच्या शिक्षणासाठी
मात्र अमाप खर्च वाया गेला…१२
उषाला पुढे डोळ्यांचा त्रास झाला पण
समाज रूढीमुळे चष्मा नाही लावता आला…
यावरूनच त्यांच्या सामाजिक रूढी परंपरेचा,
वैचारिक पातळीचा अंदाज आला…१३
आईही भजन कीर्तनात असे मग्न
घरात शिक्षणाला नव्हते मुळीच स्थान…
उषाकडेही ज्योती बहिणीशिवाय
कोणाचेच बिल्कूल नव्हते ध्यान…१४
पुढे मराठी विषयात तिने एम. ए. केले
प्राध्यापकाकडूनही भरपूर छळवाद झाले…
होस्टेलचे निकृष्ट अन्नही प्राशन केले
अशा त्रासातच तिचे
पी एच्.डी पूर्ण झाले….१५
तिच्या विशुद्ध पवित्र ज्ञानाचे कौतुक झाले
अनेक सत्कार, पुरस्कारही मिळाले..
आता खऱ्या जोडीदाराचे वेध लागला
तिने स्वतःच जोडीदार निवडला…१६
वयाच्या ५२ व्या वर्षी जोडीदारासोबत
तिने सहजीवन सुरू केले….
स्वतःच स्वतःच्या जीवनाचे
खुप छान सार्थक केले…..१७
अशा भयाण महा संघर्षातून
नवी उषा उदयाला आली….
तिच्या अलौकिक कर्तृत्वाने
पूर्व क्षितीजावरही लाली आली…१८
अशी ही उषा अनंत संघर्षाचे
गडकिल्ले एकटीच चढली….
पण ज्ञानाचे दरवाजे उघडण्यासाठी
अखेरपर्यंत ही दुर्गा
सर्वांशी लढली…१९
अशी ही परप्रांतीय जिद्दी लाडली
अवघ्या महाराष्ट्राची झाली लाडकी लेक….
आपणा सगळ्यांना उदंड प्रेरणा
देणारी ही कन्या झाली लाखात एक…२०

— रचना : सौ स्वाती वा. तोंडे पाटील. इंदापूर, पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800