Saturday, July 20, 2024
Homeलेखरामायणातील शांत शांता

रामायणातील शांत शांता

हो शांता ! मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाची बहिण ! रोमपाद ऋषींची पत्नी …अंग देशचे राजा रोमपाद आणि राणी वर्षिणी यांची दत्तक कन्या एवढीच तिची ओळख नसून अयोध्या नरेश दशरथ राजा आणि कौसल्या राणी यांची कन्या, राजा दशरथ आणि माता कौसल्या जन्मदाते, अशी ती भाग्यवान आहे.

अलौकीक अयोध्या नगरीतील राजप्रासादात बालपण फुलत होते. माता आनंदात होती. “शांतेच्या बाल्याने राजप्रासादात आनंद नांदतोय. आपल्या मातेसारखी शांता सुंदर आणि धर्मपरायण आहे !” असे सारे म्हणत होते ..

एक दिवस तिची मावशी वर्षिणी आणि तिचे पती रोमपाद दोघे अयोध्येला मातेला भेटायला आले. रोमपाद हे अंग देशाचे राजा होते. विवाहाला बरीच वर्ष झालीत तरी त्यांना पुत्र प्राप्ती झाली नव्हती. त्यामुळे ते दोघे अतिशय दुःखी होते. पण दोघे शांता सवे खूप आनंदात होते. तिची प्रतिभा, स्वभाव बघून खूष झाले. जणू त्यांचे दुःख पळून गेले. मावशीने तर किती लाड केले. शेवटी म्हणाली, “कौसल्या, मला अशी शांतासारखी कन्या हवी. मजेत म्हणाली देखिल हिलाच मी दत्तक घेऊ कां ?” हे तातांनी ऐकले. मावशीचे दुःख बघून त्यांच्या हृदयाला पाझर फुटला. तातांनी माझी कन्या तुला दत्तक देतो असे वचन दिले. दशरथ राजाने आपली कन्या शांता रोमपाद राज्याला दत्तक दिली. वचन पूर्तता केली.

कौसल्येची राजकन्या तिच्या बहिणीच्या पदरात टाकली. तिचे मातृत्व कदाचित दुखावले असेल. पण आपल्या बहिणीचे मातृत्व सुखावले यातच तिने समाधान मानले असेल.

शांता मावशीकडे अंग देशातील राजवाड्यात आली. दोघही खूप प्रेम करायचे. तिला दोन माता आणि दोन पिता मिळाले होते. मावशीकडे लालन पालन झाले. दिवस सरत होते. तिने तारुण्यात प्रवेश केला. सौंदर्याबरोबर वेद, कला आणि शिल्पाच्या ज्ञानाचे वरदान मिळाले होते.

तिच्या अंग राज्यात दुष्काळ पडला. अन्नान स्थिती झाली. जनतेचे हालहाल होऊ लागले. दुष्काळाच्या समस्येवर, नैसर्गिक संकटावर काही उपाय सांगावा म्हणून पिताश्री राजा रोमपदांनी ऋष्यशृंगी मुनींना आमंत्रित केले. ऋष्यशृंग मुनींनी यज्ञ करण्याकरिता सांगितले. समंत्र विधिपूर्वक महायज्ञ संपन्न झाला ! आणि आश्चर्य घडले. राज्यात पाऊस पडला. आनंदी आनंद झाला. राज्याच्या एवढ्या महासंकटावर विजय मिळाल्याच्या आनंदात पिता राजा रोमपादांनी ऋष्यशृंग मुनींबरोबर विवाह करुन दिला. ऋषि श्रृंग महान तपस्वी मुनि होते. ते वसती करायचे शांती आणि समृद्धी नांदायची. जिथे त्यांचे पाऊल पडायचे तेथे हिरवाई असायची. विवाहानंतर दोघेही सुखपूर्वक दांपत्य जीवन आनंदाने जगू लागलो.

असे होते या शांतेचे जीवन ! आयुष्य कुणाचे ? निर्णय कुणाचे ? दशरथ तातांनी क्षणांत निर्णय घेऊन तिची आई असतांना तिला मावशीच्या पदरात टाकली. त्यांनी ना कन्येच्या आईला विचारले, ना कन्येचा विचार केला. ना कधी संबंध ठेवला ! …कन्या राजससिंहासनावर बसू शकत नसल्यामुळे क्षणात निर्णय घेतला असेल !…

पुन्हा आयष्यात तेच घडले. रोमपाद तातांनी आपल्या शांता राजकन्येचा विवाह एका ऋषींशी करुन दिला. ऋषींच्या शिरी एक छोटे शिंग होते. राजप्रासादातून कुटीतील जीवन नशिबात आले. त्यांनीही कन्येचा विचार केला नाही !

अयोध्येची राजकन्या, अंगदेशाची राजकन्या आता कुटीत राहून ऋषींबरोबर संसार करत होती.. अयोध्येशी पुन्हा कधी संबंध आला नाही. कशी असेल कौशल्या माता ?

एक दिवस मुनींना भेटायला अयोध्या नरेश दशरथ आल्याचे समजले. दशरथ राजाला तीन पत्नी होत्या. तिची कौसल्या माता होती. त्यांनतर कैकयी आणि सुमित्रा या दोन पत्नी त्यांनी विवाह करुन आणल्या.

आपल्या कन्येला दत्तक दिल्यावर त्यांना संतती झाली नाही ! राज्याला वारस नाही ! राजा दशरथ चिंतीत होते. त्यांनी आपली समस्या ऋषि वशिष्ठांना सांगितली. वशिष्ठ ऋषींनी ऋष्यशृंगी ऋषींना आमंत्रित करुन पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचे दशरथ राजाला सुचविले.

ऋष्यशृंगी ऋषिचे नाव ऐकून त्यांना आपल्या कन्येची आठवण आली. ते ऋष्यशृंग मुनींकडे आले. यज्ञाचे सारे बोलून निघून गेले. मुनींनी मान्य केले.

शांता ला खूप आनंद झाला. अयोध्येला जाता येईल. कौसल्या मातेला भेटता येईल ! पण मुनींनी अयोध्येत येण्यास मनाई केली. ती आपली कुटीतच राहिली.

पुत्रकामेष्टी यज्ञ संपन्न झाला. सफल झाला. तीनही राण्यांना यथावकाश पुत्र प्राप्ती झाली. कौसल्या मातेने रामाला, कैकयी मातेने भरताला, सुमित्रा मातेने लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना जन्म दिला.

ऋष्यशृंग मुनींचा अभिमान वाटला. त्यांच्या यज्ञ साफल्यामुळे तिचे तात दशरथ राजाकडे चार पुत्र जन्माला आले. जणू चार वेद होते. रामासारखा मर्यादापुरुषोत्तम बंधू मिळाला हे शांता चे भाग्य होते.रामाचा अभिमान वाटायचा. पण कधी शांतेला अयोध्येला बोलावले नाही. रामाची भेट कधी झाली नाही. पण रामाची भगिनी शांता हे नाव रामायणात अमर झाले.

— लेखन : मीना खोंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments