एक पुस्तक नुकतेच वाचनात आले आणि त्यामुळे मला रायगड भूषण राजाभाऊ कोठारी यांची आठवण आली.
३० जून १९६२ रोजी जन्मलेले राजाभाऊ कोठारी यांच्या वडिलांचे लहानपणी निधन झाले. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले, परंतु ते डगमगले नाहीत. मोठ्या भावाने व आईने दुकान सांभाळले व राजाभाऊ बीकॉम झाल्यानंतर त्यांनी सुयश क्लासेस सुरू करून संसाराला हातभार लावला.
राजाभाऊंना गरिबीची जाणिव असल्याने त्यांनी अनेक गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिकवले. दर वर्षी पंचवीस विद्यार्थांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी त्यांनी आर्थिक मदत केली. आता पर्यंत त्यांनी कमीत कमी पाच हजार विद्यार्थ्यांना मोफत शिकवले आहे. अशा तऱ्हेने ज्ञान दान केल्यानंतर त्यांनी स्वतः रक्तदान करून रक्तदान शिबिरे आयोजित करण्यास सुरूवात केली.
राजाभाऊ यांनी पहिले रक्तदान शिबिर ८ जानेवारी १९८९ रोजी डॉ.हेडगेवार जन्मशताब्दी वर्षानिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या कर्जत शाखेतर्फे आयोजित केले. २४ नोव्हेंबर २०२४ रोजी त्याच संस्थेतर्फे पाचशेवे रक्तदान शिबिर आयोजित केले हा एक विक्रमच म्हणावा लागेल. या पाचशेव्या शिबिरात एकूण ६२ हजार रक्त पिशव्या जमा झाल्या आहेत. स्व.तिर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेल्या शिबिरात पाचशे बावीस पिशव्या रक्त जमा झाले होते, इतकेच नव्हे तर स्वतः राजाभाऊंनी आता पर्यंत १०७ वेळा रक्तदान केले आहे.
राजाभाऊंच्या कार्याची दखल अनेक संस्थांतर्फे घेण्यात आली असून त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १७ जानेवारी २००३ रोजी तत्कालीन राज्यपाल मोहमद फाजल यांच्या हस्ते राजाभाऊंचा सत्कार करण्यात आला. कर्जतच्या नागरिकांनी त्यांचा नागरी सत्कार करून त्यांना एक लाख रुपयाची थैली दिली. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणाऱ्या राजाभाऊ कोठारी यांनी हे एक लाख रुपये बँकेत ठेव म्हणून ठेवले आणि त्याच्या येणाऱ्या व्याजात स्वतःची रक्कम टाकून दरवर्षी शंभर बाटल्या रक्त आदिवासी व गरीब व्यक्तींना पुरवण्यास सुरूवात केली.
राजाभाऊ कोठारी यांचे आणि रक्तदान शिबिराचे समीकरण असे जमले आहे की ते जवळच्या लग्न कार्याला जाण्यापेक्षा दिवसभर रक्तदान शिबिराला हजर असतात. राजाभाऊ यांना “रक्तदाता” म्हणून सर्वजण ओळखतात. त्यांना रायगड जिल्हा परिषदेतर्फे “रायगड भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कोणताही सन्मान स्वीकारताना राजाभाऊ कोठारी विनम्रपणे सांगतात की, हा माझा सत्कार नसून रक्तदान करणाऱ्यांचा तसेच रक्तदान शिबिर आयोजित करणाऱ्या व या शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचा सत्कार आहे. आपल्या भाषणाच्या शेवटी ते एक संदेश देतात,
“एकदा रक्तदान I
देईल तिघांना जीवनदान II
विसरूनी जाती धर्मसारे I
रक्तदान करुनिया एक होऊ यारे II”
रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांच्या कार्याची कक्षा रुंदावली आहे. ते शिबिरांच्या आयोजनामुळे रक्तपेढ्या, अनेक सामाजिक संस्था, देणगीदार, डॉक्टर्स इत्यादींच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. त्या ओळखीचा ते स्वतःसाठी उपयोग करून न घेता कोणत्याही रंजल्या गांजलेल्या रुग्णाला जी आवश्यक असेल ती मदत करतात. राजाभाऊ कोठारी यांची ही भूमिका बघितल्या नंतर संत तुकाराम महाराजांच्या अभंगांची आठवण येते.
“जे का रंजले गांजले I
त्यासी म्हणे जो आपुले
तोचि साधु ओळखावा I
देव तेथेचि जाणावा”
राजाभाऊ कोठारी यांचे कार्य महान आहे. ज्या रुग्णांचे प्राण वाचले आहेत त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना राजाभाऊ मध्ये प्रत्यक्ष “देव” दिसतो.
हा लेख वाचल्यानंतर अभिरुचीसंपन्न, मनाची मशागत जाणिवेने केलेले संवेदनशील वाचकांनी राजाभाऊ कोठारी यांनी प्रज्वलित केलेल्या “जाणिवांच्या ज्योती” कायम स्वरूपी प्रज्वलित राहण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त सहकार्य केले तर या ज्योतींचा उजेड कर्जत अथवा रायगड पुरता मर्यादित न रहाता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरेल व “रुग्णमित्र” राजाभाऊ कोठारी यांची महती व त्यांच्या कार्याची माहिती सर्व महाराष्ट्रभर पसरेल यात शंकाच नाही.
निरपेक्षपणे “रुग्णसेवा” करणाऱ्या राजाभाऊ कोठारी यांना पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. त्यांना चांगले आरोग्य व धनसंपत्ती लाभो ही परमेश्वरचरणी प्रार्थना.
— लेखन : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800